September 16, 2024
Workshop organized by NIO in Mumbai on marine toxins
Home » विविध सागरी जीवांमध्ये असलेले विष हा सक्रीय जैविक संयुग बनवण्यासाठी उत्तम स्रोत
काय चाललयं अवतीभवती

विविध सागरी जीवांमध्ये असलेले विष हा सक्रीय जैविक संयुग बनवण्यासाठी उत्तम स्रोत

समुद्री विषाबाबत ‘एनआयओ’कडून मुंबईत कार्यशाळेचे आयोजन

पणजी – सीएसआयआर – नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी (सीएसआयआर-एनआयओ), गोवा आणि हिंदी विद्या प्रचार समितीचे रामनिरंजन झुनझुनवाला महाविद्यालय, घाटकोपर, मुंबई यांच्या सहयोगाने ‘हार्नेसिंग द पॉवर ऑफ मरीन वेनम  – रिसर्च अँड आउटरीच’ अर्थात ‘समुद्री विषाच्या शक्तीचा वापर – संशोधन आणि प्रचार’ या कार्यशाळेचे आयोजन मुंबईत करण्यात आले होते. ‘सीएसआयआर’च्या सागरी जीवांमधील जैवविविधता आणि रासायनिक विविधता यासंदर्भातील प्रकल्पाच्या आर्थिक पाठबळातून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यशाळेचे समन्वयन ‘सीएसआयआर-एनआयओ’तील केमिकल ओशनोग्राफी विभाग प्रमुख व वरिष्ठ प्रमुख वैज्ञानिक डॉ. नरसिंह एल. ठाकूर यांनी केले.

वैज्ञानिक संशोधन आणि सार्वजनिक सुरक्षा या दोहोंतील महत्त्वपूर्ण प्रगती कार्यशाळेत मांडण्यात आली. विषारी समुद्री जीवांची ओळख आणि समुद्री जीवांचे संवर्धन करताना त्यांच्या विषापासून असलेल्या धोक्याला सामोरे जाण्याचे मार्ग यांवर कार्यशाळेचा भर होता. समुद्री विषाबाबत संशोधनाचे वाढते महत्त्व अधोरेखित करताना समुद्री जैवविविधता आणि किनारी भागातील लोकसमुदायांच्या हितरक्षणाकडे लक्ष वेधण्याचे काम या कार्यशाळेने केले. जेलीफिश, सी-अॅनिमोनिज्, कोन-स्नेल्स आदी विविध सागरी जीवांमध्ये असलेले विष हा सक्रीय जैविक संयुग बनवण्यासाठी उत्तम स्रोत असून त्यांचा औषध निर्मिती, जैवतंत्रज्ञान आणि पर्यावरण संरक्षणासाठी वापर करणे शक्य आहे.

पारंपरिक दीपप्रज्वलन आणि प्रार्थनेने कार्यशाळेला सुरुवात झाली. यावेळी झुनझुनवाला महाविद्यालयाच्या संचालक डॉ. उषा मुकुंदन यांनी सामाजिक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सहयोगाने संशोधनाचे महत्त्व मांडले. महाविद्यालयाचे मुख्याध्यापक डॉ. हिमांशु दावडा यांनी उपस्थितांचे स्वागत केले. उद्घाटनाचे भाषण ‘सीएसआयआर-एनआयओ’तील वरिष्ठ वैज्ञानिक डॉ. मंदार नानजकर यांनी केले तर डॉ. नरसिंह ठाकूर यांनी कार्यशाळेचा कार्यक्रम मांडला.

कार्यशाळेला प्राणिशास्त्र विभागाच्या प्रमुख सानिका गुप्ते, आयोजन सचिव डॉ. गीता जोशी उपस्थित होत्या. शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत, वैज्ञानिक, संशोधक, पदव्युत्तर विद्यार्थी आदी विविध गटांतील सुमारे 150 जण कार्यशाळेत सहभागी झाले.

डॉ. नरसिंह एल. ठाकूर यांनी सागरी विषारी जीवांमधील जैवविविधता आणि रासायनिकविविधता याविषयी व्याख्यान दिले. सीएसआयआर-एनआयओतील वैज्ञानिक डॉ. कल्याण डे आणि डॉ. मंदार नानजकर यांनी विषारी समुद्री जीव ओळखण्याबाबत परस्परसंवादी सत्र घेतले.‘मरीन लाईफ ऑफ मुंबई’चे सहसंस्थापक प्रदीप पाताडे यांनी मुंबई किनारपट्टीतील विषारी समुद्री जीवांविषयी सत्र घेतले. सागरी रीबन वर्म्सच्या विषाबाबत अभ्यासपूर्ण सत्र बेल्जियममधील के.यू. लुवेन संशोधन संस्थेतील प्रा. जन त्यत्गत यांनी दूरदृश्य माध्यमातून घेतले.

सीएसआयआर-एनआयओच्या चमूसह परस्परसंवादी सत्राचे नेतृत्व प्रमुख तांत्रिक अधिकारी वेंकट कृष्णमूर्ती यांनी केले आणि सूत्रसंचालन डॉ. गीता जोशी यांनी केले. या सत्राद्वारे सहभागींना सीएसआयआर-एनआयओमधील शैक्षणिक आणि संशोधनाच्या संधींविषयी माहिती घेता आली.

निरोपाच्या सत्राने कार्यशाळेची सांगता झाली. या सत्रात सहभागींनी कार्यशाळेत प्राप्त केलेली माहिती आणि अनुभवाबाबत मनोगत मांडले.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

स्व च्या ओळखीनंतर भय कसले ?

राजा अन् नवाब फुलपाखरे…

झाडीबोली शब्दकोश निमित्ताने….

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading