July 27, 2024
Book Review of Dr Madhukar Bachulkar Cholekar
Home » पर्यावरण, निसर्ग प्रेमींना उपयुक्त असे पुस्तक
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

पर्यावरण, निसर्ग प्रेमींना उपयुक्त असे पुस्तक

वृक्षसंवर्धन, वृक्षांबाबतचे गैरसमज, विदेशी वृक्ष लागवडीचे तोटे, उपाय आणि पर्याय तसेच विदेशी वृक्षांना पर्यायी देशी वृक्ष याबाबतची माहिती दिली आहे. यामुळे निसर्गप्रेमी, पर्यावरणप्रेमी, अभ्यासक, संशोधक आणि शेतकरी या सर्वांनाच हे पुस्तक उपयुक्त ठरणारे असे आहे.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – ९०११०८७४०६

देशात ५० हजारांहून अधिक वनस्पती प्रजातींची नोंद करण्यात आली आहे. यापैकी १८ हजार ८८२ प्रजाती सपुष्प वनस्पतींच्या आहेत. पश्चिम घाटात वृक्षाच्या ६५० प्रजाती आढळतात. यापैकी ३५२ प्रजाती प्रदेशनिष्ठ आहेत. म्हणजेच या प्रजाती केवळ पश्चिम महाराष्ट्रातच आढळतात. जगात इतरत्र त्या कोठेही आढळत नाहीत. महाराष्ट्रात वृक्षाच्या सुमारे ७५२ प्रजाती आहेत. पण वाढते शहरीकरण, औद्योगिकीकरण अन् बेसुमार वाढत चाललेली लोकसंख्या यामुळे सध्या वनांचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात घटत चालले आहे. पाण्याशिवाय आपण जगू शकत नाही. अन् इतक्या मोठ्या लोकसंख्येला लागणारे पाणी याचा विचार करता मोठाली धरणे आपण बांधली आहेत. यात अनेक वृक्षाच्या प्रजातींची बेसुमार तोड झाली. दळणवळणामुळेही वृक्षांची तोड होत आहे. अशाने जैवविविधतेला मोठा धोका निर्माण झाला आहे. यासाठी वृक्ष संवर्धन हे गरजेचे आहे. यासाठी वृक्षाच्या रोपांची निर्मिती आणि त्याची लागवड याचे ज्ञान असणे गरजेचे आहे.

वनांची विनाश थांबवून विकास साधायचा असेल तर आपल्या परिसरात आढळणाऱ्या वृक्षांची माहिती करून घेणे तितकेच गरजेचे आहे. तसेच त्यांच्या लागवडीसाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. यासाठी वृक्षरोपे कशी तयार करायची ? रोपवाटीकेत वृक्षरोपांची निवड कशी करावी ?, रोपवाटिका कशा तयार कराव्यात ? वृक्षरोपांची लागवड कशी व कधी करावी?, वृक्षसंगोपन आणि संवर्धन कसे करावे ? याची माहिती वृक्षप्रेमींना, निसर्गप्रेमींना व्हावी या उद्देशाने वृक्षरोपवाटिका, वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धन हे पुस्तक डॉ. मधुकर बाचूळकर-चोळेकर यांनी लिहीले आहे.

सध्या अनेक भागात वृक्ष लागवड होते. पण यात स्थानिक वृक्षांच्या प्रजाती ऐवजी विदेशी वृक्षांची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. वृक्ष लागवड झालेली आपणास दिसते. पण शहरातील बागांमध्ये, रस्त्याच्या कडेला आढळणारे गुलमोहोर, पीतमोहोर, निलमोहोर, रेन ट्री, काशिद, पिचकारी हे वृक्ष विदेशी आहेत. हे विचारात घेणे गरजेचे आहे. पूर्वी वड, पिंपळ असे देशी वृक्ष रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात होते पण वाढत्या रुंदीकरणात हे वृक्ष जाऊन तेथे विदेशी वृक्षच लावले गेले आहेत. याची जाणीव डॉ. बाचूळकर यांनी करून दिली आहे. यामुळे हे पुस्तक केवळ माहितीवजा नसून यातून प्रबोधनही केले आहे. वृक्षांची सध्यस्थिती या पुस्तकात मांडून लेखकाने देशी वृक्षांच्या लागवडीतून जैवविविधतेचे संवर्धन करण्यासाठी प्रोत्साहित केले आहे.

आधुनिक विचारसरणीमुळे वृक्षांची लागवड केली जाते पण ती करताना अनेक शास्त्रोक्त गोष्टी विचारात घेतल्या जात नाहीत. याचा तोटा वृक्षांना होतो आहे अशी खंतही लेखकाने व्यक्त करत वृक्ष लागवड करणाऱ्यांसाठी महत्त्वाच्या सुचनाही केल्या आहेत. घराभोवती झाडे लावतो पण पावसाचे पाणी मुरायलाही जागा आपण घराभोवती ठेवत नाही. अशाने होणारे तोटे लेखकाने सांगून प्रबोधन केले आहे. सीड बॉल संकल्पना राबवली जाते खरी पण त्यात विदेशी वृक्षांच्या बियांचाच प्रसार सर्वत्र होत आहे. यावर लक्ष वेधत सीड बॉल संकल्पना राबवताना घ्यावयाची काळजी याबद्दलही महत्त्वपूर्ण शास्त्रोक्त माहिती या पुस्तकात देण्यात आली आहे.

कृत्रिम पद्धतीने वृक्ष लागवड करून जगले, वने निर्माण केल्याचा फक्त आभास निर्माण करणाऱ्यांना शास्त्रोक्त पद्धतीने त्यांची कृती कशी अयोग्य आहे हे सांगण्याचा प्रयत्न लेखकाने केला आहे. कारण यातून जैवविविधतेचे संवर्धन कदापि शक्य नसल्याचे मतही लेखकाने मांडले आहे. मियावाकी ही जपानी पद्धत भारतात अयोग्य कशी आहे याची शास्त्रोक्त कारणे देत वेळीच जागे होण्याची सुचनाही लेखकाने केली आहे. देशी वृक्ष मियावाकी या विदेशी पद्धतीने लावणे अयोग्य असल्याचेही मत लेखकाने मांडले आहे. पण यावर नक्षत्रवने, स्मृतिवने, क्रांतीवने, देवराया, वनराया यांची निर्मिती करून वृक्ष संवर्धन करणे कसे योग्य आहे हा पर्यायही लेखकाने सुचविला आहे. नक्षत्रवन कसे असते ? यामध्ये कोणते वृक्ष किंवा वनस्पती लावल्या जातात. नक्षत्राचा आराध्य वृक्ष कोणता ? त्या वनस्पती उपलब्ध नसल्यास पर्यायी कोणती वनस्पती लावावी. या वनस्पतींची लागवड कशी करावी ? याची सविस्तर माहिती दिली आहे. राशीवन, नवग्रह वन, सप्तर्षी वन, पंचवन याबद्दलही सविस्तर माहिती या पुस्तकात दिली आहे.

वृक्षांचे पर्यावरणीय मुल्य कसे मोजले जाते यावरील सविस्तर लेखातून लेखकाने पर्यावरणीय मुल्य सांगून प्रबोधन केले आहे. कोणत्याही वस्तूचे मूल्यमापन करण्याची वस्तूंची किमत अथवा मूल्य आकारण्याची ठराविक पद्धत आहे. वृक्षापासून प्राप्त होणारे लाकूड, फळे, फुले याची किंमत ठरविता येते. पण या वृक्षापासून मिळणारी सावली, पर्यावरण संतुलनातील महत्त्व याची किंमत कशी ठरवायची ? पर्यावरणीय फायद्याचे मुल्यमापन संकल्पना प्रा. दास यांनी १९८१ मध्ये वाराणसी येथे झालेल्या इंडियन सायन्स कॉंग्रेसच्या अधिवेशनात मांडली होती. ही संकल्पना सांगून लेखकाने पर्यावरणीय महत्त्व पटवून दिले आहे.

महाराष्ट्रातील देशी, विदेशी वृक्षांची सूची, वृक्षांची सध्यस्थिती, रोपवाटिका करण्याच्या पद्धती, देशी व विदेशी वृक्षरोपे तयार करण्याच्या शास्त्रीय पद्धती, वृक्षरोपांची लागवड करताना आणि करण्यापूर्वी तसेच वृक्षरोपे कोणती निवडावीत याबाबतची सविस्तर माहिती या पुस्तकात देण्यात आली आहे. वृक्षसंवर्धन, वृक्षांबाबतचे गैरसमज, विदेशी वृक्ष लागवडीचे तोटे, उपाय आणि पर्याय तसेच विदेशी वृक्षांना पर्यायी देशी वृक्ष याबाबतची माहिती दिली आहे. यामुळे निसर्गप्रेमी, पर्यावरणप्रेमी, अभ्यासक, संशोधक आणि शेतकरी या सर्वांनाच हे पुस्तक उपयुक्त ठरणारे असे आहे.

पुस्तकाचे नाव – वृक्षरोपवाटिका, वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धन
लेखक – डॉ. मधुकर बाचूळकर-चोळेकर
प्रकाशक – सुरेश शिपूरकर, निसर्ग मित्र, कोल्हापूर
किंमत – १५० रुपये, पृष्ठे – ९६


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

साहित्यिक महादेव मोरे यांना आचार्य अत्रे साहित्य पुरस्कार जाहीर

ती सध्या काय करते ?

पानिपत इथल्या 2 जी इथेनॉल प्रकल्पामुळे प्रदुषण कमी होण्यास मदत

2 comments

प्रभाकर परब June 26, 2024 at 11:26 AM

हे पुस्तक विकत घ्यायचे आहे

Reply
टीम इये मराठीचिये नगरी June 27, 2024 at 8:38 AM

मधुकर बाचुळकर सर नंबर – 97303 99668

Reply

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading