आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष
थंडीच्या दिवसात शरीराची उष्णता टिकवणे आणि रोगप्रतिकार शक्ती वाढवणे हे बाजरीचे खास गुणधर्म असल्याने उत्तर भारतात आणि विशेषत: राजस्थानात बाजरीची भाकरी रोज खाल्ली जाते.आपल्या देशात राजस्थानात मुख्यतेकरुन या तृणधान्याची शेती होते.
प्रशांत दैठणकर
संगीताचे सूर कानावर येतात आणि त्यासोबत राजस्थानी शब्द येतात..
बाजरे की रोटी खाले श्याम
के चुरमा ने भूल जावे लो
गाणं राजस्थानी आहे यातील काही शब्द बाजरीचे गुणधर्म सांगणारे देखील आहेत.
बाजरो ऐसा है बाबा ठंड नाही लागे
दस बीस कोस बाबा खाके तू भागे
भक्ती रुपात बाजरीचं गुणगाण जसं आपल्याला ऐकायला मिळत तसं ते पतीच्या आठवणीत घरी एकटी असलेल्या राजस्थानी गृहिणीच्या पती विरहाच्या शब्दातही सापडेल.
..बाजरी म्हणून आपण ओळखतो ते भरडधान्य. निमित्त अर्थातच आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष 2023 चे . पौष्टीक आहार आणि त्याचे फायदे जगात सर्वांपर्यंत पोहोचण्याची आवश्यकता कोरोना कालावधीनंतर अधिकच वाढली आहे. बाजरी ज्याला शास्त्रीय नाव आहे पेनीसीटम ग्लॉकम. भारतात काही भागात हे दैनंदिन अन्नाचा एक महत्वाचा भाग आहे.
इंग्रजीत पर्ल मिलेट म्हणून ओळख असणाऱ्या भरडधान्याला बाजरा हिंदीत तर मराठीत बाजरी म्हणून आपण जाणतो. संक्रातीचा आधीचा दिवस भोगी आणि या दिवशी बाजरीला महत्व अधिक आहे. बाजरीची खिचडी अथवा बाजरीची भाकरी या दिवशी आवर्जून खातात.
थंडीच्या दिवसात शरीराची उष्णता टिकवणे आणि रोगप्रतिकार शक्ती वाढवणे हे बाजरीचे खास गुणधर्म असल्याने उत्तर भारतात आणि विशेषत: राजस्थानात बाजरीची भाकरी रोज खाल्ली जाते.
आपल्या देशात राजस्थानात मुख्यतेकरुन या तृणधान्याची शेती होते. कमी कस असणारी जमीन, २०० मिमी पेक्षा कमी पाऊस आणि अधिक तापमान असले तरी हे पीक होते. त्यामुळे राजस्थानसह लगतच्या गुजरात आणि महाराष्ट्रात याचे उत्पादन घेतले जाते. अगदी आम्लयुक्त आणि क्षारयुक्त जमीन असेल तरी देखील बाजरीचे पीक चांगले येते ही याची खासियत आहे.
या तृणधान्याचे मुळ स्थान पश्चिम आफ्रिकेत आहे असे मानले जाते आणि साधारण इसवी सन पूर्व २००० ते २५०० पासून भारतात याचे उत्पादन घेतले जात असल्याचे पुरावे आहेत. आफ्रिका खंडातील काही देश आणि भारतात खाण्यासाठी बाजरीचे उत्पादन घेण्यात येते. याचे उत्पादन अमेरिका खंडात आहे. मात्र तिथे त्याचा वापर पशू खाद्य म्हणून अधिक होतो.
बाजरीचा आहार म्हणून विचार करायचा तर 100 ग्रॅम बाजरीतून आपल्याला 10.96 ग्रॅम प्रथिने, 11.5 ग्रॅम फायबर, 61.5 टक्के कर्बोदके आणि 1456 कॅलरी उर्जा प्राप्त होते. यात स्निग्धता अथवा फॅटस खूपच नगण्य आहेत. याचे प्रमाण केवळ 5.5 ग्रॅम आहे त्यामुळे अगदी मधुमेह असणाऱ्यांसाठीही हे एक प्रकारचे सूपर फूड ठरते.
आरोग्यासाठी काय लाभ याचा विचार केला तर बाजरीच्या सेवनाने ग्लुकोजचे (रक्तातील साखर) प्रमाण खूप काळ स्थिर राहते त्यामुळे मधुमेहींसाठी हे उत्तम अन्न ठरते. यात कोलेस्टेरॉल घटविणारे घटक आणि फायबर मुबलक असल्याने ह्रदयविकाचा त्रास कमी होण्यास मदत होते.
पित्त अर्थात ॲसिडीटीचा त्रास तसेच पोटात होणारे विकार बाजरीने कमी होण्यासोबतच यातील फायबर मुळे बध्दकोष्ठता देखील संपण्यास मदत होते. त्यामुळे याचा आहारात समावेश असलाच पाहिजे.
मांसाहारी व्यक्तींना त्यांचया विविधांगी अन्नातून आवश्यक प्रथिने सहज मिळतात शाकाहारी व्यक्तींना ते शक्य नसते त्यामुळे शाकाहारी व्यक्तींसाठी बाजरी हे प्रथिने देणारे उत्तम अन्न ठरते. याचा आणखी एक महत्वाचा फायदा म्हणजे बाजरीच्या आहारातील समावेशाने रक्तदाब कमी होतो. बाजरीतील पोटॅशिअम हे खनिज शरीरातील अनावश्यक सोडियमचा निचरा करते त्यामुळे उच्च दाब नियंत्रणात राहतो. यात मोठया प्रमाणावर ॲन्टीऑक्सीडन्स आहेत त्यामुळे लवकर शरीराचे वय वाढणै, पार्किन्सन आणि अल्झायमर अशा विस्मृती आणि स्मृतीभ्रंश अशा आजारांसोबतच स्नायूविकारांपासून आपण दूर राहू शकतो.
सर्वोत्तम पोषण मुल्य असलेल्या धान्यपैकी एक असल्याने बालकांतील कुपोषणाची समस्या दूर करणे शक्य होते. यातील कॅल्शीअमने हाडे मजबूत होतात. ज्यांना आपलं वजन कमी करायचं आहे लठ्ठपणा कमी करायचा आहे अशांना याचा फायदाच होते. यात फॉलिक ॲसिड असल्याने गर्भवती स्त्रियांसाठीही हे उत्तम अन्न ठरते.
महाराष्ट्रात खानदेश आणि मराठवाडयात बाजरीचे पीक मोठया प्रमाणात घेतले जाते. बाजरीच्या भाकरी आणि खिचडी व्यतिरिक्त मराठवाडयात मोठा प्रमाणावर उन्हाळी खारवण म्हणून यावर प्रक्रिया करुन बाजरी खारोडी अथवा खारवलेली पापडी या पध्दतीने भाजून, तळून वा कच्ची खारोडी म्हणून खाल्ली जाते.
बाजरी उत्पादन आणि त्यावरील प्रक्रिया उद्योग मराठवाडयात आता उदयास येत आहे. मात्र घरोघरी उन्हाळयात खारवण करणे हा गृहिणींचा आवडता छंद दिसतो. अन्न आणि आरोग्य यांचा थेट संबध आहे. आजारांच्या साथी, वाढते प्रदूषण आणि त्यातून येणाऱ्या आरोग्य समस्या यावर मात करणारे उत्तम पौष्टीक तृणधान्य म्हणून मान्य झालेली बाजरी आता केवळ गरिबांचे अन्न राहिली नसून ते पंचतांरांकित व सप्ततारांकित हॉटेलचा आवडता मेन्यू झाली आहेत. मग आपणच का दूर रहायचं… होवून जाऊ द्या आता बाजरी.. एक सूपर से भी उपर फूड .