राजेशाही वैभवाचा वारसा, वास्तुकलेचा अनोखा आविष्कार आणि साडेतीन लाखांहून अधिक पुस्तकांचा ज्ञानखजिना जपणारे वडोदऱ्यातील सेंट्रल लायब्ररी हे केवळ ग्रंथालय नाही, तर महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या दूरदृष्टीचे जिवंत प्रतीक आहे. विजेची सोय नसलेल्या काळातही सूर्यप्रकाश पुस्तकांपर्यंत पोहोचावा, यासाठी केलेली बेल्जियम काचेची वैशिष्ट्यपूर्ण रचना, भूकंपालाही तोंड देणारे मजबूत पुस्तकांचे रॅक आणि भारतीय संविधानासह दुर्मीळ ग्रंथांचा अमूल्य ठेवा यामुळे हे ग्रंथालय इतिहास, स्थापत्यकला आणि ज्ञानपरंपरेचा अद्भुत संगम ठरते.
मानसी म्हसकर, भावेश धोंडे
वडोदरा (गुजरात) येथील मांडवी भागात असलेली सेंट्रल लायब्ररी (केंद्रीय पुस्तकालय)ही भारतातील सर्वात जुन्या आणि ऐतिहासिक सार्वजनिक ग्रंथालयांपैकी एक आहे. हे ग्रंथालय बडोद्याचे दूरदर्शी महाराज सयाजीराव गायकवाड तिसरे यांच्या ऐतिहासिक सार्वजनिक ग्रंथालय चळवळीचे मुख्य केंद्र होते.या ग्रंथालयाची स्थापना १९१० मध्ये महाराजा सयाजीराव गायकवाड तिसरे यांनी केली.
- शाही वारसा: सुरुवातीला हे ग्रंथालय लक्ष्मी विलास पॅलेसमध्ये महाराजांचे वैयक्तिक पुस्तकालय होते. महाराजांनी स्वतःच्या संग्रहातील सुमारे २०,००० पुस्तके या ग्रंथालयाला दान केली होती. नंतर ते मांडवी येथील सरकारवाडा समोरील सध्याच्या भव्य इमारतीत स्थलांतरित करण्यात आले.
- रचना: या चार मजली इमारतीची रचना अमेरिकन ग्रंथपाल विल्यम ॲलान्सन बॉर्डन आणि प्रख्यात ब्रिटिश वास्तुशिल्पकार सर एडविन लुटियन्स यांनी मिळून केली होती.
- बेल्जियम काचेचे मजले: या लायब्ररीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे याच्या वरच्या ३ मजल्यांवर २ इंचाची आयात केलेली बेल्जियम काच (Belgian Glass) बसवली आहे. ज्या काळात विजेची सोय नव्हती, त्या काळात सूर्यप्रकाश खालच्या मजल्यांपर्यंत पोहोचावा या उद्देशाने ही पारदर्शक काचेची रचना करण्यात आली होती.
- मजबूत बांधकाम: यात अमेरिकेतून मागवलेले ३५० हून अधिक वैशिष्ट्यपूर्ण स्टील रॅक (Steel Racks) आहेत. २००१ मधील गुजरातच्या भीषण भूकंपातही या रॅकमधून एकही पुस्तक खाली पडले नव्हते
- पुस्तकांची संख्या: या ग्रंथालयात सध्या ३.५ लाखांपेक्षा जास्त पुस्तके उपलब्ध आहेत.
- बहुभाषिक संग्रह: येथे गुजराती, इंग्रजी, मराठी, हिंदी, उर्दू आणि सिंधी अशा ६ भाषांमधील पुस्तकांचा खजिना आहे.
- दुर्मीळ दस्तऐवज: येथे भारताच्या मूळ संविधानाची (Indian Constitution) एक प्रत आहे, ज्यावर खासदारांच्या मूळ स्वाक्षऱ्या आहेत. याशिवाय, २ फूट लांब असलेले ‘एम्प्रेस ऑफ इंडिया मेमोरियल व्हॉल्यूम’ हे सर्वात मोठे पुस्तक आणि अवघ्या काही इंचांचे ७३ मिनी (लहान) पुस्तकांचे कॅबिनेट देखील येथे जपून ठेवले आहे.
