December 5, 2024
Comrade Datta More who raised the fight for the justice of the common people
Home » सामान्यांच्या न्याय हक्कासाठी लढा उभारणारे कॉम्रेड दत्ता मोरे
सत्ता संघर्ष

सामान्यांच्या न्याय हक्कासाठी लढा उभारणारे कॉम्रेड दत्ता मोरे

कॉ. दत्ता मोरे आणि मंडळींनी सर्व डंगे धनगरांना एकत्र केले. भुदरगड, राधानगरी, आजरा, चंदगड तहसीलवर मोर्चे काढले. धरणे धरले. कॉ. गोविंद पानसरे यांच्या मदतीने कलेक्टर ऑफिसवर हल्लाबोल केला. तेव्हा कुठे या बिचाऱ्यांना रेशनकार्ड मिळाले. त्यांची जनगणना झाली. पण वनखात्याचा आणि त्यांचा झगडा मात्र तहहयात सुरू राहिला.

डॉ. राजन गवस ज्येष्ठ साहित्यिक

भुदरगड, राधानगरीच्या सामान्य माणसांचा आवाज म्हणून कॉ. दत्ता मोरे यांची ओळख. भुदरगड तालुका डाव्या विचारांचा बालेकिल्ला. स्वातंत्र्य चळवळीत स्वत:चे एक वेगळे इतिहास पान असलेले इथले स्वातंत्र्यसैनिक. गारगोटी खजिन्यावरचा दरोडा आणि त्यात झालेले हुतात्मे ही तर भारताच्या इतिहासात ठळकपणे नोंदवलेली गोष्ट. तालुका तसा दुर्गम. आदिवसीवत जनजीवन. अशा तालुक्यातील प्रत्येक खेड्यात स्वातंत्र्य चळवळीची मशाल पेटती राहिली. याला कारण तिथल्या जनजीवनात असणारे मूलभूत चैतन्य. अशा तालुक्यात कॉ. दत्ता मोरे यांनी जनसामान्यांच्या प्रश्नासाठी आपली हयात घालवली. आयुष्यभर आपले कॉम्रेडपण त्यांनी अभिमानाने मिरवले. भुदरगड तालुक्यात सभा असो, संमेलन असो, मोर्चा असो, घेराव असो; तेथे उठून दिसणारी उपस्थिती म्हणजे कॉ. दत्ता मोरे यांची. त्यांना सामान्य माणसाच्या जगण्याबद्दल जिव्हाळा होता आणि त्यांच्या प्रत्येक समस्येचे उत्तर निघालेच पाहिजे, असा अखंड ध्यास होता. त्यांनी उभे केलेले लढे आपल्याकडे नोंदवले गेले नाहीत.

मूळात अशा लढ्यांचा इतिहास नोंदवायचा असतो. किमान वर्तमानपत्रात आलेल्या बातम्यांची कात्रणे एकत्र करून ठेवायची असतात. अशीही जाणीव नसलेला हा भवताल. यामुळे या तालुक्यातील अनेक जनसामान्यांचे यशस्वी लढे न नोंदवताच उडून गेले. कॉ. दत्ता मोरे यांनी शेतकऱ्यांचे, कामगारांचे अनेक लढे यशस्वी केले. या लढ्यात त्यांचा अत्यंत महत्त्वाचा आणि इतिहासात नोंदवलाच गेला पाहिजे, असा लढा म्हणजे डंगे धनगर यांच्या जमीन हक्काचा लढा.

भुदरगड, राधानगरी, आजरा, चंदगड हे सह्याद्रीच्या कुशीत वाढलेले, वावरलेले तालुके. या तालुक्यात शेतजमीन तशी कमीच. प्रचंड सह्याद्रीच्या रांगा, मोठे वनक्षेत्र. अशा वनक्षेत्रात राहणाऱ्या डंगे धनगरांची नोंदही कुणाकडे नव्हती. रेशनकार्ड, मतदार यादी यासारख्या गोष्टी तर कैक कोस दूर. हे सर्व डंगे धनगर कैक हजार वर्षांपासून या सह्याद्रीच्या रांगेत घनदाट जंगलात वास्तव्य करून असलेले. फाटकी केंबळीची घरे हे त्यांचे आसरा स्थान. गुरे पाळणे, जमेल तितकी शेती करणे आणि जंगलातील संपत्तीवर गुजराण करणे, हेच त्यांचे आयुष्य. जंगलातील प्रत्येक झाडाशी, वेलीशी आणि वाहणाऱ्या ओहळ, नाले, डोहाशी त्यांचे प्रस्थापित झालेले नैसर्गिक नाते. जंगल हेच त्यांचे तारणहार. गाव – समाजाशी त्यांचा संपर्क वर्षातून कधीतरीच यायचा. रितीभाती, सणवार सारे काही गाव- समाजापेक्षा वेगळे. ब्रिटीश काळात याच डंगे धनगरांनी स्वातंत्र्य चळवळीतील क्रांतीकारकांना भाकर-तुकडा देऊन जगवले होते. याचीही कुठे नोंद नाही.

स्वातंत्र्यानंतर अचानक भारतीय वनखाते वनजमिनीवर हक्क सांगू लागले. या बिचाऱ्या डंगे धनगरांची ना सात-बाराला नोंद, ना रेशनकार्डाला नोंद. त्यांच्यापर्यंत स्वतंत्र भारतातील नागरिक पोहोचलाच नव्हता तर यांची नोंद होणार कुठून ? वनखात्याचे शिपाई, फॉरेस्ट ऑफिसर जेव्हा या जंगलाच्या कीर्रर्र झाडीत घुसले, तेव्हा त्यांच्या ध्यानात आले की, येथे मानवी वस्ती आहेत. वनखात्याच्या अडाणी, आडदांड कारभाराने या डंगे धनगरांच्या जगण्यात महत्त्वाचा प्रश्न उभा केला. ना या लोकांची रेशनकार्डावर नोंद, ना यांच्या जमिनीची भुदरगड, राधानगरीच्या सामान्य माणसांचा आवाज म्हणून कॉ. दत्ता मोरे यांची ओळख.

सात-बारावर नोंद. तर मग हे इथे राहिलेच कसे ? असा कायदेशीर प्रश्न. ज्यांच्या हजारो पिढ्या इथे जगत आल्या, त्यांना जाब विचारणे सुरू झाले. कागदपत्रांची मागणी करण्यात येऊ लागली. बिचाऱ्या डंगे धनगरांना यातले ओ की ठो कळत नव्हते. गाव- तालुक्यातून आलेले हे लोक काय मागताहेत हेही त्यांना कळत नव्हते. ते उत्तर काय देणार ? जंगल खात्याने फर्मान काढले आणि त्यांना वस्त्या हलवण्याचे, घरेदारे सोडण्याचे आदेश निघाले. बिचारे डंगे घाबरून गेले. जीव मुठीत घेऊन त्यांनी तालुक्याला आपला कुणी वाली आहे का? याचा शोध सुरू केला. कॉ. दत्ता मोरे आणि मंडळींनी या सर्व डंगे धनगरांना एकत्र केले. भुदरगड, राधानगरी, आजरा, चंदगड तहसीलवर मोर्चे काढले. धरणे धरले. कॉ. गोविंद पानसरे यांच्या मदतीने कलेक्टर ऑफिसवर हल्लाबोल केला. तेव्हा कुठे या बिचाऱ्यांना रेशनकार्ड मिळाले. त्यांची जनगणना झाली. पण वनखात्याचा आणि त्यांचा झगडा मात्र तहहयात सुरू राहिला.

आजही ते त्या डोंगरकपाऱ्यातच घनदाट जंगलात राहतात. ना घर नावावर, ना जमीन. सततची वनखात्याची छळवणूक आणि जगण्याची विटंबना पाचवीला पूजलेली. कॉ. मोरे यांनी या माणसांच्या जगण्यात आत्मविश्वास निर्माण केला. असे अनेक लढे त्यांनी आपल्या हयातीत निर्माण केले, ज्याचा स्वतंत्र इतिहास लिहिण्याची गरज आहे. कॉ. मोरे भुदरगडचा जिताजागता इतिहास. कधी भेटले तर वेगवेगळ्या लढ्याची हकीकत चित्रमय पद्धतीने सांगायचे. बदललेल्या वर्तमानात निर्माण झालेल्या गुंत्यावर पोटतिडकीने बोलायचे. सर्वसामान्य गरीब शेतकरी, कामगार, दीनदलित यांच्याविषयी प्रचंड कळवळा शेवटच्या क्षणापर्यंत त्यांच्या व्यक्तिमत्त्वात ओसंडून वाहत होता. लढा, मोर्चा, धरणे आंदोलन हेच त्यांचे कार्यक्रम होते. काळ बदलला. परिस्थिती बदलली. माणसाची लढण्याची क्षमता कमी झाली. मात्र कॉ. मोरेंचा उत्साह कमी झाला नव्हता. शेवटच्या श्वासापर्यंत ते सामान्यांच्या प्रश्नांबाबत ते अस्वस्थ होत गेले. कॉ. मोरे आमच्यातून निघून गेले, तेव्हा मनात एकच आले. आता भुदरगड, राधानगरीतील जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर कोण येईल ? सामान्यांचे जगणे अधिक आगतिक होत असताना कॉ. मोरे यांचे असणे अधिक गरजेचे होते. पण कालगतीला इलाज नाही. कॉम्रेड गेले त्याक्षणी आमच्यातून शुभ्र काही हरपले, अशी उदास पोकळी घेरून गेली.

पुस्तकाचे नाव – कॉम्रेड दत्ता मोरे
लेखक – सुभाष धुमे
प्रकाशक – व्हिजन प्रकाशन, गडहिंग्लज
किंमत – १०० रुपये


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading