गडचिरोली जिल्हा झाडीबोली साहित्य मंडळाचे वार्षिक साहित्य पुरस्कार वितरण सोहळा
गडचिरोली – झाडीबोली साहित्य मंडळ जिल्हा शाखेच्या वतीने वार्षिक साहित्य तथा लोककलावंत पुरस्कार वितरण तसेच विदर्भ स्तरीय कविसंमेलनाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. शिवनाथ कुंभारे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर होते.

आरमोरी येथील नायब तहसिलदार धनंजय वाकुलकर, झाडीबोली साहित्य मंडळाचे जिल्हाध्यक्ष कवी डॉ. चंद्रकांत लेनगुरे, चंद्रपूर जिल्ह्याध्यक्ष कवी अरूण झगडकर, कवयित्री शशिकला गावतुरे (मुल), जीवन विमा निगमचे दिलीप उडान यांची प्रमुख उपस्थिती होती. मंडळाच्या वतीने मागविण्यात आलेल्या प्रवेशिका मधून कवी मुरलीधर खोटेले यांच्या झाडीबोली (मातीतून अबारात) पुस्तकास, कवयित्री शितल कर्णेवार यांच्या प्रमाणभाषेतील (मौनाचे अस्तर) कविता संग्रहाकरिता, दिवं. लेखक पितांबर कोडापे यांच्या रान झुलवा या वैचारिक लेखन पुस्तकास साहित्य पुरस्कार देण्यात आले. झाडीपट्टी लोककलावंत पुरस्कार शाहीर लोकराम शेंडे यांना प्रदान करण्यात आला.
आपल्या झाडीपट्टीची मूळ भाषा असलेल्या झाडीबोलीचा स्वाभिमान आपण सदैव जपला पाहिजे , त्यासोबत या बोलीचा प्रचार प्रसार करणे गरजेचे आहे.
डॉ. शिवनाथ कुंभारे
धनंजय वाकुलकर म्हणाले की, माझे आयुष्य या झाडीप्रांतात गेले. येथील वैविध्यपूर्ण संस्कृती जपली गेली पाहिजे.साहित्य मंडळाच्या माध्यमातून होत असलेले झाडीबोली संवर्धनाचे वाड्.मयीन कार्य कौतुकास्पद असल्याचे ते म्हणाले.
बोलीभाषेत माय माऊलींच्या संस्काराचा खजिना आहे, ती आपली प्राथमिक ज्ञानभाषा असल्याने त्यातून गाव समाजातील संवाद प्रक्रिया प्रभावीपणे होत असते.
बंडोपंत बोढेकर
यावेळी बामनी (खडकी)येथे होत असलेल्या ३१ व्या झाडीबोली साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल डॉ. चंद्रकांत लेनगुरे यांचा तसेच मुल येथे होणाऱ्या पहिल्या महिला झाडीबोली साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल कवयित्री शशीकला गावतुरे यांचा तसेच ज्येष्ठ गझलकार वामनदादा गेडाम आणि कवयित्री मालती सेमले यांचा विशेष योगदानाबद्दल मानवस्त्र व गौरवचिन्ह देऊन मंडळातर्फे सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात ज्येष्ठ कवी वामनदादा गेडाम, मालती सेमले यांच्या उपस्थितीत विदर्भ स्तरीय कविसंमेलन घेण्यात आले .यात लक्ष्मण खोब्रागडे, अर्पणा नैताम, संजय कुनघाडकर, देवेंद्र मुनघाटे, अँड.संजय ठाकरे, मंदाकिनी चरडे, निधी गडकरी, संगीता गडकरी, शशिकला गावतुरे, कन्हैय्या मेश्राम, तुषार मेश्राम, पुनाजी कोटरंगे, भारत मेश्राम, प्रभाकर मेश्राम, योगेश गोहणे, सुरेखा बारसागडे, संजीव बोरकर, प्रिती चाहंदे, आनंदराव बावणे, प्रतिक्षा कोडापे, वर्षा राजगडे, पुरूषोत्तम ठाकरे, उपेन्द्र रोहणकर, डॉ. चंद्रकांत लेनगुरे, वामनदादा गेडाम, मारोती आरेवार, कमलेश झाडे, विनायक धानोरकर, डॉ. प्रवीण किलनाके इत्यादी ३६ कवींनी आपल्या रचना प्रस्तुत केल्यात. या कार्यक्रमात ज्येष्ठ कवयित्री शशिकला गावतुरे यांच्या क्रांतीपर्व काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले.
प्रा.विनायक धानोरकर यांनी प्रास्ताविक केले तर डॉ. चंद्रकांत लेनगुरे यांनी गडचिरोली जिल्हा शाखेच्या कार्यावर प्रकाश टाकला. सूत्रसंचालन संजीव बोरकर यांनी तर कविसंमेलनाचे सुत्रसंचालन मारोती आरेवार आणि डॉ. प्रवीण किलनाके यांनी केले. आभार प्रदर्शन उपेंद्र रोहणकर यांनी केले.
मंडळाचे सदस्य कमलेश झाडे, प्रतिक्षा कोडापे, पुरूषोत्तम ठाकरे, प्रेमिला अलोने, जितेंद्र रायपुरे, गजानन गेडाम आदींनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.