November 21, 2024
Sane Gurujis agricultural thought article by Indrajeet Bhalerao
Home » साने गुरुजींचा शेतीविचार
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

साने गुरुजींचा शेतीविचार

॥ साने गुरुजींचा शेतीविचार ॥

ग्रामीण साहित्याची पार्श्वभूमी शोधताना महात्मा ज्योतिराव फुले यांच्यापासून यशवंतराव चव्हाण यांच्यापर्यंत अनेक नावं चर्चेत येतात. ही नावं येणं अपरिहार्यच आहे. पण अपरिहार्य असूनही एक नाव मात्र कधीच चर्चेत आलं नाही. ते नाव म्हणजे साने गुरुजी. साने गुरुजी यांचं समग्र साहित्य वाचताना शेती आणि शेतकऱ्यांविषयी त्यांनी जो कळवळा दाखवला आहे तो वरच्या नामावलीतल्या कुणाहीपेक्षा तसूभरही कमी नाही. परंतु एकदा आलेल्या नावांचीच लोक पुन्हा पुन्हा चर्चा करतात आणि बाजूला पडलेलं नाव बाजूलाच राहतं. अलीकडं भालचंद्र नेमाडे यांनी साने गुरुजींकडं पाहण्याची नवी वाङ्मयीन दृष्टि दिली. दरम्यान झालेल्या साने गुरुजींच्या शताब्दीमुळे त्यांच्या साहित्याला उर्जितावस्था आली. आता तरी ते साहित्य वाचून साने गुरुजींची योग्य ती वाङ्मयीन दखल घेतल्या जावी ही अपेक्षा.

मराठी कवितेचं जबरदस्त वाचन आणि आकलन असलेल्या शरद जोशी यांनी मात्र ‘आता उठवू सारे रान’ हे साने गुरुजींचं गाणं उचलून शेतकऱ्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय केलं. त्यातली आवाहकता ओळखून त्याचा चपखल उपयोग केला. शेतकऱ्यांचे मेळावे आणि आंदोलनं स्वतः साने गुरुजी यांनीही केलेली होतीच. त्यातूनच साने गुरुजींना ही गाणी सुचलेली होती. त्यांच्या कवितेतही शेती आणि गावाचे पुष्कळ संदर्भ येतात. ग्रामीण कवितेचा विचार करताना गुरुजींच्या काही कवितांचा विचार नक्कीच व्हायला हवा. शेतकऱ्यांविषयी साने गुरुजींनी काढलेले पुढील उद्गार खूप चिंतनीय आहेत.

” सुशिक्षित वर्ग म्हणजे डोके. बहुजन समाज म्हणजे पाय. समाज पुरुषांचे मुंडके व हे खालचे सारे धड यांची आज फारकत झालेली आहे. वरच्या साहेबी थाटाच्या मुंडक्याला हे खालचे धड काही आवडत नाही. हे खालचे सेनामातीत बरबटलेले पाय शोभत नाहीत ! ज्या समाजात धड व मुंडके एकत्र नाहीत तो समाज जिवंत कसा राहायचा ? माझ्या पायात जर काटा टोचला तर माझ्या वरच्या डोळ्यांना पाणी येते ! पायाचे दुःख कुठे आहे ते डोळे पाहू लागतात. परंतु आज समाजातील खालच्या लोकांच्या दुःखाने वरच्या वर्गातील लोकांचे डोळे ओले होतात का ? वरचे डोळे खालच्या पायांकडे धावतात का ? वरच्या डोक्याने या पायांपाशी खरोखर नमले पाहिजे.”

‘कला म्हणजे काय ?’ या पुस्तकाच्या प्रस्तावनेचा हा काही भाग मुद्दाम इथं दिलेला आहे. साने गुरुजींची तळमळ त्यातून आपणाला दिसते. भाषा अलंकारिक असली तरी विचार मात्र तर्कशुद्ध आहेत. मुळात साने गुरुजींनी अनुवादित केलेला टॉलस्टाॅयचा हा ग्रंथ ग्रामीण साहित्यिकांनी नव्या पिढीला नीट वाचायला लावला असता तरी खूप काही चांगलं घडलं असतं. मग टॉलेस्टॉयदेखील ग्रामीण साहित्य चळवळीचा एक भाग झाला असता. खेड्यापाड्यातल्या पोरांना कला म्हणजे काय ? साहित्य म्हणजे काय ? नीट समजलं तरी असतं !

साने गुरुजींची ‘सुंदर पत्रे’ वाचताना मला शेती आणि शेतकऱ्यांचा विचार त्यात सतत डोकवताना दिसततो. साने गुरुजींच्या वाङ्मयात ‘सुंदर पत्रे’ मला सर्वश्रेष्ठ वाटतात. ‘श्यामची आई’पेक्षादेखील हे पुस्तक मला जास्त आवडतं. श्यामची आई हे साने गुरुजींनी अगदी सुरुवातीच्या काळात लिहिलेलं एक भावनीक पुस्तक आहे आणि सुंदर पत्रे हे त्यांचं अगदी शेवटचं पुस्तक. त्यामुळे परिपक्व अवस्थेतले साने गुरुजी या सुंदर पत्रातून आपणाला सापडतात. त्यात सतत शेतीचे संदर्भ येत राहतात. या संदर्भात साने गुरुजींनी अनुवादित केलेली एक कादंबरी पाहणं मला जास्त महत्त्वाचं वाटतं. ही कादंबरी म्हणजे ‘गोप्या’. गोप्या ही साने गुरुजींची अनुवादित कादंबरी मूळ फिनलँड मधल्या एका लेखकाची आहे. साने गुरुजींच्या आवडत्या गोष्टींच्या मालीकेतला हा दुसरा भाग. मुळात ही एका शेतकऱ्याची कहाणी आहे. म्हणजे ग्रामीण कादंबरीच की ! गुरुजींनी काही मूळ कादंबरी समोर ठेवून हा अनुवाद केलेला नाही. केव्हातरी वाचलेल्या कादंबरीचं कथानक लक्षात ठेवून ते आपल्या परीनं विकसित करत त्यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. साने गुरुजींनी स्वतः जी शेतकऱ्यांची आंदोलनं केली त्यातले सगळे अनुभव साने गुरुजींनी या नायकाच्या संदर्भात मांडून एका अर्थानं ही कादंबरी मुळीच अनुवाद वाटू नये अशा पद्धतीनं नव्यानं नव्यानं लिहिलेली आहे, असं ही कादंबरी वाचताना वाटतं.

या कादंबरीतला गोप्या हे पात्र काँग्रेसचा एक कार्यकर्ता आहे. भूमिगत होऊन तो शेतकऱ्यांचं एक आंदोलन उभं करतो. पत्री सरकारचाही थोडाफार प्रभाव या लेखनावर पडलेला आपणाला पाहायला मिळतो. तुम्ही माजला आहात, असं सावकाराला बोलून तो बाहेर पडतो आणि चळवळ उभी करतो. लोकांमध्ये लोकप्रिय होतो. त्याच्या भाषणाला गर्दी होते. लोक शेतकऱ्यांचा पंचप्राण म्हणून त्याचा उल्लेख करतात. पुढं आपल्या लक्षात येईल की शरद जोशींनाही नेमकं शेतकरी असंच म्हणत असत. काँग्रेसच्या शहरी पुढार्‍यांच्या तुलनेत गोपाळची भाषणं तुफान गाजतात. त्याच्या एका भाषणाचा हा नमुना पहा,

“सरकारी नि सावकारी जुलमाला सीमा नाही. लाखो खेड्यापाड्यातून लाखो हुतात्मे ; शहरातील कारखान्यातून हुतात्मे ; खेड्यातील झोपड्यातील हुतात्मे. माझी बायको मंजी, ती का हुतात्मा नव्हती ? ती उपाशी राहून तुम्हा प्रतिष्ठितांना पोषित होती. तुम्हाला धान्य देत होती. तिचे बलिदान कोणाला आहे का ठाऊक ? आणि माझी तारा ! आकाशातील तार्‍याप्रमाणे तेजस्वी ! ती का हुतात्मा नव्हती ? लहानपणी अपार काम तिला करावे लागे. तिचे खेळण्याबागडण्याचे वय. परंतु या शिवापुरात तिला मोलकरीण म्हणून राहावे लागले. रासभर धुणे धुवावे लागले. या गावच्या तळ्यात ती बुडून मेली ! बुडून मेली की तिने तुम्हाला जागे करायला स्वतःचे बलिदान केले ? बंधूंनो, माझ्याच काय लाखो शेतकऱ्यांच्या घरात ही अशी बलिदाने दररोज होत आहेत. कोण जागा होतो ? कोण उठतो ? “

या उताऱ्यात बलिदान या शब्दाच्या ठिकाणी आत्महत्या हा शब्द टाकावा आणि तो आजच्या संदर्भात वाचावा म्हणजे लक्षात येतं की साने गुरुजी कसे कायमच समकालीन आणि अभिजात आहेत ते.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

1 comment

सुहास रघुनाथ पंडित. सांगली. November 18, 2024 at 8:36 PM

खूप नवीन वाचायला मिळाले

Reply

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading