October 11, 2024
Sohni Dange strives to develop the talents of women
Home » Privacy Policy » महिलांच्या कलागुणांना विकसित करण्यासाठी झटणाऱ्या सोहनी डांगे
मुक्त संवाद

महिलांच्या कलागुणांना विकसित करण्यासाठी झटणाऱ्या सोहनी डांगे

जिजाऊ – सावित्रीच्या कर्तृत्ववान लेकी

गेली काही वर्षे महिलांच्या कलागुणांना विकसित करण्यासाठी व त्या स्वावलंबी होण्यासाठी सोहनी डांगे या विशेषतः कार्यरत आहेत. पण या कामाची व्याप्ती वाढली ती लॉकडाऊनच्या काळात. खास महिलांसाठी streeshakti स्त्रीशक्ती फेसबुक ग्रुप सुरू करून त्याद्वारे महिलांना ताईंनी ऑनलाइन बाजारपेठ उपलब्ध करून दिली. तसेच महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी ऑनलाइन कॉम्पिटिशन या ग्रुप मार्फत सुरू केली. विविध स्पर्धांचे आयोजन करणे, विविध कार्यक्रम घेणे व त्यांना बक्षीसे देणे, त्यासाठी प्रायोजक मिळवणे अशी धडपड त्यांनी सुरु केली. ‘चलते चलते कारवॅा बनतां गया ।’ याप्रमाणे आज स्त्रीशक्ती ग्रुपचा बोलबाला पूर्ण महाराष्ट्रभर आहे पण प्रत्यक्ष कार्यक्रम सध्या केवळ पुणे शहरात होतात.

सोहनीचा जन्म कोल्हापुरातील एका सामान्य कुटुंबातील. शिक्षण एफ. वाय. बी.कॉम, फॅशन डिझायनिंग, सामाजिक कार्य, चित्रकला, शिवण कला व सतत नवीन कला शिकण्याची आवड त्यांना आहे. तिचा बालपणीचा प्रवास खूप खडतर होता, बालपणीच वडिलांची छत्रछाया हरवली त्यामुळे दोन बहिणी व आई असे कुटुंब झाले. कुटुंबात कर्ता पुरुष नाही, अशा आर्थिक संकटाच्या परिस्थितीत स्वतः कमाई करून सोहनीताईंनी स्वतःचे शिक्षण एफ.वाय. बीकॉम.पर्यंत पूर्ण केले. तिघीही बहिणी असल्यामुळे मुलींच्या लग्नाची चिंता सतत आईला भेडसावत असे. म्हणूनच १८ वर्ष पूर्ण होताच पुण्यातील ज्ञानेश डांगे यांच्यासोबत ताई विवाहबद्ध झाल्या.

सुदैवाने विवाहानंतर पतीची ताईंना चांगली साथ मिळाली,आणि फॅशन डिझायनिंगमध्ये पुढचे शिक्षण त्यांनी पूर्ण केले. ‘हलाखीच्या परिस्थितीमुळे इच्छा असूनही स्वतःची विशेष आवड मात्र जोपासता आली नाही, पण विवाहानंतर सामाजिक कार्याची आवड स्वस्थ बसू देत नव्हती. कोल्हापूरमधून पुणे येथे येऊन कमी काळात स्वतःची एक खूप मोठी ओळख तयार होईल असे स्वप्नातही कधी वाटले नव्हते. सामाजिक कार्याची सुरुवात दांडेकर पूल वसाहत पुणे येथून केली. सुरुवातीला डायमंड बचत गटाची स्थापना केली आणि अनेक बचत गट तयार केले, महिलांनी व्यवसाय करून सक्षम व्हावे यासाठी व्यवसाय गट सुरू केले, बचत गटाचे हे कार्य मर्यादित राहू नये यासाठी क्रांतिज्योती महिला विकास संस्थेची स्थापना २०१४ साली सामाजिक कार्यकर्ते मा. अण्णा हजारे यांच्या हस्ते केली.’ सोहनी ताई मोठ्या उत्साहाने सांगत होत्या. आज त्यांच्या वागण्या – बोलण्यात प्रचंड आत्मविश्वास जाणवत होता. हाती घेऊ त्या कामाला यश प्राप्त झाल्याचा आनंद काय असतो ते सोहनी ताईंकडे पाहून लक्षात आल्यावाचून रहात नाही.

वडील बालपणी गेले असले तरीही सामाजिक कार्याची त्यांची आवड ही सोहनी ताईंच्या नसानसात भिनली आहे. लग्नानंतर शक्यतो कोणालाही आपल्या घरच्या सुनेने सामाजिक काम करावे असे वाटत नसते. तसा त्रास सोहनी ताईंनाही झालाच पण त्यांचे पती त्यांच्यामागे ठामपणे उभे राहिले नव्हे तर त्यांच्या प्रत्येक कामात सहभागी झाले. दोन मुले, पती असे त्यांचे कुटुंब आज आपापल्या क्षेत्रात यशस्वी आहे. घर संसार व सामाजिक काम ही तारेवरची कसरत ताई करत यशाचे शिखराजवळ एकेक पाऊल चढत होत्या. हसतमुखाने समाजात वावरत असल्याचा फायदा त्यांना मिळणाऱ्या प्रचंड यशात परावर्तित झाला. आज त्यांचे यश व लोकप्रियता पाहाता त्यांची दोन्ही मुलं व पती आपला व्यवसाय सांभाळून त्यांच्या सामाजिक कामात सक्रिय सहभागी होतात याचा त्यांना प्रचंड आनंद होतो.

एका महिलेला महिलांमधे लोकप्रिय होणे ही साधी व सोपी गोष्ट नाही पण त्यांनी उभारलेल्या कामात महिलांचा भरभरून प्रतिसाद मिळाल्यामुळे ‘स्त्रीशक्ती महिला मंच’ हा सर्वात मोठा महिला मंच पुण्यात सुरू करण्यात आला, यांच्यामार्फत “न भूतो न भविष्य” अशी रॅली स्त्रीशक्तीची हा कार्यक्रम जागतिक महिला दिनानिमित्त घेण्यात आला होता. त्याची दखल राज्य शासनाने घेतली या रॅलीचे प्रमुख आकर्षण म्हणजे स्त्रिया रोड रोलर, टांगा, ट्रॅक्टर ,स्कूल बस, स्कूल व्हॅन, बैलगाडी, ॲम्ब्युलन्स, जीप, बाईक यावर वेगवेगळ्या वेशभूषेत (भारतमाता, महाकाली, क्रिकेटर, जिजामाता, मिल्ट्री वुमन, पोलीस ऑफीसर) स्वार झाल्या होत्या. या प्रचंड यशानंतर ताईंनी मागे वळून पाहिलेच नाही.

सामाजिक कार्यामध्ये प्रौढ शिक्षण, समरकॅम्प, मोफत नेत्र तपासणी शिबिर ,दुष्काळग्रस्त भागांना धान्यवाटप ,बचतगट स्थापना, आदिवासी पाड्यांना मदत, विविध सरकारी कल्याणकारी योजना राबवणे, महिला सक्षमीकरणासाठी अनेक प्रशिक्षणाचे आयोजन, खाद्यपदार्थ महोत्सव, वृक्षारोपण पर्यावरण संतुलन दिंडी, शैक्षणिक सहलींचे आयोजन,तंबाखू मुक्त अभियान, डिजिटल प्रशिक्षण यासारखे आदर्श सामाजिक उपक्रम राबवण्याचा धडाका त्यांचा आजही सुरूच आहे. रेड लाईट एरियातील महिलांच्या मुलांना त्यांचा वाढदिवस माहित नाही म्हणून त्यांच्यासाठी दरवर्षी बालदिनाचे आयोजन केले जाते. तसेच रेड लाईट एरियातील महिलांनी स्वतःची काळजी स्वतः कशी करावी? आणि येणाऱ्या भयानक आजारापासून कसा बचाव करावा, यासाठी बुधवार पेठ पुणे येथे स्वास्थ जागृतता कार्यक्रम आयोजित केला. तसेच त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहता यावे यासाठी रूम फ्रेशनर, अत्तर, परफ्यूम, बेसिक ब्युटी, कागदी पिशव्या, क्लिनिंग मटेरियल, हँडवॉश आणि सोप बनवायला शिकवले त्यांना प्रॅाडक्ट तयार करून ते मार्केटमध्ये कसे विकायचे इथपर्यंत मार्गदर्शन करण्यात आले. रेड लाईट एरियातील महिलांनी हे सर्व तयार करून विकण्यास सुरुवात केली त्यांचा उत्तम प्रतिसादही या प्रशिक्षणास मिळाला यात तृतीयपंथीचा पण यामध्ये सक्रिय सहभाग होता. समाजामध्ये अशा स्त्रियांना कोणते स्थान मिळत नाही, त्यांच्यामुळे आज इतर स्त्रीया स्वतःला सुरक्षित समजून वावरतात, याचे भान ठेवून ती पण एक स्त्री असून, तिलाही मान सन्मान मिळायला हवा म्हणून त्यांच्यासाठी हळदीकुंकू समारंभ आयोजित केला.

समाजसेवक अण्णा हजारे आणि अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांचे मार्गदर्शन नेहमीच प्रेरणादायी ठरल्याची भावना त्या व्यक्त करतात.

आपण काम करत रहावे, समाज त्याची दखल घेत असतो त्याप्रमाणे सोहनी ताईंना आजवरच्या कामासाठी सेवा गौरव पुरस्कार, रणरागिनी पुरस्कार, पुणे कार्पोरेशन गौरव, सह्याद्रि पुरस्कार, समाजरत्न पुरस्कार, आदर्श सामाजिक उपक्रम, नवदुर्गा पुरस्कार, कोरोना योद्धा पुरस्कार, सुपरवुमन पुरस्कार, सिद्धी महिला पुरस्कार, राज्यस्तरीय आदर्श महिला समाज रत्न बचत गट पुरस्कार, संस्कृती पुरस्कारांनी ताईंना आदर्श सामाजिक उपक्रमासाठी सन्मानित करण्यात आले.
‘पुरस्कार हा सन्मानच नव्हे तर अधिक काम करण्यासाठीची ऊर्जा असते. आपण उभारलेल्या कामाची ती पावती असते. जोपर्यंत माझा श्वास सुरू असेल तोपर्यंत माझे हे सामाजिक कार्य असेच अखंड चालू राहील.’ असा विश्वास त्या आनंद व अभिमानाने व्यक्त करतात.

अशा या धडाडीच्या, हसतमुख, प्रामाणिक, सतत नवनवीन उपक्रम महिलांसाठी राबवणाऱ्या, कोमल हृदयी जिजाऊ – सावित्रीच्या कर्तृत्ववान लेकीस मानाचा मुजरा..!!

सोहनी डांगे – मो. 95117 56162


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading