दखल एका प्रेरणास्थळाची……!
पोहरागड-उमरीगडेर येथे भरण्यात येणाऱ्या यात्रेतील प्रथा परंपरावर काही बंधणे घालणे गरजेचे आहे. भक्तांच्या सोयी सुविधांसाठी प्रयत्न होण्याची गरज आहे. यात्रेच्या निमित्ताने लाखो भाविक येथे दाखल होतात. हे बंजारा समाजाचे पीठ म्हणून विकसित होण्यासाठी आता प्रयत्न होणे गरज आहे.
✍️ याडीकार पंजाब चव्हाण
पूसद
9421774272
जवळपास दोनशे वर्षापूर्वीचे पोहरागड म्हणजे पूर्वेस दगडी परकोटातील महाद्वार ,पश्चिमेस चिंचेचे झाड व विहीर, उत्तरेस भव्य परकोटाची दगडी भिंत त्यामध्ये संत सेवालालबापुची संजीवन समाधी आहे. तर दक्षिणेस जगतजननी देवी जगदंबा मातेचे भव्य मंदिर. मागच्या बाजुस संत बामणलाल महाराज आणि संत डॉ. रामरावबापु महाराज यांची संजीवन समाधी आहे. असे पोहरागड चौदा पंधरा हजार लोक वस्तीचे गाव! मंदिराला लागूनच संत सेवालाल महाराज यांच्या बंधु हापा नायक यांचे वंशज मंहत बाबुसिंग महाराज, नामदेव महाराज, कबीरदास महाराज, संजय महाराज, बलदेव महाराज, शेखर महाराज इत्यादी तर मागच्या बाजूस पुरा नायक यांचे वंशज संत बामणलाल महाराज यांच्या कुळातील मंहत सुनील महाराज, मंहत जितेंद्र महाराज व इतर मंडळी राहात आहेत.
उमरीगडाच्या यात्रेचा इतिहास
बधु नायक यांनी आपल्या भावकीच्या हिस्से वाटणीत येणारी कोणतीही संपत्ती न घेता ते झोळी घेऊन उमरीगड येथे गेले. बधु नायक यांना तिन मुले संत जेतालालबापु महाराज, घासी नायक, नानु नायक या तिन्ही नायकांचे वंशज उमरीगड येथे राहतात. उमरीगड येथे सामकी याडी आणि संत जेतालालबापु यांचे भव्यमंदिर आणि संजिवन समाधी आहे. सात हजार लोक वस्तीचे गाव! उमरीगडाच्या यात्रेचा इतिहास महंत खुशाल महाराज यांनी नुकताच जाहीर केला. उमरीगड- पोहरागड येथील यात्रा आणि रामनवमीचे काही संबंध नसून सदर यात्रा हि उमरीगडावरून सन 1954 साली सप्तमीच्या दिवशी सामकी मातेच्या मूर्तीची स्थापना केल्यानंतर सुरू झाल्याचे जाहीर केले आहे. ही यात्रा सप्तमी पासून सुरुवात झालेली. असून या यात्रेत प्रथम जवळपासच्या परिसरातील भाविक भक्त लोक आपल्या बैलगाडी, छकडा आणि पायी उमरीगडाला न चुकता सप्तमी आणि अष्टमीला येऊन मनोभावे दर्शन घेत होते. त्यानंतर नवमी आणि दशमीला पोहरागडाची यात्रेची सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितलेले आहे.
खानदेशा आवगो
उमरीगडावरून सुरू झालेली ही यात्रा पोहरागडाच्या यात्रेला शेवट होत असून सुरुवातीला खानदेश मधून काही भाविक भक्त आले. नंतर मध्यप्रदेशातून भाविक भक्त आले आजही उमरीगड येथे कोणत्याही राज्या मधील लोक आले की खानदेशा आवगो असे लोक गमतीने सांगतात. या यात्रेचा प्रचार प्रसार संत डॉक्टर रामरावबापू महाराज यांनी संपूर्ण भारतभर फिरून कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा व इतर राज्यात केला. असल्यामुळे आज संपूर्ण भारतातूनच उमरीगड आणि पोहरागडाच्या यात्रेला लाखो भाविक भक्त याठिकाणी येतात. उमरीगड येथे संत श्रेष्ठ जेतालाल महाराज, सामकी याडी यांची संजीवन समाधी असून हे मोठे पवित्र तीर्थक्षेत्र आहे.
चुकीच्या रुढी परंपरावर टीका
सोळाव्या शतकात क्रांतीसुर्य सेवालाल महाराज यांनी बंजारा समाजातील चुकीच्या रूढी – परंपरा, नसाबं – हसाबं, ओरी – बकरी, पूजा-अर्चा यावर कडाडून हल्ला करत….
कोई केती मोठो छेंणी, कोई केती नानक्या छेणीं, भजने पूजनेम वेळ घाले पेक्षा करणी करेर शिकजो…..जाणंजो…..छाणंजो….पचं…माणंजो!
भावार्थ — कोणीही कोणा पेक्षा लहान किंवा मोठा नाही पूजा-अर्चा करण्यापेक्षा प्रामाणिक पणाने आपले कर्तव्य पार पाडा. कोणतीही गोष्ट स्वीकारण्यापूर्वी त्याला समजून घ्या, त्याला निरखून पहा, आणि त्यानंतरच तिचा स्वीकार करा.
असा सूचक संदेश देऊन बंजारा समाजातील कर्मकांड, वर्त वैकल्य करणाऱ्या मंडळींना प्रथम हादरा दिला. भजन पूजनात वेळ घालण्यापेक्षा कृती करा. कृती केल्याने आपले आयुष्य सुकर होईल. असे लोकांना पटवून दिले.
संत सेवालाल महाराज म्हणजे बंजारा समाजाचे संस्थापक ! हापा नायक, पुरा नायक, बधु नायक, संत जेतालालबापु समवेत संत सेवालाल महाराज लदेणी करत करत दिग्रस जवळील रूई (तलाव) येथे आले. तेथे गुराढोरांना पाणी आणि चारा मुबलक असल्यामुळे काही दिवस वास्तव्याला रुई येथे थांबले. परंतु त्यांचा देह मात्र येथे अग्नी न देता पोहरागड येथे नेण्यात आला. ही फार मोठी कथा आहे.
गोरबंजारा समाजाला जागृत करण्याचे महान कार्य
सोळाव्या सतराव्या शतकात पोहरागड हे तर संत सेवालाल महाराजांचे माहेरघरच बनले होते. हापा नायक , पुरा नायक हे सर्व पोहरागडाचे तर बधु नायक आणि संत जेतालाल महाराज, सामकी माता हे उमरी बुद्रुक येथे स्थायिक झाले. गोधनासाठी मातीचा उंचवटा( ढिगारा) रचतांना सामकी मातेच्या पायातील दिव्य पद्म संत सेवालाल महाराज यांना दिसल्यामुळे त्यांचा विवाह संत जेतालाल महाराजांशी केला. शुद्ध शाकाहारीचे आचरण बंजारा समाजात सामकी मातेने त्यावेळी रुजवण्याचा आटोकाट प्रयत्न केल्याचे आजही लोक सांगतात. बधु नायक, संत जेतालाल महाराज, घासी नायक, नानु नायक व सामकी मातेच्या पवार परिवारातील पिढया उमरी येथे स्थायिक झालेले असून संत सेवालाल महाराज यांचे बंधू हापा नायक, पुरा नायक आणि इतर मंडळी पोहरागड येथे स्थायिक झालेले आहे.एके काळी बहूजनासाठी सर्व मंदिरे दर्शनासाठी बंद असतांना मात्र पोहरागड-उमरीगडाचे मंदिर बहूजनासाठी उघडे होते. त्यामुळे माडी (कोजागरी पोर्णिमा) पौर्णिमेला पोतराज लोकांची यात्रा आजही भरते. संत सेवालाल महाराज यांनी आपल्या सूचक संदेशाद्वारे गोरबंजारा समाजाला जागृत करण्याचे महान कार्य केलेले आहे. त्यांचे सर्वच बोल खरे ठरले असून सेवालाल महाराज यांचे ब्रह्मचर्य आचरण स्वतः संत डॉक्टर रामरावबापु महाराज यांनी स्वीकारून पोहररागचे महात्म्य वाढविले होते. माजी मंत्री संजयभाऊ राठोड यांनी पोहरागड येथे ऐतिहासिक नंगारा वास्तुचे निर्माण करून या प्रवित्र श्रद्धास्थानाचे ऐतिहासिक महत्त्व वाढविले.
किडी मुंगीन साई वेस कधी समजून घेणार
त्याकाळी दळणवळणाची साधने नसल्यामुळे संत सेवालाल महाराज, संत जेतालाल महाराज , सामकी याडी, संत बामणलाल महाराज यांच्या भक्तांना फार त्रास होत असे. तरीही ते उन्हाळ्यात सप्तमी ते रामनवमीत आपण बोललेला नवस फेडण्यासाठी उमरीगड आणि पोहराकडे येथे येत असत. दिवट्या, मशाली किंवा कंदिलाच्या उजेडात तेथे रात्रभर भजन-कीर्तन नामस्मरण चालत असे. सकाळी उठल्याबरोबर संत सेवालाल महाराज यांना नारळ प्रसाद किंवा लापशी (गव्हाच्या पिठात गूळ टाकून केलेला पदार्थ) याचा भोग मनोभावे दिल्यानंतर लगेचच जगदंबा मातेसमोर बोकडांचा बळी दिला जातो. संत सेवालाल महाराज आपल्या वचनात सांगतात लहानात लहान जीव म्हणजे मुंगीला सुद्धा संरक्षण दे ! किडी मुंगीन साई वेस ही विश्व कल्याणकारी प्रार्थना आपण समजुन घेणे महत्त्वाचे आहे. आणि ती समजुन घेतली पाहिजे. ती आपण केव्हा समजुन घेणार आहो ?
यात्रेसाठी देश-विदेशातूनही भाविक
संत डॉक्टर रामरावबापु महाराज यांनी पूर्ण भारत-भ्रमण केल्यामुळे क्रांतीसुर्य सेवालाल महाराज यांचे विज्ञानवादी आणि परिवर्तनवादी विचार भारतात पसरलेले आहे .त्यामुळे संत सेवालाल महाराज यांची भक्तमंडळी केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर शेजारच्या कर्नाटक ,आंध्र, तामिळनाडू, मध्य प्रदेश , उत्तर प्रदेश,पंजाब, हरीयाणा, दिल्ली, छत्तीसगड, बिहार राज्यात आहे. एवढेच नव्हे तर गेल्या चार-पाच वर्षापूर्वीच्या यात्रेचे आपण आढावा घेतला. तर अमेरिकेसारख्या प्रगत देशातुनही आणि पाकिस्तानातुन भाविक भक्त पोहरागडला नतमस्तक होण्यासाठी येतात. दरवर्षी यात्रेकरूंची संख्या वाढतच चाललेली आहे. सध्या तर दसऱ्याला 25000 हजार, दिवाळीला 50000 हजार, आणि 15 फेब्रुवारीला साठ-सत्तर हजार, तर रामनवमीच्या यात्रेला दोन अडीच लाख भाविक भक्त दरवर्षी पोहरागडाला येतात.
बंजारा संस्कृतीचे पीठ होण्याची गरज
पोहरागड येथे बंजारा संस्कृतीचे पीठ व्हावे. बंजारा संस्कृतचे गाढे अभ्यासक, लेखक, कवी , विद्वान व्यासंगी लोकांनी निदान यात्रेदरम्यान वर्षातून तीन-चार वेळा तरी पोहरागडाला वास्तव्यास यावे. जेणेकरून बंजारा संस्कृती आणि गोरबोली भाषेचे जतन कसे करता येईल. आजच्या बकरा-बळी प्रथावर विचार मंथन करता येईल. गोरबंजारा समाज दशा आणि दिशा यावर व्यापक प्रमाणात जनजागृती करता येईल !
भाविक भक्तांनी वर्षातून चार पाच दिवस पोहरागड येथे यावे. देवाचे दर्शन घ्यावे .बंजारा समाज संस्कृती, गोर बोलीभाषा, संत सेवालाल महाराज यांचे महान तत्वज्ञान घ्यावे. व आपल्या गावी परत जाऊन तेथे या ज्ञानाचा प्रचार प्रसार करावा. अशी तमाम जनतेची प्रामाणिक ईच्छा आहे. फक्त देव दर्शनासाठी येथे यायचे असेल तर लोकांनी बारा महिन्यात केव्हाही यावे. जिवनात एखदा तरी उमरीगडाची-पोहरागडाची वारी जरूर करावी.
काही प्रथा, परंपरावर बंधने घालण्याची गरज
दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पोहरागड येथे येणारा भक्त हा हजार रुपये बोकडांचा बळी देण्यात खर्च करतो. परंतु प्रामाणिकपणे मंदिराची देखभाल ,पाण्याची सोय व इतर नागरी सुविधासाठी पाच पैसेही देत नाही. ही फार मोठी शोकांतिका आहे. तो असे का करतो? ते देवच जाणे. यामुळेच पोहरागड-उमरीगडाचा विकास झालेला नाही. आज पोहरागड-उमरीगडाच्या परिसरात येणाऱ्या गाडीला पन्नास रुपयाचा चार्ज जरी घेतला. तर वर्षाकाठी सहजगत्या चार-पाच लाख रुपये जमा होऊ शकतात. या पैशांमधून पोहरागड येथे भक्तनिवास सहज उभे करता येईल. एक ते दीड -लाख लोकांची यात्रा आहे. उद्या दोन-अडीच लाखाची होईल, परवा चार- पाच लाखाची होईल. रामनवमीच्या आठ दिवस आधी दुकानवाले, व्यवसायकरणाऱ्याचे आगमन होते. त्यामुळे रामनवमीपर्यंत ही मंडळी सर्व मंदिर परिसरात ठाण मांडून बसतात. दरवर्षी यात्रेच्या निमित्ताने थोडीफार सुधारणा पोहरागड मंदिर प्रशासन कडून केली जाते. व मंदिरातील मुख्य गाभाऱ्यात फरशीचे काम सुद्धा दरवर्षी केल्या जाते. नारळ जोराने फरशीवर फोडतात आणि फरशीचे तुकडे तुकडे होऊन जातात. येथे स्वंयसेवक आहेत. अशातला भाग नाही. परंतु स्वयंसेवकाचे लोक कोणीही ऐकत नाही. स्वंयसेवक ओरडून-ओरडून नारळ फरशीवर फोडू नका असे बजावतात. परंतु घाईगर्दीत नारळ फरशीवर लोक फोडतात. शेवटी या गोष्टीचा प्रचंड राग येतो. परंतु आपणोच मणक्याछं ही भावना मनात येते. आणि मंदिरातील फरशीचे अतोनात नुकसान होते. एवढ्यावरच हे लोक थांबत नाही. तर शासनाचा आदेश असतांनाही बोकडाचा बळी दिल्यानंतर बोकडाचे रक्त हातात घेऊन जगदंबा मातेच्या पायरीपर्यंत ही मंडळी आपल्या हातातील रक्ताने धार देतात व धन्य मानतात. जगदंबा माता मंदिर ते सेवालाल मंदिर रस्त्यावर जवळजवळ दीड ते दोन फुटाचा जाड थर नारळाच्या सालटयाने व्यापून जातो .त्यामुळे त्यावरून चालणे सुद्धा त्रासदायक होते. पोहरागड येथे जत्रे दरम्यान येणाऱ्या भाविक भक्तांच्या दृष्टीने शासनाने पाण्याचे नियोजन करायला पाहिजे. पण तसे शासनाकडून प्रयत्न होताना दिसत नाही.
हागणदारीमुक्त ग्राम चळवळीची गरज
पोहरागड, उमरीगड येथे एका कुटुंबात दहा वीस माणसे उतरतात. घरात आधीच स्वकीयांची गर्दी आणि वरून हे यात्रेकरू. यामुळे घरातील स्त्रिया, आजारी मुले आणि म्हाताऱ्या माणसाची प्रचंड गैरसोय होत असते. तरीही पोहरागड-उमरीगड येथील स्थानिक नागरिक येणाऱ्या भाविक भक्तांची फुकटात मनोभावे सेवा करताना दिसतात .त्या बद्दल त्याचे आभार मानले पाहिजे! संडासाची कुठेही सोय नसल्यामुळे सकाळी पुरुषमंडळी सर्वत्र पावसाळ्यात उगवणाऱ्या छत्र्या प्रमाणे चहूकडे बसतात. त्यामुळे महिला भगिनींची या दिवसात फारच कुचंबणा होते. यात्रा पर्वातील नव दिवसात होणारी ही अडचण शासनाने दूर करावी किंवा पोहरागड-उमरीगड येथे शासनामार्फत हागणदारीमुक्त ग्राम चळवळ यशस्वी करून हजारो संडासाचे बांधकाम करण्यात यावे.
भाविकांसाठी उपुऱ्या सोयी-सुविधा
किसनभाऊ राठोड यांनी भक्तीधाम उभारून जवळपास पस्तीस खोल्या त्यांनी निर्माण केलेल्या असून प्रचंड गर्दीमुळे तेथील व्यवस्था सुद्धा कमी पडते.जवळपास दहा हजार लोकांची अंघोळीची व्यवस्था आणि पाच दहा हजार लोकांना जेवण्याचे चांगले नियोजन भक्तीधाम पिठाचे मंहत जितेंद्र महाराज व त्यांच्या टिमने अंत्यत चांगल्या प्रकारे करत असून जगदंबा मंदिर प्रशासनाकडे सुद्धा राहण्यासाठी बऱ्याच खोल्यांचे निर्माण करण्यात आलेले आहे. संत कबीरदास महाराज आणि त्यांच्या टिम कडुन सुद्धा या ठिकाणी अन्नदान चालवून भाविक भक्तांची राहण्याची आणि जेवणाची सोय सुद्धा केलेली आहे. तसेच संत बामलाल पिठाचे महंत सुनील महाराज यांनी सुद्धा संत बामणलाल पिठावर जवळपास दहा खोल्यांचे निर्माण केले. असून तेथे सुद्धा यात्रेदरम्यान जेवणाची व्यवस्था करण्यात येत आहे. पण या सर्व उपाय योजना भाविक भक्तांच्या लाखो लोकांसमोर कमी पडतात .त्यामुळे शासनाने या ठिकाणी भरपूर निधी देऊन लोकांना राहण्यासाठी भक्तीनिवासाचे निर्माण करावे .अशी तमाम जनतेची मागणी आहे. तसेच गोरबंजारा समाजातील उच्चपदस्थ अधिकारी मंडळी आणि नेतेमंडळींनी सुद्धा पोहरागड-उमरीगडाला भरघोस मदत करून कायमस्वरूपी पर्यायी व्यवस्था केली. तर निश्चितच त्यांचा भाविक भक्तांना फायदा होईल .
पोहरागड आणि उमरीगड यात्रा दरम्यान योग्य नियंत्रण ठेवले तर सर्वांनाच यात्रा सुसह्य होईल. संत सेवालाल महाराज, संत जेतालाल महाराज, संत बामलाल महाराज, सामकी याडी, संत डॉक्टर रामराव बापू महाराज यांचे विचार तमाम बंजारा समाजाच्या मनात मना-मनात तांडया तांडया पर्यंत निश्चितच पोचवेल. आणि संत सेवालाल महाराज व पर्यायाने पोहरागड- उमरीगडाचे महत्त्व शतपटीने वाढेल अशी आशा वाटते !
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.