अध्यात्मामध्ये सर्व अभ्यास स्वतःच शिष्याला करावा लागतो. सर्वच कृती त्याने स्वतः करायची असते. स्वतःच स्वतःचा शोध घ्यायचा असतो. ज्ञानेश्वरीचे नित्य पारायण स्वतः करून स्वतः त्याचा अभ्यास करून आत्मज्ञानी व्हायचे असते.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे
मोबाईल 9011087406
आणि माझे तवं आघवें । ग्रथन येणेंचि भावें ।
जे तुम्ही संती होआवें । सन्मुख सदा ।। ३२८ ।। ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा
ओवीचा अर्थ – आणि माझ ग्रंथ रचणें तर याचहेतुने आहे की तुम्ही संतांनी नेहमी प्रसन्न होऊन समोर असावे.
संत ज्ञानेश्वरांनी श्री ज्ञानेश्वरी ग्रंथाची रचना केली. ज्ञानेश्वरी रचना करताना गुरुं त्यांच्यासमोर होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही रचना केली. गुरु-शिष्य शिक्षणाचा, अध्ययनाचा हा प्रकार, ज्ञानदानाचा प्रकार विचारात घेण्यासारखा आहे. यावर सखोल चिंतन, मनन आणि अभ्यास होण्याची गरज आहे. आपणास ज्ञानेश्वर घडवायचे असतील तर ही शिक्षण पद्धती निश्चितच विकसित करावी लागेल. विशेषतः उच्च शिक्षणामध्ये किंवा एखाद्या विषयातील तज्ज्ञ (पी. एचडी) ही पदवी मिळवताना अशी शिक्षणपद्धती अवलंबण्याचा विचार होण्याची गरज आहे. अशाने निश्चितच ज्ञानेश्वर घडतील. ज्ञानेश्वरी हा ग्रंथ पी. एचडीला प्रबंध जसे आपण सादर करतो तसाच आहे. ज्ञानेश्वरीच्या ज्ञान दानातून आजही आत्मज्ञानाची गुरु शिष्य परंपरा मराठीच्या या नगरीत विकसित होत आहे. मराठीचिये नगरीतील हे ज्ञानपीठ अमरत्वाचे सिहासन आहे.
पी. एचडीमध्ये शिष्याने स्वतः विषय शोधायचा, स्वतः त्या गोष्टीचा अभ्यास करायचा, स्वतःच तो विषय आत्मसात करायचा, अन् स्वतःच त्यावर आपली मते व्यक्त करायची. यात गुरु केवळ एक मार्गदर्शक असतात. शिष्य काय सांगतो. काय करतो हे फक्त ऐकत असतात. अशा या शिक्षण पद्धतीला प्राधान्य देण्याची गरज आहे. शिक्षक सांगतात. शिकवतात व शिष्याने त्यांच्याकडून ज्ञान घ्यायचं. अशी शिक्षण पद्धती सध्या आहे. शिक्षकांनी एखादा भाग काहीच शिकवला नाही तर विद्यार्थ्यी तो भाग शिकवला नाही म्हणून त्यांच्या विरोधात ओरड करतात. म्हणजे शिक्षकांनी शिकवला तरच विद्यार्थी तो भाग शिकणार अन्यथा नाही. ही पद्धत आणि हा विचार दोन्हीही चुकीचे आहे. शिक्षक शिकवोत अथवा न शिकवोत विद्यार्थ्यांने तो भाग हा स्वतः शिकायला हवा. स्वतः तो भाग आत्मसात करायला हवा. तरच तो विद्यार्थी घडेल. त्याच्या बुद्धीचा विकास होईल.
आजची मुले मोबाईल गेम किंवा नवे तंत्रज्ञान पटकण आत्मसात करतात. त्यांना न सांगताही ते त्यात पारंगत असतात. मोबाईलमध्ये हा गेम दडवून ठेवला किंवा त्याला न दिसेल असे केले. तरी मुले ते शोधून काढतात. यात त्या मुलांना काहीही शिकवले नाही, पण ते स्वतःच स्वतः शिकले म्हणजे काय मुलांनी स्वतः आवडीने ते शोधून काढले. अभ्यासामध्येही असेच त्यांनी करायला हवे. म्हणजे ते स्वतः त्या विषयामध्ये पारंगत होतील. आता अशी शिक्षण पद्धती विकसित करण्यावर भर द्यायला हवा.
विद्यार्थी खऱ्या अर्थाने घडवायचे असतील तर त्यांना मोकळीक ही द्यायला हवी. स्वांतत्र्य द्यायला हवे. म्हणजे विद्यार्थी स्वतःच स्वतःची मते मांडतील. ती मते मांडण्यासाठी साहजिकच त्यांना स्वतः अभ्यास करावा लागेल. यातून आपोआपच तो विद्यार्थी त्या विषयात पारंगत होईल. विद्यार्थ्याला काय समजले, हे त्याला स्वतःला सांगण्यास सांगितले तर तो विद्यार्थी आपोआपच अभ्यास करून येईल. शिक्षण पद्धतीत असे प्रयोग करायला हवेत.
अध्यात्मामध्ये सर्व अभ्यास स्वतःच शिष्याला करावा लागतो. सर्वच कृती त्याने स्वतः करायची असते. स्वतःच स्वतःचा शोध घ्यायचा असतो. ज्ञानेश्वरीचे नित्य पारायण स्वतः करून स्वतः त्याचा अभ्यास करून आत्मज्ञानी व्हायचे असते. स्वतःच प्रत्येक ओवीचा बोध घ्यायचा असतो. बोधातून, अनुभवातून शिकून आत्मज्ञानाची अनुभुती मिळते. हे सर्व मात्र गुरुंच्या मार्गदर्शनाखाली असते याचा विचार मात्र नित्य ठेवायला हवा. ज्ञानप्राप्तीही गुरुंच्याकडून होते. यासाठीच हे ज्ञान त्यांना समर्पित करायचे असते. यासाठी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ग्रंथ रचना करताना तुम्ही संतांनी नेहमी प्रसन्न होऊन समोर असावे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.