प्रकाश या अत्यंत हुशार असणाऱ्या मित्राचे पुढे काय झालं या आठवणीने लेखकाचा जीव व्याकुळ होतो. याउलट वर्गात ढ असणारा भीमा मात्र अंगच्या हुशारीने जनावराचा व्यापार करतो, आपल्या मुलांना उच्च शिक्षण देतो, वेगवेगळ्या चळवळीत भाग घेतो. एक दिवस अचानक वृत्तपत्रात बाळासाहेब आंबेडकरांच्या शेजारी त्याचा फोटो येतो आणि लेखकाला लहानपणीचा भीमा आठवत जातो.
स. ना. जोशी, नांदेड
॥ लेखकाविषयीची उत्सुकता शमवणारे पुस्तक ॥
कुठलाही कलाकार, साहित्यिक, कवी, कादंबरीकार जेंव्हा आपल्याला आवडायला लागतो तेव्हा त्याच्या घराबद्दल, त्याच्या जवळच्या माणसाबद्दल एक नैसर्गिक कुतुहल निर्माण होते. रत्नागिरीच्या मुक्कामात सहकुटुंब गणपतीपुळ्याला गेलो होतो. जवळच मालगुंड हे केशवसुतांचे गाव आहे. केशवसुतांचं घर, गाव पाहताना “गोष्टी घराकडील मी वदता गड्या रे” ही कविता आठवल्याशिवाय राहणार नाही. माझी मुलगी अनुजा हीणे तर, “एक तुतारी द्या मज आणुनी” मोठ्याने गायला सुरुवात केली. सगळेच एका वेगळ्या विश्वात गेलो. साहित्यिक जेव्हा साहित्य निर्माण करतो, तो त्याच्या अनुभूतीचा भाग असला तरी वाचकाने त्याचा त्याच्या खाजगी जीवनाशी संबंध जोडला तर फसगत होण्याची शक्यता असते. ललित लेखाच्या बाबतीत लेखक निश्चित पणे अनुभवाशी प्रामाणिक असतो.
कवी म्हणून इंद्रजीत भालेराव यांचा खूप मोठा नावलौकिक आहे. पण तेवढ्याच ताकदीने त्यांनी ललित गद्य लिहिले आहे. “गायी घरा आल्या ” हे त्यांचं पहिलं ललितगद्यलेखन मोठ्या प्रमाणावर गाजलं. लळा आणि नाद यांनाही अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. “माझा गाव माझी माणसे” हे त्यांचे ललितगद्याचे चौथे पुस्तक आहे. पन्नास वर्षांपूर्वीचा गाव समजून घेण्यासाठी यातील ललितलेख अत्यंत उपयुक्त आहेत. ज्या गावात रस्ता नव्हता, एकाच खोलीत शाळा भरायची, गावात सहा जाती शिवाय सातवी जात नव्हती, शाळेला शेजेगावला जावं लागायचं, अजून विजेचे दिवे ही आले नव्हते असा कंदील चिमण्यांच्या काळातला गांव. कमी गरजा असणाऱ्या विरक्त अशा खेड्याची, खेड्यातील माणसांची ओळख या सर्व लेखांमधून होते. ज्या गावातून लेखक निघाले, तिथे आधुनिक असे काहीच नव्हते. आधुनिकतेचा स्पर्श नसणारा हा सोवळा गाव.
लेखक स्वतःबद्दल सांगतात “गावातल्या चांभारानं शिवलेलं पायतन घालून, गावातल्या टेलरने शिवलेले कपडे नेसून आणि गावातल्या वारकानं केलेली केसाची कटिंग घेऊन जेव्हा मी शहरातल्या शाळेत आलो… सगळ्यांनी मला चिडवलं.. हिणवलं….मला खूप वाईट वाटलं!” मग शहरातील नवीन दोस्तांना गाव समजून देण्यासाठी त्यांनी “गावाकडं चल माझ्या दोस्ता” ही लोकप्रिय कविता लिहिली. “कशी उन्हात उन्हात तळतात माणसं, कशी मातीत मातीत मळतात माणसं” हे गावातलं वास्तव जीवन कवितेतून समोर आलं अशा अनेक कवितांचे मूळ संदर्भ इथल्या विविध लेखातून आलेले आहेत. भालेरावांची कविता समजून घेण्यासाठी हे लेखन उपयुक्त ठरते.
” मुलुख माझा ” हा दीर्घ कवितांचा अत्यंत गेय असा कवितासंग्रह मला तो एवढा आवडला होता की, मी लगेच सरांना भारावून फोन लावला व प्रतिक्रिया दिली. त्या वेळी मी प्रजावाणीमध्ये शिदापाणी हे सदर लिहीत होतो. या सदरामध्ये मुलुख माझा वर एक लेखही लिहिला होता. या कवितेतील संदर्भाचे तपशील एका स्वतंत्र लेखात आलेले आहेत. मराठवाड्यातील राहणीमान, खानपान, स्वभाव, इतिहास, परंपरा, प्रसिद्ध ठिकाणे.. वारंग्याच्या खिचडीपासून ते सेलूचा चना, गंगाखेडची कलम या लेखात आलेली आहे. साहित्यिक, चित्रकार, गायक यांचे मोठेपण या लेखात आहे. अतिशय लालित्यपूर्ण असा हा लेख आहे.
सरांचे गाव जरी रिधोरा असले तरी त्यांचे पुढील आयुष्य परभणी मध्येच व्यतीत झालेले आहे. “शहर ए परभणी” या लेखामध्ये परभणीबद्दलचे भाव व्यक्त झाले आहेत. परभणी मध्ये राहणाऱ्या माणसाला परभणी सोडवत नाही… तसं पाहिलं तर परभणीत आलेल्या पाहुण्यांना काय दाखवावं हा प्रश्न पडतो. पण सरांनी परभणीचे वर्णन प्रतिमायुक्त केले आहे. या लेखात आलेला अनंतराव भालेराव यांच्या परभणीवरील लेखातील पुढील उतारा मला फार आवडला, “परभणी म्हटले की माझ्यासमोर घोगऱ्या आवाजातला छातीवर केसाचे जाळे असलेला उघडाबंब आणि भरदार शरीराचा खानदानी म्हातारा उभा राहतो. तो आपलं तुपलं मानत नाही. त्याच्या पोटात एक ओठात एक नसतं. हसायचं तर सात मजली, रडायचं तर असमांतला गदागदा हलवीत. परभणी शहर वाढत गेलं. जुनी घरे पडली. नवीन इमारती आल्या. तरी इथला माणूस मात्र जशाला तसा आहे.” परभणीचे ऐतिहासिक, सांस्कृतिक पैलू या लेखात आले आहेत. या लेखातील मला आवडलेले बी. रघुनाथ यांचे वाक्य म्हणजे “परभणीत काही असो की नसो जीवन मात्र नक्की आहे “
लक्ष्मी, खळ्याचे दिवस, कण्या भाकरीचे खाणे, कुपाटी हे लेख म्हणजे कृषी जीवनातील जगण्याचा सुंदर हिरवगार मांडव आहेत. हा मांडव काट्या कुट्याचा असला तरी हिरव्यागार पानांचा आहे. त्याला एक सुंदर धुंद करणारा रानगंध आहे. पिकपाणी या त्यांच्या पहिल्या कवितासंग्रहातील अनेक संदर्भखुणा येथे येतात. त्यातून त्यांचे बालपणही उलगडत जाते. सांजा, कण्या, घुगऱ्या, कुटके, शेंगोळे, वरणफळं हे त्या काळातील पदार्थ. आजही त्याची चव जिभेवर रेंगाळते. आज घर भरलेले असूनही लेखक आजही ते गरीबीच्या काळातील पदार्थ आवडीने खातो. तेव्हा कमी उजेडात किंवा चांदण्यातही जेवावे लागे. तेव्हा मोठी माणसे म्हणत “अंधारात जेवताना घास बरोबर तोंडातच जातो. कानात जात नाही.”
घराच्याबाहेर शेतात गेल्यावर मेव्यावर भर असायचा. मुगाच्या शेंगा, भुईमुगाच्या शेंगा, तुरीच्या शेंगा, या सगळ्या पोटभर आवडीने खायच्या. उभा ऊस काडकन मोडून खायचा. गाजर, रताळं तर कच्ची खायची. भाजलेल्या शेंगा, हूळा, हुरडा ओंब्या या रात्री शेकत खायच्या. आंबा, चिंच, कवठे, बोर, जांब,चारं, कारं केकतडाचे बोंडं, कुपाटीतल्या रानकामुन्या, शेन्न्या, वाळक अशा कितीतरी रानमेव्याचा उल्लेख आलेला आहे. जे नव्या पिढीला व शहरातल्या माणसांना माहित नाही.
अंधारातला प्रकाश आणि भीमा ही दलित समाजातील बालपणीच्या मित्रांची व्यक्तीचित्रे खूपच व्याकुळ करणारी आहेत. पन्नास वर्षांपूर्वी या गावात अस्पृश्यता पाळली जायची. हे भालेराव कुठेही झाकून ठेवत नाहीत. दलित मित्र प्रकाशच्या बहिणीच्या हातचं पाणी पिलं म्हणून रागावणारा चुलतभाऊ यात आहे. मोठ्या मनाने क्षमा करणारे त्यांचे वडीलही आहेत. वडील समजावून सांगताना म्हणतात “अरे आम्ही तालुक्याला हॉटेलला जातो तेव्हा तिथं पाणी देणारा कोण असतो माहित असतो का ? पण आपलं गाव अजून लहान आहे. पुन्हा असं मुद्दाम पाणी पिऊ नकोस” लेखकाच्या आयुष्यातली ही घटना वाचून मला माझ्या जीवनातली घटना आठवली. आमच्या शेजारी तान्हूबाई राहायची. ती जातीन हटकर होती. घर निर्मळ चिरमळ असायचं. एकदा तिच्याकडे शेंगोळे केले होते. मला ते खावेसे वाटत होते. तेव्हा माझी आई म्हणाली “खाय काही होत नाही. तान्हूबाई आपल्याच आहेत. त्या कोणाला सांगणार नाहीत. फक्त बाहेर कोणाला सांगू नको.”
प्रकाश या अत्यंत हुशार असणाऱ्या मित्राचे पुढे काय झालं या आठवणीने लेखकाचा जीव व्याकुळ होतो. याउलट वर्गात ढ असणारा भीमा मात्र अंगच्या हुशारीने जनावराचा व्यापार करतो, आपल्या मुलांना उच्च शिक्षण देतो, वेगवेगळ्या चळवळीत भाग घेतो. एक दिवस अचानक वृत्तपत्रात बाळासाहेब आंबेडकरांच्या शेजारी त्याचा फोटो येतो आणि लेखकाला लहानपणीचा भीमा आठवत जातो. बायसूबाई हा लेख माहित नसलेल्या गोष्टीवर प्रकाश टाकतो. सिंधुताई सपकाळ यांचे चरित्र सर्वश्रुत आहे. त्यावर चित्रपटही निघाला. सिंधुताई जत्रा करीत फिरत असत. एकदा त्या लिंबगावच्या यात्रेतून बायसूबाई बरोबर बैलगाडीत रिधोऱ्याला आल्या होत्या. बायसूबाईने त्यांचा आईप्रमाणे सांभाळ केला, ही नवीच माहिती आपणाला या पुस्तकात मिळते.
“बबुदा” आणि “बीजेचा भाऊ गेला” हे दोन लेख त्यांच्या भावावर लिहिलेले आहेत. त्यांच्या निधनानंतर हे लेख आल्यामुळे ते अत्यंत हृदयस्पर्शी आहेत. शेवटचा “कसा बदलत गेला गाव” हा ललितलेख आहे की कविता असा प्रश्न पडावा. जुन्या मराठी चित्रपटात शेवटी एक गीत असायचं यामध्ये चित्रपटाची कथा उलगडत जायची, ती संपूर्ण काव्यमय असे. शेवटचा लेख म्हणजे असाच आहे. तो या पुस्तकाचा सार आहे. नव्हे तो आत्माच आहे. यात गाव कसा बदलत गेला याचे काव्यमय वर्णन आहे. १६८ पानांचे हे पुस्तक आपण भराभरा वाचत जातो आणि पन्नास वर्षाचा हा पट सरसर डोळ्यासमोरून जातो.
पुस्तक – माझा गाव माझी माणसे
लेखक – इंद्रजीत भालेराव
प्रकाशक – सुरेश एजन्सी, पुणे
किंमत – २६० रुपये
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.