December 21, 2024
Regular Dnyneshwari Reading due to new experiences
Home » नित्य नव्या अनुभुतीमुळेच नियमित पारायणे
विश्वाचे आर्त

नित्य नव्या अनुभुतीमुळेच नियमित पारायणे

तेथ हरु म्हणे नेणिजे । देवी जैसें कां स्वरूप तुझे ।
तैसें हें नित्य नूतन देखिजे । गीतातत्त्व ।। ७१ ।। ज्ञानेश्वरी अध्याय १ ला

ओवीचा अर्थ – त्यावर शंकर म्हणाले, हे देवी ज्याप्रमाणे तुझ्या स्वरुपाचा थांग लागत नाही, त्याचप्रमाणे गीतातत्त्वाचा विचार करावयास जावे, तेंव्हा ते रोज नवीनच आहे असे दिसते.

जेवण आपण रोजच करतो. दररोज तेच तेच पदार्थ असतील तर ते खाताना कंटाळा येतो. एकच भाजी रोज खायला नकोशी वाटते. दररोज जेवणात वेगवेगळ्या भाज्या असतील तर जेवणाचा आनंद वाटतो. दररोज काही ना काही तरी नवीन खावे असे वाटते. असा बदलही अंगाला मानवतो. म्हणजेच नित्य बदल असेल तर त्याची गोडी अधिक वाढते. प्रत्येक वेळी नवीन हवे म्हणजे त्यामध्ये रस अधिक वाटतो. तसे गीतेचे तत्त्वज्ञान आहे. ज्ञानेश्वरीही अशीच आहे. गीतेचे श्लोक, ज्ञानेश्वरीतील ओव्या त्याच आहेत. पण दरवेळी वाचनात येणारा अनुभव, होणारा बोध हा वेगळा आहे. यामुळे त्याचे पारायण करताना कंटाळा येत नाही.

दरवेळी काहीतरी वेगळे शिकायला मिळते. नवनवे बोध होत राहतात. वाचनाची गोडी त्याचमुळे वाढत राहाते. सृजनशीलता, नवनिर्मिती होत राहीली तर वाचताना कंटाळा येत नाही. काळ बदलला, वेळ बदलली तरी त्यातील तत्त्वज्ञान तेच आहे. ओव्या, श्लोकही तेच आहेत. काळानुसार त्यात बदल होत नाही उलट नव्या युगातही त्याच ओव्या आपणाला आपलेसे करून टाकतात. कारण त्यात नव्यापणाचा विचार आहे. काळाशी सुसंगत, बदलशी सुसंगत असे ते तत्त्वज्ञान आहे. शास्त्र तेच असते फक्त त्याचा वापर काळानुसार बदलत असतो. ठिबक सिंचन पूर्वीही होते अन् आताही आहे. झाडाच्या मुळाशी पाणी घालावे हे शास्त्र आहे फक्त आता बदलत्या परिस्थितीनुसार त्यात बदल झालेला पाहायला मिळतो. मडक्याची जागा आता पाईपने घेतली आहे. पाईपला छिद्रे पाडून झाडाच्या मुळाशी पाणी घातले जात आहे.

ज्ञानेश्वरी, गीता तत्त्वज्ञान हे संपूर्ण विश्वाला लागू पडते. देश बदलला म्हणून मग त्या ओव्यात किंवा श्लोकात बदल होत नाही. भाषा बदलेल पण श्लोक किंवा ओवी मात्र तीच असेल. फक्त त्यातून होणारा बोध, अनुभुती ही त्या त्या परिस्थितीही सुसंगत असते. त्यामुळे हे तत्त्वज्ञान, हे शास्त्र जगभरात वापरले जाणारे आहे. चालणारे आहे. नित्य नुतन विचारांमुळे यात आवडही कायमस्वरुपी टिकूण राहते. युगानुयुगे हे तत्त्वज्ञान याचमुळे परंपरेने टिकून आहे. हे तत्त्वज्ञान नव्यापिढीसाठीही मार्गदर्शक असे आहे.

रसायनशास्त्रामध्ये रासायनिक प्रक्रियेचे प्रयोग केले जातात. एकाच रासायनिक प्रक्रियेच्या प्रयोगात दरवेळी मिळणारी आकडेवारी ही बदलत राहाते. कारण प्रक्रियेत वापरल्या जाणाऱ्या रसायनाच्या गुणवत्तेचे प्रमाण हे एकच नसते. ते बदलत असल्याने मिळणाऱ्या निकालाची आकडेवारीही बदलत राहते. असेच जीवनाचे आहे. जीवनात रोज तोचतोच पणा नसतो. सूर्य तोच आहे, चंद्र तोच आहे. पण येणारी सकाळ, उजाडणारा दिवस हा वेगळा आहे. नवा बदल घेऊन तो येत असतो. यातील आनंद आपण टिपायला शिकले पाहीजे. नव्या बदलाबरोबर नवा आनंदही मिळत राहतो. तसा बदल आपण आपल्यात केल्यास जीवन नित्य आनंदी राहते.

रोज येणारे वृत्तपत्र त्याच त्याच बातम्या देत असेल तर आपणास ते वाचायला नको वाटते. साहजिकच आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. वाचायलाही नित्य नुतन काहीतरी हवे असते. तसा बदल आपणास अपेक्षित असतो. नव्या लेखमाला, नवी सदरे यासाठीच वृत्तपत्रात नित्य दिली जातात. वाचक त्यामुळे खिळून राहातो. नव्या मांडणीचे प्रयोगही नित्य केले जातात. हे बदल हे त्यासाठीच असतात. नित्यनुतन हवे असते. मग ज्ञानेश्वरी अन् गीतेचे तेच तेच श्लोक, ओव्या वाचताना आपणाला कंटाळा का येत नाही ? पारायणाचा कंटाळा यायला हवा , पण तसे होत नाही. कारण त्या ओव्या, ते श्लोक आपणास नित्यनुतन अनुभुती देत असतात. नवा बोध त्यातून मिळतो म्हणूनच या ग्रंथाची पारायणे नित्य होत राहतात.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading