September 22, 2023
need-of-mind-and-wisdom-unity-rajendra-ghorpade-article
Home » जे मन बुद्धी इहिं । घर केले माझां ठायी ।
विश्वाचे आर्त

जे मन बुद्धी इहिं । घर केले माझां ठायी ।

कोणतेही कार्य करताना मन आणि बुद्धी यांचे ऐक्य असायला हवे. तरच ती कृती योग्यप्रकारे होते. मनाने एखादी गोष्ट करण्याचा पक्का निर्धार केला तर त्यात कितीही अडथळे आले तरी ती गोष्ट साध्य करण्यात आपणास निश्चितच यश मिळते.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे

मोबाईल 9011087406

जे मन बुद्धी इहिं । घर केले माझां ठायी ।
तरी सांगे मज काई । मी तूं ऐसे उरे ।। 99 ।। ज्ञानेश्वरी अध्याय 12 वा

ओवीचा अर्थ – कारण की, मन व बुद्धी ही माझ्या ठिकाणी कायमची राहिली तर मग, मी व तूं असे द्वैत उरेल काय ? सांग.

अभ्यासाला बसल्यानंतर मन दुसरीकडे भरकटत असेल तर अभ्यास कसा होईल. बुद्धीत काहीच शिरणार नाही. यासाठी अभ्यास करताना मन आणि बुद्धी यांचे ऐक्य असणे गरजेचे आहे. शिक्षक वर्गात शिकवत असताना मन मात्र पटांगणातील खेळावर असेल तर शिक्षकांनी काय शिकवले हे कसे लक्षात राहील. कारण मन वर्गात नव्हतेच. शरीराने आपण वर्गात होतो. पण मनाने मात्र पटांगणात होतो. काय शिकवले याकडे लक्षच नसेल तर बुद्धीत काहीच शिरणार नाही. यासाठी मन वर्गात शिक्षकांच्या शिकवणीकडे लागणे गरजेचे आहे.

मनाचा निर्धार गरजेचा

गाडी चालवताना किंवा सायकल चालवताना लक्ष त्या कार्यावर असायला हवे. अन्यथा अपघात होण्याचा धोका अधिक असतो. म्हणजेच कोणतेही कार्य करताना मन आणि बुद्धी यांचे ऐक्य असायला हवे. तरच ती कृती योग्यप्रकारे होते. मनाने एखादी गोष्ट करण्याचा पक्का निर्धार केला तर त्यात कितीही अडथळे आले तरी ती गोष्ट साध्य करण्यात आपणास निश्चितच यश मिळते. म्हणून अभ्यास मनाने करायचा आहे. मनाने पक्का निर्धार करायचा आहे. तरचं अभ्यासात चांगले यश संपादन करता येईल. खचलेल्या मनाने यश संपादन करता येत नाही. खचलेले मन अपयशाने अधिकच खचते. म्हणून मनाने पक्का निर्धार करा यश तुम्हाला निश्चितच मिळेल. मनाला बुद्धीची साथ मिळाली तर यश निश्चितच आहे.

देह आणि आत्मा ओळखायला हवा

मनाने पक्का निर्धार करा मला आत्मज्ञानी व्हायचे आहे. यासाठी असणारा गुरुमंत्र मनात साठवायचा आहे. मनाचा निर्धार पक्का झाला, तर सो ऽ हमचा स्वर मनाला निश्चितच ऐकयला येईल. बुद्धीत तो स्वर पक्का होईल. मन आणि बुद्धी त्यावर एकत्र आली तर आत्मज्ञानाचा निश्चितच लाभ होईल. मी आत्मा आहे. तो देहापासून वेगळा आहे. देहात आल्याने तो वेगळा वाटत नाही. पण देह आणि आत्मा हे वेगळे आहेत. देह आणि आत्मा यांची ओळख करून घेऊन आपण कोण आहे हे जाणून घ्यायला हवे. मी आत्मा आहे ही ओळख मनाला आणि बुद्धीला होईला तेव्हाच आपण आत्मज्ञानी होऊ. यासाठी मन आणि बुद्धीचे ऐक्य गरजेचे आहे.

Related posts

नैसर्गिक प्रेमातूनच शाश्वत ज्ञानानुभव

भावी काळात शेतीचे महत्त्व वाढणार

नियम, व्रतात न अडकता जमेल तशा साधनेनेही ज्ञानप्राप्ती

Leave a Comment