June 20, 2024
Chrysanthemum Shevanti flower plantation article by Krushisamrpan
Home » शेवंतीची लागवड करताना…
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

शेवंतीची लागवड करताना…

शेवंतीची लागवड केव्हा करावी ? लागवडीसाठी कोणती जमिन योग्य असते ? खते कोणती वापरावीत ? उत्पादनवाढीसाठी कोणत्या मशागती कराव्यात ? यासह विविध मुद्द्यावर जाणून घ्या या लेखातून…

माहिती सौजन्य – कृषिसमर्पण 🌳

🌼 शेवंती लागवड 🌼

१) मध्यम हलकी, पाण्याचा चांगला निचरा होणारी, भरपूर सेंद्रिय पदार्थ असलेली जमीन निवडावी. शेवंतीसाठी अत्यंत भारी जमीन निवडू नये. शेवंतीची सुरुवातीची वाढ जोमदार झाल्यास उत्पादन भरपूर व दर्जेदार मिळते. हलका ते मध्यम पडणारा पाऊस शेवंतीसाठी पोषक ठरतो.

२) लागवडीची वेळ पिकाची वाढ व फुलांवर येण्याचा काळ लक्षात घेऊन ठरवावी. पाण्याच्या उपलब्धतेनुसार लागवड लवकर अथवा उशिरा करता येते. शेवंतीची लागवड एप्रिल-मे महिन्यात करतात. या लागवडीपासून दसरा-दिवाळी सणांच्या काळात फुले उपलब्ध होतात. या लागवडीसाठी सुरुवातीच्या काळात पाणी उपलब्ध असेल, तरच ही लागवड करता येते. पाण्याची उपलब्धता नसेल, तर जून-जुलैमध्ये लागवड करता येते. पावसाळा सुरू झाल्यानंतर केलेल्या लागवडीस डिसेंबरपासून पुढे फुले येतात. म्हणजे नाताळ सण व लग्नसमारंभासाठी ती उपलब्ध होतात.

३) लागवडीसाठी प्रथमतः जमीन उभी-आडवी नांगरून, कुळवून भुसभुशीत करावी. जमीन तयार करताना हेक्टरी २५ ते ३० टन चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळावे. जमिनीच्या उताराला आडव्या ६० सेंमी अंतरावर सऱ्या सोडून वाफे तयार करावेत. लागवडीसाठी मागील हंगामातील शेवंती पिकाच्या निरोगी काश्या वापराव्यात. लागवड ही सरीच्या दोन्ही बाजूंना ३० सेंमी अंतरावर बगलेत करावी. लागवड शक्यतो दुपारची उन्हे कमी झाल्यावर करावी, म्हणजे रोपांची मर कमी होते.

४) महाराष्ट्रात सोनाली तारा, बग्गी, झिप्री, राजा, पांढरी व पिवळी रेवडी, शरदमाला, बंगळूर, रतलाम चंद्रमा या जाती लागवडीखाली आहेत. फुलांचा रंग, आकार आणि उपयोग यावरून शेवंतीच्या जातीचे वर्गीकरण केले जाते.

५) शेवंतीच्या उत्तम वाढीसाठी आणि दर्जेदार उत्पादनासाठी लागवडीपूर्वी जमीन तयार करताना हेक्टरी २५ टन शेणखत जमिनीत मिसळावे. लागवडीच्या वेळी हेक्टरी १५० किलो नत्र, २०० किलो स्फुरद आणि २०० किलो पालाश तर लागवडीनंतर एक ते दीड महिन्याने १५० किलो नत्र हेक्टरी द्यावे.

६) लागवड उन्हाळी हंगामात करावयाची असल्याने पिकास पाण्याचा ताण पडणार नाही याची काळजी घ्यावी. लागवडीपासून पाऊस सुरू होईपर्यंत पाच ते सात दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. त्यानंतर गरजेप्रमाणे पाणी द्यावे. फुले येण्याच्या व फुलण्याच्या काळात पाण्याचा ताण पडणार नाही याची काळजी घ्यावी.

७) झाडाची वाढ मर्यादित राहण्यासाठी आणि अधिक उत्पादनासाठी शेवंतीच्या झाडाचा शेंडा खुडण्याचा प्रघात आहे. शेंडा खुडण्याचे काम लागवडीनंतर साधारणतः चौथ्या आठवड्यानंतर करावे. शेंडा खुडल्याने अधिक फुटवे फुटून फुलांच्या उत्पादनात वाढ होण्यास मदत होते.

८) जातीनुसार फुलांची काढणी लागवडीनंतर तीन ते पाच महिन्यांनी सुरू होते. ती पुढे एक महिना चालते. लवकर उमलणाऱ्या जातींचे एकूण चार ते सहा, तर उशिरा उमलणाऱ्या जातींचे आठ ते दहा तोडे होतात.

📚 संकलन- कृषिसमर्पण समूह, महाराष्ट्र राज्य

​​​​|| कृषिमूलम् जगत् सर्वम् ||​​​​

Related posts

मानवता धर्माची गरज

ग्रेट मिलेट… ज्वारी… ग्रेट फूड …!

जलक्रांतीचा योद्धा जलनायक सुधाकरराव नाईक

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406