जिजाऊ – सावित्रीच्या कर्तृत्ववान लेकी८
महिला सक्षमीकरण व स्वावलंबनाबरोबरच मानसिकदृष्ट्या महिलांना सक्षम करणाऱ्या स्मिता पोकळे या जिजाऊ – सावित्रीच्या कर्तृत्ववान लेकीला मानाचा मुजरा..!!
अॅड. शैलजा मोळक
लेखक, समुपदेशक, सामाजिक कार्यकर्ता
मो. 9823627244
आज अनेक महिला मोठ्या पदावर जाऊनही आपल्या पतीच्या नावाने ओळखल्या जातात ही आपली सामाजिक व्यवस्था आहे. अनेकांचे नवरे पण बायकोच्या कामात लुडबुड करतात हे आपण पाहातो. तिचे स्वतंत्र व्यक्तिमत्व ते खुलू देत नाहीत. अशा काळात वडगाव धायरी या ग्रामीण समजल्या जाणाऱ्या भागात जिजाऊ महिला महासंघाच्या माध्यमातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करून हजारो महिलांचा आधार बनणारी स्मिता पोकळे..! कुटुंब, महिला व राष्ट्रसेवा समूहाचा पण आधार असलेली स्मिता म्हणजे ‘मूर्ती छोटी पण किर्ती मोठी’ असे म्हटलं तर वावगे ठरू नये.
स्मिताताई राजमाता जिजाऊ महिला महासंघ व जिजाऊ सावित्री महिला संघटना अध्यक्षा, राष्ट्रसेवा समूहाची प्रवक्ता, प्लॅटिनम इंडस्ट्रीज ( Platinum Industries ), स्मिता एंटरप्राईजेस, जिजाऊ एज्युकेशन ट्रस्टच्या संचालक म्हणून सध्या कार्यरत आहेत.
स्मिता ही मूळची आंग्रेंची. पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यांतील अंग्रेवाडीतील सरखेल कान्होजी आंग्रे यांचे एक घर पुण्यातील भुकूम याठिकाणी स्थिरावले. त्याच कुटुंबातील स्मिताचा जन्म. वडील खालकर तालमीचे वस्ताद. पैलवान माणूस. अस्सल साधं मराठा परंपरा व रितीरिवाज असलेल्या कुटुंबातील स्मिताचे सर्व शिक्षण कोथरूड येथील एमआयटी ( MIT ) शाळेत झाले. बी.कॅाम होताच राहुल पोकळे यांचे स्थळ तिला सांगून आले. पसंती झाली आणि शिवधर्म पद्धतीने विवाह करण्याचा प्रस्ताव पुढे आल्यावर क्षणाचाही विचार न करता कुटुंबाने आणि तिने होकार दिला. वडगांव धायरीतील पहिला शिवधर्म विवाह संपन्न झाला. सुमारे १० हजार लोक विवाह पहायला आलेले होते. त्याची मीही एक साक्षीदार.
स्मिता अगोदर पासूनच अंधश्रद्धा, कर्मकांड यापासून दूर होती. पोकळे यांची सून झाल्यावर तर ती पूर्ण सत्यशोधक आणि पुरोगामी बनली. आज पुरोगामी चळवळीत खूप मोठे काम तिने स्वतः उभे केले आहे. राष्ट्रसेवा समूहाच्या प्रत्येक कार्यात ती सक्रिय असते. विचाराने परिपक्व आणि तशीच मुलांची जडणघडण ती करून घेत आहे. रामदासी बैठका बंद करून तिने जिजाऊ बैठक सुरू करून महिलांना प्रबोधित करणे सुरु केले.
शिव – फुले – शाहू – आंबेडकरांचे विचार सहज आत्मसात करून त्या विचारावर चालणे ही सोपी गोष्ट नाही. पण स्मिताने लग्नानंतर पतीच्या साथीने सावित्री जिजाऊ रमाई यांचा विचार मनात ठेवून महिला सक्षमीकरणाचे काम सुरु करून आजवर अनेक महिला सक्षम केल्या आहेत. कामात सातत्य, प्रामाणिकपणा, कष्ट, निर्भीडपणे विचार मांडत स्मिताताई कार्यरत आहेत. ‘लोक काय म्हणतील’ या रोगापासून त्या दूर आहेत. त्यामुळे आज त्या यशाच्या शिखरावर आहेत. प्रयत्नांनी यश मिळत गेले त्यामुळे आता कोणीही स्पर्धा करू शकत नाही, इतकं मोठं काम स्मिताताईंनी केवळ आपल्या मैत्रिणींच्या माध्यमातून उभे केले आहे. यासाठी पती, सासू-सासरे व कुटुंबाचा पाठिंबा नक्की आहे पण त्यांच्या प्रत्यक्ष सहभागाशिवाय स्मिताताई सक्षमपणे सारं काम करत आहेत.
१० हजार महिलांचा महासंघ चालवणारी ती पुण्यातील पहिलीच महिला असेल. या माध्यमातून महिला आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी तिने प्रचंड काम केले. हजारो हाताला काम दिले. कामासाठी पैसा उभा केला. कर्ज रूपाने वाटला. आज हजारो महिला सक्षम झाल्या आहेत ते सारे श्रेय स्मिताने उभ्या केलेल्या ‘राजमाता जिजाऊ महिला महासंघाला’ द्यावे लागेल.
अगदी कमी काळात सातत्य, परिश्रम व प्रामाणिकपणा, सर्वांशी मिळून मिसळून वागण्याचे कसब या जोरावर तिने तिचे स्वतंत्र ऑफिस, स्टाफ, गाडी, ड्रायव्हर अशी सर्व स्वतंत्र व्यवस्था निर्माण करून गेल्या १५ वर्षात महासंघाचा मोठा वटवृक्ष करण्यात तिला यश आलेले आहे. रेशनिंगचे स्वस्त धान्य दुकान धायरी गावात उभे करून १८०० लोकांच्या घरात धान्य पुरवण्याचे काम ती करत आहे. कोरोना काळात जीवावर उदार होऊन तिने लोकांना धान्य वाटप केलेले आहे. त्याचसोबत स्वतःची गिरणी स्थापन करून त्याला जोडधंदा निर्माण केलेला आहे.
महिलांना विविध विषयांचे प्रशिक्षण देऊन उद्योग सुरू करणे, महिलांना अडचणीच्यावेळी कर्ज रूपाने पैसे उभे करून त्यांच्या समस्या सोडवणे, ज्या ठिकाणी शासनाकडून मदत होत नाही अशा ठिकाणी मुलींच्या लग्नासाठी अकरा हजार रुपयांचा निधी वाटप करणे, शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना आर्थिक स्वरूपात मदत करणे, राजमाता जिजाऊ महिला महासंघाच्या माध्यमातून महिलांच्या विविध समस्यावर अनेक आंदोलने व मोर्चे, महिलांसाठी समुपदेशन केंद्र, सर्व बहुजन महानायक आणि महानायिकांच्या जयंती आणि स्मृतिदिनाचे औचित्य साधून महिलांचे प्रबोधन, वाचनालय अशा विविध कामांसोबत विधवा महिला मेळावा घेऊन या भागात इतिहास निर्माण केलेला आहे. अनेक अनिष्ट रूढी परंपरा, अंधश्रद्धा, कर्मकांडांच्या विरोधात जाऊन पर्यायी व्यवस्था निर्माण करण्यात राजमाता जिजाऊ महिला महासंघाचा मोठा वाटा आहे. महासंघाच्या माध्यमातून शिक्षणासाठी व हॉस्पिटलसाठी मदत, छोट्या मोठ्या व्यवसायासाठी प्रशिक्षण शिबीर, सर्व प्रकारची माहिती व कर्ज पुरवठा तसेच उत्पादित झालेल्या मालाची विक्री, बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळावी म्हणून जत्रा भरवणे असे उपक्रम राबवले जातात. दहा हजार महिलांच्या माध्यमातून खूप मोठ्या व्यवसाय वाढीला चालना मिळाल्याने मोठी बाजारपेठ निर्माण झालेली आहे. यामुळे बचत गटाचे जाळे आसपासच्या सर्व गावात उभे राहिलेले आहे.
महिलांना फक्त प्रबोधन करणे हाच स्मिताताईंचा उद्देश नाही तर त्यासोबत त्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करणे, सामाजिक राजकीय अशा प्रकारचे स्थान त्यांच्या जीवनात निर्माण करणे यासाठी खूप मोठे योगदान ताईंच्या माध्यमातून उभे राहिलेले आहे. स्मिता ही स्वतः वैचारिक परिपक्व असून वाचनाची सवय व आवड असल्याने अनेक ठिकाणी ती उत्तम प्रकारची व्याख्याने देत असते. ती स्वतः एक व्यावसायिक असल्याने प्लॅटिनम इंडस्ट्रीजच्या माध्यमातून ती अनेक मोठे व्यवसाय देखील सांभाळत आहे.
विशेष म्हणजे हे सगळं ती स्वतःच घर कुटुंब, मुलगी सई, मुलगा शंभूराज यांना सांभाळून सगळीकडे वेळ देऊन करत आहे. स्मिता व त्यांचे पती राहुल पोकळे यांची परस्परांना खंबीर साथ कायम असते, अगदी ‘ज्योतिबा सावित्रीची जोडी’ म्हणून ती आसपासच्या भागात प्रसिद्ध आहे. यांचा आदर्श घेऊन धायरी परिसरात अनेक जोडपी मानसिकदृष्ट्या सक्षम होत आहेत.
काही वर्षांपूर्वी स्मिताताईंनी शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून जिल्हा परिषदची निवडणूक देखील लढवलेली होती. सामाजिक राजकीय आणि चळवळीतील सर्व विषयात ती परिपक्व झाल्याने सर्व क्षेत्रात ती सक्षमपणे कार्यरत आहे.
तिच्या सक्षम व स्वावलंबनामुळे ती स्वतःच्या पायावर उभी आहे. सर्व निर्णय ती स्वतः घेते. तिला कोणत्याही प्रकारचे बंधन नाही. शिव-फुले-शाहू-आंबेडकर यांचा विचार ती सतत आचरणातून दाखवून देते. महिलांचे तिला प्रचंड सहकार्य आहे. स्वतः अगोदर आर्थिक सक्षम होऊन तिने इतरांना पण मोठे केलेले आहे. ज्या महिलांना बँक व्यवहार माहिती नव्हते त्यांना आर्थिक सक्षम केले आहे. आजपर्यंत दिवाळी सणाच्या माध्यमातून लाखो रुपयांच्या गिफ्टचे वाटप महिलांना करण्यात आलेले आहे. अनेक कुटुंब सुखी व आनंदी करण्यात स्मिताताईंचा खूप मोठा वाटा आहे.
महिला सक्षमीकरण व स्वावलंबनाबरोबरच मानसिकदृष्ट्या महिलांना सक्षम करणाऱ्या या जिजाऊ – सावित्रीच्या कर्तृत्ववान लेकीला मानाचा मुजरा..!!
स्मिता पोकळे – मो. 90110 09327
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.