March 25, 2023
dada-madhavnath-maharaj-sangawadekar-memory-article-by-rajendra-ghorpade
Home » संशोधक अन् संस्कृती संवर्धक दादा माधवनाथ
विश्वाचे आर्त

संशोधक अन् संस्कृती संवर्धक दादा माधवनाथ

सदगुरु दादा माधवनाथ महाराज सांगवडेकर यांची आज पुण्यतिथी. त्यानिमित्ताने…

राजेंद्र कृष्णराव घोरपडे
मोबाईल – 9011087406

साधक हा मुळात संशोधक असतो. त्याच्यात संशोधकवृत्ती नसेल तर तो कधीही अध्यात्मात प्रगती करू शकत नाही. कारण अध्यात्मात संशोधन हे स्वतःपासून करायचे असते. मी कोण आहे ? याचा शोध प्रत्येक साधकाने घ्यायचा असतो. स्वतःची ओळख स्वतःला झाली तरच आपण अध्यात्मात प्रगती साधू शकतो. अध्यात्माच्या विविध पायऱ्यावर प्रगती करतानाही संशोधकवृत्ती सदैव ठेवायला हवी तरच आपण संजिवन समाधीच्या स्थितीपर्यंत पोहोचू शकतो. असाच ध्यास घेऊन सद्गुरु दादा माधनवाथ महाराज सांगवडेकर यांनी संपूर्ण जीवनभर अध्यात्माच्या क्षेत्रात संशोधन केले. मी कोण आहे ? यापासून दादांची झालेली सुरुवात सोहम साधनेचा प्रसार करणारे सद्गुरु रामचंद्र महाराज तिकोटकर यांच्या सानिध्यातून संजिवन समाधीमध्ये झाली.

मी कोण आहे ? या शोधातच त्यांना सद्गुरु गोविंदनाथ महाराज यांच्याकृपेने ब्रह्मज्ञानाचा ठेवा मिळाला. अनेक संत हे ब्रह्मज्ञानी, आत्मज्ञानी होतात. अन् स्वतःचा नावलौकिक मिळवण्याच्या मागे लागतात. पण दादांनी असे कधी केले नाही. सदैव त्यांनी संप्रदायाचा अभ्यास करण्यावर, संप्रदायाचा शोध घेण्यावर भर दिला. संशोधनातूनच त्यांनी संप्रदायामध्ये खंडीत झालेली ज्ञानेश्वरी परंपरा कशी पुन्हा उदयाला आली याचा शोध घेतला. अध्यात्मात दृष्टांतांना खूप महत्त्व आहे. हे दृष्टांत कसे पडतात. त्यानुसार शोध कसे घ्यायचे. याचाच ध्यास दादांना नित्य लागलेला असायचा. दादांनी गुरु संप्रदाय, नाथ परंपरेचा सखोल अभ्यास केला. त्यामध्ये संशोधन केले. यातूनच त्यांनी संजिवन समाधी साधली.

स्वतःचा स्वतःवर विश्वास असेल तर सर्व काही साध्य करता येऊ शकते हा विचार सदैव डोक्यात ठेऊन दादांनी कार्य केले. यामुळेच त्यांनी दृष्टांतांच्या आधारावर देवनाथ महाराज यांच्या संजिवन समाधीचा शोध घेतला. त्यांची पैठण येथील समाधी शोधून काढली. हे देवनाथ कोण ? हा प्रश्न निश्चितच सर्वांना पडला असेल. संत ज्ञानेश्वर महाराज बाराव्या शतकात होऊन गेले. त्यानंतर ज्ञानेश्वरांची पताका महाराष्ट्रात अनेकांनी हाती घेतली. ज्ञानेश्वरांची आत्मज्ञानाची परंपरा पुढे नेणारे अनेक संत पुढे होऊन गेले. आजही त्यांची परंपरा महाराष्ट्रात पाहायला मिळते. पण देवनाथ महाराज यांनी पंधराव्या शतकात साधनेतून सिद्धी प्राप्त करून घेऊन ज्ञानेश्वरीच्या परंपरेची एक नवी साखळी पुन्हा उभी केली. यामध्ये पुढे चुडामणी, गुंडामहाराज देगलूरकर, रामचंद्र महाराज तिकोटेकर, विश्वनाथ महाराज रुकडीकर, स्वामी स्वरुपानंद (पावस) असे अनेक थोर संत झाले. त्याच परंपरेची धुरा दादा माधवनाथ यांनी पुढे सांभाळली. पण त्यांनी ही परंपरा साधनेतून अभ्यासली. त्यावर सखोल संशोधन केले.

देवनाथ महाराज यांच्या समाधीचा शोध घेण्यासाठी त्यांनी या परंपरेतील सर्व संताच्या ठिकाणी जाऊन सामुदायिक ज्ञानेश्वरीची पारायणे केली. यातून स्वतःच्या शिष्यगणांचाही अध्यात्मिक विकास साधण्याचा प्रयत्न केला. पारायणातून त्यांनी मराठीच्या या नगरीत भाषा संवर्धनाचे ही मोठे कार्य केले. ज्ञानेश्वरीची पताका महाराष्ट्रात सदैव फडफडत राहावी यासाठी त्यांनी या बिजाचे संवर्धन केले. ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेला अमरत्व प्राप्त करून दिले आहे. हे अमरत्व, ही संजिवनी नेहमी जीवंत ठेवण्यासाठी ज्ञानेश्वरीच्या पारायणाची आवश्यकता आहे. पारायणातून पडणारे जीवन अमृत पुन्हा हा वृक्ष वाढवत ठेवतो हे ओळखून त्यांनी शिष्यांमध्ये ज्ञानेश्वरीचे बीज रोवले.

दादा शिष्यांना अनुग्रह हे पटकण कधीच देत नसत. त्या शिष्याची पात्रता ते अभ्यासत असत. शिष्यामध्ये सर्वप्रथम ते ज्ञानेश्वरीचे बीज रोवत. ते बीज कसे फुलेल यासाठी ते प्रयत्न करत. त्याची वाढ कशी होत आहे हे ओळखून मगच ते शिष्यांना अनुग्रह देत असत. म्हणजेच शिष्यामध्येही संशोधनाची वृत्ती ते निर्माण करत. शिष्याने सुद्धा अभ्यास करावा यासाठी त्याला ते प्रोत्साहित करत. शिष्यांनी सुद्धा अध्यात्माचे संशोधन करावे असा त्यांचा प्रयत्न असे. ज्ञानेश्वरी हा अनुभवण्याचा ग्रंथ आहे. अनुभवातून शिकण्याचा ग्रंथ आहे. आलेल्या अनुभवातून, अनुभूतीतून अध्यात्मिक प्रगती साधावी असाच दादांचा नित्य प्रयत्न असे. शोध म्हणजे सापडेल. हाच त्यांचा आशिर्वाद निश्चितच आत्मज्ञानाच्या परंपरेची ही ज्योत कायम तेवत ठेवणार आहे.

Related posts

जीवनातील पाण्याचे महत्त्व ओळखून व्यवस्थापन करण्याची गरज

भेटीलागी जीवा…चा आनंद

तेही एक एक आघवे । चित्रिचे सिंहाडे मानावे । जैसे बोलोनि हाते घ्यावे । पुसोनियां ।। ( एकतरी ओवी अनुभवावी )

Leave a Comment