July 27, 2024
Home » स्वधर्माचे आचरण
विश्वाचे आर्त

स्वधर्माचे आचरण

मी कोण आहे, याचा शोध घेणे. मी आत्मा आहे. तो आत्मा सर्वांध्ये आहे. सर्वांधील आत्मा समान आहे. तो एक आहे. आत्मा अमर आहे. देह नाशवंत आहे. देहामध्ये तो अडकला आहे. हे जाणणे यासाठी ध्यानधारणा आहे.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे

मोबाईल 9011087406

अगा आपुला हा स्वधर्मु । आचरणी जरी विषमु ।
तरी पाहावा तो परिणामु । फळेल जेणें ।। 923 ।। अध्याय 18 वा


ओवीचा अर्थ – अरे अर्जुना, आपला धर्म आचरण करण्याच्या बाबतीत जरी कठीण असला, तरी ज्या परिणामानें तो फलद्रूप होईल, त्या परिणामाकडें दृष्टि ठेवावी.

नव्या पिढीने आरामच हरवलाय

अध्यात्माचा अभ्यास करणाऱ्यांवर नेहमीच टीका होते. पारायणे करून कुठे देव भेटतो का ? पारायणांचा फायदा काय ? संतांच्या मागे लागून वेळ फुकट घालविण्यात काय अर्थ आहे ? ध्यानधारणेत वेळ घालविण्याऐवजी देशसेवा करा, असे विविध सल्ले, प्रश्‍न उपस्थित केले जातात. टीका करणारे नास्तिक आहेत असेही नाही, पण टीका होते. सध्या वेळेला महत्त्व आले आहे. प्रत्येक क्षण महत्त्वाचा आहे. जग वेगाने बदलत आहे. जागतिकीकरणाचा वेग झपाट्याने वाढत आहे, तसे माणसाची विश्रांतीही कमी झाली आहे. आराम हराम आहे, पण आराम काही काळ तरी हवा असतो, हे मान्य करायलाही वेळ नाही. नवी पिढी आरामच हरवून बसली आहे. अशा या बदलत्या जगाला देवाचा विचार करायला वेळ कुठे आहे ! देव आहे तर मग दाखवा, नाहीतर तो विचार सोडून द्या, अशी विचारसरणी बनली आहे.

स्वधर्माचे आचरणच थोडे विषम

अध्यात्म हे थोतांड आहे, असे नव्या पिढीला वाटत आहे. देवाला रिटायर करा असे म्हणणारे, तसे सल्ले देणारेही आज बरेच आहेत. भारतात अनेक थोर संत होऊन गेले. त्यांनी अनेक ग्रंथ लिहिले आहेत, पण ते वाचायला आज नव्या पिढीला वेळच नाही. ते काय आहेत, हे जाणून घेण्याचीही त्यांची इच्छा नाही. ज्यांची इच्छा आहे त्यांतील अनेक जण हे ते केवळ त्यातून पैसा कसा मिळवता येतोय, याचाच विचार करतात. देशातील महान आध्यात्मिक ग्रंथांवर टीका होत आहे. देशातीलच नागरिक त्यावर टीका करत आहेत. वेळ असणाऱ्या मंडळींनी मांडलेले शास्त्र, वेळ घालविण्यासाठी मांडलेले सिद्धांत आहेत, असे म्हटले जात आहे. टीका करणारे परके नाहीत. देशीच आहेत. असे का? तर या स्वधर्माचे आचरणच थोडे विषम आहे.

चिंतन, मनन वृत्तीच नष्ट होतेय

झटपट निकाल यात लागत नाही. पूर्वी एकदिवसीय सामना 60 षटकांचा असायचा. नंतरच्या काळात तो 50 षटकांवर आला. पुढे पुढे 45 षटकेच खेळली जाऊ लागली. आता ट्‌वेंटी ट्‌वेंटी सामने खेळले जात आहेत. झटपट निकाल लागला पाहिजे. कोणत्याही प्रश्‍नाचे उत्तर लगेच मिळायला हवे. लाभ झटपट मिळायला हवा. हुशारीची व्याख्याही बदलली आहे. गुण मिळविणारे हुशार. मग ते कसेही मिळविलेले असोत. पाठांतर करून, घोकमपट्टी करून आजकाल हुशार होता येते. गुणांवर हुशारी तोलली जात आहे. अशाने नव्या पिढीतील चिंतन, मनन वृत्तीच नष्ट होत आहे. ती क्षमताही राहिलेली नाही. विचार करण्याची वृत्तीच नाही, तर मग नवाविचार ते मांडू कसे शकतील. नवा विचारच त्यांच्या उत्पन्न होत नाही.

अध्यात्म हे शिकवते

पैसा कमविणे हेच उद्दिष्ट झाले आहे. अशा या विचारसरणीत स्वधर्माचे पालन करण्यात अडचणी येत आहेत. व्यापारी वृत्तीने अध्यात्माचा विचारच संपवला आहे. विश्‍वास, श्रद्धा, भक्तीवर आधारलेले अध्यात्म आता दिसेनासे झाले आहे. मतांच्या पेट्यांसाठी रथ यात्रा काढली जाते. उत्सव भरवले जातात. पैसा मिळतो म्हणून देवधर्म केला जातो. दानही पैसा अधिक मिळावा यासाठीच केले जाते. फळाची अपेक्षा ठेवून कर्म केले जात आहे. अशा विचारांनी मग विकास खुंटतो हेच मुळी लक्षात येत नाही. काही वर्षापूर्वी प्रसिद्ध असणारी वृत्तपत्रे आज अडचणीत दिसत आहेत. काही तर बंदच पडली आहेत. कारण मात्र एकच आहे. त्यांनी बदलत्या काळाला ओळखले नाही. बदलत्या काळाचा विचारच केला नाही. बदलत्या जगासोबत जाण्याची वृत्तीच त्यांच्यात नव्हती. कारण तसा विचार करण्याची वृत्तीच त्यांच्यात नव्हती. अध्यात्म बदलत्या काळात कसे वागायचे हे शिकवते.

सेवाभावचा अभाव

एखाद्या गोष्टींचे चिंतन, मनन करावे हे अध्यात्म शिकवते. चिंतन, मनन केल्याने विकास होतो. पण हा विचार त्यांना पटला नाही. त्यांच्यात रुळला नाही. ते विकास करू शकलेच नाहीत. पत्रकारिता हा व्यवसाय आहे. हाच विचार त्यांनी मनात ठेवला. सेवा हा व्यवसाय होऊ शकत नाही. सेवेचा विचार वेगळा. व्यवसायाचा विचार वेगळा. सेवेत व्यवसाय आला की मग विचाराचा व्यापार होतो. सेवेचा विचार त्यात राहात नाही. अशानेच मग वृत्तपत्रातील जागा विकत घेण्याचे प्रकार घडत आहेत. विकतच्या बातम्यांनी विचार विकला जात आहे. तेथे सेवाभाव राहिलाच नाही. सामाजिक बांधिलकी मग अशा ठिकाणी कशी राहील. राहिली तरी त्यावर समाज विश्‍वास कसा ठेवेल. हेच मुळी त्यांना समजत नाही. अशाने हा व्यवसाय आता अडचणीत येत आहे.

अध्यात्मातील स्वधर्माचा विसर

अध्यात्म ही सुद्धा एक सेवा आहे. त्यात सेवाभावच हवा. अध्यात्म हा व्यवसाय नाही. यासाठी अध्यात्माचा धर्म जोपासायला हवा. त्यासाठी तो समजून घ्यायला हवा. अध्यात्मातील स्वधर्माचा विसर पडला आहे. स्वधर्म म्हणजे स्वतःचे अस्तित्व स्वतःच जाणणे. मी कोण आहे, याचा शोध घेणे. मी आत्मा आहे. तो आत्मा सर्वांध्ये आहे. सर्वांधील आत्मा समान आहे. तो एक आहे. आत्मा अमर आहे. देह नाशवंत आहे. देहामध्ये तो अडकला आहे. हे जाणणे यासाठी ध्यानधारणा आहे. यातून सुख, शांती, समाधान मिळते. यातूनच आत्मज्ञानाची प्राप्ती होते. यासाठी याचे आचरण करणे गरजेचे आहे. आत्मज्ञानाचे फळ निश्‍चितच मिळते. म्हणूनच तर ही गुरूशिष्य परंपरा आजही अखंड सुरू आहे.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

असा जिंका देहाचा किल्ला…

वसंतातील पल्लवी रोखणे अशक्य !

मातृमंदिर विश्वस्त संस्थेचे संत साहित्य पुरस्कार जाहीर

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading