महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने महाराष्ट्र हिरक महोत्सव व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे. यामध्ये महाराष्ट्रातील बदललेली शेती यावर कृषितज्ज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक यांनी अनमोल विचार मांडले. त्यातील काही मुद्दे…
महाराष्ट्र हे देशातील शेतीचे महत्त्वाचे राज्य आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या सुरवातीच्या काळात शेतीचे उत्पादन वाढविण्यावर अधिक भर दिला गेला होता. ‘अधिक धान्य पिकवा’ असा त्यावेळचा नारा होता. त्याच काळात कोयना धरण झाले. पण त्यावेळची शेतीही जनावरांच्या मदतीने केली जात होती. पिकाच्या पेरण्या या टोकण पद्धतीने केल्या जात होत्या. मोटेचा वापर पिकांना पाणी देण्यासाठी केला जात होता. त्यावेळी मिश्रपिक पद्धती होती. एका पिकाचा दुसरा पिकाला फायदा होता अशी त्यावेळी शेती होती.
शेतीमधील विविध क्षेत्रात क्रांती
1960 मध्ये महाराष्ट्राची निर्मिती झाली. त्यावेळी ‘अधिक धान्य पिकवा’ वरून देश यांत्रिकिकरणाकडे वळला. डिझेलचे पंप आले, ट्रॅक्टरचा वापर शेतीसाठी होऊ लागला. १९६६-६७ च्या कालावधीत विल्यम गॅड यांनी हरितक्रांती हा शब्द प्रथम वापरला. संकरीत धान्य पिकवण्याची पद्धतही याच कालावधीत विकसित झाली. हरितक्रांती सोबत १९७१ च्या सुमारास धवलक्रांती आली. यामध्ये दुधाच्या उत्पादनावर भर देण्यात आला. त्यानंतर नीलक्रांती आली. माशांच्या उत्पादनावर भर देण्यात आला. बदलत्या शेतीमध्ये त्यानंतर फळे, फुले यांच्या उत्पादनावर भर देण्यात आला. ‘फळा फुलांची सप्तरंगी क्रांती’ राज्यात झाली.
१९९० ला खुल्या अर्थ व्यवस्थेचा स्वीकार करण्यात आला. त्यानंतर १९९४ मध्ये जागतिकीकरण झाले. खुल्या शेतीच्या ठिकाणी हरितगृहे उभारली जाऊ लागली. निर्यात कम शेती ही पद्धतही विकसित झाली.
पूर्वीच्या काळी रस्ते नव्हते. शेताकडे जाताना काट्या कुट्यातून जावे लागत असे. आता शेतीत काय बदल झाला असे म्हणाल तर काट्या कुट्याच्या शेतीतून काटेकोर शेती आली.
डाॅ. बुधाजीराव मुळीक
शेती न समजणारे ठरवतात धोरणे
हवामान बदल विचार होऊन शेती केली जात आहे, ड्रोनचा वापर, आयटीचे तंत्र वापरुन आता शेती केली जात आहे. घरात फरशी आली तशी शेतात संकरित धान्ये आली. रासायनिक खतांचा वापर वाढला. महाराष्ट्रात सर्व पिके पिकू लागली, ग्राहकाला काय हवे आहे ते विचारात घेऊन उत्पादने होऊ लागली. पण शेतीवर आक्रमण झाले ते आौद्योगिकरणाचे झाले, शहरीकरणाचे, जंगल तोडीमुळे आक्रमण झाले. जंगली जनावरे गावात आली. जैवविविधता धोक्यात आली आहे. ज्याला शेती कमी कळते त्याचा शासकीय धोरणे ठरवण्यामध्ये सहभाग वाढला. शेती न समजणारे बँकेचे अधिकारी शेतकऱ्याला किती कर्ज किती द्यायचे हे ठरवतात.
पूर्वीच्या काळी शेतीमध्ये पाण्याचा वापर होता ते पाणी शुद्ध होते. शेतामध्ये पाटाने पाणी दिले जात होते. त्या पाटातील पाणी पिण्यासाठी योग्य होते. प्रदुषण कमी होते. आता मात्र पिकांना देण्यात येणारे पाणी थेट पिणे शक्य होत नाही. कारण नदी, नाल्यांचे पाणी प्रदुषित झाले आहे. हा मोठा बदल झाला आहे. रोग आणि किडीच्या नियंत्रणासाठी फवारणी कधीच केली जात नव्हती. हे विचारात घेण्याची गरज आहे. औद्योगिक प्रदुषणामुळे महाराष्ट्र आणि देशातील पंधरा टक्के अन्नधान्य उत्पादन घटले आहे. असा अहवाल संशोधकांनी दिला आहे. मग त्याची नुकसान भरपाई दिली जाते का ?
डाॅ. बुधाजीराव मुळीक
पुन्हा सेंद्रिय शेतीकडे
विदर्भाला धान्याचे कोठार म्हटले जायचे. अख्या भारताला खाद्य पुरवू शकतील इतके धान्य विदर्भ, मराठवाड्यात पिकवले जात होते. पण आता पाऊसच नसल्याने समस्या निर्माण झाल्या आहेत. कापूस पिकवला जात आहे. आता पुन्हा मात्र शेतकरी रासायनिक शेतीकडून सेंद्रिय शेतीकडे वळले आहेत. गावठी कोंबडीच्या पालनाकडे वळले आहेत. कारण त्यालाच चव आहे.
शहरातील जैविक कचऱ्याचे खत शेतात येण्याची आता गरज आहे.
डॉ. बुधाजीराव मुळीक
शेतीवर अर्थव्यवस्था आहे. त्यामुळे जपान व परदेशात शेतीला सरकार विमा, अनुदान देते. शेतीमुळे हवा शुद्ध होते. शेतकरी कोणत्याही परिस्थितीत असला तरी सर्वाधिक रोजगार निर्मिती शेतीमुळे होते आहे. शेतीत विकासाची बेटे झाले आहेत. शेती हीच कोरोनामुळे वाचवू शकेल.