November 8, 2024
Network artificial intelligence article by Dr V N Shinde Shivaji University
Home » जाळे कृत्रिम बुद्धिमत्तेचे !
संशोधन आणि तंत्रज्ञान

जाळे कृत्रिम बुद्धिमत्तेचे !

कृत्रिम बुद्धितत्ता मानवाची विचार करण्याची प्रक्रिया कमी करू शकते. कृत्रिम बुद्ध‍िमत्ता चॅटजीपीटीमध्ये वापरण्यात येते. त्यातून अनेक लोक आपले लेख तयार करून घेत आहेत. अशा प्रकारे सर्जनशिलतेवरही या तंत्रज्ञानाने घाला घातला आहे. भविष्यात काय वाढून ठेवलेले आहे, हे नेमके सांगता येत नाही. मात्र भविष्यकाळात काय वाढून ठेवले आहे, हे एआय तंत्रज्ञान स्वत: सांगत आहे आणि ते तितकेच घातक आहे, समस्त मानव जातीसाठी!

डॉ. व्ही. एन. शिंदे,
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर

या वर्षीचे नोबेल पुरस्कार नुकतेच जाहीर झाले. भौतिकशास्त्राचे नोबेल पुरस्कार कृत्रिम बुद्धिमत्तेचे जाळे निर्माण करणाऱ्या दोन संशोधकांना जाहीर झाले. या घोषणेने अनेकांच्या भुवया उंचावल्या. भौतिकशास्त्राचे नोबेल कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या संशाधकांना देण्याचे कारण काय? असा प्रश्नही अनेकांना पडला. कृत्रिम बुद्धीमत्ता या विषयाचे वय अवघे पाउणशे वर्ष आहे. हा शब्दप्रयोग वापरण्यापूर्वीच अल्फ्रेड नोबेल यांनी आपल्या मृत्यूपत्रातून नोबेल कोणत्या विषयात द्यावे, हे सांगून ठेवले आहे. त्यामुळे या विषयाचा आणि नोबेल पुरस्काराचा काहीच संबंध नाही, असे अनेकांचे मत आहे. याचाच अर्थ अजूनही आम्ही आंतरविद्याशाखीय आणि बहुविद्याशाखीय संकल्पना समजून घेऊ शकलो नाही.

यावर्षीचे म्हणजेच २०२४चे भौतिकशास्त्राचे नोबेल जेफ्री हिंटन आणि जॉन हॉपफिल्ड यांना देण्यात आले. कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील संशोधनासाठी हा पुरस्कार देण्यात आला. हिंटन आणि हॉपफिल्ड यांनी अदृष्य थरांची संकल्पना मांडली. ही संकल्पना भौतिकशास्त्रातील तीन तत्त्वावर आधारित आहे. बुद्धिमत्ता शब्दच मूळी मानवी मेंदूशी संबंधित आहे. मानवी मेंदूप्रमाणे कार्य करू शकणारी बुद्धिमत्ता यंत्रामध्ये आणल्यास त्या बुद्धिमत्तेस कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणतात.

मानवी मेंदू कसा काम करतो, हे जैवभौतिकीमध्ये (Biophysics) अभ्यासण्यात येते. याच तत्त्वाचा विचार करून यंत्राची निर्मिती करण्यात आली. मानवी मेंदू आपल्या पंचेंद्रियाद्वारे विविध घटना, प्रसंग यांचे आकलन करून घेतो, माहिती आपल्या मेंदूमध्ये साठवतो. पुढे एखाद्या प्रसंगावर मात करण्यासाठी, साठवलेल्या माहितीमध्ये काही समकक्ष आहे का, याचा शोध घेतो. असेच कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये संगणकात जी माहिती साठवलेली आहे. संगणकामध्ये आपल्या मेंदूमध्ये जशी माहिती साठवलेली असते, तशीच माहिती संगणकात साठवलेली असते. या संगणक तंत्रज्ञानामध्ये माहितीचे विश्लेषण करण्यासाठी भौतिकी सांख्य‍िकीचा (Statistical Physics) उपयोग करतात. कठीण प्रश्नांचे उत्तर शोधण्यासाठी तौलनिक भौतिकीचा (Computational Physics) उपयोग होतो.

हॉपफिल्ड यांचे न्यूरल नेटवर्क जैवभौतिकीवर आधारित होते. त्यांनी मेंदू जसा कार्य करतो, त्यापद्धतीच्या कार्यासाठी कृत्र‍िम धाग्यांचे जाळे बनवले. त्यानंतर माहितीच्या विश्लेषणासाठी भौतिक सांख्य‍िकीच्या सहाय्याने एक प्रारूप तयार केले. त्यानंतर तौलनिक भौतिकीच्या सहाय्याने निष्कर्षासाठीचे प्रारूप बनवले. या तिन्हींचा समन्वय साधण्याचे कार्य हिंटन आणि हॉपफिल्ड यांनी केले. त्यावरच आजचे कृत्र‍िम बुद्ध‍िमत्तेचे विश्व उभा राहिले आहे.

या दोघांचे कार्य आजच्या एआय तंत्रज्ञानाचा पूर्ण पाया आहे. सिरी, अलेक्सा वैद्यकिय प्रतिमा विश्लेषणासाठी वापरण्यात येणारी एआय प्रणाली, सर्वकाही याच तंत्रज्ञानावर आधारित आहे. अल्फाफोल्ड प्रणाली कोणत्याही प्रोटिनची रचना सांगते. ही प्रणालीही याच तंत्रज्ञानावर आधारित आहे. जैवरसायनशास्त्र, औषध संशोधन क्षेत्रात कृत्र‍िम बुद्ध‍िमत्ता तंत्रज्ञान महत्त्वाचे बनले. खगोलशास्त्र, कण भौतिकी, हवामानशास्त्र या सर्व क्षेत्रात आज एआय महत्त्वाची भूमिका पार पाडत आहे. स्वंयचलित वाहनासाठी आवश्यक प्रणालीही हिंटन आणि हॉपफिल्ड यांच्या कार्यावर आधारित आहे.

किन्से यांच्या २०२३ मध्ये तयार करण्यात आलेल्या अहवालात निर्मितीक्षम कृत्रिम बुद्धिमत्तेच्या व्यवसायात ४.४ अब्ज डॉलरची उलाढाल होत आहे. यातून हिंटन आणि हॉपफिल्ड यांच्या संशोधनाचे महत्त्व अधोरेखीत होते. आर्थ‍िकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या या कार्यासाठी अर्थातच नोबेल पुरस्कार देण्यात आले. एआय तंत्रज्ञान संशोधनासह अनेक क्षेत्रात उपयुक्त असले तरी, हिंटन यांनी स्वत:च याबाबत चिंता व्यक्त केली आहे.

एआय तंत्रज्ञान विकसित होऊन त्याचा सर्वत्र वापर सुरू झाल्यास आंतरराष्ट्रीय नाणेनिधी या संस्थेनेच जागतिक पातळीवर ४० टक्के लोकांची नोकरी जाणार असल्याचे जाहीर केले आहे. हे खरेही आहे. आजवर नवे तंत्रज्ञान आल्यावर, जे कर्मचारी या नव्या तंत्रज्ञानाशी जुळवून घ्यायचा प्रयत्न करायचे, ते टिकून राहायचे. अन्य कर्मचाऱ्यांना नोकरी गमावावी लागत असे. मात्र आता येत असलेले कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात सर्वच कामे संगणकातील प्रणालीच्या सहाय्याने केली जातील. यामुळे कोणतेही वेतन न देता कारखान्यातील मजूरांचे काम यंत्रमानव करतील. त्यामुळे मानवी कर्मचाऱ्यांनी नवे तंत्रज्ञान समजून घेण्याची आणि नोकरी टिकवण्याची संधीच असणार नाही. उद्योगधंदे, कारखाने, दवाखाने, वाहतूक नियंत्रण, हवामान खाते, शेती अनेक क्षेत्रामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचे तंत्रज्ञान उपयुक्त असले तरी याच्या वापरातून अनेक सामाजिक समस्याही निर्माण होणार आहेत.

कृत्रिम बुद्धितत्ता मानवाची विचार करण्याची प्रक्रिया कमी करू शकते. कृत्रिम बुद्ध‍िमत्ता चॅटजीपीटीमध्ये वापरण्यात येते. त्यातून अनेक लोक आपले लेख तयार करून घेत आहेत. अशा प्रकारे सर्जनशिलतेवरही या तंत्रज्ञानाने घाला घातला आहे. भविष्यात काय वाढून ठेवलेले आहे, हे नेमके सांगता येत नाही. मात्र भविष्यकाळात काय वाढून ठेवले आहे, हे एआय तंत्रज्ञान स्वत: सांगत आहे आणि ते तितकेच घातक आहे, समस्त मानव जातीसाठी!

एआय तंत्रज्ञान सर्वत्र वापरण्यास सुरुवात झाली, घरकामापासून शेतीपर्यंत सर्वत्र यंत्रमानव काम करू लागले, तर मानवाच्या हाताला काम राहणार नाही. खाणे आणि विश्रांती घेणे हेच सर्वसामान्यांसाठी काम राहील. असे जर झाले तर मानवाच्या आरोग्याचे काय होणार, हा सर्वात मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. दुसरा महत्त्वाचा धोका म्हणजे धनको हे आधिक श्रीमंत होतील तर गरीबांचे जगणे दुश्वर होईल. तंत्रज्ञानाचा वापर करून मोठ्या प्रमाणात युद्धे खेळली जातील. ज्याच्याकडे प्रगत तंत्रज्ञान आहे तो विजयी होईल. मात्र अशा उद्योगपतीनी जगाला जिंकले तरी तो कोणती सुखे यातून मिळवेल, हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे.

त्यापुढचा प्रश्न येतो तो म्हणजे रिकामे मन म्हणजे सैतानाचे घर असते, असे मानतात. यंत्रमानवाच्यामार्फत सर्व कामे केली गेली, हाताला काम राहिले नाही, मनाला काम राहिले नाही, तर मानवाला काम राहणार नाही. अर्थातच अनेक रिकाम्या मनात सैतान शिरणार आणि हे सैतान पृथ्वीवर जो धुमाकूळ घालतील, ते कोणालाही सांगता येणार नाही. त्यामुळे मानवी हाताला आणि मेंदूला अगदी सर्वसामान्यांना मोठ्या प्रमाणात काम देणे आवश्यक आहे. या वर्षीच्या नोबेल पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन करताना, त्यांनी दिलेल्या धोक्याच्या इशाऱ्याकडे गंभीरपणे पाहण्याची गरज आहे!


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading