उतारवयात प्रेमळ वागणे अन् वाचनाने जीवन सुखकर
दुसऱ्यांना आनंद देत राहावे. घरातील सर्वांना प्रेम दिले तर, उतारवयात हे सर्वही तुमच्यावर निश्चितच प्रेम करतील. काही वेळेला हे प्रेम मुलांना नकोसे वाटते. मनाला खटकते, पण म्हणून तुम्ही तुमचे प्रेम लपवू नये. प्रेमाने वागण्यात केलेला हा बदल आयुष्याच्या उतारवयात अनेक व्याधींपासून दूर ठेवतो.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे
मोबाईल – 9011087406
आता वृद्धाप्याचिया तरंगा । माजीं मतिभ्रंशाचा जरंगा ।
तेणें कवळिजताती पै गा । चहूंकडे ।। ८६ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सातवा
ओवीचा अर्थ – आता म्हातारपण लाटेमध्ये असणाऱ्या बुद्धीभ्रंशरुपी जाळ्याने तें चोहोबाजूंनी व्यापलेले असतात.
निवृत्तीनंतर करायचे काय हा प्रश्न अनेकांना पडतो. काहीजण नोकरीत कंटाळलेले असतात. त्यामुळे निवृत्तीचा त्यांना आनंद वाटतो. पण प्रत्यक्षात निवृत्तीनंतर एक-दोन महिने बरे वाटते. त्यानंतर मात्र सुटी नकोशी वाटू लागते. काहीजणांना पुस्तके वाचनाचा छंद असतो. ते विविध पुस्तके वाचनात वेळ घालवतात. विविध छंदात मन रमवणे याशिवाय दुसरे पर्याय दिसत नाहीत. काहीजण निवृत्तीनंतर देवदर्शनासाठी जातात. विविध गोष्टीत मन रमविण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.
मन रमत नसेल, तर मग मात्र मनात चिडचिडेपणा वाढतो. एकाकीपणानेही मनाची स्थिरता ढळते. घरात बसलेल्यांना घर खायला उठते. फिरायला गेलेतर विविध विषयांच्या चर्चेने त्रास होतो. मनाचा हा त्रागा शांत करायला हवा. वृत्तपत्रातील बातम्या वाचूनही मनाला त्रास वाटू लागतो. आता तर चोविस तास बातम्या टीव्हीवर पाहायला मिळतात. त्यामुळे तर मन अधिकच विचलित होते. जगातील विविध प्रश्नांनी मनास त्रास करून घेण्यापेक्षा विरंगुळा म्हणून वाचन करायला हवे. मनास प्रसन्न ठेवणारे साहित्यच वाचायला हवे. त्यातच मन रमवायला हवे.
ज्ञानेश्वरी वाचन करून अध्यात्माचा अभ्यास करायला हवा. आयुष्याच्या उतारवयात तरी इतरांना त्रास होणार नाही, असे वागायला हवे. आचरणात केलेला फरकही मनाला आनंद देतो. दुसऱ्यांना आनंदी ठेवण्यात स्वतःला आनंद मिळतो हे लक्षात घ्यायला हवे. त्यानुसार दुसऱ्यांना आनंद देत राहावे. घरातील सर्वांना प्रेम दिले तर, उतारवयात हे सर्वही तुमच्यावर निश्चितच प्रेम करतील. काही वेळेला हे प्रेम मुलांना नकोसे वाटते. मनाला खटकते, पण म्हणून तुम्ही तुमचे प्रेम लपवू नये. प्रेमाने वागण्यात केलेला हा बदल आयुष्याच्या उतारवयात अनेक व्याधींपासून दूर ठेवतो.
मन प्रसन्न ठेवता आले तर अनेक आजारापासून मुक्ती मिळते. कारण अनेक व्याधी ह्या मनातील रागातून उत्पन्न होतात. शरीरावर त्याचा अनिष्ट परिणाम होत असतो. यासाठी क्रोध, राग, द्वेष यापासून दूर राहून मन प्रसन्न ठेवण्यावर अधिक भर दिला तर, आरोग्यही उत्तम राहते. पिढीतील अंतरामुळे नातवंडावर संस्कार करण्यात तुम्ही कमी पडत असाल. पण तरीही त्यांच्यावर प्रेम व्यक्त करण्यात, त्यांच्या आनंदात रमण्यातच खरा आनंद आहे. विचारांची ही तफावत पाहून मनास त्रास करून घेऊ नये. आपण आपले आचरण चांगले ठेवले तर त्यांच्यावरही चांगले संस्कार होऊ शकतात. प्रेमाने जग जिंकता येते. सर्वावर प्रेम करून त्यांच्यावर विजय मिळवावा.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
1 comment
Ekadam chaan