एकंदरीत कादंबरीत अतिशय प्रवाही आणि सरळ सोपी भाषा वापरली आहे जी कथानकाला गतिमानता देते. फक्त या कादंबरीत प्रकरणांची संख्या अकारण वाढवली आहे असं वाटतं. सलग कथानक, त्यातली लय साधणारं, भावनात्मक नाट्य पकडणारं असं हे अतिशय कसदार लेखन आहे.
सुजाता राऊत
“एकटे पोळणारे दुःख अनिकेत
येते का सांत्वनाच्या सावलीत?
करूणेने भिजतो का
थोडा निर्दयतेचा काठ ?
थांबते का एखादी विनाशाची लाट?”
कवयित्री अरुणाताई ढेरे यांच्या या ओळी अनेकदा वाचलेल्या आणि मनात रुजलेल्या. पण एखादे जीवनदर्शन असे असते की वरील ओळींची सत्यता पटते आणि मनाला काही केल्या सांत्वना मिळत नाही.
कवयित्री लेखिका छाया कोरेगावकर यांची “रिक्त विरक्त” ही कादंबरी वाचायला घेतली की आपल्या मनातही एका वेदनेचा प्रवास सुरू होतो. एका स्वप्नपूर्तीच्या अति व अट्टाहासापायी जीवनेच्छेचा धागा चिवटपणे धरून ठेवण्याच्या बाईच्या जिण्याचा जमा खर्च म्हणजे ही कादंबरी” असं लेखिकेने सुरुवातीलाच म्हटले आहे. विलक्षण गतिमान ,प्रवाही पण धक्के देत वळणावळणाने पुढे जाणाऱ्या या कादंबरीचं एक ठळक चित्र वाचक मनावर उमटतं. त्यातून अनेक नवीन प्रश्न समोर उभे ठाकतात.
कादंबरीची सुरुवात सावित्री भोसले या नायिकेच्या लहानपणापासून होते. कुशाग्र बुद्धीची, कष्टाळू, तरतरीत सावित्री .लहान भावंडांचा सांभाळ करणारी ,जबाबदारीने वागणारी, अनेक कलागुण तिच्यामध्ये आहेत. पण तारुण्याच्या उंबरठ्यावर घरातून निघून विराजशी लग्न करणं हे एक चुकीचं पाऊल पडतं आणि तिच्या आयुष्याची पूर्ण दिशाच बदलते. छोटं मूल पदरात घेऊन फसवणूक ,मानहानीने घायाळ झालेली,स्वप्नभंग झालेली ही तरुण सावित्री माहेरी परतते. जिद्दीने शिक्षण पूर्ण करून मुलाला वाढवते. जातीयतेचे चटके तिला लहानपणापासूनच अनुभवायला येत असतात. सगळ्याला तोंड देऊन सरकारी नोकरीत स्वतःला प्रस्थापित करणाऱ्या सावित्रीचा हा प्रवास लेखिकेने शब्दशः जिवंत केला आहे.
स्त्रीचं आयुष्य, तिच्या बाबतीतले नितीनियम,समाजात असलेल्या स्त्रीच्या वर्तणुकीबद्दल असणारे ठोकताळे, दुटप्पी कल्पना, भारतीय जातव्यवस्थेचं वास्तव या सगळ्याच प्रत्यंतर सावित्रीचा पुढचा जीवन प्रवास पाहताना येतं. वयाच्या चाळीशीच्या उंबरठ्यावर विवाहित आदिनाथशी झालेली ओळख, मैत्रीचे गुंफलेले धागे, त्यांची भावनिक गुंतवणूक, आदिनाथ आणि सावित्रीच्या कुटुंबाच्या प्रतिक्रिया, न सुटणारे सतत जटील होत जाणारे तिढे यांचं चित्रण करताना, अनेक पात्रे त्यांचे स्वभाव चित्रण समोर येतं. ते प्रसंग लेखिकेने विलक्षण हातोटीने समोर उभे केले आहेत. त्यातलं नाट्य नकळत मनावर परिणाम करून जातं. सावित्री भोसलेचे हे प्रश्न पृष्ठ पातळीवर राहत नाहीत तर वाचकाला सहसंवेदना देण्याची ताकद या लेखनात आहे.
एक स्त्री जी बुद्धिमान आहे, मनस्वी ,कवी मनाची आहे, जिला प्रेमाची उत्कट ओढ आहे, जिच्यामध्ये त्याग, समर्पण, इतरांविषयी करूणा आहे, त्याचवेळी ती बुद्धिवाद जपणारी, स्वतःच्या तत्त्वांना मुरड न घालणारी आहे. अशी ही सावित्री जिने समाजाच्या नितीनियमांना झुगारून विवाहित आदिनाथ बरोबर राहण्याचा निर्णय घेतला. तथाकथित पारंपारिक चौकटी तिने झुगारून दिल्या आहेत. त्यातून प्रत्येक पावलाला तिला संघर्ष करावा लागतो. तिचा मुलगा स्वप्निल ,तिचे वडील आणि तथाकथित समाजरक्षक सगळेच तिच्याविरुद्ध जातात. आदिनाथच्या कुटुंबातून विलक्षण मानहानी, तेजोभंग या सगळ्याचा सामना तिला करावा लागत असताना कामाच्या ठिकाणीही अनुभवलेले जातीयतेचे चटके, तिच्या वैयक्तिक आयुष्याचा अकारण जोडलेला संबंध या विविध पातळ्यांवर ती सतत लढत राहते. जखमी होत राहते. स्वतःच्या कवित्व शक्तीने पुन्हा पुन्हा उमलत राहते ,आदिनाथ वरच्या प्रेमाने स्वतःलाच फुलवत ठेवते.
सावित्रीचा हा प्रवास अत्यंत प्रामाणिक आहे. कादंबरीतील नायिका जशी फक्त सद्गुणांची पुतळी असते तशी ही नसून ती हाडामासांची जिवंत व्यक्तिरेखा आहे. तिच्यात भावना, विकार, उफाळून आलेलं मनातलं न शमणारं वादळ हे प्रत्येक प्रकरणातून पुढे येतं. नोकरी मधल्या बदल्या ,आदिनाथचं अगम्य वागणं,स्वप्निलची पितृसत्ताक मनोवृत्ती, त्याचा असहकार या सगळ्यांना तोंड देत ती स्वतःचा शोध घेत, सामाजिक उद्दिष्टे शोधत राहते. समाजासाठी काम करण्याची तिची तळमळ विलक्षण आहे. निरंतर अवहेलनेतून मनातली कोवळीक बेचिराख होत असताना, कधी कधी सावित्री पूर्णतः कोसळून पडते. स्त्रीचे चारित्र्य आणि त्याविषयी समाजात असणाऱ्या पारंपारिक कल्पना, व्यवहारात असणारी दुटप्पी नीती यावरही येथे थेट भाष्य केले आहे. स्त्रीच्या मनाबरोबरच तिच्या शारीर जाणिवांबद्दलही नायिका थेट बोलते. स्वतःच्या लैंगिक जाणीवांबद्दल ,स्त्री हक्क असण्याच्या हक्काबद्दल ती बोलते. मराठी कादंबरीत इतकं थेट पण संयत चित्रण प्रथमच आलं आहे.
सावित्रीच्या मनातले झाकोळ, कल्लोळ,तिचं तुटून जाणं, पुन्हा नव्याने उभं राहणं, तिला आलेलं सामाजिक भान तिच्या प्रातिभ व्यक्तिमत्त्वाला फुटलेले धुमारे सर्व काही लीलया उघडून दाखवताना या कादंबरीत सरळ साध्या संवादांचा प्रभावी वापर केला आहे. लेखिकेची भाषा कधी कधी काव्यात्म होते कारण ती अस्सल कवयित्री आहे. “सुरेल गाण्याची तान समेवर येता येता तंबोऱ्याची तार तुटावी तसं व्हायचं” किंवा “रोमांचांची लड सावित्रीच्या सर्वांगातून सळसळत गेली.” ” फुटणारं रडू रोखून धरावं तसा पाऊस ढगात अडकलेला, पडू पाहणारा ओथंबलेला पण न पडणारा “अशी अनेक उदाहरणे देता येतील. पण एकंदरीत कादंबरीत अतिशय प्रवाही आणि सरळ सोपी भाषा वापरली आहे जी कथानकाला गतिमानता देते. फक्त या कादंबरीत प्रकरणांची संख्या अकारण वाढवली आहे असं वाटतं. सलग कथानक, त्यातली लय साधणारं, भावनात्मक नाट्य पकडणारं असं हे अतिशय कसदार लेखन आहे.
प्रकरणे करताना योग्य संपादनाची गरज होती. काही मुद्रण दोषही आहेत. हे मनाआड केलं तर कादंबरी एक विलक्षण अनुभव देऊन जाते. वाचकाला भावनिक मानसिक थकवा येतो व मनात अनेक प्रश्नांची गर्दी होते. हेच या कादंबरीचे खरे यश आहे. ग्रंथालीने प्रकाशित केलेल्या कादंबरीचे समर्पक मुखपृष्ठ देवेंद्र उबाळे यांनी केले आहे तर पुस्तकाची पाठराखण डॉ. माया पंडित यांनी केलेली आहे. सावित्रीच्या सत्व शोधाचा ही यात्रा तिला सामाजिक भान देऊन जाते. एक पोळणारे अनिकेत दुःख ओंजळीत घेऊन वाटचाल करणाऱ्या संवेदनक्षम स्त्रीचा हा प्रवास थक्क करणारा आहे.
पुस्तकाचे नाव – रिक्त- विरक्त
लेखिका : छाया कोरेगावकर मोबाईल – 9359136770
प्रकाशनः ग्रंथाली प्रकाशन
पृष्ठसंख्या ३१४
किंमत ४००