October 14, 2024
monika-thakkar comments on Book Mazhi Boli Mazhi Katha
Home » Privacy Policy » माझी बोली, माझी कथा पुस्तकाच्या निमित्ताने मनोगत
गप्पा-टप्पा

माझी बोली, माझी कथा पुस्तकाच्या निमित्ताने मनोगत

दुसऱ्या महायुद्धानंतर इस्रायलनं मृतवत झालेल्या हिब्रू भाषेला पूनः जिवंत केले, हे उदाहरण आपण ऐकतो. पण त्यांनी नक्की काय केलं ? का केलं ? हा तपशील सामान्यांपर्यंत पोहोचत नाही. इंग्रजी भाषेचं साम्राज्य तयार होतं पण त्यातलं रहस्य आपण समजून घेत नाही. आपल्या आसपासच्या भाषिक क्षेत्रातून काय चाललं आहे, हेही आपल्याला बऱ्याचदा माहीत नसतं.

डॉ. मोनिका ठक्कर

भारतीय संस्कृती ही विविधांगी आहे. ज्यात भारताचा महान इतिहास, विलक्षण भूगोल आणि सिंधू घाटी सभ्यतेदरम्यान बनली आणि पुढे जाता वैदिक युगात विकास पावली. शेजारी देशांच्या रूढी-परंपरा, भाषा प्रथा आणि परंपरा यातील परस्पर संबंधातील श्रेष्ठ विविधतेचे एक अद्वितीय उदाहरण देते. भारत अनेक धार्मिक प्रणाली जसे हिंदू धर्म, जैन धर्म, बौद्ध धर्म आणि सिख धर्म सारख्या धर्माचा जनक आहे. या मिश्रणाने भारतात उत्पन्न झालेल्या विभिन्न धर्म आणि परंपरांनी विश्वातील वेगवेगळ्या भागांना प्रभावीत केले आहे.

भारतीय संस्कृतीला जगाच्या इतिहासात अनेक दृष्टिकोनातून अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. ही जगातील प्राचीन संस्कृतीपैकी एक आहे. भारतीय संस्कृती ही कर्मप्रधान संस्कृती आहे. मोहेंजोदडोच्या उत्खननानंतर ही इजिप्त, मेसोपोटामियाची सर्वात पुरातन सभ्यतांच्या समकालीन समजू जाऊ लागली. प्राचीनतेसोबतच हिचे दुसरे वैशिष्ट्य अमरत्व आहे. चिनी संस्कृती व्यतिरिक्त प्राचीन जगाच्या अन्य सगळ्याच मेसोपोटामियाची सुमेरियन, असिरियन, बॅबिलोनियन आणि खाल्दी तथा इजिप्त, इराण, युनान आणि रोमच्या संस्कृती कालौघात विलीन झाल्या. काही उध्वस्त अवशेष त्यांची गौरव गाथा गाण्यास उरल्या आहेत, परंतु भारतीय संस्कृती कित्येक हजार वर्षापासून, युगानुयुगे काळाचे घाव झेलत आजतागायत टिकून आहे. हिचे तिसरे वैशिष्ट्य तिचे जगद्गुरू असणे आहे. तिला याचे श्रेय प्राप्त आहे की महाद्विपासारख्या भारताला सभ्यता शिकवली तर भारताबाहेरील जंगलातील आदिवासींनादेखील सभ्य बनविले.

सायबेरियाच्या सिंहल (श्रीलंका) पर्यंत आणि मादागास्कर बेट, इराणी तथा अफगाणिस्तान पासून प्रशांत महासागराच्या बोर्नियो, बालीच्या द्विपापर्यंतच्या विशाल भूखंडावर आपला प्रभाव उमटवला आहे. भारतीय संस्कृती ही सर्वांगीणता, विशालता, उदारता, प्रेम आणि सहिष्णुतेच्या दृष्टीतून अन्य संस्कृतीच्या अपेक्षेत अग्रस्थानी आहे.

भारतात बोलल्या जाणाऱ्या भाषांच्या मोठ्या संख्येने येथील सांस्कृतिक आणि पारंपरिक विविधतेला समृद्ध केले आहे. एक हजार (जर आपण प्रादेशिक बोली आणि प्रादेशिक शब्दांना मोजले तर आणि जर आपण नाही मोजली तर ही संख्या कमी होऊन २१६ एवढी राहते) भाषा अशा आहेत ज्यांना दहा हजार पेक्षा अधिक समूहाद्वारे बोलली जाते, अनेक भाषा अशाही आहेत जिला दहा हजार पेक्षा कमी लोक बोलतात. भारतात एकूण ४१५ भाषा उपयोगात आहेत. भारतीय संविधानाने शासकीय संप्रेषणासाठी हिंदी आणि इंग्रजी या दोन भाषांचा वापर अधिकारिक भाषा म्हणून घोषित केला आहे. वैयक्तिक राज्यांच्या त्यांच्या अंतर्गत प्रशासकीय संप्रेषणासाठी आपापल्या राज्यभाषेचा वापर केला जातो.


भारतात दोन प्रमुख भाषा संबंधी परिवार आहेत. भारतीय ‘आर्य भाषा’ आणि ‘द्रविड भाषा’. यातील पहिल्या भाषेतील परिवार मुख्यतः भारताच्या उत्तरी, पश्चिमी, मध्य आणि पूर्व क्षेत्रात पसरलेला आहे आणि दुसरा परिवार भारताच्या दक्षिणी भागात पसरला आहे. भारताचा पुढचा सर्वात मोठा भाषा परिवार ‘इस्रो एशियायी भाषा समूह’ ज्यात भारताच्या मध्य आणि पूर्वअट बोलली जाणारी ‘मुंडा भाषा’, उत्तरपूर्वमध्ये बोलली जाणारी ‘खासी भाषा’ आणि निकोबार द्वीपमध्ये बोलली जाणारी ‘निकोबार’ भारताचा चौथा सर्वात मोठा परिवार आहे. तिबेटी- बर्मन भाषा परिवार जो स्वतः चिनी – तिबेटी भाषा परिवाराचा उपसमूह आहे.

भाषा हा मानवी संस्कृतीचा महान ठेवा आहे. मानवी संस्कृती म्हटल्यावर खरंतर त्यात अपपरभाव यायचं काही कारण नाही. सर्व भाषा आपल्याच आहेत. पण प्रत्यक्ष व्यवहारात दुर्दैवाने तसं घडत नाही. सर्वांना जोडणारा दुवा ठरण्याऐवजी बऱ्याच ठिकाणी भाषेच्या नावावर माणसांना एकमेकांपासून तोडण्याचे प्रकार होत आलेले दिसतात. याचं मुख्य कारण म्हणजे आपलं एकमेकांबद्दलच घोर अज्ञान, स्वार्थ, अहंगंड, हेवेदावेे, उच्च निचतेच्या कल्पना, राजकीय बेरजा-वजाबाक्या अशा अनेक गोष्टी असतात की ज्यामुळे आपण एकमेकांना दुरावत चाललो आहोत. गेल्या काही दशकात आणखी एक चमत्कारिक चित्र दिसू लागलं आहे की अनेक भाषा समुदायांना आता आपलं काय होणार?, तथाकथित मोठ्या भाषांचे समुदाय आपल्याला गिळून तर टाकणार नाहीत ना? अशी भीती वाटायला लागली आहे.

भाषेत अंतर्गत बदल होत असतात, तसे तिच्या बाह्य परिस्थितीतही बदल होत असतात. चढ-उतार चालू असतात. जगातल्या अनेक भाषांनी असे चढ-उतार अनुभवले आहेत. आपल्याला ती माहिती कळली तर आपणही तशा परिस्थितीला तोंड द्यायला तयार होऊ शकू.

दुसऱ्या महायुद्धानंतर इस्रायलनं मृतवत झालेल्या हिब्रू भाषेला पूनः जिवंत केले, हे उदाहरण आपण ऐकतो. पण त्यांनी नक्की काय केलं ? का केलं ? हा तपशील सामान्यांपर्यंत पोहोचत नाही. इंग्रजी भाषेचं साम्राज्य तयार होतं पण त्यातलं रहस्य आपण समजून घेत नाही. आपल्या आसपासच्या भाषिक क्षेत्रातून काय चाललं आहे, हेही आपल्याला बऱ्याचदा माहीत नसतं. आज जागतिकीकरण हा परवलीचा शब्द झाला आहे. आपला अजूनही असा समज आहे की जागतिकीकरण म्हणजे जगभरातल्या विविध वस्तू आपल्या घरात आणून त्याचा उपभोग घेणं! जागतिकीकरण म्हणजे आपल्या तरुणांनी, उद्योजकांनी देशोदेशी जाऊन पराक्रम गाजवणं, जग काबीज करणं. आज या जागतिकीकरणाच्या निमित्तानं आपल्याला आपल्या भाषांनाही मोठं करण्याची संधी आली आहे. आपण तिचा उपयोग करुन घेणार, की दवडणार हे आपल्या विजिगिषु वृत्तीवरच अवलंबून आहे.

या बाबतीत अगदी अलीकडची चीनमधील घटना लक्षात घेण्यासारखी आहे. संगणकाच्या क्षेत्रात मायक्रोसॉफ्टनं आपला ‘विंडोज’ कार्यक्रम आणून जगातल्या साऱ्या देशांमध्ये खिंडारं पाडली; पण चीनमध्ये मात्र त्यांना प्रवेेश नव्हता. विंडोज आज्ञावलीवर आमची चिनी भाषा आणा नि मगच तुमचे कार्यक्रम विका, अशी अट चिनी सरकारनं घातली. हे आव्हान स्वीकारून मायक्रोसॉफ्टनं आपला पैसा, बुद्धिमत्ता नि कसब एकवटून चिनी – चित्रलिपी संगणकावर बसवण्याचं ऐतिहासिक कार्य पार पाडलं आणि चीनच्या बाजारात प्रवेश केला. चिन्यांनी दाखवलेल्या हुशारीमुळे त्यांना, त्यांच्या भाषेचा केवढा फायदा झाला!

जागतिकारणाच्या रेट्यात आपण हरवून जायचं, नष्ट व्हायचं की पराक्रम गाजवून विजयी व्हायचं हे आपल्या मनोवृत्तीवरच अवलंबून आहे. ‘इंग्लिश आली, पळा!’ किंवा ‘चिनी अली, धावा, धावा!’ असं म्हणून आपण घाबरुन जाणार असू तर आपल्या भाषेचं, म्हणजेच आपल्या संस्कृतीचं आणि पर्यायाने आपलं अस्तित्वच संपून जाईल, यात काही संशयच नाही; त्यानंतर आपण केवळ ‘प्राणी’ म्हणून जगत राहू, तसं झालं तर राजकीय दृष्ट्या नाही तरी सांस्कृतिक दृष्ट्या ते जिणं गुलामगिरीचंच असेल. आज दुर्दैवाने अशी अनेक उदाहरणे आफ्रिकेत दिसतात, हा धोका आपल्या उंबरठ्यापाशी येऊन ठेपलेला आहे. एवढेच नव्हे तर त्यानं ईशान्य भारतात चंचुप्रवेशही केला आहे.


एखादी भाषा मरणं म्हणजे संस्कृती मरणं हे मानवजातीचं कधीही भरून न निघणारं फार मोठं नुकसान आहे. हे जगातल्या जाणत्यांना ठाऊक असलं तरी ‘व्यापाऱ्यांना’ त्याची पर्वा नसते. बऱ्याचदा राजकारणीही अगतिक बनतात; तेव्हा जागतिकीकरणाच्या लाटेत संस्कृतीचा विचार करणाऱ्यांनी वाहून जाता कामा नये. तो आपल्या केवळ अस्मितेचा नव्हे तर अस्तीत्वाचा प्रश्न म्हणून गांभीर्याने बघायला पाहिजे. आपण जागरुक राहिलो तर आपण नव्या लाटेत निश्चितपणे टिकून राहू, स्वतंत्रपणे वाढू, समृद्ध होऊ! देशाच्या तथाकथित राजकीय सीमा ओलांडून जाणारं तंत्रज्ञान आज आपल्या हाती आलं आहे, त्याचा योग्य उपयोग करण्याची हुशारी आपण दाखवली तर आपल्या भाषेला जागतिक स्तरावर नेणं सोपं आहे. कारण मुळातच मराठी ही संख्येच्या दृष्टीनं जागातल्या मोठ्या भाषांपैकी एक भाषा आहे, पण तेवढं वाटणं पुरेसं नाही. मुळात म्हणजे आपण आपल्या भाषेचा सर्व क्षेत्रात वापर केला पाहिजे, जास्तीत जास्त ठिकाणी ती आग्रहानं वापरली पाहिजे, आपल्या विचार चिंतनाचं आणि शिक्षणाचं माध्यम म्हणून तिचाच वापर केला पाहिजे. एवढी एक गोष्ट आपण प्रामाणिकपणे केली तरीही नव्या ज्ञानाच्या दृष्टीनंही सक्षम बनून ती ज्ञानभाषा होण्यात कसलीही अडचण नाही. सारं काही आपल्याच हातात आहे.

सर्व भाषा आपल्याच आहेत, आपण त्या शिकाव्या, गरजेनुसार त्यांचा उपयोग करावा, आपलं जीवन समृद्ध करावं. हे सगळं करताना आपली भाषा, आपली संस्कृती सोडण्याची गरज नसते हे आपल्याला भाषांच्या अभ्यासामुळे कळतं, आपल्यात दडलेला अतिरेकी ‘संपतो’. संस्कृतीचा ठेवा मुख्यतः भाषेच्या आधारानेच टिकून असतो; म्हणूनच संस्कृतीच्या संरक्षणात, संवर्धनात भाषेचं स्थान अनन्यसाधारण आहे. भाषांच्या संदर्भातल्या महत्त्वाच्या मुद्यांची मुळात माहिती देऊन चर्चा होणे गरजेचे आहे. व्यक्त होतो तो व्यक्ती आणि व्यक्त होण्यासाठी शब्दांची गरज असते. या शब्दांना भावनेचा आधार मिळाल्यास व्यक्तीचं व्यक्त होणं अधिक प्रभावी तसच स्पष्टही होत जातं. माणसाला प्राण्यांपासून वेेगळ्या करणाऱ्या दोन अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आहेत; त्या म्हणजे विचार करण्याची क्षमता आणि भाषा. यावरून भाषेचे विशेष महत्त्व आपल्या लक्षात आले असेल.

डॉ. गणेश देवी यांनी आपल्या पुस्तकात मांडलेले संदर्भ याप्रमाणे-

“मुख्य प्रवाहातील कुठल्याही भाषेला समृद्ध करण्यात त्या-त्या परिक्षेत्रातील बोलींचा मोलाचा हातभार असतो. मानवाला अन्य प्राण्यांपासून वेगळे करण्यामागे भाषा या सामुदायिक प्रक्रियेचा फार मोठ्या प्रमाणात हातभार लागला आहे. किंबहुना असेही म्हणता येईल की भाषेमुळे माणूस, माणूस बनला. हा सारा इतिहास जवळ जवळ सत्तर हजार वर्षांपासून उत्क्रांत होत आहे. त्या आधी ध्वनी माध्यमातून सांकेतिक आकाराचे ‘शब्द’ वापरात नव्हते; म्हणजे ज्याप्रमाणे हवा किंवा पाणी मानवाला नैसर्गिकरित्या प्राप्त झाले, त्याप्रमाणे भाषा नैसर्गिक नाही. ती मानवी समाजानी घडविलेली एक सामुदायिक संहिता आहे. मुळात ती ध्वनी स्वरूपात व कालक्रमाने लिखित आणि नंतर मुद्रित स्वरूपात आपल्याला मिळालेली एक वारसागत भेट आहे. संपूर्ण विश्वाचा उगम कशात आहे, हे कोडे मानवी मनाला अजूनही संपूर्णपणे सोडवता आले नसले तरीही सध्यापुरते विश्वनिर्मितीचे कारण म्हणून ‘बिगबँग’ सिद्धांत स्वीकारण्यात आला आहे. ‘त्या’ घटनेस साधारणतः चौदाशे कोटी वर्षे झाली असावीत, असे मानण्यात आले आहे. ज्या सूर्य मालिकेत आपली पृथ्वी आहे, त्या सूर्य मालिकेच्या निर्मिती प्रक्रियेस पूर्णता सुमारे सहाशे कोटी वर्षांपूर्वी आली असावी, असे मानण्यात आले आहे. त्यानंतर जीव निर्मिती; अत्यंत प्राथमिक स्वरूपाच्या जीवनिर्मितीचा काळ अडीचशे कोटी वर्षांपूर्वीचा असावा असे या कालमापनात कल्पिले आहे. या सर्व प्रचंड आकड्यात, मनुष्य प्राण्याची निर्मिती सुमारे पाच लाख वर्षांपूर्वीची समजली जाते. पाच लाख वर्षांपूर्वीचा आपला पूर्वज पाठीच्या कण्याच्या सहाय्याने ताठ उभा राहू शकत होता. त्याच्या शरीराची ठेवण जवळपास आपल्यासारखीच होती. आपले पूर्वज आणि आपल्यामधला सर्वात मोठा फरक होता तो म्हणजे सध्याचा मानवप्राण्याची अभिव्यक्ती व संवाद यासाठी आपण भाषा हे माध्यम वापरतो. पाच लाख वर्षांपूर्वीचे आपले पूर्वज ते माध्यम त्या काळात निर्माण करू शकले नव्हते, करू शकले नसते. प्रारंभीच्या सुमारे दोन लाख वर्षात ते पूर्वज हावभावाच्या सहाय्याने ‘संवाद व अभिव्यक्ती’ दर्शवायचे. आजही बोलताना आपण हातवारे करतो, चेहऱ्यावर भाव व्यक्त करतो. अन्य व्यक्तीला होकार व नकार देण्यासाठी मान हलवतो. या साऱ्या सांकेतिक निर्मितीचे श्रेय आपल्या चार ते पाच लाख वर्षांपूर्वीच्या पूर्वजांना द्यायला हवेे. त्या सुरुवातीच्या नाटकी संवाद माध्यमाची नंतरची पायरी ‘संगीताच्या’ माध्यमातून विकसित होत गेली. हुंकार भरणे, आरोळ्या ठोकणे, उसासे टाकणे, छोटे-मोठे स्वर पुनरावर्तित करून भावना व अर्थ व्यक्त करणे, हा प्रकार जवळपास दोन-अडीच लाख वर्षे चालत राहिला. पण त्यातून ‘स्वर’ हे अभिव्यक्तीचे समर्पक माध्यम बनू शकते हा विश्वास त्या पूर्वजांना आला. आपल्यासारख्या ‘बोलक्या’ भाषेच्या निर्मितीच्या संदर्भात भाषाशास्त्र व अन्य मानव्यशास्त्रे यांनी आपल्या आधी सत्तर हजार वर्षे हा कालावधी स्वीकारला आहे.”

आपल्या महाराष्ट्रात माय मराठी भाषेला समृद्ध करणाऱ्या विविध बोली बोलल्या जातात, या मुख्य बोली सुमारे पाशष्ट असून उपबोली, पोटबोली मिळून सुमारे शंभर बोली होतात. ज्या आज नामशेष होत चालल्या आहेत. या बाबतचा विचार करून बोलींचे जतन आणि संवर्धन व्हावे या दृष्टीने तसेच वाचकांना ते रंजक वाटावे या उद्देशाने आणि आपल्या महाराष्ट्रात एवढ्या बोली बोलल्या जातात हे जनमानस, महाविद्यालय व विद्यालय स्तरावरही विद्यार्थ्यांना याची माहिती मिळून बोलींच्या अभ्यासाकडे कल वाढावा आणि जनमानसापर्यंत पोहोचावा या हेतूने हा प्रकल्प हाती घेतला.
सीमालगतच्या भागात बोलली जाणारी बोली किंवा डोंगराळ प्रदेशात बोलल्या जाणाऱ्या बोलीमध्ये, माणसा-माणसाच्या अंतरावर त्याची लकप, लय, आरोह, अवरोह निश्चित होते, म्हणजे वीस कोसावर बदलणारी बोली ही भौगोलिक परिस्थितिनुसार तसेच माणसाच्या मानसिकते नुसार बदलत जाते. त्याची जीवन रहाटी, उपजीविकेसाठी करत असलेले कामकाज यावरही अनेक गोष्टी ठरत असतात. मुळात भौगोलिक परिस्थिती आणि जीवनरहाटीमुळे मानसिकता तयार होते आणि ती बोलीच्या स्वरुपात आविष्कार पावत असते.

भाषेचे आद्य कर्तव्य बोलणे आहे; नंतर ऐकणे, वाचणे, लिहिणे असे चार टप्पे आहेत. १९५० पूर्वीची मराठी आणि आजची मराठी यात खूप मोठा बदल आपल्याला दिसून येतो. आजची मराठी ही आंग्ल प्रचुर असल्याने भाषेचा संकर होऊन ती रुक्ष झाली आहे. भाषा ही कधीच ग्रामीण अथवा नागर नसते. भाषा ही भाषा असते, कारण तिच्या अभिव्यक्तीचे वैभव तिच्या मातीतून जन्माला येते. भाषा आणि बोलीचं कधी भांडण नसतं! भाषा, परंपरा आणि नवता यापलिकडे एक अत्यंत गतीमान अवस्था आहे ती म्हणजे नागरीकरण आणि आजच्या नवपीढीने भाषेचा जो संकर केला आहे म्हणजेच आविष्कार केला आहे, ज्याला आपण मिश्र भाषा म्हणतो. या कारणाने भाषेचा ओलावा संपला आहे आणि त्यात एक रूक्षपणा आलेला आहे आणि हा रूक्षपणा संस्कृतीला अत्यंत पीडादायक आहे. या रूक्षपणाने अभिव्यक्ती होणे कठीण झाले आहे. ज्यामुळे कळतं पण वळत नाही अशी अवस्था होण्याची शक्यता अधिक बळावते. सांस्कृतिक एकात्मता रूजवण्याचं महत्त्वपूर्ण कार्य लोककलेची धारणा आहे. याचमुळे लोककला ही जीवन आणि जीवनमुल्यांचे अधिष्ठान आहे.

या आधुनिक युगातील अनेक तंत्रज्ञान किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियाने आपल्या जीवनातील महत्त्वपूर्ण जागेचा ताबा घेतल्याने कुठेतरी ही वाचन संस्कृतीही हरवली आणि त्या जागी टिव्ही, चित्रपट, इंटरनेट, मोबाईल, व्हॉट्सॲप, फेसबुकने असे काही मायाजाल पसरवले आहे की या यंत्रणेच्या माध्यमाने हजारोंच्या संख्येने मित्र असतात, परंतु शेजारी कोण राहतं याचा पत्ता ही लागत नाही. आपल्याला आलेला ताप, ‘M not feeling well’ या वाक्याच्या माध्यमातुन फेसबुकवरील हजारों मित्रांना आधी कळतं आणि घरातल्यांना खुप नंतर. या मायाजालाने अंतर्गत संबंधही खुप दूरवर नेऊन ठेवले आहेत असे वाटते आणि हाच मीडिया; वाचन संस्कृतीला मारक ठरला आहे. आपल्या मनात नक्कीच प्रश्न निर्माण झाला असेल की, व्हॉट्सॲपवर किंवा फेसबुकवर देखील अनेक गोष्टी वाचण्यासारख्या असतात आणि आम्ही त्या वाचतो. तुमचे म्हणणे तुमच्या दृष्टीने योग्यही असेल परंतु मित्रांनो जे तुम्ही आधुनिक माध्यमाने साहित्य वाचता त्याचे स्वरूप आणि गरज लक्षात घेता या साहित्याचे मुळ नेमके कुठे रूजले आहे? आमची संस्कृती काय होती? आणि आज काय आहे? या सर्वांच्या मुळापर्यंत जायचे असेल आणि आपल्या ज्ञानाचा पाया मजबूत करायचा असेल तर पुस्तकांशी मैत्री करणं, पुस्तकांशी ‘फेस टू फेस’ होणं अत्यंत गरजेचे आहे.

त्या पलिकडे जाऊन मी एक उदाहरण देईन ते नाटकाच्या संदर्भातील. ज्याप्रमाणे एखादी संहिता लिखित स्वरूपात असते आणि पुढे ती नाटकाच्या स्वरूपात, दृष्यांच्या स्वरूपात उभी राहते आणि रंगमंचावर सादर होते तेव्हा Page to stage म्हणजेच संहितेच्या पानांवरून रंगभूमीपर्यंतचा त्या नाटकाच्या प्रवासात त्या संहितेवर होणारे अनेक संस्कार आणि कधी कधी होणारे अत्याचार जर आपल्याला अभ्यासायचे असेल तर Stage to page म्हणजेच रंगमंचाकडून पानांकडे किंवा संहितेकडे असा उलट प्रवास केला तरच ते लक्षात येईल. ज्याला Roll back असे म्हणता येईल. अगदी त्याचप्रमाणे Page to stage and roll back प्रमाणेच इलेक्ट्रॉनिक मीडिया, वाचन आणि मौखिकता असा प्रवास केल्यास तुम्हाला नक्कीच आपल्या संस्कृतीची मुळे आपल्यातच रूजलेली दिसतील असा विश्वास आहे. परंतु काळ इतका झपाट्याने बदलतो आहे की, अशा धकाधकीच्या काळात वाचनसंस्कृती जपली गेली तरीही एक समंजस पिढी निर्माण होईल. वाचनसंस्कृती जशी एक व्यक्ती घडवते तशीच समाजही घडवते. माणसाच्या संवेदनशीलता, निर्मितीक्षमता, जाणीव-जागृती, भावनाविष्कार, विचारप्रक्षोभ अशा मनांच्या विविध आखाड्यांवर वाचनसंस्कार काम करत असते. माणूस वाचन करतो म्हणजे नेमके काय करतो? तर माणूस वाचता वाचता स्वतःलाही ताडून पाहत असतो. या प्रक्रियेत भावना, तर्क, कल्पना, मनाच्या आणि मेंदूच्या पातळीवर चालू राहतात, खरे तर वाचन मनाचे आणि बुद्धिचे मेतकूट जमवून देते आणि त्या मेतकूटाने जीवन चविष्ट होते यात शंका नाही.

लॉक डाऊनसारख्या महाभयंकर काळात हा प्रकल्प हाती घेतला. अनेक लोकांना दूरध्वनीच्या माध्यमाने संपर्क केला. विषय समजावून सांगितला; ज्यांना सांगितला त्या प्रत्येकाला विषय खूप आवडला आणि सकारात्मक उत्तरासह अनेकांनी एकसाथ कामाला सुरुवात केली. प्रकल्पाची एकूण धाटणी लेखकांच्या लक्षात राहावी म्हणून एक पत्र पाठवलं. प्रत्येक लेखकाने आपली कथा पाठवली आणि माझा प्रवास खऱ्या अर्थाने सुरु झाला. त्या कथा समजून घेणे, त्यात कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा किंवा अश्लीलता आलेली नाही ना! आणि अन्य संपादन भाग वैगेरे… वगैरे… परंतु कथेच्या संकल्पनेला, त्याच्या आशय विषयाला लेखकांनी मुभा घेतली आहे तसेच आपापल्या अनुभव आणि अभ्यासाप्रमाणे त्या मांडल्या आहेत. या बोलींना मराठी भाषेच्या व्याकरणाचे निकष लावून चालत नाही; कारण या बोली त्या त्या भू-भागातून, तिथल्या मातीतून आणि समाजाच्या अथीव्यक्तीनुसार घडत गेल्या. बोलण्याची गरज आणि समजण्याचा ताळमेळ हा त्यांनी त्यांचा ठरवलेला निकष आहे. बोलीतील अभ्यासकांनी त्याचा ‘सेन्स, इसेन्स आणि इनोसेन्स’ कायम ठेवण्याचा जो प्रयत्न या प्रकल्पात दिसतो आहे तो खरंच वाखाणण्याजोगा आहे.
या बोलींचा अभ्यास करताना लक्षात आले की महाराष्ट्रातील बोलींवर हिंदी आणि गुजरातीचा बऱ्यापैकी प्रभाव आहे. या तीनही भाषा मला समजत असल्याने त्या वाचण्यास आणि समजण्यास सोपे झाले.

महाराष्ट्रातील विविध बोलीतील कथा संकलित करुन सोबतच त्यांचा कथासार, कठीण शब्दांचे अर्थ, त्या-त्या बोलीविषयी अभ्यासपूर्ण माहिती तसेच लेखकांचा थोडक्यात परिचय अशा साध्या सोप्या धाटणीचा हा प्रकल्प आहे. या ग्रंथात ५७ बोलीतील ५७ कथा असून प्रत्येक कथा त्या-त्या बोलीतील अभ्यासक लेखकांनी लिहिल्या आहेत. दिग्गज लेखक मंडळींनी या ग्रंथाला आपले योगदान देऊन समृद्ध केले आहे. बोलीविषयक असा प्रयोग महाराष्ट्रात प्रथमच होतो आहे, हे मी नम्रपूर्वक नमूद करीत आहे.

पुस्तकाचे नाव – माझी बोली माझी कथा
संकलक आणि संपादक : डॉ. मोनिका ठक्कर
मुखपृष्ठ व मांडणी : योगेश्वर नामदेव लोळगे
प्रकाशक : लोकायन प्रकाशन संस्था, मुंबई
पृष्ठ संख्या : ३४४
मूल्य : १,१००/-


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading