July 27, 2024
Tiger and family Residence Poem by Vishwas Deshpande
Home » वाघीणच ती…
मुक्त संवाद

वाघीणच ती…

रात्री डिस्कवरीचं चॅनल पाहत होतो. एक वाघीण आणि तिची पिलं . मोठी गोजिरवाणी होती पिलं . वाघीण त्या पिलांचा सांभाळ करत होती. शिकार करायला शिकवत होती. आईच ती ! वाघीण झाली म्हणून काय झालं…! काळीज तर आईचंच होतं ना ! पाहता पाहता कधी झोप लागली कळलं नाही. रात्री स्वप्नात ती वाघीण आणि तिची पिलं आली

विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
९४०३७४९९३२

घनदाट पसरलेलं जंगल. उंचच उंच पहाड. दऱ्या खोऱ्या. खळाळते झरे. डोंगराच्या माथ्यावर निबिड रान पसरलेलं. दिवसा सूर्याचा थोडाफार प्रकाश यायचा. पण एरव्ही झाडांची गर्द सावली. दिवसासुध्दा मनुष्य प्राणी तिकडे फिरकण्याची हिंमत करत नसायचा. अशा त्या जंगलात एका जाळीमागे नुकतीच व्यालेली एक वाघीण. तीन डौलदार, रुबाबदार आणि गोजिरवाणे छावे. कधी कधी ती त्यांना तोंडात धरून पाण्यापर्यंत घेऊन जाई . पण लगेच ते चालायला लागले. मग त्यांना तोंडात धरून नेण्याची गरज राहिली नाही. आईलाही तेच हवं होतं . पुढे ती जायची. तिच्या पाठोपाठ पिलं .

चालायचं कसं ती शिकवत होती.
पाणी कसं प्यायचं ती दाखवत होती त्यांना.
शिकार ती करून आणत होती.
तिच्या बछड्यांसाठी जीवावर उदार होऊन.
शिकवत होती त्यांना खायला.

तीही मोठी लाडावली होती बेटी .
आपल्या आईच्या अंगावर खेळत असायची.
कधी एकमेकांशी मस्ती करत असायची.
कधी आईला त्रास द्यायची .
मग आई मध्येच त्यांच्यावर गुरकावयाची.
पण ते खोटं खोटं असायचं.
त्याच्यात प्रेमच जास्त असायचं.

मग हळूहळू पिलं मोठी होऊ लागली.
आता वाघीण त्यांना शिकार करताना बरोबर नेऊ लागली.
शिकारीचे धडे देऊ लागली.
त्यांना आधी आक्रमणाची संधी देऊ लागली.
गरज पडली तर मध्ये पडायची.
पिलांना तिने स्वावलंबी बनवलं.
शिकार करायला शिकवलं.

आता पिलांमध्ये शक्ती आली .
कोवळी काया तारुण्यात न्हाली.
गोजिरवाणी पिले रुबाबदार झाली.
डरकाळीत त्यांच्या शक्ती आली.
आता पिलं नव्हती आईवर अवलंबून.
स्वतः जंगलात फिरून आणायचे भक्ष्य.
तरीही आईचं होतच त्यांच्यावर लक्ष.

पण होता होता एक दिवस
पिलं लांब निघून गेली जंगलात
वाघिणीचा जीव इकडे कासावीस झाला.
जंगलात फिरली. शोध शोध शोधलं.
पण कुठेच पत्ता नव्हता.
दोनतीन दिवस काही खाल्लं नाही.
डोळ्यांमधले अश्रू थांबले नाहीत.
पण नियम निसर्गाचा.
थांबावच लागलं.

इकडे पिलं गेली लांबवर.
भटकत भटकत घरापासून दूर.
पण नव्हती फिकीर त्यांना.
झाले होते शूर.
जंगलातच लांब कुठेतरी त्यांना
भेटली आपापली जोडीदारीण.
मग कसले जातात घरी ?
स्वतंत्र जग त्यांचे आता.
आता फक्त वाघ आणि त्याची वाघीण.

पण एक दिवस मात्र अजब घडले
उन्हाळ्याचे दिवस होते.
अचानक कुठून तरी जंगलात वणवा पेटला.
झाडे, गवत सारे काही पडले आगीच्या भक्ष्यस्थानी.
जंगलातले पशु पक्षी हैराण झाले.
वाघोबालाही आपलं घरटं सोडून जावं लागलं.
तो कुठे, वाघीण कुठे काही कळेना.
वाघोबाचा पाय मात्र वाघिणीवाचून निघेना.

पण आग होतीच एवढी भडकलेली
की त्याला निघावेच लागले.
सगळीकडेच जंगल होते भडकलेले.
कुठे कुठे फक्त निखारे होते.
पावलांना चटके बसत होते.
दमला, थकला आणि एका ठिकाणी थांबला.
तो प्रदेश त्याला ओळखीचा वाटू लागला.

मग त्याला लक्षात आले की
अरे, इथे तर माझे बालपण गेले.
इथेच आईने मला भरवले होते.
शिकार करायला शिकवले होते.
रात्र झाली की तिच्या कुशीत
कशी शांत निवांत झोप लागायची.
तिची खूप आठवण झाली .
कुठे असेल आता माझी आई ?
खूप हाका मारल्या, जीव तोडून
आई, आई मी आलोय,
कुठे आहेस तू आई ?

पण आईचा कुठेच आवाज आला नाही.
त्याच्या हाकेला प्रतिसाद नाही.
त्याच्याच आवाजाचा आता प्रतिध्वनी येत होता.
सभोवताली फक्त जंगल होते.
जंगल कसले , निष्पर्ण झालेली झाडे.
राखेचे काळे ढीग आणि गरम निखारे.
खूप ओरडला, फिरला इकडे तिकडे
पण हरवलं होतं घर .
होती जळालेली लाकडे.
आणि डोळ्यांतल्या अश्रूंबरोबर
साठवलेल्या आईच्या आठवणी.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

देवघरातील निरांजने…

बेहड्याची खरी ओळख ही भेळा म्हणूनच…

आयुर्वेदातील वैद्यांना वनसंवर्धनाची सक्ती करण्याची गरज

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading