पानांनी झडलेला हा वृक्ष पुन्हा बहरेल याची यतकिंचितही शक्यता नसते. पण वसंताचे आगमन होतात. वृक्षावर पल्लवीचे अंकुर फुटलेले पाहायला मिळतात. इतके पोषक वातावरण या ऋतुत असते. या वसंताच्या वातावरणात पल्लवीचे हे बहरणे त्या वृक्षालाही रोखता येणे अशक्य असते.
राजेंद्र कृष्णऱाव घोरपडे, मोबाईल – 9011087406
नेणों कैसी वसंतसंगे । अवचितिया वृक्षाचीं अंगे ।
फुटती तैं तयांही जोगें । धरणें नोहे ।। १५ ।। ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा
ओवीचा अर्थ – वसंत प्राप्त झाला म्हणजे झाडांच्या फांद्यास कशी अकस्मात पालवी फुटते हे कळत नाही; परंतु तें पालवी फुटणे थांबून ठेवणें हे झाडांच्याही स्वाधीन नसते.
ऋतुमध्ये वसंत हा सर्वश्रेष्ठ समजला जातो. भगवान कृष्णाने सर्वश्रेष्ठ असा वसंत ऋतु मीच आहे असे विश्वरुप दर्शनात म्हटले आहे. वसंत ऋतुचे वैशिष्ट्यही तसे आहे. या ऋतुमध्ये आकाश स्वच्छ, निरभ्र असते. वातावरण अर्थात हवा आल्हादायक असते. सूर्यापासून मिळणारी उष्णताही पोषक असते. तिचा दाह जाणवत नाही. पंचतत्वे अर्थात जल, वायू, पृथ्वी, आकाश, अग्नी हे सर्वही आकर्षक रुपात असतात. एकंदरीत मनाला आनंद देणारे असे हे वातावरण असते. असे हे वातावरण मीच आहे असे भगवंत म्हणतात. कारण हे सर्व वातावरण आत्मज्ञानाचा बहर येण्यासाठी, ज्ञानाच्या आशा पल्लवीत होण्यासाठी पोषक असते. असा हा बहार ही भगवंताचीच अनुभुती असते.
वसंतापूर्वी थंडीने गारठलेले मन प्रसन्न वातावरणाच्या प्रतिक्षेतच असते. थंडीने वृक्षांच्या पानांची पडझड होते. सर्व झाडचे रुक्ष झालेले असते. झाडाची वाढच थांबलेली असते. पाने पिवळी पडून झडतात. पानांनी झडलेला हा वृक्ष पुन्हा बहरेल याची यतकिंचितही शक्यता नसते. पण वसंताचे आगमन होतात. वृक्षावर पल्लवीचे अंकुर फुटलेले पाहायला मिळतात. इतके पोषक वातावरण या ऋतुत असते. या वसंताच्या वातावरणात पल्लवीचे हे बहरणे त्या वृक्षालाही रोखता येणे अशक्य असते. वृक्षावरील हे सुप्तावस्थेतील डोळे अंकुरतात.
साधनेसाठी वसंत ऋतुसारखे पोषक वातावरण मिळावे याची प्रतिक्षा प्रत्येक साधकाला ही असतेच. जीवनात आलेल्या अनेक संकटांनी साधक थकतो, पण तो हरत नाही. त्याचा आत्मज्ञानासाठीचा संघर्ष हा सुरुच असतो. हा सुप्तावस्थेत गेलेला संघर्ष पोषक वातावरण मिळताच पुन्हा पल्लवीत होतो. हे त्याचे बहरने, पल्लवीत होणे त्यालाही रोखता येत नाही. आत्मज्ञानाचा हा अंकूर पल्लवीत होतो. कारण हा वसंत ऋतु म्हणजे स्वतः भगवंत आहेत. सद्गुरु आहेत. आत्मज्ञानाचा अंकूर फुटावा यासाठीच त्यांचा प्रयत्न सुरु असतो. हे सर्व भगवंताच्याच इच्छेने होत असल्याने ही आत्मज्ञानाची पल्लवी त्या वृक्षाला रोखता येणे अशक्य असते. इतका हा वृक्ष, हा साधक त्या गुरुंच्या, त्या वसंत ऋतुच्या स्वाधीन झालेला असतो.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.