November 11, 2024
A gentle poem from the bottom of the heart
Home » काळजाच्या तळातून आलेली नितळ कविता
मुक्त संवाद

काळजाच्या तळातून आलेली नितळ कविता

शब्दांच्या जंजाळात हरवलेली कविता आणि कवींचे फुटलेले पेव बघून कवी अस्वस्थ होत आहे. अर्थहीन जड शब्दांच्या ओझ्याखाली कविता दडपून गेली आहे. खरतर खरी कविता सापडतच नाही अशी अवस्था आहे. वीज तोलून धरावी तर आकाशानेच ! संजीवक पण दाहक अशी कविता पेलायची म्हणजे जळून जाऊन राख व्हायची मनाची तयारी हवी. सशक्त कविता जन्माला घालणारा असा कवी आज आतल्या आत गाडला गेला आहे. पण हे गाडलेपण उद्या प्रतिभेच्या नव्या रोपाला जन्म देईल असा विश्वास कवी व्यक्त करत आहे. बाजारातल्या झगमगाटाला भुलून जाण्यापेक्षा आपले मूळ न सोडता भविष्याचा विचार करून कवीने चिरकालीन काव्य लिहावे अशी कवीची अपेक्षा आहे.(मूळ).

कविता करणे किंवा कविता होणे खूप सोपे असते असा समज करून घेऊन गांभीर्याने विचार न करता केवळ प्रसिद्धीसाठी कविता लिहिणारे कवी खूप आहेत. शब्दांच्या पसाऱ्यातून शब्द वेचू घ्यावेत आणि एकापुढे एक मांडत जावे की झाली कविता. खरचं, कविता इतकी सोपी असते का ? अभ्यास, मनन, चिंतन नसताना सुचलेले काव्य हे दर्जाहिनच असणार. केवळ टाळ्या मिळवणे एवढाच त्याचा उद्देश असतो. अशा खुशमस्कऱ्यांनी केलेली स्तुती कवितेला अधिकच दर्जाहीन बनवते. हीच खंत कवीने या कवितेत व्यक्त केली आहे. उथळपणाच्या तवंगामुळे अभिजातपणाची खोली अदृश्य होत चालली आहे. शब्दांचा सांगाडा म्हणजे सशक्त कविता नव्हे असे मत कवी ठामपणे मांडत आहे. (फोल पसारा ).

ज्ञानेश्वर, तुकाराम यांची परंपरा सांगणारे आपण, काय लिहीतो ? अर्थ समजून न घेता केलेली पारायणे आणि पेलत नसलेल्या कवितेला हात घालणे , दोन्ही हास्यास्पद ! दात काढलेल्या सापाचे खेळ करुन गारुडी फसवतो आणि शब्दांची पिलावळ प्रसवून कवी निस्तेज प्रतिभेचे दर्शन घडवण्याचा प्रयत्न करत असतो. कवीला चीड आहे ती या दांभिकतेची. (इंद्रायणी आतून).

तथाकथित साहित्य प्रेमाचे आणि वाड्मय निष्ठेचे वाभाडे काढणारी ‘ खरा कवी ‘ ही कविता म्हणजे उपरोधिक ‘शालजोडी’ चा उत्तम नमुना आहे. शब्दांचा बाजार मांडून निष्ठेचा लिलाव करणाऱ्या साहित्यिक दलालांचा बुरखा फाडणारी ही कविता कविच्या दर्जेदार साहित्य विषयक तळमळीची साक्षच देते. एकीकडे आपल्यातल्या अपुरेपणाची जाणीव आणि दुसरीकडे सुमार साहित्याची दुकानदारी यातले नेमके अंतर टिपणारी ही कविता ख-या कवीच्या व्यथा मांडणारी आहे असे म्हणावे लागेल.(खरा कवी)

कवी स्वतःच होतो घोडा आणि एका नव्या दुनियेत फेरफटका मारून येतो. पण अपेक्षित माणूस न सापडल्याने त्याच्या मार्गातही परिवर्तन होते आणि कवीचे धारदार शब्द गुलामगिरीचे दोर कापून टाकतात. मेंढरांच जीणं संपतं आणि मानवतेच्या मंदिरात कवीचा सन्मान होतो. हा सन्मान परिवर्तनाशिवाय शक्य नाही याची जाणीव कवी येथे करून देत आहे. हा सन्मान एकट्या कवीचा नाही तर परिवर्तनाच्या वाटेने जाणाऱ्या प्रत्येकाचा सन्मान होणार आहे असा विश्वास कवीला वाटतो.(कवीचा घोडा )

शोषितांची दुःखे मांडणारी कविता आता वहीच्या पानात रेंगाळून चालणार नाही तर तिने जाब विचारण्याची वेळ आली आहे. दहशतीच्या टापा कालही वाजत होत्या. कदाचित उद्याही वाचतील. पण आयुष्याच्या मशाली पेटवून त्यांना शह देण्याची वेळ आता आली आहे. हा संघर्षच देईल अशा कवितेला जन्म , जी फक्त संमेलने गाजवण्यासाठी नसेल तर असेल हिशेब मागण्यासाठी आणि पांथस्थाला मार्गावर आणण्यासाठी. आजची पिचलेली कविता उद्या सौदामिनीच्या तेजाने तळपावी एवढीच कवीची इच्छा ! (कवितांच्या वहीत )

भले बुरे अनुभव झेलत झेलत पुढे जात असताना कटू अनुभवच जास्त आले. गद्दारांचीच संख्या जास्त होती. सगळं आयुष्यच उद्ध्वस्त व्हाव असे अनेक प्रसंग आले. पण या सगळ्या संकटात साथ दिली ती शब्दांनीच.शब्दांनी सावरलं. शब्दांनी अश्रू पुसले. या शब्दांचे सामर्थ्यच एवढे मोठे की शेवटच्या क्षणापर्यंत त्यांच्या खांद्यावर डोक ठेवून त्यांच्याच साक्षीनं समाधिस्थ व्हावं.

माणसांच्या आलेल्या अनुभवपेक्षा कवीला शब्दांचा आलेला अनुभव अधिक खात्रीलायक वाटतो. विश्वासघात, बेईमानी करणारी माणसे भेटतील पण शब्दांनी कधीच बेईमानी केली नाही. शब्दांवर दाखवलेला पूर्ण विश्वास कवीला जगण्याचे बळ देतो. म्हणून तर शब्दांची झोळी काखेत अडकवून शब्दांविषयी कृतज्ञता व्यक्त करत कवी शेवटपर्यंत शब्दांची साथ सोडायला तयार नाही.(कवितेच्या बागेत समाधीस्थ)

‘ शब्द ‘ या कवितेत कवीने शब्दांची महती गाईली आहे. शब्द काय नाही ? शब्दात शक्ती आहे, युक्ती आहे. म्हणूनच ते जग जिंकू शकतात आणि अशक्य ते ही करून दाखवू शकतात. शब्द हे धन आहेत आणि तितकेच महत्वाचे म्हणजे ते मनही आहेत. म्हणजेच स्वतःच्या मनाला आपण जितकं महत्त्व देतो तितकं महत्त्व शब्दांनाही दिलं जावं. मन सांभाळाव तितकेच शब्दही सांभाळावेत. म्हणून शब्द बोलताना भान असावे.दिला शब्द मोडू नये आणि शब्दाला शब्द वाढवून भांडत बसू नये. आपली चूक मान्य करताना शब्द कमी पडू देऊ नयेत. शब्दात अहंपणा म्हणजे ‘ मी ‘ नसावा. उलट शब्दातून दुसऱ्याविषयीची काळजी, आपुलकी व्यक्त व्हावी. भडकवणारे शब्दही वापरु नयेत आणि शब्दांनी लाळघोटेपणाही करू नये. ही सर्व पथ्ये पाळून जे शब्द वापरतात आणि दिलेला शब्द पाळतात असे लोकच आपल्या स्मरणात राहतात.

या संपूर्ण कवितेत कविने ‘ शब्द ‘ या शब्दालाच महत्त्व दिले आहे. कारण साहित्य निर्मिती ही शब्दाशिवाय होणे अशक्य आणि चांगले साहित्य निर्माण व्हायचे असेल तर चांगली भाषा, चांगले शब्द हवेतच. केवळ साहित्यच नव्हे तर रोजच्या जगण्यातही शब्दांची किंमत, ताकद ओळखून त्यांचा वापर केला पाहिजे. शब्द इतिहास घडवू शकतात आणि भूगोल बदलू शकतात.रक्तहीन क्रांती आणि चिरकाल शांती देण्याचे सामर्थ्य शब्दांत आहे हे विसरुन चालणार नाही असेच कवीला म्हणायचे असावे. (शब्द)

सर्वत्र अंधार दाटलेला. चेहऱ्यावर मुखवटे ओढलेल्या माणसांनी आपण वेढलो गेलोय. स्वार्थाच्या गर्दीत औपचारिकतेने टिकवलेली नाती. जबाबदारीची चौकट मोडणेही शक्य नाही. अशा परिस्थितीत विश्वास ठेवावा अस कोणीच दिसत नाही. मग कशाच्या आधारानं, कशाच्या जीवावर ही सारी धडपड चालू आहे ? आणि मग लक्षात येत हे बळ देणारी, विश्वासानं साथ देणारी एकच आहे…ती म्हणजे कविता. नसती कविता तर ? कुणाशी बोललो असतो व्यथा, वेदना ? कुठे जपून ठेवले असते सुखदुःखाचे क्षण ? आज आपण जे काही आहोत ते कवितेच्या जीवावरच. कविता हीच आपली ओळख आहे. कवितेच्या तेलामुळच प्राणाचा दिवा तग धरुन आहे याची कबुलीच कवी देतोय.(कविते तुझ्यामुळे)

या सर्व कविता वाचल्यावर एक गोष्ट लक्षात येते की कविता हा गंभीर साहित्य प्रकार आहे याची जाणीव कवी करुन देत आहे. चार दाणे फेकावेत, ते कसेही उगवून यावेत, कदाचित अल्पजीवी ठरावेत, अशी कविता नसावी. तर जमिनीची योग्यप्रकारे मशागत करून मग दाणे पेरले जावेत, उगवणाऱ्या दाण्यांचीही काळजी घेतली जावी आणि सकस दाणे देणारं पीक यावं अशी कविता असावी असेच कवीला वाटते. कवितेने भावना व्यक्त कराव्यात, मार्गही दाखवावा आणि आधारही द्यावा. म्हणून तर ,सुखाची लहर असो वा दुःखाच्या लाटा येवोत , कवी कवितेच्या झाडाला सोडायला तयार नाही. उलट शब्दांची पाखरं आणखीनच जमा होतात आणि कवी लिहून जातो….

“अवघडलेल्या फांदीवरती
शब्दपाखरे ही फडफडती
पोटामधला अर्थ घेऊनी
ओठांवरती येती गाणी “

त्या गाण्यांचा अर्थ शोधण्याचा हा एक छोटासा प्रयत्न !

सुहास रघुनाथ पंडित

काव्यसंग्रह: काळजाचा नितळ तळ
कवी : श्री.भीमराव धुळूबुळू 9850739738
प्रकाशक : प्रतिभा पब्लिकेशन. इस्लामपूर 7588586676
पृष्ठे : १३२
मूल्य : रु.२४०


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading