March 25, 2023
Home » अवचितयावरी सर्वस्व सांडिजे । चोख तरी तोचि भांडारी कीजे । तैसा तूं आतां माझे । निजधाम कीं ।।
विश्वाचे आर्त

अवचितयावरी सर्वस्व सांडिजे । चोख तरी तोचि भांडारी कीजे । तैसा तूं आतां माझे । निजधाम कीं ।।

अध्यात्मात संतसुद्धा शिष्यामध्ये हाच भाव पाहतात. संतांकडे दररोज हजारो माणसे भेट देतात. हाताची पाचही बोटे सारखी नसतात. तशी सर्वच माणसे ही सारखी नसतात. प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो.
– राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल 8999732685

अवचितयावरी सर्वस्व सांडिजे । चोख तरी तोचि भांडारी कीजे ।
तैसा तूं आतां माझे । निजधाम कीं ।। 52 ।। ज्ञानेश्वरी अध्याय 10 वा

ओवीचा अर्थ – एखाद्या अकस्मात आलेल्या मनुष्यावर आपलें सर्वस्व सोंपवावें व तो प्रामाणिक आहे असें आढळून आलें, तर त्यालाच खजिनदार करावा, त्याप्रमाणें आम्ही तुला सांगितलेलें तूं लक्षपूर्वक ऐकतोस, अशी आमची खात्री झाल्यामुळें तूं आता आमचें राहण्याचे ठिकाण झाला आहेस.

जीवनात अनेक माणसे आपल्याला भेटत असतात. आपल्या आयुष्यात येत असतात. प्रत्येक माणूस हा विश्वासहार्य असेलच असे नाही. अचानक जीवनात आलेल्या माणसावर पटकण आपण विश्वास ठेवणे तितके शक्य नसते. आपण कोणावर विश्वास ठेवतो ? अनेकजण आपणास आमिषे दाखवतात व फसवतात. आपण त्यांच्या त्या दुष्टचक्रात सापडतो यात आपलेच नुकसान होते. पण अशी फसवणारी माणसे नेहमीच भेटतात असे नाही. मुळात अशी फसवणारी माणसे आपण आपल्या आयुष्यातून दूर ठेवायला हवीत. आपण फसलो म्हणजे आपण हरलो असे कधीच होत नाही किंवा तो जिंकला असेही होत नाही. फसवणूकीमध्ये हार-जीत नसतेचमुळी.

ठेच एकदा लागल्यानंतर माणूस शहाणा होतो. पण त्यातून शहाणपण येते. पुन्हा त्या मार्गावर तो सावधपणे चालतो. ज्या दगडामुळे ठेच लागला तो दिसताक्षणी योग्य ती खबरदारी घेतो. वाटेत येणारा तो अडथळा तो दूर करतो. जीवनात वागतानाही असेच करावे लागते. फसवणूक करणाऱ्या माणसांपासून दूर राहणेच कधीही उत्तम. एकदा फसल्यानंतर पुन्हा फसणार नाही याची काळजी घेणे हे उत्तम.

काही अनोखळी माणसे सुद्धा. किंवा कधी ज्यांचा आपल्याशी संपर्क आला नाही अशी माणसेही आपणास अनपेक्षीतपणे मदत करतात. निरपेक्ष भावनेने मदत करतात. त्यातून त्यांना काही मिळो न मिळो फक्त समाधानासाठी ते मदत करत असतात. अशी प्रेमळ माणसे जीवनात आली तर आपण त्यांच्यावर निश्चितच विश्वास टाकतो. आपले सर्वस्व आपण त्यांना सोपवतो. अशा व्यक्तीला आपण खजिनदार जरूर करावे कारण तो तुमची योग्यप्रकारे काळजी घेऊ शकतो. त्या पदासाठी तो योग्य असतो.

अध्यात्मात संतसुद्धा शिष्यामध्ये हाच भाव पाहतात. संतांकडे दररोज हजारो माणसे भेट देतात. हाताची पाचही बोटे सारखी नसतात. तशी सर्वच माणसे ही सारखी नसतात. प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो. प्रत्येकाचे वागणे वेगळे असते. या माणसांची पारख ही करावीच लागते. सदगुरु शिष्याची निवड करताना अशी पारख करतात. त्याची परिक्षा घेतात. तो परिक्षेत पास झाला तरच त्या पदासाठी तो योग्य ठरतो. शिष्यामधील गुण जाणून घेऊनच मग त्याला दिक्षा दिली जाते. अनुग्रह देताना शिष्याची आवड, निवड, त्याची भक्ती, आराधना, उद्देश, अवधान आदी सर्व गोष्टींची परिक्षा सदगुरु घेतात.

अवधान हे अध्यात्मामध्ये सर्वात महत्त्वाचे आहे. जो अवधान देतो तो निश्चितच त्या पदास पोहोचतो. सदगुरु शिष्याच्या गुणांची खात्री करतात अन् मगच त्याला त्यांच्या हृदयात स्थान देतात. यासाठी शिष्याने योग्य ती काळजी घेऊन अभ्यास करायला हवा. साधना करायला हवी. तरच आत्मज्ञानाचा ठेवा त्याला मिळू शकेल.

 ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।
संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेल्या ज्ञानेश्वरी या ग्रंथाचा अभ्यास एक तरी ओवी अनुभवावी असा या ग्रुपचा उद्देश आहे. मग होताय ना सहभागी..त्यासाठी लिंकवर क्लिक करा.
https://www.facebook.com/groups/ShriDnyneshwariStudy

Related posts

गुरुसेवेने जीवास ब्रह्मत्व

स्वप्नातून बाहेर पडून वास्तवात जगा

जपाचे शब्द बुद्धीच्या डोळांनी पाहावेत

Leave a Comment