April 20, 2024
Dnyneshwari article by Rajendra Ghorpade on Illusion
Home » भास-अभास
विश्वाचे आर्त

भास-अभास

आपणाला जे भासते ते खरे नसते. खरे काय आहे हे ओळखायला हवे. दृष्टीभासाची अशी अनेक उदाहरणे देता येऊ शकतात. यातून सांगण्याचे तात्पर्य हेच आहे की सत्य परिस्थिती काय आहे हे ओळखायला हवे. आपण म्हणजे कोण आहोत ?

राजेंद्र कृष्णराव घोरपडे

मोबाईल 9011087406

अथवा नावें हन जो रिगे । तो थडियेचें रुख जातां देखे वेगें ।
तेंचि साचोकारें जों पाहों लागे । तंव रुख म्हणे अचळ ।। 97 ।। श्री ज्ञानेश्वरी अध्याय 4 था

ओवीचा अर्थ – अथवा जो नावेत बसून जातो, त्याला किनाऱ्यावरची झाडे भरभर चालली आहेत असे दिसते पण वस्तूस्थिती जेव्हा तो पाहू लागतो तेव्हा ती झाडे स्थिर आहेत असे तो म्हणतो.

विहिरीच्या काठावर उभे राहून विहिरीत पाहिले, तर आपलेच प्रतिबिंब आपणास दिसते. ते आपले प्रतिबिंब असते. आपण स्वतः तेथे नसतो. म्हणजे तो आणि मी वेगळे आहोत. याची जाणीव आपणास असायला हवी. मडक्‍यात पाणी भरून मडके बाहेर ठेवले तर त्यात आकाश दिसते. मडक्‍यातही ते आकाश सामावते. पण ते मडके फुटले तर ते आकाशही नाहीसे होते. याचा अर्थ मडक्‍यात असणारे आकाश हे खरे नव्हते. त्या आकाशाची ती प्रतिमा होती. नावेमध्ये किंवा रेल्वेतून प्रवास करताना आपणास बाहेरची झाडे मागे मागे पळत जात आहेत असे वाटते. प्रत्यक्षात झाडे आहेत तिथेच असतात आपण पुढे जात असतो. त्यामुळे आपणास तसा भास होतो. मांजराने हवेत उडी मारली तेव्हा त्याची प्रतिमा भिंतीवर उमटली. त्यात ते मांजर न वाटता बिबट्या वाटला. पण प्रत्यक्षात तो तसा भास होतो. खरे तर ते मांजरच आहे. 

आपणाला जे भासते ते खरे नसते. खरे काय आहे हे ओळखायला हवे. दृष्टीभासाची अशी अनेक उदाहरणे देता येऊ शकतात. यातून सांगण्याचे तात्पर्य हेच आहे की सत्य परिस्थिती काय आहे हे ओळखायला हवे. आपण म्हणजे कोण आहोत? आपले नाव म्हणजे आपण आहे का ? नाही, कारण एकाच नावाची अनेक माणसे असू शकतात. मग आपण कोण आहे? हे नाव शरीराला दिले आहे. मग आपण म्हणजे शरीर आहोत का ? पृथ्वी, आप, वायू, तेज, गगन या पंच महाभूतांनी हा देह, हे शरीर तयार झाले आहे. ते आपण आहोत का? नाही कारण आपण मेल्यानंतर हे शरीर पंचत्वात विलीन होते. विविध रसायनांनी युक्त असणारे हे शरीरही आपण नाही. कारण या शरीरात जो पर्यंत जीव आहे तोपर्यंत हे शरीर जिवंत आहे. तो जीव गेला की शरीराची क्रिया संपते. त्या शरीराला मग किडा मुंगा लागतात त्या लागू नयेत यासाठी ते शरीर जाळले जाते. किंवा त्यापासून रोगराई पसरू नये यासाठी ते जमिनीत गाढतात. म्हणजे शरीर हे नष्ट होते.

मग या शरीरात असणारा जीव आपण आहोत का? या जीवात असणारा हा आत्मा म्हणजे मी आहे का? मी आत्मा आहे. हे खरे आहे. पण तो प्रत्येकाच्या शरीरात आहे. शरीराची नावे वेगळी असली तरी आत्मा हा एकच आहे. सर्वांच्या ठायी असणारा आत्मा हा एकच आहे. सबका मालिक एक हे यासाठीच म्हटले आहे. हा आत्मा अविनाशी आहे. तो ओळखायला हवे. शरीरात आल्यामुळे तो आपणास वेगळा वाटत नाही. प्रत्यक्षात शरीर आणि आत्मा हे वेगवेगळे आहेत. हे ओळखायला हवे. हे ज्याने ओळखला तोच आत्मज्ञानी होतो.

Related posts

शेतकरी महिलांसाठी वत्त्कृत्व स्पर्धा

कविवर्य रेंदाळकर साहित्य पुरस्कारासाठी ग्रंथ पाठविण्याचे आवाहन

पाटगावचे वैभव…

Leave a Comment