खरे सुख-समाधान कशात आहे हे ओळखता यायला हवे. या सुखात समाधानातूनच आपणास येणारी अनुभुती ही आत्मज्ञानाची ओढ वाढवणारी असते. या समाधानाने साधनेला स्फुर्ती चढते. प्रोत्साहन मिळते. समाधानातूनच मिळणारा आनंद मोठा असतो.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 9011087406
तेथ शाकुही कीर बहुत म्हणावा । तयाचा हर्षवेगुही तो घ्यावा।
उजळोनि दिव्यतेज हातिवा । ते भक्तीचि पाहावी ।। २३ ।। ज्ञानेश्वरी अध्याय १६ वा
ओवीचा अर्थ – अशा स्थितीत त्याचा भाजीपाला देखील ( खरोखरच पक्वान्नांप्रमाणे) फार किंमतीचा समजावा व केवळ त्याच्या भाजीपाल्याकडे न पाहता अमृतसागराच्या दर्शनाने त्यास होणाऱ्या आनंदाकडेच लक्ष द्यावे. सूर्याला काडवातीने ओवाळण्यांत, काडवातीकडे लक्ष न देता (सूर्याने) त्या ओवाळणारांची भक्तींचा पाहावी.
गरजेच्यावेळी गरीबाच्या हातात मदत म्हणून कोणी पैसे दिले तर त्याला होणारा आनंद हा लाख मोलाचा असतो. मदत म्हणून किती पैसे मिळाले याला महत्त्व नसते. पण ते पैसे मिळाल्याने त्यावेळी त्याची गरज भागली गेली. यातून मिळालेला आनंद खूप मोलाचा असतो. कारण या आनंदाची, समाधानाची कक्षा कितीतरी पटीत असते. एखादे मनासारखे काम सदगुरुंच्या, भगवंताच्या कृपेने झाले तर आपण त्यांच्या दर्शनाला जातो. सदगुरुंना, भगवंताला देण्यासाठी आपल्याकडे काहीही नसले तरी चालते. भगवंताला फक्त भक्तीने वाहीलेले फुल, फळच हवे असते. पण भक्ताकडून याचीही अपेक्षा त्यांची नसते. दर्शनाच्यावेळी भक्ताच्या चेहऱ्यावर झालेला आनंदच सदगुरुंना समाधानी करतो. भक्ताने काय दिले याची मोजदाद ते कधीही करत बसत नाहीत. भक्ताला झालेल्या आनंदातच त्यांना खरे सुख मिळत असते.
खरे सुख-समाधान कशात आहे हे ओळखता यायला हवे. या सुखात समाधानातूनच आपणास येणारी अनुभुती ही आत्मज्ञानाची ओढ वाढवणारी असते. या समाधानाने साधनेला स्फुर्ती चढते. प्रोत्साहन मिळते. समाधानातूनच मिळणारा आनंद मोठा असतो.
खरा कलावंत कलेतून पैसे किती मिळाले याची अपेक्षा कधीही ठेवत नाही. ही कला प्रेक्षकांच्या पसंतीला किती उतरली यावरच त्याचे लक्ष असते. कलेला प्रेक्षकांनी दिलेली दाद हीच त्याच्यासाठी लाख मोलाची असते. प्रेक्षकांनी दिलेल्या प्रतिसादातूनच तो कलाकार प्रोत्साहित होत असतो. हा प्रतिसाद पैशात मोजता येत नाही. लावणीनृत्य करणाऱ्या नृत्यांगणेच्या नृत्यावर प्रेक्षकांनी शिटी वाजवून दिलेला प्रतिसाद त्या कलाकारास अधिक समाधानी करतो. लेखकाला पुस्तकाचा खप किती झाला, यातून पैसा किती मिळाला यापेक्षा हे पुस्तक किती जणांनी वाचून त्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली यात अधिक समाधान वाटते. पुस्तकाच्या खपातून लाखो रुपये मिळाले तरी लेखकाला समाधान वाटत नाही कारण ज्या लिखाणावर एक प्रतिक्रियाही उमटू शकत नाही असे लिखाण शुण्य मोलाचे असे त्याला वाटते. मिळालेली प्रतिक्रिया त्या लेखकाला लिखाणासाठी प्रोत्साहित करत असते. म्हणजेच त्या पुस्तकावर व्यक्त झालेल्या भावना अधिक महत्त्वाच्या असतात.
अशा घटनातून कोणता बोध घ्यायला हवा हे महत्त्वाचे आहे. सूर्याला दिवा लावून ओवाळले जाते. ज्याच्याजवळ प्रकाशाची काहीच कमतरता नाही. अशा सूर्याला दिवा लावून ओवाळणे थोडे गमतीशीरच वाटत नाही काय ? राज्याचा, सत्तेच्या ऐश्वर्याचा त्याग करून, संन्यास घेऊन आत्मज्ञानी झालेल्या राजाला सोन्याचा मुकुट भेट म्हणून दिला जातो. ह्या गोष्टी थोड्या विसंगत वाटत नाहीत का ? पण या गोष्टीतील देणाऱ्याचा भाव, भक्ती समजून घेण्याची गरज आहे.
आत्मज्ञानी गुरुसमोरच निरुपण करण्याची परंपरा आपल्याकडे आहे. गुरु निवृत्तीनाथांच्या समोरच ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी सांगितली. येथे शिष्यच गुरुंना ज्ञान समजावून सांगत आहेत. ज्ञान मिळवण्याची ही अनोखी परंपरा भारतीय संस्कृतीत आहे, असे आपणास वाटत नाही का ? गुरु-शिष्य संबंधातील ही ज्ञान परंपरा विचारात घेणे गरजेचे आहे. गुरु स्वतः शिष्याला किती समजले आहे हे पाहात आहेत की स्वतः शिष्याकडून ज्ञान घेऊन अधिक ज्ञानी होत आहेत. गुरुतर सर्वज्ञानी आहेत मग त्यांना ज्ञान समजावून सांगण्याची गरज काय ? सूर्याला वातीच्या दिव्याने ओवाळण्यासारखाच तर हा प्रकार आहे ना ? या घटनातील भाव विचारात घ्यायला हवा. शिष्यातील आत्मज्ञानाचा दिवा प्रज्वलित व्हावा ही भावना आहे. निरुपण करता करता त्याला हे आत्मज्ञान प्राप्त व्हावे. येथे शिष्याला सर्व प्रयत्न हे स्वतः करायचे आहेत. स्वतःचा अभ्यास स्वतःच करायचा आहे. स्वतःचा विकास हा स्वतःच करायचा आहे. स्वतःच स्वतःतील आत्मज्ञानाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. सूर्याप्रमाणे स्वतःच त्याने प्रकाशमान व्हायचे आहे. स्वयंपूर्ण व्हायचे आहे. या स्वयंपूर्णतेमुळे दुसऱ्यावर विसंबून राहावे लागत नाही. उलट या स्वयंपूर्णतेमुळे इतरांनाही त्याच्या लाभ होऊ शकतो. यासाठी भाव-भक्तीची ही परंपरा समजून घेणे गरजेचे आहे. स्वतःच स्वसामर्थ्यांनी विकसित व्हायचे आहे अन् इतरांनाही विकसित करण्याचा प्रयत्न करायचा आहे. यातच खरे सुख-समाधान आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.