ब्रह्मज्ञानाचा सखोल अभ्यास करायचा आहे. ते मिळविण्यासाठी आवश्यक सर्व पायऱ्या अभ्यासायच्या आहेत. ब्रह्मज्ञान मिळाल्यानंतर आता पुढे जाणणे नाही. कारण जाणण्यासाठी काही शिल्लकच राहात नाही. ब्रह्म हेच अंतिम सत्य आहे.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे
मोबाईल – 9011087406
म्हणौनि ब्रह्मेशानापरौतें । वाढणें नाहीं जीवातें ।
तेथूनि मग वरौतें । ब्रह्मचि कीं।। 203 ।। ज्ञानेश्वरी अध्याय 15 वा
ओवीचा अर्थ – म्हणून ब्रह्मदेव आणि शंकर यांच्या पलीकडे जीवांना वाढणें नाही मग तेथून तर केवळ ब्रह्मच आहे.
विश्वातील प्रत्येक गोष्टीला काही-ना-काही मर्यादा आहे. जिवांची वाढ किती होते हे त्यातील जनुकीय घटक ठरवतात. उत्पादित धान्याची चव, वास, रूप हे त्यात आढळणाऱ्या जनुकीय संरचनेवर आधारित असते. जनुकीय संरचनेत बदल करून सुवासिक जातीची धान्ये तयार करता येतात. पण त्यालाही मर्यादा असते. मर्यादे पलीकडे जाऊन काही करता येत नाही. कमाल मर्यादा गाठण्याचा संशोधकांचा प्रयत्न असतो.
झाडाची उंचीही त्या झाडाचे जनुकीय घटक ठरवतात. वडाच्या झाडाचा विस्तार कितीही मोठा असला तरी त्यालाही काही मर्यादा आहेत. एखाद्या वस्तूकडे एक टक पाहणे किती वेळ शक्य असते. श्वास रोखून धरणे किती वेळ शक्य असते किंवा आपणास उभे राहणे किती काळ शक्य आहे. मर्यादा पाहूनच हे सर्व करावे लागते. मर्यादेच्या पलिकडे जाऊन काहीच करणे शक्य नसते.
तसेच अध्यात्माचे आहे. ब्रह्मदेव आणि शंकर ही देवत्वाची कमाल मर्यादा आहे. त्यांच्या पलीकडे जिवांची वाढ नाही. ब्रह्माचा साक्षात्कारानंतर केवळ आणि केवळ ब्रह्मच आहे. ब्रह्माच्या पलीकडे वाढ नाही. ही कमाल मर्यादा आपणास गाठण्याचा प्रयत्न करायचा आहे. साधक आणि संशोधक हे सारखेच आहेत. संशोधक त्याच्या शोधातील कमाल मर्यादा शोधत असतो. सर्वप्रकारे, सर्वदिशांनी त्याचा अभ्यास सुरू असतो. सखोल ज्ञान शोधण्याचा त्याचा प्रयत्न असतो. साधकानेही हेच करायचे आहे.
ब्रह्मज्ञानाचा सखोल अभ्यास करायचा आहे. ते मिळविण्यासाठी आवश्यक सर्व पायऱ्या अभ्यासायच्या आहेत. ब्रह्मज्ञान मिळाल्यानंतर आता पुढे जाणणे नाही. कारण जाणण्यासाठी काही शिल्लकच राहात नाही. ब्रह्म हेच अंतिम सत्य आहे. जिवाची वाढ ही तेथे पर्यंतचं आहे. त्यापुढे जिवाची वाढ नाही. हे जाणून घेण्यासाठी साधकाने संशोधकवृत्ती अंगी जोपासायला हवी. अंतिम ध्येय गाठेपर्यंत शोध हा सुरूच ठेवला पाहिजे.
संशोधनातून आपला विकास साधायचा आहे. चांगल्या झाडाच्या फांद्यातूनच नवी झाडे पुन्हा रुजवली जातात. ब्रह्मज्ञानाचा विस्तारही असाच आहे. ब्रह्मज्ञान प्राप्त झालेल्या व्यक्तीकडूनच ब्रह्मज्ञानाचा विस्तार होतो. यासाठी जीवनाचे अंतिम सत्य शोधण्याचा प्रयत्न साधकाने करायला हवा. ब्रह्माच्या अनुभूतीतून ब्रह्मज्ञानाची प्राप्ती करून घ्यायला हवी. याच्या अभ्यासात सातत्य ठेवले, तर ते सहज शक्य आहे. दृढनिश्चयाने जीवनाचे अंतिम ध्येय गाठायला हवे. त्या पलीकडे जगाचा विस्तार नाही. हे जाणून घेऊन जीवन सार्थकी लावायला हवे. ध्येय असावे सुंदर त्यातच चालत राहावे. तसा जीवनाचा प्रवास करायला हवा. तरच आनंदी जीवनाचा आस्वाद चाखायला मिळेल.
।। ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.