प्रकाश मेढेकर
स्थापत्य सल्लागार , वास्तू मूल्यकर्ता, इराक, ओमान, मलेशिया आणि भारतातील बांधकाम प्रकल्पाअंतर्गत 35 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव, व्यवस्थापन विषयांसाठी अभ्यागत व्याख्याता, मानव अधिकार आणि आदर्श स्थापत्य शास्त्रज्ञ पुरस्कार विजेते 2014, लेखक – दिशा बांधकाम नवनिर्मितीची (सकाळ प्रकाशन, पुणे )
ई -मेल – prakash.5956@gmail.com
मोबाईल – 9146133793
ज्या ज्या वेळी स्मार्ट सिटी या विषयाबाबत चर्चा होते त्यावेळी नकळत मला ऐंशीच्या दशकातील बगदाद शहर आठवते. हेच शहर सन ७६२ मध्ये इराक मधील सांस्कृतिक,व्यापारी, कलाकौशल्य, ज्ञानविज्ञान आणि विचारवंतांच प्रमुख केंद्र होते. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आणि विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुणे आणि बगदाद मध्ये याबाबत मात्र साधर्म्य आढळते.
राजधानी कशी असावी याचा आदर्श नमुना
इराक देशाची राजधानी असणारे हे शहर त्याकाळातील खऱ्या अर्थाने स्मार्ट शहर होते. राजधानी कशी असावी याचा आदर्श नमुना म्हणजे त्याकाळातील बगदाद शहर म्हणता येईल. आज आपल्या देशाच्या राजधानी असणाऱ्या दिल्ली शहराची ओळख देशातील सर्वाधिक प्रदुषित शहर म्हणून होणे ही निश्चितच चांगली गोष्ट नाही. देशातील इतर महत्वाची शहरेही त्याच दिशेने कमी अधिक प्रमाणात आज दुर्दैवाने वाटचाल करीत आहेत. शहरातील प्रदूषणावर आताच नियंत्रण ठेवले नाही तर सर्वांचेच आरोग्य भविष्यात धोक्यात येणार हे आपण विसरुन चालणार नाही. म्हणूनच पुणे मेट्रो प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण झाल्यास तमाम नागरिकांचे जीवन सुसह्य होण्यास मदत होणार आहे. येणारे वर्ष या प्रकल्पासाठी मैलाचा दगड असणार आहे. आपल्या शहराचा महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणून सर्वानीच यासाठी सहकार्य करणे आवश्यक आहे.
आंतरराष्ट्रीय विमानतळ स्थापत्य शास्त्राचा उत्कृष्ट नमुना
राजधानी बगदादचा सद्दाम आंतरराष्ट्रीय विमानतळ स्थापत्य शास्त्राचा उत्कृष्ट नमुना होता. मुख्य शहरापासून अंदाजे ४० किमी अंतरावर त्याचे ठिकाण होते. खरेतर देशातील दुसऱ्या स्थानावर असणाऱ्या पुणे आयटी हब साठी स्वतंत्र आंतरराष्ट्रीय विमानतळ या अगोदरच कार्यान्वित असायला हवे होते. आजही आपल्याला आंतरराष्ट्रीय विमानतळ गाठण्यासाठी मुंबईकडे धाव घ्यावी लागते. आणि त्यासाठी असणारा द्रुतगती महामार्ग सदैव अपघात आणि वाहतूक कोंडीच्या जाळ्यात सापडलेल्या अवस्थेत असतो. स्मार्ट सिटी बनणाऱ्या पुणे शहराच्या आंतरराष्ट्रीय विमानतळचे काम प्रत्यक्ष चालू करण्यास आता वेळ दवडून चालणार नाही.
स्वच्छ आणि सुंदर रस्ते
बगदाद शहरातील स्वच्छ आणि सुंदर रस्ते शहराच्या वैभवात भर घालणारे होते. त्याकाळात शहरात चारपदरी रस्ते, दिशा आणि वेगमर्यादा फलक, भव्य आयलंड, पुतळे आदी शहरात पहायला मिळत. रस्त्यांची तेथे नियमित स्वच्छता होत असे. त्यासाठी आधुनिक यंत्रप्रणालीचा वापर केला जात असे. आपल्या शहरातही नवीन रस्ते, जुन्या रस्त्यांचे रुंदीकरण, डांबरी रस्त्यांचे काँक्रीटीकरण, भुयारी मार्ग, स्कायवॉक, पदपथ, सायकलमार्ग, स्वच्छतागृहे आदी अनेक गोष्टी सतत होत असतात. परंतु या सगळ्यांचा उपयोग शहरातील नागरिकांसाठी व्हायला हवा. बगदाद शहरातील स्वातंत्र्य स्मारक असणाऱ्या ताहीर स्वेअर जवळील भुयारी मार्गाला त्यावेळी एस्कलेटर बसवला होता. आज आपल्या शहरातील भुयारी मार्ग, स्कायवॉक, पदपथ, स्वच्छतागृहे यांची सद्य स्थिती बदलणे गरजेचे आहे.
स्वच्छ अन् सुंदर तैग्रिस नदी
बगदाद तैग्रिस नदीच्या किनाऱ्यावर वसले आहे. मला आजही ती स्वच्छ आणि सुंदर नदी आठवते. कारण सारे बगदादवासी त्या नदीवर मनापासून प्रेम करत होते. पुणे शहरही मुळा मुठेच्या किनारी वसले आहे.. परंतु या नदीवरील पुलांवरून राजरोसपणे नदीत कचरा फेकला जातो. अनेकदा स्वयंसेवी संघटना पुढाकार घेऊन नदी स्वच्छतेसाठी प्रयत्न करतात. परंतु येणाऱ्या काळात प्रशासनाने ठोस उपाययोजना करून नदी स्वच्छता आणि त्यामधून जलवाहतूक करण्याचे उद्दिष्ट ठेवावे अशी आशा आहे.
बहुमजली स्वयंचलित पार्किंगची गरज
बगदाद शहरातील सर्व चौकात अत्यंत आकर्षक आयलंड होती. आपल्या शहरातील आयलंड अशीच स्वच्छ आणि सुशोभीत करण्यास खूप वाव आहे. यासाठी अनेक स्वयंसेवी संघटना निश्चित पुढाकार घेतील. पुणे शहराला अजूनही रिंग रोड नसल्यामुळे अनेक वाहने गरज नसताना शहरात येत असतात. शहरातील अरुंद रस्ते आणि अपुरे पार्किंग यामुळे वाहतूक कोंडी नित्यनेमाने होत असते. नुसते पार्किंगचे दिवस बदलून आणि नागरीकांवर पार्किंग शुल्क वाढवून हा प्रश्न सुटणार नाही. या शहराला आवश्यकता आहे अनेक बहुमजली स्वयंचलित पार्किंग व्यवस्थेची. सुदैवाने बगदाद शहरात पादचारी आणि दुचाकी स्वार क्वचीतच पहायला मिळत असे. सर्वत्र चारचाकींचे राज्य होते. ज्यावेळी पुण्यात पेट्रोलचा दर पाच रुपये होता तेव्हा तेथे पाच पैसे लिटर इतके स्वस्त पेट्रोल मिळत होते. आज आंतरराष्ट्रीय स्तरावर पेट्रोलचे भाव जरी उतरले तरी त्याचा फायदा सर्वसामान्यांना मिळत नाही याचे शल्य मनाला बोचते.
अर्थसंकल्पात देखभाल खर्चाची तरतूद गरजेची
आज शहरात अनेक नवनवीन सार्वजनिक कामे घडत असतात. परंतु या सर्वांचे योग्य नियोजन असणे आवश्यक आहे. अनेक कामांचे उद्घाटन झाले की पुढे काही घडत नाही. नागरीकांसाठी असणाऱ्या अनेक वास्तू केवळ देखभालखर्चा विना धूळ खात पडून असतात. एखाद्या गोष्टीची निर्मिती करण्या इतकेच त्याची देखभाल होणे महत्वाचे असते. नेमका त्यासाठीच आपल्याकडे निधी संपलेला असतो. अर्थसंकल्प करतानाच त्यामध्ये पुढील पाच वर्षाची देखभाल खर्चाची तरतूद केली तर हा प्रश्न मार्गी लागेल . नवीन वर्षात विविध शहरांच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, रिंग रोड, आंतरराष्ट्रीय विमानतळ, समान पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन, पार्किंग समस्या, नदी स्वच्छता, प्रदूषण नियंत्रण, सार्वजनिक स्वच्छतागृहे, कायदा आणि सुव्यवस्था याबाबत ठोस कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी प्रचंड संधी आहे. या संधीचे सुवर्णसंधीत रुपांतर झाले तरच खऱ्या अर्थाने जगाच्या नकाशावर स्मार्ट शहरे निर्माण होतील.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.