April 19, 2024
Home » स्वामीनिष्ठेची प्रेरणा देणारा टोकाचा गड..अर्थात पारगड
पर्यटन

स्वामीनिष्ठेची प्रेरणा देणारा टोकाचा गड..अर्थात पारगड

भावी पिढीसाठी आपल्या परिसराचा, पूर्वजांचा इतिहास माहीत असणे किंबहुना त्याची जपणूक करण्याची जबाबदारी आपली असते. पाश्‍चिमात्त्य देशात काल्पनिक कथानक आणि पात्रे निर्माण करून पराक्रमाचे संस्कार रुजवण्याचा प्रयत्न होतो. सुदैवाने आपल्या देशात ठायीठायी वीर आणि विरांगणांनी आपल्या अजोड पराक्रमाच्या सत्यकथेतून इतिहास घडवला आहे. हा इतिहासच फार मोठा ठेवा आहे. पारगडावरील मावळ्यांनी ज्या प्रकारे त्याची जपणूक केली आहे, ती इतरांसाठी निश्‍चितच प्रेरणादायी आहे..             

– प्रशांत सातपुते, जिल्हा माहिती अधिकारी,  कोल्हापूर

घनदाट, निबिड अरण्यात छातीचा कोट करुन गोवा – कर्नाटकातील हालचालींवर स्वराज्याच्या रक्षणार्थ आपली नजर रोखून उभा असणारा आणि आपल्या स्वामीनिष्ठेची प्रेरणा देणारा गड..पारगड..! अगदी शेवटाचा..टोकाचा तो पारगड..! छत्रपती शिवाजी महाराजांच्या वास्तव्याने पावन झालेला, इतिहासातील अनेक घटनांचा साक्षीदार असणारा हा गड दुर्गप्रेमींसाठी आणि शिवभक्तांसाठी ऐतिहासिक घटनांना उजाळा देत कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यात सह्याद्रीच्या कुशीत विसावला आहे. चंदगडमधील हेरेपासून अवघ्या २४ किमी अंतरावर हा गड आहे.

सह्याद्रीच्या उंचच – उंच डोंगर रांगांमधून, लता – वेली, जंगली आणि औषधी झाडांच्या घनदाट अरण्यामधून ही वाट गडाच्या पायथ्याला जाते. या ठिकाणापासून ३६० पायऱ्या चढून गेल्यानंतर शिवकालीन तोफांच्या अवशेषांचे दर्शन होते. बाजूलाच हनुमानाचे मंदिर असून, या ठिकाणी पुरातन अस्तित्वाची साक्ष देणारे तुळसी वृदांवन दिसते. या पायऱ्यांपासून थेट गडावर जाण्यासाठी गडाच्या मागील बाजूस वाट आहे. सध्या या वाटेने चारचाकी वाहन वर जाते. कोकण आणि गोव्याच्या सीमेवरील या गडाचे महत्त्व शिवरायांनी हेरले होते.

गोव्याच्या पोर्तुगीजांवर लक्ष ठेवण्यासाठी हा गड अत्यंत महत्त्वाचा वाटल्याने त्यांनी तो ताब्यात घेतला. छत्रपती शिवाजी महाराज यांनी १६७४ मध्ये हा गड वसवला. गोव्यातील पोर्तुगीजांच्या हालचालींवर लक्ष केंद्रित करणे हा प्रमुख हेतू या वसवण्यामागील असावा. समुद्र सपाटीपासून याची उंची ७३८ मीटर आहे.

कोंढाण्याच्या लढाईत नरवीर तानाजी मालुसरे यांना वीरमरण आले. मुलगा रायबाच्या लग्नकार्यापेक्षा स्वराज्याप्रती कर्तव्याला महत्व देणाऱ्या विराला छत्रपतींनी सिंहाची उपमा देऊन कोंढाण्याचे “सिंहगड” नामकरण केले. पुढे तानाजीचा पुत्र रायबा याचे लग्न स्वत: छत्रपतींनी पुढाकार घेऊन पार पाडले. त्यानंतर, पारगडच्या किल्लेदाराची जबाबदारी रायबावर दिली. यावेळी छत्रपतींचा काही दिवस गडावर मुक्काम होता.“चंद्र, सूर्य असेपर्यंत गड जागता ठेवा,” असा आदेश शिवरायांनी मावळ्यांना दिला. आपल्या राजाने दिलेला आदेश मावळ्यांनी मानला. पारगडासारखेच तिथले ग्रामस्थही सुमारे गेली ३४५ वर्षे केवळ आपल्या राजाचा आदेश म्हणून घट्ट पाय रोऊन आजही त्यांचे वंशज गडावर वास्तव्य करून आहेत. स्वामिनिष्ठेचे मूर्तिमंत उदाहरण म्हणून पारगडकडे पहावे लागेल.

इ. स. १६८९ मध्ये औरंगजेबाचा पुत्र मुअज्जम व खवास यांनी पारगडावर हल्ला केला होता. परंतु, इथल्या निष्ठावान व शूर मावळ्यांनी गनिमी काव्याने मुघल सैन्याला पुरते हैराण केले. या युद्धात गडावरील तोफखान्याचे प्रमुख विठोजी माळवे धारातिर्थी पडले. त्यांची पत्नी तुळसाबाई या सती गेल्या. गाडीवाटेने गडावर आल्यास या दोघांच्याही समाध्या पहायला मिळतात. याठिकाणी सतीशिळाही पहायला मिळते. त्यानंतर पुढे चालत आल्यास गडावर भवानीमातेचे शिवकालीन मंदिर आहे. मंदिराच्या पायरीवरच ४ वीरगळींचे दर्शन होते. काळ्या दगडात बांधलेला गाभारा आणि सभामंडप असे मंदिराचे स्वरूप होते.

छत्रपतींनी स्वतः या मूर्तीची प्रतिष्ठापना केल्याचे सांगितले जाते. सध्या ग्रामस्थांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे. या नव्या कमानींवर छत्रपतींची राजमुद्रा आणि धर्मवीर संभाजीराजांची राजमुद्रा पहायला मिळते. येथील सभामंडपात शिवचरित्रावर आधारित प्रसंगांचे चित्रदालन साकारण्यात आले आहे. पुढे गडावर छत्रपती शिवरायांचा पूर्णाकृती पुतळा आहे.

खेम सावंत भोसल्यांनी (कुडाळकर) मुघलांच्या सहकार्याने १६९० पासून गड काबीज करण्याचा प्रयत्न केला, असा संदर्भ इतिहासात मिळतो. तसेच समकालीन पोर्तुगीज कागदपत्रात हा गड इ. स. १७०१ च्या फेब्रुवारी अखेरीस हा गड खेम सावंतांच्या ताब्यात आला. मराठ्यांचे राज्य संपून इंग्रज अंमल सुरु राहिला, तरीही गडावर उत्पन्नाचे कोणतेही साधन नसताना गडकऱ्यांनी गड सोडला नाही. इंग्रजांनी त्यावेळी त्यांना तनखेवजा पगार सुरु केला. हे उत्पन्न गडकऱ्यांना बेळगाव मामलेदार कचेरीतून १९५४ पर्यंत मिळत होते.

माहेर आणि सासर दोन्हीही पारगड असणाऱ्या मालुसरे घराण्याच्या वंशज डॉ. शीतल मालुसरे यांनी दिलेल्या माहितीनुसार रायबा – मुंबाजी – येसाजी – सूर्याजी – येसाजी – आप्पाजी यांच्यापर्यंतची पिढी गडावर रहायला होती. त्यानंतरची पिढी उपजिविकेसाठी बळवंतराव – बाळकृष्णराव – शिवराज बेळगावला स्थायिक झाली. आजही गडावर गणेशोत्सव, माघी पौर्णिमा, नवरात्रोत्सव, होळी पौर्णिमा, शिवजयंती, शिवराज्याभिषेक हे सगळे उत्सव साजरे होतात. नोकरी, उद्योगांसाठी बाहेर गेलेले चाकरमानी हे उत्सव साजरे करण्यासाठी आजही गडावर येतात. डॉ. शीतल यांचे चिरंजीव रायबा हे तानाजी मालुसरेंचे थेट १३ वे वंशज आहेत.

या गडाचा परिसर हा “जावळीचे खोरे प्रतापगडाच्या परिसराशी” मिळते – जुळते आहे. या खोऱ्यातील नैसर्गिक दुर्गमता, घनदाट जंगले, अनेक औषधी वनस्पती येथे दिसून येतात. शांत, स्वच्छ, निरभ्र आकाश असताना रात्रीच्यावेळी पारगडावरुन पश्चिमेस गोव्याचे तसेच कलानिधीगडाचेही दर्शन होते. पारगड, गंधर्वगड, कलानिधीगड, महिपालगड, वल्लभगड, सामानगड अशी स्वराज्य संरक्षणासाठी ढाल म्हणून गडकोटांची साखळी निर्माण केल्याचे दिसून येते. पुढे सिंधुदुर्गमधील विजयदुर्गपर्यंत हीच संरक्षणाची भक्कम ढाल पहायला मिळते.

कोल्हापूर वन विभागातील चंदगड वन परिक्षेत्रामार्फत गडावर जागोजागी पक्षी, प्राणी आणि वनस्पती याची माहिती देणारे फलक लावले आहेत. वृक्षांची काळजी घेण्याबाबत छत्रपती शिवाजी महाराज स्वत: किती दक्ष होते हे त्यांच्या आज्ञापत्रातून दिसून येते. या आज्ञापत्राचा फलकही मंदिराकडे जाताना पहायला मिळतो. गडाच्या बुरूजावरून गोव्याहून येणाऱ्या नव्या वाटेचे दर्शन होते. शिवाय, सह्याद्रीच्या पर्वतरांगा, ताशीव कडा, खोल – खोल जाणाऱ्या दऱ्या, विपुल जंगल संपत्ती यांचे मनोहारी दर्शन आणि पशू – पक्ष्यांच्या आवाजाबरोबरच दिवसा ऐकायला मिळणारा रातकिड्यांचा आवाज या दुर्गाची दुर्गमाता दाखवते. इतिहासाची पायवाट वर्तमानातून उज्ज्वल भविष्याकडे जाते. भावी पिढीसाठी आपल्या परिसराचा, पूर्वजांचा इतिहास माहीत असणे किंबहुना त्याची जपणूक करण्याची जबाबदारी आपली असते. पाश्‍चिमात्त्य देशात काल्पनिक कथानक आणि पात्रे निर्माण करून पराक्रमाचे संस्कार रुजवण्याचा प्रयत्न होतो. सुदैवाने आपल्या देशात ठायीठायी वीर आणि विरांगणांनी आपल्या अजोड पराक्रमाच्या सत्यकथेतून इतिहास घडवला आहे. हा इतिहासच फार मोठा ठेवा आहे. पारगडावरील मावळ्यांनी ज्या प्रकारे त्याची जपणूक केली आहे, ती इतरांसाठी निश्‍चितच प्रेरणादायी आहे.                       

 – प्रशांत सातपुते, जिल्हा माहिती अधिकारी,  कोल्हापूर

( व्हिडिओ साैजन्य – D SUBHASH PRODUCTION )

Related posts

चला जाणूया नदीला अभियानाचा दुसरा टप्पा…

रानपिंगळ्यांची वसाहत..

फणसाचा ‘गर’ ठरतोय शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचा ‘झरा’

Leave a Comment