आवानओल काव्यसंग्रहातील ‘उंबरा ओलांडणाऱ्या बायका ‘ कवितेचा सन्मान
कणकवली – स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ नांदेडच्या एफ.वाय.बीएच्या अभ्यासक्रमात कवी अजय कांडर यांच्या ‘उंबरा ओलांडणाऱ्या बायका’ या कवितेचा समावेश करण्यात आला आहे. कवी कांडर यांच्या ‘आवानओल’ काव्यसंग्रहातील सदर कविता असून आजवर महाराष्ट्रातील विविध विद्यापीठांच्या एकूण 13 अभ्यासक्रमांमध्ये आणि एका शालेय अभ्यासक्रमामध्ये कांडर यांच्या कवितांचा समावेश करण्यात आला आहे. यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या हिंदी एम एच्या अभ्यासक्रमातही त्यांच्या हिंदी भाषांतरित काव्यसंग्रहाचा समावेश करण्यात आला आहे.
कवी अजय कांडर यांना समकालीन मराठी कवितेच्या मुख प्रवाहातील महत्त्वाचे कवी मानले जातात. 90 नंतर लिहिणाऱ्या पिढीत ग्रामीण भागातून ज्या लोकांनी मराठीला सशक्त कविता दिली यात कवी अजय कांडर यांचा प्रामुख्याने समावेश होतो. 2005 मध्ये शब्दालय प्रकाशनातर्फे त्यांच्या प्रसिद्ध झालेल्या ‘ आवानओल’ काव्यसंग्रहाने मराठी कवितेच्या मुख्य प्रवाहात त्यांचे कवी म्हणून नाव अधिक ठळक केले. या संग्रहाला त्यावेळी प्रतिष्ठित महाराष्ट्र फाउंडेशन, विशाखा, इंदिरा संत अशा १२ काव्यपुरस्काराने गौरविण्यात आले. त्याचबरोबर या संग्रहातील कवितेचा हिंदी, इंग्रजी, मल्याळम, उर्दू आदी भारतीय भाषांमध्ये अनुवादही करण्यात आला.
त्याचबरोबर ‘आवानओल’ काव्यसंग्रहातील कवितांचा मुंबई विद्यापीठ, अमरावती विद्यापीठ, सोलापूर विद्यापीठ, स्वायत्त प्रताप महाविद्यालय अमळनेर, स्वायत्त सोमैया महाविद्यालय मुंबई आदींच्या अभ्यासक्रमामध्ये समावेश करण्यात आला होता. त्याचबरोबर जळगाव उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या एमएच्या अभ्यासक्रमात हत्ती इलो या काव्यसंग्रहाचा समावेश करण्यात आला व डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या हिंदी एमएच्या अभ्यासक्रमात ‘युगानुयुगे तूच ‘ या दीर्घ कवितेच्या हिंदी अनुवादाचाही समावेश करण्यात आला. तर शिवाजी विद्यापीठाच्या एमएच्या अभ्यासक्रमात संदर्भ लेखन म्हणून ‘कवितेची निर्मिती प्रक्रिया’ याविषयीच्या लेखाचा समावेश करण्यात आला.
त्यानंतर आता स्वामी रामानंद तीर्थ नांदेड विद्यापीठाच्या एफवाय बीएच्या अभ्यासक्रमात ‘आवानओल ‘ काव्यसंग्रहातील ‘उंबरा ओलाडणाऱ्या बायका’ या कवितेचा समावेश करण्यात आला आहे.आवानओल काव्यसंग्रह प्रसिद्ध होऊन सुमारे वीस वर्ष झाले तरी त्यातील कविता वेगवेगळ्या संदर्भाने बहुचर्चित होत आहेत.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.