तुकारामांना तर नाहीच नाही. कारण तो धर्म स्त्री शूद्रांना वेदांचा अधिकार नाकारणारा, उच्च-नीच जातिभेद मानणारा, कर्मकांडाच्या आहारी जाण्यास लावणारा, अंधश्रद्धेची जोपासना करणारा, ज्ञानेपणाचा आभास आव आणणाऱ्यांचा, कर्मयोग व नीतीविचारांची सांगड अध्यात्म विचाराशी न घालता दैववाद व निष्क्रियतेची कास धरणारा, भक्तीच्या क्षेत्रात चातुर्वर्ण्याला अनुकूल असलेला, कांचनिक भक्तीच्या मागे लागलेला असा होता.
डॉ. लीला पाटील, कोल्हापूर
वेदांचा तो अर्थ आम्हांशीच ठावा ।
येरांनी वाहवा भार माथा ॥ १ ॥
खादल्यांची गोडी देखल्याशी नाही ।
भार धन वाही मजुरीचे ॥२॥
उत्पत्ती पाळण संहाराचे नीज ।
जेणे नेले बीज त्याचे हाती ॥३॥
तुका म्हणे आम्हा सापडले मूळ ।
हातोहाती लूट सापडले ॥४॥ तुकाराम गाथा (२२६६)
‘वेदांचा तो अर्थ आम्हांशीच ठावा’ हे तुकाराम महाराजांचे विधान वरवर पाहता धृष्टतेचे वाटते आणि म्हणूनच अनुभवाच्या मार्गाने ब्रह्मस्थितीपर्यंत पोहोचणाऱ्या संतांची बाजू मांडण्यासाठी या विधानाचा मराठी साहित्यात वारंवार उपयोग केला जातो. अनुभवाशिवाय केवळ शब्दांच्या कथनातून वेद जाणणे व श्रोत्यांपर्यंत पोहोचविणेची अपेक्षा व्यर्थ आहे. पाठांतर, घोकंपट्टी करून वेद मागणाऱ्यांना त्याचा अर्थच समजलेला नसतो. कारण त्यांच्यात अनुभवाची कमतरता असते, असे तुकाराम महाराजांना सूचित करायचे आहे.
क्षुद्र देवतांची उपासना करणाऱ्या भक्तांचा तिरस्कार करणारे तुकारामांच्या हल्ल्यातून कर्मठ वेदाभिमानीही सुटले नाहीत. ही मंडळी आपणास वेद समजले आणि ते सांगण्याचा अधिकार आपणासच आहे, अशा आत्मप्रौढीने भारलेले असतात. आपल्या अहंकाराला गोंजारणाऱ्यांचा उल्लेख ते ‘भारवाही’ असा करतात.
वेदाचे निव्वळ पठण करणारे स्वनामधन्य वैदिक भारवाही (भारवाहक हमाल) आहेत. अनुभवाशिवाय पठण हे निरर्थक आहे. जन्मभर धर्मग्रंथाचा भारा डोक्यावर वाहून ज्ञान मात्र डोक्यात शिरले नाही, त्यांना वेदांचा अर्थ काय कळणार ? प्रत्यक्ष खाण्याची गोडी जशी केवळ पाहून पाहणाऱ्यांना पाहणाऱ्यांना अनुभवता येत नाही. धनाचा हंडा केवळ वाहून नेणाऱ्यांना धनाचा लाभ होऊ शकत नाही. म्हणजेच धर्मग्रंथ, खाण्याचा पदार्थ, धनाचा हंडा यांच्या संपर्कात राहूनही अनुक्रमे अर्थ, गोडी व लाभ मिळत नाही असा तुकारामांचा कयास आहे. जगाच्या उत्पत्ती-स्थिती व लयाला कारण असलेला पांडुरंग ज्याने आत्मत्वाने हस्तगत केला त्यालाच वेदांचा तात्पर्यार्थ कळतो. म्हणजेच तुकारामांना जे म्हणायचे आहे ते असे की, उत्पत्ती, पालन व संहार स्वरूपाचे बीज ज्याने नेले त्याच्याच हातात ते आहे.
मग तुकाराम वेदांचा तो अर्थ आम्हांशी ठावा असे का म्हणतात ? तर जो पांडुरंग वेदांची उत्पत्ती करतो, पालन करतो व संहार करतो तो पांडुरंगच आम्ही हस्तगत केला आहे. त्यामुळे आम्हाला वेदाचे खरे स्वरूप कळले आहे, असा दावा तुकाराम महाराज करतात. वेदांवर श्रद्धा, अर्थ अर्थ जाणून जाणून घेण्याची क्षमता, ज्ञान व अनुभव संपन्नता यामुळेच वेद जाणून घेणे शक्य झाले. तुकाराम म्हणतात, आमच्या हातातच सर्वांचे मूळ (पांडुरंग) लागल्यामुळे आपल्या आपण फळही हस्तगत झाले असे सांगणाऱ्या तुकारामांचा हा आत्मविश्वास व आत्मसमाधान कशातून निर्माण झाले आहे ? तर अखंड विठोबाचा ध्यास, निस्सीम भक्ती, वेदाचे ज्ञान आणि अनुभवांच्या द्वारे आलेली अनुभूती हीच त्यामागील कारणे आहेत.
तुकारामांनी सर्वसामान्यांसाठी पंढरीचा विठोबा सगुण भक्तीसाठी निवडला. क्षुद्र देवतांची उपासना मोडीत काढण्यासाठी त्यांनी हा उपाय शोधला. वेदांच्या नावावर खपवलेला धर्म लोकांचे समाधान करू शकला. तुकारामांना तर नाहीच नाही. कारण तो धर्म स्त्री शूद्रांना वेदांचा अधिकार नाकारणारा, उच्च-नीच जातिभेद मानणारा, कर्मकांडाच्या आहारी जाण्यास लावणारा, अंधश्रद्धेची जोपासना करणारा, ज्ञानेपणाचा आभास आव आणणाऱ्यांचा, कर्मयोग व नीतीविचारांची सांगड अध्यात्म विचाराशी न घालता दैववाद व निष्क्रियतेची कास धरणारा, भक्तीच्या क्षेत्रात चातुर्वर्ण्याला अनुकूल असलेला, कांचनिक भक्तीच्या मागे लागलेला असा होता. अशा धर्मतत्त्वांचे विरोधक असलेल्या तुकारामांनी कसली व कोणाचीही भीती, परिणामांची क्षिती बाळगली नाही म्हणून त्यांना वेदांचा तो अर्थ आम्हांस ठावा असे म्हणण्याचे धारिष्ट्य, आत्मविश्वास अधिकारही प्राप्त झाला.
‘विठ्ठल आमुचा निजाचा । सज्जन सोयरा जीवाचा ॥’ अशी पंढरीवरची श्रद्धा, भक्ती, सपर्मण केलेल्या तुकारामांना वेद समजले नाहीत तर मग कोणाला ? ‘समर्पिली काया । तुका म्हणे पंढरीराया ।।’ असे अत्यंत कळकळीने, तळमळीने, तुडुंब भक्ती भावाने पंढरीलाच देह अर्पण करायला निघालेल्या तुकारामांना वेदांचा अर्थ सांगण्याचा अधिकार प्राप्त झाला. निधड्या छातीने, अफाट धाडसाने आणि तितक्याच श्रद्धेने तो अधिकार सांगून वेदांचा अर्थ सामान्यांपर्यंत पोहोचवला.
डॉ. लीला पाटील, कोल्हापूर
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.