जीवनाकडे बघण्याचा वैज्ञानिक आणि गणितीय दृष्टिकोन मनात आपल्या मातृभाषेविषयीचा गोडवा, बहुजनांना आणि स्त्रियांना मानवाचे स्थान देणारे शाहीर अण्णाभाऊ साठे या सारख्या महान विभूतिंची प्रेरणा व त्यांच्या जीवन मार्गातील ठसे कवी सुरेश गेडाम यांच्या मनःपटलावर उमटले व अतिशय सुरेख, भावगर्भित, सारगर्भित प्रतिबिंब साकार झाले.
सौ. प्रिती विलास जगझाप
मु. पो. बल्लारपूर जि. चंद्रपूर
प्रत्येकाला स्वप्रतिमा दुसर्याच्या प्रतिमेपेक्षा निश्चितच आवडत असते.आणि या आवडीचे रूपांतर जर छंदात झाले, आत्मविश्वासात झाले, स्व च्या जाणीवेत झाले तर शब्दांत गुंफल्या जातात भावना, विचार, मनोगत, हृदयीचे गुज त्यातुन अवतरतं आपलं ‘प्रतिबिंब’…म्हणजे हुबेहुब चित्र डिक्टो म्हणतो आपण त्याला.
बरेचदा असे होते की,आपल्या मनातला भाव व्यक्त करण्यासाठी शब्दांची साथ हवी असते.आणि त्या शब्दातून मनातील प्रतिमेचा ठाव,ठसा,चित्र, एक मूर्त कल्पना,विचारांची, कृतीची दिशा आपणास कळत असते.या सर्व भावभावनांचे एकत्रीकरण वाचावयास मिळते कविवर्य सुरेश गेडाम यांच्या “प्रतिबिंब “या कवितासंग्रहात आपला पहिलावहिला कवितासंग्रह त्यांनी भारतमातेसाठी लढणारे वीर जवानांना त्याच बरोबर त्यांच्या वाड वडीलांना जन्मदात्री ला अर्पण केलेला असून सुप्रसिद्ध चित्रकार संतोष धोंगडे यांच्या कुंचल्यातून अतिशय सुरेख असे मुखपृष्ठ कवितासंग्रहाला लाभलेले आहे. एक कमी शंभर कवितांचा प्रतिबिंब हा कवितासंग्रह ज्याला पंढरपूरच्या समिक्षा प्रकाशनाने प्रकाशित केलेले आहे आणि झाडीबोली साहित्य मंडळाचे जिल्हाध्यक्ष अरूण झगडकर यांची अभ्यासपूर्ण प्रस्तावना लाभलेली आहे.तर झाडीबोली मंडळाचे मार्गदर्शक ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांनी कवितासंग्रहाची पाठराखण केलेली आहे.
जीवनाकडे बघण्याचा वैज्ञानिक आणि गणितीय दृष्टिकोन मनात आपल्या मातृभाषेविषयीचा गोडवा, बहुजनांना आणि स्त्रियांना मानवाचे स्थान देणारे शाहीर अण्णाभाऊ साठे या सारख्या महान विभूतिंची प्रेरणा व त्यांच्या जीवन मार्गातील ठसे कवी सुरेश गेडाम यांच्या मनःपटलावर उमटले व अतिशय सुरेख, भावगर्भित, सारगर्भित प्रतिबिंब साकार झाले.
कवी म्हणतात-
धन्य आपली देशभक्ती, धन्य आपली सेवा ll
संविधान हक्क दिधले, तू संबोध दे भगवान.ll.
भिमाईच्या सूता, तुला ज्ञानाचे वरदान l
मंडळी प्रत्येकाला चांगली बायको, चांगली मुले स्त्री ला चांगला नवरा, प्रेमळ सासू -सासरे, चांगले यशस्वी मित्र,श्रीमंत जावयी वगैरे….वगैरे पाहिजे असतात पण माणूस कुठे हरवलाय? याचा शोध कवी सुरेश गेडाम घेताना दिसतात. ते म्हणतात–
नको पैसा आणि धन सारे नाशिवंत खाणं
गुणवंत माणुसकीचे माणूस शोधतो मी!!
मागील दोन वर्ष टाळेबंदीच्या काळात माणूस आपल्याला गवसलाय सर्वदूर अंदाधुंदी माजलेली असली तरी माणूसकी मुळेच या भयावह संकटावर आपण मात केलेली आहे.डाॅक्टर, नर्स, सफाई कामगार, दूधवाला, भाजीवाले,मोफत जेवण देणाऱ्या संस्था, औषध दुकानदार, शिक्षक, आशा वर्कर्स,अंगणवाडी ताई यांच्यात दिसला “माणूस”
कवी म्हणतात-
सकळ जीवांचे रक्षण करूनी
राहो जीवन सुखी आनंदीत
न्याय, हक्क हे समता बंधूता
घडो भूमीवर सदा सदोदित
त्याचबरोबर शांतीची उपासना करतांना शांतीची मागणी करतांना कवी म्हणतात-
आसक्ती सारखे अग्नी नको
व्देषासारखे मळ नको
स्कंदासारखे दुःख नको
युध्द नको बुद्ध हवे
‘जो बुंद से गयी वो हौद से नही आती ” या म्हणीची आठवण आरसा ही कविता वाचताच वाचकाला येते.कवी म्हणतात-
देह मनुष्याचे काचेच्या समान
खाली पडताही कुठं जुळे तन.
अतिशय उच्च दर्जाची शब्दसंगती आहे इथे खाली पडणे म्हणजे जमिनीवर पडले पाहिजे असे नाही तर विचाराने,कर्माने,बोलण्याने,वागण्याने तुम्ही जर खाली पडले तर ज्याप्रमाणे आरसा एकसंघ होऊ शकत नाही आपले व्यक्तीमत्व, आपले चारित्र्य देखील अभंग, अखंड राहणार नाही आणि खंडित आरशाचा जशी किंमत नसते तशीच मानवाची देखील गत होईल म्हणून मानवाने सदाचाराने वागावे कवी म्हणतात–
तोच आवडतो प्रिय लोकां जन
मन स्वच्छ ठेवा आरशा समान
हे जीवन जगण्याचे तत्वज्ञान सांगणारा गुरू मग तो मित्र, आई,बाबा,मैत्रिण वा नवरा, बायको पण असू शकतो. अथवा एखाद्या साहित्यिकाच्या साहित्यातून देखील आपणास गुरू महिमा लक्षात येऊ शकेल कवी म्हणतात-
बालमनाच्या सुखदुःखाची
ओळख त्याला सर्वांगाची
जीवनमूल्ये संस्काराची
कला संवर्धन कौशल्याची
प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात त्याच्या बालमनावर संस्कार करण्याची जबाबदारी माता पिता व समाजाची देखील असते मात्र जन्मदात्री आई येथे अग्रगण्य आहे. “आईची माया”या
कवितेत कवी म्हणतात-
कष्ट करूनी आई मातेने
तुम्हा घडविले छान!!!
दुःख भोगून स्वतः जीवाला
दिले तुम्हा वरदान
जन्म भरीया आईची माया
ह्दयी ठेवा जपून
मायचं प्रेम जपतांना भूतदया देखील ह्दयात जपून ठेवावी जतन करावी हे देखील कवी सांगतात-
काळ वेळ जीवनातील सुटत नसते कोणाले
धन,दौलत, पैसा सारे साथी नसते मरणाले
विधाता सर्वांना एकाच पारड्यात मोजत असतो म्हणून फक्त सत्कर्म करा असे कवी सांगतात.
रात्रवेळी माणसाचे काळ कोणी पाहिले?
जीवनाचे अंतःकाळी जाळ कोणी पाहिले?
हि गज़ल असो
अथवा
जीवनाच्या वाटेवर
लुटेरे, लबाड, ढोंगी
संकटात झोपलेले
ते देवही स्वार्थी सोंगी
हि कविता असो वर्तमानात जगण्याचा आणि आपल्या स्वकर्तृत्वावर जगण्याचा सल्लाही कवी देतात संकटावर मात करत कसे जगावे कवी म्हणतात–
रोज दिनीही कष्ट श्रमाचे
क्षणा-क्षणाला असे
ह्द्यी पाहूया स्वप्न उद्याचे
जीव कल्याणाचे कसे.
अशाप्रकारे वरील विविध कवितांमधून कवी सुरेश गेडाम सामाजिक बांधिलकी जपत व्यक्त होतात त्याचबरोबर त्यांच्या विविध कविते मधून निसर्गाचे “प्रतिबिंब “देखील बघावयास मिळते श्रावणमास, नंदीबैलाच्या जोडीन,ऋतूवसंत, आला श्रावण श्रावण, हिरवं कंच राण, रानमेवा,सृष्टीचे रक्षण, पळसाची डाई आणि मोरा पांघरून रोवे या निसर्ग कवितांची वर्णी प्रतिबिंब मधे लागलेली आहे.कवी म्हणतात–
साथ मोर्याची कमाल
माह्या मायेच्या जीवाले
पिक शेतामधी डोले
अन्न मिळेल जगले
त्याचबरोबर—
कण -कण वरूळाचे
तसं ह्दयाचे मन!
झूला झूले वार्यासंगे
सारं पृथ्वीवर तन
मंडळी हिरवाई बघितली कि अरसिक मनात सुद्धा प्रेमांकुरते मग सुरेश गेडाम तर ठरले कवी त्यांच्या मनात प्रित बहरणारच ते म्हणतात—
दूर कुठे मन वेडे
पक्षी नवे बागडते
उंच नभी पक्ष्यासंगे
मन माझे फडफडते
आता मन फडफडते म्हंटल्यावर त्याचे अत्तर तर चहुकडे पसरणारच कवी म्हणतात-
तुझ्या प्रेमाचा सुगंध
मिळे जीवास स्वानंद
सुखदुःखाच्या डोंगरी
चला घेऊया आनंद
आणि या आनंदभानात कवी म्हणतात-
वेली सुंदर बहरून आल्या
जीवनाच्या या वाटेवरती
तुझेच नाते गुंफुन माला
आयुष्याच्या जगण्यावरती
अशा कविते मधून सुखी संसाराचे “प्रतिबिंब “दिसून येते.
संसार नेटका करून सामाजिक भान जपत महाराष्ट्राचे गौरवगीत गातांना कवी म्हणतात–
इथे जन्मले शिवबा राजे
वीर ते तानाजी
संगे घेऊनी सुर्याजीला
गड कोंढाणा जिंकला
फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचाराने प्रेरित होऊन समाजात वावरणारे कवी ज्या माऊलीने शिक्षणाच्या आद्यप्रवर्तक सावित्रीबाईने स्त्रियांना हक्काचे,मानाचे स्थान देणाऱ्या साऊ विषयी कवी लिहीतात–
आज जगामंदी
मुक्त झाले रे शिक्षण
उजळल्या ज्ञानज्योती
स्त्रिया शिक्षण घेऊन
शिक्षणासोबतच कवी पुस्तकाचे महत्व देखील विशद करतात.
जीव पुस्तकाची घडी
तिथं आयूष्याचा मान
सार्या जगामध्ये दादा
दिसे जीवनाची शान
आणि रसिक वाचकांनो या प्रतिबिंब कवितासंग्रहाचा प्राण असलेली शेवटची कविता म्हणजे– “पै फुकाचा”
या कवितेत जीवनाचे, प्रत्येकाच्या जगण्याचे सार लपलेले आहे असे म्हणावयास हरकत नाही कवी म्हणतात —
बोलणारा बोलून जातो नच कोणा ऐकणे
तोलणारा तोलून जातो कार्य आपुले करणे
अशा अतिशय कवितासंग्रहाचे साहित्य क्षेत्रात मनःपूर्वक स्वागत
पुस्तकाचे नाव – प्रतिबिंब काव्यसंग्रह
कवी – सुरेश गेडाम, गडचिरोली
मुल्य – १५० रुपये
पुस्तकासाठी संपर्क – 9423400051