May 23, 2024
Do not Ignore women support in life Vishwas Deshpande article
मुक्त संवाद

देवघरातील निरांजने…

सहधर्मचारिणी हा शब्द किती छान आहे …! . बायको, पत्नी, सखी, मैत्रीण, प्रेयसी हे सगळे वेगवेगळे अर्थ आणि अर्थाचे वेगवेगळे पदर असणारे शब्द. पण लग्न झाल्यानंतर ज्या काही सगळ्या गोष्टी करायच्या, त्या सगळ्या गोष्टींचे धर्म हे अधिष्ठान असले पाहिजे.

विश्वास देशपांडे, चाळीसगाव

परवाच्या दिवशी सकाळी बागेमध्ये फिरत असताना मी आणि माझ्या मित्रांमध्ये पती पत्नी परस्परांना अनुकूल असले म्हणजे जीवनात ते किती प्रगती करू शकतात याची चर्चा सुरु होती. एकमेकांना समजून घेणे, साथ देणे आणि आपल्या पतीच्या किंवा पत्नीच्या कार्यात शक्य होईल तेवढे सहकार्य करणे ही खऱ्या अर्थाने दोघांची जबाबदारी असते. सगळ्यांनाच असा लाईफ पार्टनर मिळतो असं नाही. असा जोडीदार लाभणे ही खरं म्हणजे भाग्याचीच गोष्ट. पण तरीही काही स्त्रिया किंवा काही पुरुष असे असतात, की जे आपला जोडीदार त्यांच्या अपेक्षेप्रमाणे नसला, तरी त्याला सांभाळून घेतात. अशा समजदार जोडप्यांचा संसार सुखाचा होतो.

ज्या स्त्रियांनी आपल्या पतीला त्याच्या कार्यात पूर्णपणे साथ दिली, त्यांचे पती सामाजिक जीवनात खूप मोठे कार्य करू शकले. राजकारण आणि सामाजिक जीवनात ज्यांनी मोठे काम केले त्यांच्या मागे त्यांची पत्नी, सहधर्मचारिणी खंबीरपणे उभी होती. याउलट अशाही काही पतिपत्नींच्या जोड्या आहेत की ज्यात पतीने आपल्या पत्नीच्या कर्तृत्वाला वाव दिला, म्हणून त्या मोठे कार्य करू शकल्या. किरण बेदी, सुधा मूर्ती, मेरी कोम ही त्यापैकी काही उदाहरणे. आणि ज्यांनी समाजजीवनात एकमेकांच्या सहकार्याने अद्वितीय कार्य केले आहे अशा आदरणीय पतिपत्नींच्या जोड्या भरपूर आहेत. महात्मा गांधी आणि कस्तुरबा, ज्योतिबा आणि सावित्रीबाई, बाबा आमटे आणि साधनाताई. यांनी परस्परांना सांभाळून घेतले नसते तर सामाजिक जीवनात एवढे मोठे कार्य करणे या दोघांपैकी कोणालाही शक्य झाले नसते.

‘ दिव्यत्वाची प्रचिती ‘

विविध क्षेत्रात कर्तृत्व गाजवणाऱ्या थोर स्त्रियांची अनेक उदाहरणे या ठिकाणी देता येतील. पण आज मी ती टाळतो आहे. कारण मला आजच्या या माझ्या लेखात रोज आपल्या अवतीभवती वावरणाऱ्या आणि आपल्या कष्टाने, त्यागाने आपलं घर, संसार ऑफिस सांभाळणाऱ्या स्त्रियांची दखल घ्यावीशी वाटते. त्यांचा त्याग अक्षरशः प्रचंड असतो. ‘ दिव्यत्वाची प्रचिती ‘ त्यांच्या बाबतीतही आपल्याला येते. अशा कर्तृत्वान स्त्रियांची कितीतरी उदाहरणे आपल्या आजूबाजूला आपण डोळे उघडून पाहिले तर सहज दिसतील. कोणाच्या पतीचे दुकान किंवा काही व्यवसाय असतो. कोणाची दिवसभर बाहेर नोकरी असते. कोणी बाहेरगावी नोकरीस असतो. कोणी सैन्यात असतो. अशा वेळी त्याच्या अनुपस्थितीत घराची जबाबदारी समर्थपणे पेलते ती त्याची सहधर्मचारिणी. कधी कधी जोडीदाराचा व्यवसाय देखील घरासोबतच सांभाळून घेते ती सहधर्मचारिणी. कधी कधी दोघे मिळून एकाच ठिकाणी काम करतात आणि संसारही सांभाळतात. पण तरीही मुलांकडे विशेष लक्ष देते, घराकडे लक्ष देते ती सहधर्मचारिणी.

सहधर्मचारिणी

सहधर्मचारिणी हा शब्द किती छान आहे …! . बायको, पत्नी, सखी, मैत्रीण, प्रेयसी हे सगळे वेगवेगळे अर्थ आणि अर्थाचे वेगवेगळे पदर असणारे शब्द. पण लग्न झाल्यानंतर ज्या काही सगळ्या गोष्टी करायच्या, त्या सगळ्या गोष्टींचे धर्म हे अधिष्ठान असले पाहिजे. इथे धर्म हा शब्द रूढ अर्थाने मी वापरत नाही. धर्म म्हणजे आपल्या रोजच्या जीवनात ज्या काही गोष्टी आपण करू, जी काही जीवनपद्धती असेल त्याप्रमाणे वागू, रीतिरिवाज, संस्कार, नियम, परंपरा पाळू, त्या सगळ्या समाजमान्य असलेल्या गोष्टी. आणि या सगळी गोष्टीत जिची साथ असते ती सहधर्मचारिणी.

संसारात यामुळेच रंगत

स्त्रीचा आपल्या घरासाठी, आपल्या मुलांसाठी त्यांचा त्याग मोठा असतो. आपल्या जोडीदाराच्या लहरी, त्याचे गुणदोष सांभाळून घ्यावे लागतात.. त्याशिवाय संसार यशस्वी होत नाही. यात स्त्रियांचे जसे योगदान असते, तसे पुरुष मंडळींचेही असते. असे ज्या घरात दोघे एकमेकांना सांभाळून घेतात, एकमेकांच्या आवडीनिवडी जपतात, ते घर हसते खेळते राहते. थोडीफार भांडणे, कुरबुर कुठे नसते ! त्याशिवाय संसाराला मजाही नाही. जेवणामध्ये चटणी, लोणचे तोंडी लावायला हवेच असते. त्याशिवाय थोडीच चव येते !

स्त्रीची रुपे

स्त्रीची अनेक रूपे आहेत. आई, बहीण, पत्नी, प्रेयसी, सखी, मैत्रीण. ती कधी कोणाची काकू, कोणाची मावशी, कोणाची मामी तर कोणाची आत्या असते. प्रत्येकवेळी भूमिका वेगवेगळी. पण या सगळ्या भूमिका ती मोठ्या कौशल्याने पार पाडते. यासाठी तिच्यामध्ये असलेल्या प्रेम, क्षमा, धैर्य, प्रसंगावधान इ गुणांचा मोठा उपयोग होतो. त्यासाठी बऱ्याच वेळा तिला स्वतःच्या आवडीनिवडीना मुरड घालावी लागते. तिच्या सहनशीलतेची जीवन जणू परीक्षा पाहत असते. तिच्या त्यागावर घर उभे असते. याचा अर्थ असा नाही की पुरुषाचा आपल्या घरासाठी त्याग नसतो. तोही शक्य तेवढे करतच असतो. पण स्त्रीचा घरासाठी असलेला त्याग त्याच्या एक पाऊल पुढे नक्कीच असतो.

घर दोघांचे, संसार दोघांचा

बऱ्याच वेळा शक्य असेल तेव्हा बाबा मुलांना शाळेत सोडायला जातो. पण जेव्हा बाबाला हे शक्य नसेल, तेव्हा आजची आई राणी लक्ष्मीबाईसारखी मुलाला पाठीशी घेऊन शाळेत सोडायला जाते, घ्यायला जाते. तीही आपली कामे सांभाळून. कधी कधी शाळेत पालक सभा असते. अशा वेळी त्या सभेला आईच पालक म्हणून जाते कारण बाबांना वेळ नसतो. घरी मुलांचा अभ्यास घेणे, त्यांना हवे नको ते पाहणे या गोष्टीदेखील जणू तिचीच जबाबदारी. या सगळ्या गोष्टी करता करता तिची प्रचंड दमणूक होत असते. ती शारीरिक आणि मानसिक दृष्ट्याही थकते . अशा वेळी तिला हवे असतात ते प्रेमाचे दोन शब्द. पतीचे आणि मुलांचे. ‘ तू किती करतेस आमच्यासाठी ..! ‘ या शब्दांसाठी जणू ती आसुसलेली असते. ते शब्द जणू तिच्यावर जादू करतात आणि ती नवीन उत्साहाने कामाला लागते. कधी कधी आपल्याला फिरायला घेऊन जावे अशीही तिची अपेक्षा असते. आणि या तिच्या अपेक्षा तिच्या जोडीदाराने पूर्ण करणे, तिला आनंदी ठेवणे ही त्याचीही जबाबदारी असते . कारण घर दोघांचे असते. संसार दोघांचा असतो.

आवडणारे स्त्रीचे रुप

स्त्रीची आई, बहीण, प्रेयसी, सखी, मैत्रीण, गृहिणी ही सगळीच रूपे तशी विलोभनीय.पण मला सर्वात जास्त आवडणारे स्त्रीचे रूप म्हणजे आईचे. या नात्याची तुलनाच होऊ शकत नाही. मनुष्यच काय सृष्टीतील अवघ्या प्राणिमात्रांमध्ये आईचे हे वात्सल्य आपल्याला अनुभवास येते. या अर्थाने आईचे हे रूप वैश्विक आहे. म्हणूनच या विश्वमाता रुपाला मनःपूर्वक सलाम. स्त्री असते म्हणून घराचे घरपण टिकून असते. आई असते घरातील प्रकाश. घरातील चैतन्य. देवघर उजळणारी निरांजन .

Related posts

अग्निपरीक्षा नेहमी सितेलाच का ?

सौभाग्य व ती….

वाघीणच ती…

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406