September 7, 2024
The key to safe construction article by Prakash Medhekar
Home » सुरक्षित बांधकामाची गुरुकिल्ली
काय चाललयं अवतीभवती

सुरक्षित बांधकामाची गुरुकिल्ली

 

प्रकाश मेढेकर
स्थापत्य सल्लागार , वास्तू मूल्यकर्ता, इराक, ओमान, मलेशिया आणि भारतातील बांधकाम प्रकल्पाअंतर्गत 35 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव, व्यवस्थापन विषयांसाठी अभ्यागत व्याख्याता, मानव अधिकार आणि आदर्श स्थापत्य शास्त्रज्ञ पुरस्कार विजेते 2014, लेखक – दिशा बांधकाम नवनिर्मितीची (सकाळ प्रकाशन, पुणे )
ई -मेल – prakash.5956@gmail.com
मोबाईल – 9146133793

आपल्या देशात कृषी नंतर  बांधकाम क्षेत्र  दुसऱ्या क्रमांकावर असून रिअल इस्टेट आणि इन्फ्रास्ट्रक्चर हे त्यामधील दोन  उपविभाग आहेत . या बलाढ्य क्षेत्रात वर्षाकाठी होणारी उलाढाल हजारो कोटींची असून  देशाच्या जीडीपी म्हणजेच सकल राष्ट्रीय उत्पनात या क्षेत्राचा वाटा उल्लेखनीय असतो. आज देशातील कोट्यावधी लोक या क्षेत्राशी निगडीत असून देशाच्या नवनिर्मितीत असणारे त्यांचे योगदान महत्वाचे आहे. रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध असल्याने या क्षेत्रात पदार्पण करणार्‍यांची संख्या सुद्धा मोठी असते. परंतु या क्षेत्रात काम करताना आज सुरक्षिततेचा विचार गांभीर्याने होण्याची गरज आहे. 

सुरक्षिततेबाबतच्या उपाययोजनांची माहिती गरजेची

एखादी दुर्घटना घडल्यानंतर खडबडून जागे होणे,  झालेल्या वित्त अथवा जीवितहानी बद्दल दुखः व्यक्त करणे, घटनेची चौकशी करत रहाणे आणि काळाच्या ओघात त्याचा विसर पडणे हेच आजपर्यंत आपण करत आलो आहोत. बांधकामाच्या विविध टप्प्यांवर कामे करताना सुरक्षितता वेळोवेळी तपासली तर दुर्घटनांवर मात करून प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आपणास साध्य करता येते. त्यासाठी सुरक्षिततेबाबत असणाऱ्या विविध उपाययोजनांची माहिती या क्षेत्राशी निगडीत असणाऱ्या सर्वांनाच असणे काळाची गरज आहे. बांधकाम प्रकल्पांमध्ये  सुरक्षितता, दर्जा आणि वेग  या तीनही गोष्टी महत्वपूर्ण असतात. अनेकदा बांधकामाचा  वेग वाढला असता दर्जा घसरण्याची शक्यता असते. प्रकल्पांवर प्रत्यक्ष काम करताना या दोन्ही गोष्टींचे संतुलन ठेवणे हीच खरी कसोटी ठरते.

बांधकाम प्रकल्पांवर घडणारे अपघात

पूर्व प्रकल्पांच्या सर्वेक्षणानुसार बांधकाम प्रकल्पांवर विविध प्रकारचे अपघात घडू शकतात. यामध्ये उंचीवरून पडणे ५६ टक्के, बांधकाम अंगावर कोसळणे २१ टक्के, चालत्या वाहनांचा धक्का लागणे १० टक्के, विद्युतप्रवाहाचा शॉक बसणे ५ टक्के, उचललेली वस्तू अंगावर पडणे ३ टक्के, चलयंत्राच्या संपर्कात येणे ३ टक्के, उष्ण आणि हानीकारक वस्तूंचा संपर्क होणे २ टक्के असे आहे. अशा सर्व ठिकाणी वित्त अथवा जीवितहानी होण्याचा संभव असतो. बांधकाम प्रकल्पांवरील खोदलेले खड्डे, उंचीवरील कामे, शिड्यांचा वापर, स्कॅफोल्डींग, वेल्डिंग, ड्रिलिंग, ज्वलनशील पदार्थांचा साठा, वाहतुकीचा रस्ता, बांधकाम साहित्यांची वाहतूक, विविध मशिनरी यासंबंधीत कामे करताना सुरक्षिततेची काळजी घेणे आवश्यक आहे. 

 आखाती देशातील सुरक्षापद्धती 

आखाती देशातील बांधकाम प्रकल्पांवर  सुरक्षिततेच्या बाबतीत असणाऱ्या उपाययोजना आपल्यासाठी  अनुकरणीय आहेत .  तेथील बांधकाम प्रकल्पांवर सुरक्षा अग्रस्थानी गणली जाते. ओमान, दुबई, आबुधाबी, शारजा, बहारीन, कुवेत, कतार, सौदी अरेबिया ई.  देशात आजही हजारो भारतीय कामगार आणि अभियंते तेथील बांधकाम प्रकल्पावर कार्यरत आहेत.  गुणवत्ता आणि सुरक्षितता यामध्ये सुरक्षिततेला त्या सर्व देशात प्राधान्य दिले जाते. तेथील  बहुसंख्य  बांधकाम कंपन्यांकडे गुणवत्तेच्या आस्थापनासाठी असणारे आयएसओ ९००१, उत्कृष्ट वातावरण निर्मीतीसाठी असणारे आयएसओ १४०००१  आणि सुरक्षिततेसाठी असणारे आयएसओ १८०००१ प्रमाणपत्र आहेत. जागतिक स्तरावर सुरक्षा प्रमाणपत्राची ओळख  ओएचएसअेएस म्हणजे ऑक्युपेशनल हेल्थ अॅन्ड सेफ्टी असेसमेंट सिस्टीम अशी आहे. सन १९९० पासून बांधकामक्षेत्रात आयएसओ १८०००१  प्रमाणपत्र देण्याची सुरवात झाली. आयएसओ १८०००१ मधील  सुरक्षीततेबाबत असणारे नियम कडक आहेत.

ओमानचा सुरक्षेबाबतचा स्तुत्य उपक्रम

ओमान देशात सुरक्षेबाबत घेतली जाणारी उपायोजना वाखाणण्याजोगी म्हणता येईल. या देशात  कित्येक वर्ष सुलतान खबूस यांची राजवट होती. देशात अनेक बांधकाम प्रकल्प कार्यरत असून त्या सर्वांवर तेथील राज्यकर्त्यांची करडी नजर असते. दरवर्षी देशात कार्यरत असणाऱ्या बांधकाम कंपन्यांसाठी सुरक्षिततता अभियान स्पर्धेचे आयोजन केले जाते. कामगारांच्या सुरक्षिततेची सर्वोच्च काळजी घेणाऱ्या बांधकाम कंपनीचा राज्यकर्त्यांतर्फे गौरव केला जातो. ओमान मधील गल्फार कंपनी अनेक वर्ष सातत्याने असा पुरस्कार पटकावीत आहे. जवळपास दहा हजार बांधकाम कामगार आणि अभियंते या कंपनीत सुरक्षितपणे विविध बांधकाम प्रकल्पांवर कार्यरत असून त्यामध्ये अनेक भारतीयांचा समावेश आहे. सुरक्षितते बाबत एकूणच या देशात  विविध बांधकाम कंपन्यात चढाओढ असते. त्यामुळे कामगारांमध्ये स्वतःच्या सुरक्षिततेबाबत जागरुक राहण्याची भावना  निर्माण होते.  स्पर्धात्मक वातावरणामुळे मनोधैर्य उंचावते. असे स्तुत्य उपक्रम आपल्याकडे करण्यास प्रचंड वाव आहे.

 सुरक्षिततेचे निकष  

आयएसओ १८०००१ प्रणालीत  बांधकाम प्रकल्पावरील कामगारांचे आरोग्य आणि सुरक्षिततेबाबत दुर्घटना घडू नये म्हणून प्रयत्न केले जातात. यामधील जोखीमांचा पूर्व अभ्यास करुन, त्या कमी अथवा संपूर्णपणे नाहीशा करण्या बाबतचे प्रयत्न सातत्याने केले जातात. प्रकल्पावरील संभाव्य अपघात, त्यांची कारणे, ते कमी करण्याबाबतचे सुरक्षा नियम, त्यांची कठोर अंमलबजावणी यांचा कृती आराखडा प्रथमतः तयार करावा लागतो. सर्वच आयएसओ गुणवत्ता प्रणालीत कंपनी व्यवस्थापनाला नियोजन, कार्यवाही, तपासणी आणि पुनर्रकार्यवाही अशा क्रमाने बांधकामातील सर्व टप्पे पूर्ण करावे लागतात. आयएसओ गुणवत्ता प्रणाली बनवताना  जागतिक दर्जाच्या तज्ञ सल्लागारांची मदत घेतली जाते.

संकटकाळी सर्व व्यक्तींना एका विशिष्ठ जागी येण्यासाठीचा असेम्ब्ली पॉईंट असतो

अशी ठेवली जाते सुरक्षितता

परदेशातील जवळपास सर्व बांधकाम प्रकल्पांवर सुरक्षितपणे काम करणे बंधनकारक असते. वरीष्ठांपासून तळापर्यंत सर्वांनाच सुरक्षिततेबाबत असणारे नियम पाळावेच लागतात . कोणालाही त्यामधून सवलत दिली जात नाही. जर वरीष्ठ अधिकारी स्वतःहून  सुरक्षितता पाळत असतील तर  इतरांना आपोआपच त्याचे अनुकरण करावे लागते. बांधकामाचे विविध टप्पे सुरक्षितपणे होत आहेत की नाही याची तपासणी करण्यासाठी स्वतंत्र सुरक्षा अधिकाऱ्यांची नेमणूक अशा कंपन्यांमध्ये केली जाते. असे सेफ्टी ऑफिसर प्रकल्पावरील अभियंते आणि कामगारांच्या कामावर सतत नजर ठेवून असतात. प्रकल्पावर काम करणाऱ्या प्रत्येकाला सेफ्टी हेल्मेट आणि सेफ्टी शूज वापरणे बंधनकारक असते. कामगारांना या व्यतिरिक्त कामाच्या स्वरूपानुसार सेफ्टी जॅकेट, सेफ्टी बेल्ट, हॅन्ड ग्लोज, गॉगल , मास्क आदी सुरक्षा साधनांचा वापर करावा लागतो. उंच इमारतींना  विविध उंचीवर सेफ्टी नेट बांधावी लागतात. प्रकल्पावर वाहने आणि विविध यंत्रप्रणाली चालवणाऱ्यांना योग्य प्रशिक्षण दिले जाते. प्रत्येक वाहनांचे ब्रेक, रिव्हर्स हॉर्न, प्रदूषण चाचणी, लायसेन्स इत्यादी गोष्टींची नियमित तपासणी केली जाते. रात्रीच्या वेळी काम करताना प्रखर दिव्यांची सोय असते. आगीच्या आपत्कालीन प्रसंगाला सामोरे जाण्यासाठी सुसज्ज अग्निप्रतीबंधक यंत्रणा असते. संकटकाळी सर्व व्यक्तींना एका विशिष्ठ जागी येण्यासाठीचा असेम्ब्ली पॉईंट असतो. आपत्कालीन वेळी इमारतीमधून बाहेर पडण्यासाठी असणारा मार्ग निश्चित केलेला असतो. एखाद्या ठिकाणी असुरक्षितपणे काम चालू असेल तर संबंधित व्यक्तींना प्रथमतः योग्य समज दिली जाते. पुढील वेळी  त्यात सुधारणा दिसली नाही तर त्या व्यक्तीला त्याचा जाब द्यावा लागतो. झालेल्या प्रकाराची लेखी नोंद सुरक्षा अधिकाऱ्यास करून घटनेची माहिती त्वरित प्रकल्प व्यवस्थापनाला कळवावी लागते. यामध्ये जाणीवपूर्वक निष्काळजीपणा आढळल्यास संबंधीत व्यक्तीला कामावरून कमी करून त्वरीत मायदेशी पाठवण्यात येते.

 सुरक्षिततेबाबत आवश्यकता  

आठवड्यातील एक दिवस  सुरक्षीतते बाबतीत असणार्‍या नियमांची उजळणी करण्यासाठी सेफ्टी मीटिंग घेतली जाते. यावेळी खड्ड्यात, उंचीवर, स्कॅफोल्डींगवर कामे करताना, मशिनरी चालवताना, यंत्रे हाताळताना, काँक्रीट, बांधकाम आणि प्लास्टर करताना आपल्या स्वतःची आणि इतरांची काळजी कशाप्रकारे घ्यावी याबाबत सेफ्टी ऑफिसरद्वारे  मार्गदर्शन केले  जाते. साईट ऑफिस मध्ये प्रथमोपचार पेटी, पोलीस स्टेशन, हॉस्पिटल, रुग्णवाहिका, संबंधित डॉक्टर्स, अग्निशामक यंत्रणा आदीचे नंबर ठळकपणे बोर्डावर नमूद केलेले असतात. ज्वलनशील पदार्थांचा साठा, गोदामे, जीने, तळघर, रॅम्प, असेंम्ब्ली पॉइंट, ऑफीस आदी ठिकाणी नामदर्शक बोर्ड लावावे लागतात.

आरोग्याचीही काळजी

महिन्यातील एक दिवस स्वच्छता दिन म्हणून पाळला जातो. त्यामुळे प्रकल्पावरील वातावरण निरोगी राहण्यास मदत होते. प्रकल्पावरील सर्वांची वर्षातून एकदा आरोग्य तपासणी केली जाते. प्रकल्पावर काम करणाऱ्या सर्वांचा विमा उतरवला जातो.  व्यवस्थापनाला दरवर्षी एक अंतर्गत सुरक्षा ऑडीट करावे लागते. त्यामधील त्रुटी दूर करुन त्रयस्त तज्ञ अधिकाऱ्यांमार्फत अंतिम ऑडीट केले जाते. सर्व त्रुटी दूर झाल्यानंतरच पुढील एका वर्षासाठी सुरक्षा प्रमाणपत्राची मुदत वाढवली जाते. अशा प्रकारच्या सुरक्षिततेच्या उपाययोजना आपल्या देशात कसोसीने पाळल्या गेल्या तर ज्या दुर्घटना आपल्या आजूबाजूला घडताना दिसतात त्यावर निश्चितच मात करून घडणारी  वित्त अथवा  जीवितहानी टाळता येईल.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

स्थापत्य अभियंत्याचे पाऊल पडते पुढे…

बांधकामविश्वाची समृद्ध भ्रमंती

गच्चीवर उतरत्या छप्पराची परवानगी अन् सक्ती गरजेची

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading