September 8, 2024
Padshichiwari article by Meera Tashi
Home » पडशीची वारी…
मुक्त संवाद

पडशीची वारी…

आज वारी विस्तारते आहे ही आपल्या अभिमानाची गोष्ट आहे. पण त्याबरोबर वारीमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांचा वारकऱ्यांनी आणि त्यांना मदत करणाऱ्यांनी विचार करावा. कमीत कमी गरजा, अन्नाचा योग्य वापर, प्लास्टिक बंदी आणि स्वच्छतेचा अंगीकार या चतुःसूत्रीचा वापर करत ही वारी आनंददायी वारी होऊन पर्यावरण पूरक व आरोग्यदायी व्हावी.

मीरा उत्पात-ताशी,
9403554167.

पंढरपूर हे महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील एक महान तीर्थक्षेत्र आहे‌. प्रतिवर्षी कोट्यवधी भाविक इथे विठ्ठलाच्या दर्शनाला येतात. पंढरपूरचा ज्ञात इतिहास पाच हजार वर्षांचा आहे. पंढरपूरची वारी हे तर एक अद्भुत आहे. इथली आराध्य देवता श्री विठ्ठल. या विठ्ठल मूर्तीत एक विलक्षण ताकद आहे. विठ्ठलाचे हास्य इतके संमोहक आहे की त्याच्याकडे पाहिले की झालं आपण त्याचेच होऊन जातो. पंढरपूरला जाऊन विठ्ठलाला एकदा तरी भेटावे. वारीचा अनुभव घ्यावा असं महाराष्ट्रातील प्रत्येकाला वाटत असतं.

पंढरीचं महात्म्य इतकं मोठं आहे की इथे देव सुद्धा पंढरीचा सुख अनुभवण्यासाठी दगड, तृण, झाडे, वेली, जलचर या रूपात वास करतात. आताच्या वारीचा इतिहास आठशे वर्षांचा आहे. पूर्वीची साधी, कष्टदायकवारी लोकांच्या मनातून आणि कृतीतूनही दूर गेली आहे‌ आळंदीहून वारीची सुरुवात झाल्यापासून मीडिया वाले प्रत्येक क्षण टिपून त्याला प्रसिद्धी देत राहतात. अनेक संस्था, उत्पादक कंपन्या, सेवाभावी माणसं वारीत अनेक गोष्टी वाटत राहतात. त्यामुळे वारी म्हणजे आपल्या उत्पादनाची, संस्थेची जाहिरात करण्याचं ठिकाण झालं आहे.

पूर्वी वारकरी ‘पडशीची वारी’ करत असत. आता वारीचा मूळ हेतू दूर जाताना दिसतो आहे. कंपन्यांच्या मोफत वस्तू, सेवा वाटपामुळे मुळे लाखो लोकांशी त्यांचा समोरासमोर संवाद होतो आणि आपल्या वस्तूची जाहिरातही होते. वस्तू किंवा सेवा पुरवल्याचे पुण्यही मिळते. त्यामुळे अक्षरशः अशा गोष्टींचा पूर आल्यासारखे वाटते. वारकऱ्यांना खाद्यपदार्थ, छत्र्या, रेनकोट, बॅग अशा अनेक गोष्टी ही लोकं वाटत असतात. ते जरूरीपेक्षा जास्त होवून वाया जातात. कित्येकदा खाद्यपदार्थ इतके जास्त होतात की रस्त्याच्या दुतर्फा अन्नपदार्थांच्या पॅकेट्सचा खच पडलेला दिसतो.

वारीच्या दरम्यान येणाऱ्या एकादशीला हजारो किलोची खिचडी, केळी वाटली जातात. केळीच्या साली इकडे तिकडे टाकल्याने कित्येक माणसे घसरून पडून अपघात होतात. चार-पाच वर्षांपूर्वी आषाढी वारीच्या वेळेस अजिबात पाऊस झाला नव्हता. अक्षरशः प्रचंड ऊन होते. एका संस्थेने वारकऱ्यांसाठी नाष्टा म्हणून बटाटे वडे वाटले होते. एवढ्या लोकांना वाटण्यासाठी मध्यरात्रीपासून बटाटे उकडणे वगैरे तयारी सुरू केलेली होती. पहाटे वडे तळून गरम असतानाच प्लास्टिकच्या पिशवीत भरले. प्रचंड उकाडा आणि गरम गरम पॅक केल्यामुळे सकाळी नाष्टा वाटप केल्यानंतर वडे खराब झाले. सगळ्यांनी ते रस्त्याच्या कडेला टाकून दिले अक्षरशः रस्त्यावर वड्यांचा खच पडला होता. जेवणाचंही तसच होतं.

पूर्वी पडशीची वारी असायची. त्यावेळी गरजा खूप मर्यादित होत्या. माणूस फक्त विठ्ठलाच्या ओढीने वारीला येत असे. खाण्यापिण्या कडे जास्त लक्ष न देता मुखात हरीनाम घेत वाटचाल सुरू असे. पडशीत, पडशी म्हणजे एक चार कप्पे असणारी खांद्याला अडकवायची मोठी पिशवी. त्यामध्ये आपल्याला लागणारे सर्वसामान, फिरकीचा तांब्या, शिधा भरून निघायचे. शिधा वारी होईपर्यंत पुरवायचा. मुक्कामाच्या ठिकाणी चुलीवर दोन घास रांधून मिताहार घ्यायचा. दोनच कपडे असायचे. कोणाला काहीही न मागता, कोणाच्याही घरी वास्तव्य न करता, अखंड नामस्मरण करत पंढरपूरला येत असत. हे फार कठीण होतं परंतु विठ्ठलाच्या नामस्मरणात दंग असल्याने त्यांना कुठलीच कमतरता वाटत नसे.

आज वारी विस्तारते आहे ही आपल्या अभिमानाची गोष्ट आहे. पण त्याबरोबर वारीमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांचा वारकऱ्यांनी आणि त्यांना मदत करणाऱ्यांनी विचार करावा. कमीत कमी गरजा, अन्नाचा योग्य वापर, प्लास्टिक बंदी आणि स्वच्छतेचा अंगीकार या चतुःसूत्रीचा वापर करत ही वारी आनंददायी वारी होऊन पर्यावरण पूरक व आरोग्यदायी व्हावी.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

अवचितयावरी सर्वस्व सांडिजे । चोख तरी तोचि भांडारी कीजे । (एकतरी ओवी अनुभवावी)

प्रदूषण निवारण योजनेंतर्गत महाराष्ट्रातील पाच नद्यांसाठी 1183 कोटी रुपये मंजूर

सत्तेगणिक निष्ठा बदलणाऱ्या चिंबोरीवृत्तीच्या माणसांची ही कथा

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading