पृथ्वीच्या दक्षिण व उत्तर टोकावर जाऊन भटकंती करायची ही कल्पना कशी वाटते ? या भटकंतीचा फारसा परिचय भारतामध्ये आढळून येत नाही. मात्र आंतरराष्टीय पर्यटक जयप्रकाश प्रधान व त्यांची पत्नी जयंती यांनी पृथ्वीच्या या दोन्ही टोकांवर जाऊन मनसोक्त भटकंती केली. शेवटच्या टोकाचे ते गाव कसे असेल ? त्या गावात कशा सुविधा असतील याबद्दल जाणून घेण्याची आपल्या मनात उत्सुकता निश्चितच निर्माण झाली असेल . पृथ्वीच्या दक्षिण टोकावरचे शेवटचे गाव प्युर्टो विल्यम्स आणि शेवटचे शहर उश्वायाची प्रत्यक्ष सफर करण्याचा अनुभव अत्यंत दुर्मिळ अशा छायाचित्रासह या व्हिडिओमधुन घेऊ शकाल.. जयप्रकाश प्रधान यांचा हा व्हिडिओ आपणास कसा वाटला ते सांगा तसेच सबक्राईब करायलाही विसरू नका…
टोकाला असलेलं गाव अशी ‘प्युर्टो विल्यम्स’ची ओळख आहे. कोणत्याही देशाच्या सीमेवर राहणाऱ्या लोकांबद्दल, गावांबद्दल आपल्याला मोठं कुतूहल असतं. हे तर पृथ्वीच्या शेवटच्या टोकावरचं गाव. खऱ्याखुऱ्या अर्थानं ‘एंड ऑफ द वर्ल्ड.’ या विलक्षण गावाच्या भेटीची ही रंजक कहाणी...
जयप्रकाश प्रधान, मोबाईल 9545859259
‘पृथ्वीच्या सीमेवरच्या दक्षिणेकडच्या अगदी शेवटच्या टोकाला असलेल्या गावाला आता आपली बोट लागत आहे,’ हुर्टिग्रुटेन आंतरराष्ट्रीय कंपनीच्या ‘मिडनॅट सोल’ क्रूझच्या कप्तानानं सकाळीच ही घोषणा केली, आणि अंगावर अक्षरश: रोमांच उभे राहिले. कोणत्याही देशाच्या सीमेवर राहणाऱ्या लोकांबद्दल, गावांबद्दल आपल्याला मोठं कुतूहल असतं. इथं तर पृथ्वीच्या शेवटच्या टोकावरच्या गावात आम्ही उतरत होतो. आता यापुढे कोणतंही गाव, मनुष्यवस्ती काहीसुद्धा नाही. फक्त पाणी, पाणी आणि पाणी… पृथ्वीचं दक्षिणेकडचं अखेरचं टोक मानलं जाणारं ‘केप हॉर्न’ हे या गावापासून बोटीनं अवघ्या पाच-सहा तासांच्या अंतरावर. खऱ्याखुऱ्या अर्थानं ‘एंड ऑफ द वर्ल्ड.’ सारंच चित्तथरारक, विश्वासही न बसणारं, कल्पनेच्या पलीकडचं…
अर्जेंटिनामधलं ‘उश्वाया’ हे पृथ्वीच्या नकाशावरचं दक्षिणेकडचं अखेरचं शहर म्हणून प्रसिद्ध आहे. ते ‘एंड ऑफ द वर्ल्ड’ असल्याचं मानलं जातं. अंटार्क्टिकाला जाणाऱ्या अनेक क्रूझेस उश्वायाहून सुटत असल्यानं ते एक मोठं बंदर झालं आहे. तिथली वाहतूक, वस्ती वाढली. उश्वाया हे पृथ्वीच्या नकाशावरचं अखेरचं मोठं शहर निश्चितच आहे; पण त्याच्या पुढंही काही छोटी बेटं आहेत. जगाचा नकाशा बारकाईनं पाहिला, की दक्षिणेच्या टोकाला शेवटी एक नाव दिसून येतं : ‘प्युर्टो विल्यम्स.’ हे अगदी छोटं गाव, चिली देशात असून, तिथं त्यांचा नाविक तळही आहे. हे गाव म्हणजे खऱ्या अर्थानं ‘एंड ऑफ द वर्ल्ड.’
प्युर्टो विल्यम्सच्या त्या छोट्याशा धक्क्याला आमची अजस्र क्रूझ सकाळी नऊच्या सुमारास लागली आणि जवळजवळ दिवसभर भटकंतीसाठी आम्हाला वेळ देण्यात आला. पृथ्वीच्या सीमेवर राहणाऱ्या लोकांच्या भावना काय असतील, कसे असतील तिथले रहिवासी, त्यांच्या दैनंदिन जीवनाचं स्वरूप काय असेल… असे नाना प्रश्न उत्सुकता वाढवत होते. बोलता येईल का तिथल्या रहिवाशांशी असाही एक प्रश्न पडला. अर्थात भाषेची अडचण होतीच; पण काहीतरी मार्ग काढूच, या जिद्दीनं मी आणि पत्नी जयंती गावाच्या दिशेनं निघालो. सुदैवानं हवा तशी बरी होती. म्हणजे तापमान ३ – ४ अंश सेल्सिअस! थंडगार वारे वाहत होते आणि मधूनमधून पावसाच्या सरी येत होत्या.
वस्तुत: प्युर्टो विल्यम्स या अगदी छोटेखानी गावातही बघण्यासारखं खूप आहे. त्याची यादी, नकाशे आम्हाला दिले होते. पत्नीनं त्वरित सर्व माहिती काढली. संपूर्ण दिवस हाताशी असल्यानं त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी आम्हाला पाहताही येणार होत्या. गावाचा नकाशा पाहून कोणत्या भागात काय आहे याची नोंद करून घेतली, म्हणजे गावाच्या एका भागात गेलं, की तिथली सर्व ठिकाणं नीटपणे बघता येतात. सुमारे अडीच ते तीन हजार लोकवस्तीच्या या गावात नाविक दलाचे सैनिक- त्यांचे कुटुंबीय यांच्याबरोबरच स्थानिक नागरिकांची संख्याही बऱ्यापैकी होती. आम्हाला सर्वांत मोठी उत्सुकता होती, ती गावकऱ्यांबरोबर बोलण्याची, त्यांच्याशी संवाद साधण्याची.
क्रूझमधून उतरल्यानंतर समोरच बोर्ड दिसला प्युर्टो विल्यम्स नाविक दलाचा. हे गाव थोडं उंचावर आहे आणि ठिकठिकाणी समरमधली, रस्त्यांची कामं सुरू होती. अगदी मध्यवर्ती ठिकाणी शाळेची इमारत होती. त्याच्या आजूबाजूला छोटी छोटी एकमजली घरं. मुख्य चौकातच माहिती कार्यालय आणि पोस्ट ऑफिस. जगाच्या नकाशावरचं अगदी शेवटचं पोस्ट ऑफिस आणि माहिती कार्यालय! छोटी टुमदार इमारत आणि जेमतेम १०-१०ची एक-एक खोली. टपाल कचेरीवर ‘कोरिएस’ असा शब्द होता. त्याचा अर्थ ‘मेल’. या शेवटच्या पोस्ट ऑफिसमधून विविध देशांमधल्या आपापल्या गावांना पोस्टकार्ड पाठवण्यासाठी पर्यटकांची चांगलीच रांग लागते. सर्वप्रथम आम्ही माहिती कार्यालयात शिरलो. दोरी ओढून दरवाजा उघडावा, अशी सूचना सुदैवानं इंग्लिशमध्येही लिहिली होती. या सर्व भागांत स्पॅनिशचं वर्चस्व. ग्रामीण भागांत तर स्पॅनिशला पर्यायच नाही. इंग्लिश बोलणारे, समजणारे फार फार कमी; पण या वेळी आमचं नशीब जोरदार होतं. माहितीपत्रकं, वाङ्मयपुस्तिका स्पॅनिशमध्येच होत्या; पण माहिती अधिकारी जॉनला बऱ्यापैकी इंग्लिश येत होतं. जेमतेम तिशीतला जॉन हा मूळचा चिलीतल्या पुंटा ऐरेनास इथला होता. माहिती खात्यात कामाला लागला आणि पहिलंच पोस्टिंग मिळालं ते, जगाच्या सीमेवरच्या अखेरच्या गावात. त्याचा मावसभाऊ इथंच राहणारा. त्यानं या गावात एक गर्लफ्रेंडही मिळवली. सध्या गर्लफ्रेंड आणि मावसभावाबरोबर तो राहतो असं त्यानं सांगितलं.
प्रथम त्याचीच मुलाखत सुरू केली. त्याला मी विचारलं : ‘‘इथं तुझा दिवस कसा जातो?’’ त्यावर तो म्हणाला : ‘‘आता मधूनमधून पर्यटक येतात. विशेषत: अंटार्क्टिकाला जाणाऱ्या काही क्रुझेस ‘प्युर्टो विल्यम्स’ला थांबायला लागल्यात. त्यामुळे पर्यटकांची संख्याही हळूहळू वाढतेय. इथलं हवामान अतिशय खराब आणि क्षणाक्षणाला बदलतं. समरमध्येही तापमान एक ते दोन अंश सेल्सिअस, पाऊस, वारा, धुकं यांचंच साम्राज्य. इथं मी एक हिवाळा अनुभवला. रोजचं तापमान -५ अंश ते -८ अंश सेल्सिअस. मधूनमधून हिम पडतो. जीवघेणी थंडी, सोसाट्याचा वारा… कंटाळा येतो; पण मजाही येते. आता हिवाळ्यातही इथं थोडे पर्यटक येऊ लागले आहेत.’’
‘या गावातल्या कोणाशी बोलता येईल का,’ असं जॉनला विचारल्यावर तो म्हणाला : ‘‘का नाही?’’ समोरच्याच घरातील एका दांपत्याला त्यानं बोलावून आणलं. गेली तीस-पस्तीस वर्षं ते इथं राहत असून, मासेमारी हा त्यांचा व्यवसाय आहे. ते इथल्या जीवनाशी पूर्णतः एकरूप झालेले वाटले. ‘जगाच्या दक्षिणेकडच्या अगदी टोकाच्या गावात राहताना तुमच्या भावना काय आहेत,’ असं विचारता ते म्हणाले : ‘‘इथं राहणं अतिशय कठीण. त्यामुळे तरुणवर्ग इथं राहणं फारसं पसंत करत नाही. गॅसपासून प्रत्येक गोष्ट कमालीची महाग. कारण इथं काहीच पिकत नाही, तयार होत नाही. इथून २९७ किलोमीटर अंतरावर असलेलं पुंटा ऐरेनास हे सर्वांत जवळचं मोठं शहर. सर्व गोष्टी तिथूनच आणाव्या लागतात. आता इथं एक छोटं सार्वजनिक आणि नाविक दलाचं हॉस्पिटल आहे. अन्यथा थोड्या मोठ्या आजारपणासाठीही पुंटा ऐरेनास गाठावं लागतं. तिथं जाणं फार खर्चाचं. प्युर्टो विल्यम्स इथं छोटं विमानतळ आहे. पुंटा ऐरेनास ते प्युर्टो विल्यम्स अशी विमानाची जाऊन-येऊन रोज एक फेरी असते. सव्वा तासाचा प्रवास; पण त्यासाठी १,२१,००० चिलियन पेसो म्हणजे सुमारे २०० अमेरिकन डॉलर्स मोजावे लागतात. सर्वसामान्यांना ते परवडणारं नाही. वैद्यकीय आणीबाणी असेल, तर सरकार सहा हजार पेसोची म्हणजे अवघ्या १० डॉलर्सची सवलत देतं. बोटीच्या प्रवासासाठी साधारणत: २८ तास लागतात आणि ती आठवड्यातून एकदा असते.
या गावचा कारभार केप हॉर्न्स म्युन्सिपाल्टी अँड प्रोव्हेंशिअल गर्व्हनन्सतर्फे चालवला जातो. सरकारकडून काही सवलती दिल्या जातात; पण त्या अगदीच नगण्य असल्याची गावकऱ्यांची तक्रार आहे. एक बँक, एक शाळा आणि एक एटीएम अशा सोयी आहेत. सॅटेलाईट टेलिफोन आणि इंटरनेट सर्व्हिस उपलब्ध आहे; पण ही सेवा हवामानवर अवलंबून असते. पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेऊन, स्थानिक नागरिकांनी चौकात छोटी छोटी दुकानं थाटली आहेत. त्यात टी-शर्ट, टोप्या आणि अन्य काही सुव्हिनिअर्स विक्रीसाठी ठेवली होती. इथल्या खाद्यपदार्थांत ‘किंग क्रॅब’ हा सर्वांत लोकप्रिय आणि सहज उपलब्ध होणारा पदार्थ. दुपारचं जेवण आम्ही ठरवून गावातल्या एका छोट्या रेस्टॉरंटमध्ये घेतलं. जेमतेम दोन खोल्यांचं रेस्टॉरंट. ‘किंग क्रॅब’ची डिश मागवली. ही डिश तशी खूप महाग; पण कमालीची चवदार. अंटार्क्टिकाला जाणारे पर्यटक रेस्टॉरंटमधल्या पदार्थांचा फारसा आस्वाद घेताना दिसत नाहीत; पण पक्षीनिरीक्षण, ट्रेकिंगसाठी येणाऱ्यांची संख्याही वाढते आहे. त्यामुळे दिवसभरात आठ-दहा गिऱ्हाईक येतात, असं सांगण्यात आलं. इथली सर्व घरं एकमजली आणि छोटी, बरीचशी नवीन बांधलेली. मात्र, सन १९५३मधलं एक सर्वांत जुनं घर मुद्दाम जतन करून ठेवण्यात आलं आहे. ते बंदराच्या समोर असून, गावात आलेल्यांना ते आवर्जून दाखवलं जातं.
प्युर्टो विल्यम्स गावाच्या अगदी मध्यभागी एक स्मारक उभारण्यात आलं आहे. ‘येल्चोकटर’ या चिलियन बोटीच्या पुढच्या भागाची ती भव्य प्रतिकृती असून, तिथं लिहिलेल्या मजकुरावरून, या बोटीची आणि ती चालवणाऱ्या ल्युईस पार्डो या चिलियन नाविक दलाच्या खलाशाची महान कामगिरी समजून येते. अर्थात ती सारी कहाणीच मोठी रोमांचकारी म्हणावी लागेल. इंग्लंडचा सर अर्नेस्ट शेकल्टन हा फार मोठा धाडसी दर्यावर्दी. अंटार्क्टिका म्हटलं म्हणजे शेकल्टनचं नाव घ्यायलाच हवं. त्यानं अंटार्क्टिकावर अनेक धाडसी मोहिमा केल्या. आपल्या सर्व सहकाऱ्यांची काळजी घेऊन मोहीम पूर्ण करायची हे त्याचं मुख्य सूत्र. सन १९०७मध्ये तर सहकाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी तो दक्षिण ध्रुवापासून अवघ्या ८७ मैलांवर असताना माघारी फिरला. पंचवीस सहकऱ्यांना घेऊन १९१५ला तो अंटार्क्टिकाच्या मोहिमेवर निघाला. हवामान अत्यंत प्रतिकूल; पण त्यातून तो आणि त्याचे सहकारी मार्ग काढत होते. सर्वत्र हिमनगाचं साम्राज्य आणि त्यांची ‘एन्ड्युरन्स’ बोट वेडेल (Weddell) समुद्रात बर्फात अडकली आणि फुटली. प्रसंग कठीण होता; पण शेकल्टन आणि त्याच्या सहकऱ्यांनी लाईफ बोटींच्या साह्यानं, त्यातल्या त्यात सुरक्षित अशा, अंटार्क्टिकातल्या ‘एलिफंट’ बेटाचा आश्रय घेतला. तिथं बरेच पेंग्विन आणि सील मासे होते. त्यामुळे खाण्याचा प्रश्न सुटला होता; पण तिथून मनुष्यवस्तीचं पहिलं ठिकाण ८०० मैलांच्या अंतरावर होतं. तुफानी वारे, हिमवृष्टी, कडाक्याची थंडी कमी होत नव्हती. शेकल्टन आणि त्याचे पाच सहकारी मदत मिळवण्यासाठी छोट्या बोटीतून व काही ठिकाणी अक्षरश: डोंगर चढत-उतरत निघाले. प्रचंड यातना, कष्ट सहन करत ते एका किनाऱ्याला लागले. तिथून त्यांनी चिलियन नाविक दलाच्या मदतीची मागणी केली.
नाविक दलानं ती मान्य केली. ल्युईस पार्डो या नाविक दलाच्या खलाशावर ती कामगिरी सोपवली गेली. तो ‘येल्चो’ बोट घेऊन मदतीला निघाला. हे काम अतिशय कठीण होतं. इग्लडमध्ये १९०६मध्ये बांधण्यात आलेली ती टगबोट. १९०८ला चिलियन नाविक दलात आली. १२० फूट लांबीच्या या बोटीत रेडियो यंत्रणाही नव्हती. अशा परिस्थितीत हे मोठं धाडसच होतं. हिवाळ्याच्या मध्यास ड्रेक पॅसेजमधून प्रवास, ४०-४५ फूट उंचीच्या लाटा, तुफानी वारं यांतून मार्ग काढायचा होता. या मोहिमेवर निघण्यापूर्वी पार्डो यानं आपल्या वडिलांना लिहिलेलं हृदयस्पर्शी पत्र या स्मारकाच्या ठिकाणी कोरून ठेवण्यात आलं आहे. त्यात तो म्हणतो : ‘‘मला कल्पना आहे, की हे काम कठीण व मोठं आहे; पण मी चिलियन असून, धोका पत्करायलाच हवा या भूमिकेतून हे धाडस करत आहे. मला त्या दर्यारोहकांना वाचवायचं आहे, चिलीला प्रतिष्ठा मिळवून द्यायचीय आणि अन्य कोणीही जे काम केलेलं नाही ते केल्याचं समाधान मिळवायचं आहे. मी परत आलो, तर सर्वांनाच बरोबर घेऊन येईन; पण या मोहिमेत मला जर मरण आलं, तर माझी बायको, मुलं यांची जबाबदारी मात्र कृपया तुम्ही स्वीकारा.’’ अर्थात ल्युईस पार्डो यानं ही मोहीम यशस्वी करून कॅ. शेकल्टन आणि त्याच्या सहकाऱ्यांना वाचवलं आणि चिलीला मोठं नाव मिळवून दिलं.
योगायोग असा, की ‘मिडनॅट सोल’ बोटीच्या पुढच्या १८ दिवसांच्या ‘अंटार्क्टिका’ प्रवासात शेकल्टनवरचा याबाबतचा चित्रपट दोन भागांत पाहायला मिळाला. शेकल्टन कसा धाडसी मोहिमा आखायचा आणि १९१५मध्ये आपल्या सहकाऱ्यांचे प्राण वाचवण्यासाठी त्यानं काय काय साहस केलं याची उत्कृष्ट माहिती त्यातून मिळाली; पण त्या सर्वांना वाचवणारा ल्युईस पार्डो, त्याची ‘येल्चो’ बोट, चिली नाविक दल यांचा कुठंही उल्लेख त्या ब्रिटिश फिल्ममध्ये करण्यात आलेला नव्हता.
प्युर्टो विल्यम्स हे पृथ्वीवरील दक्षिणेकडचं सर्वांत अखेरचं छोटं गाव. बिगल चॅनेलवर नाव्हारिनो (Navarino) बेटाच्या उत्तरेकडे आहे. हे गाव १९५३ मध्ये वसलं. तीन वर्षांनी त्याचं नाव बदलण्यात येऊन ते ‘प्युर्टो विल्यम्स’ असं ठेवण्यात आलं. आयरिश खलाशी ज्युएन विल्यम्स यानं या जागेची सर्वप्रथम नोंद केली. त्यामुळे त्याच्या स्मरणार्थ हे नाव देण्यात आलं. प्रशांत आणि अटलांटिक महासागरांतल्या लष्करी वाहतुकीच्या दृष्टीनंही हे महत्त्वाचं बंदर मानण्यात येतं. तसंच अंटार्क्टिका प्रदेशामुळे चिलियन देशाच्या राजकारणात त्याचं स्थान मोठं आहे. अंटार्क्टिका प्रांत हा मॅगेलन (Magellan) प्रदेशाचा भाग समजला जातो. त्यात बिगल चॅनेल आणि नाव्हारिनो बेट, काबो द हॉर्नोस व चिलियन अंटार्क्टिकाचा समावेश होतो. प्युर्टो विल्यम्स ही त्याची राजधानी असून, खऱ्याखुऱ्या अर्थानं अंटार्क्टिकाचं प्रवेशद्वार मानण्यात येतं. तिथल्या अप्रतिम निसर्गसौंदर्यासाठी ते प्रसिद्ध आहेच; पण जीवशास्त्रविषयक विविधता, दुर्दम्य भूप्रदेश आणि अत्यंत मागासलेला असा ‘यागन’ समाज ही या भागाची वैशिष्ट्यं आहेत. त्यांची अगदी निराळी संस्कृती, परंपरा, तसंच क्षणाक्षणाला बदलणारं हवामान, झंझावाती वारे, ग्लेशियर्स या सर्वांशी सामना देत टिकाव धरण्याची क्षमता खरोखरच कौतुकास्पद म्हणावी लागेल. पृथ्वीचं अखेरचं टोक मानण्यात येणारं ‘केप हॉर्न’ हे प्युर्टो विल्यम्स बंदरापासून अवघ्या पाच-सहा तासांच्या अंतरावर आहे; पण हा वेळ आणि तो प्रवास संपूर्णपणे हवामानावर आणि निसर्गाच्या लहरीपणावर अवलंबून असतो.
तिथल्या समाजाचा उगम, विकास आणि संस्कृतीविषयक म्युझियमला जरूर भेट द्या, असं क्रुझवरच्या विविध सहलींचं आयोजन करणाऱ्या तज्ज्ञ गटाच्या प्रमुखानं आवर्जून सांगितलं होतं. किंबहुना या गटातच काम करणाऱ्या एका अभ्यासकानं या म्युझियमच्या उभारणीसाठी मोठं साह्य केलं आणि तो स्वत: तिथं हजर राहून म्युझियम आणि तिथल्या प्राचीन घडामोडींची माहिती देत होता. हे अगदी आधुनिक म्युझियम असलं, तरी यागन समाजाचा इतिहास, अठराव्या शतकात कशा प्रकारच्या झोपड्यांत राहून ते त्या भयंकर हवामानाला तोंड द्यायचे, त्यांच्या दैनंदिन गरजा, साधनं यांची माहिती आपल्याला इथं होते. प्राचीन काळातल्या त्यांच्या वापराच्या काही वस्तूही इथं पाहायला मिळतात. हॉर्नोस बेटावरील, पृथ्वीच्या टोकावरील दक्षिणेकडील अखेरचं चॅपेल आणि अमेरिकेचं लाईट हाऊस पाहण्याची मजा आणखी निराळी. या लाईट हाऊसची व्यवस्था चिलियन नाविक दलाकडून केली जाते. सार्वभौमत्वाचं संरक्षण आणि हवामानविषयक सेवा उपलब्ध होण्यासाठी त्याचा उपयोग होतो. तिथून जाणारी प्रत्येक बोट, काही क्षणांसाठी तिथं मुद्दाम थांबवली जाते. इथल्या सुमारे २४० किलोमीटर लांबीच्या आणि सुमारे पाच किलोमीटर रुंदीच्या नयनरम्य बिगल चॅनेलमधून तुम्ही धाडसी जलप्रवास करू शकता. पक्षीनिरीक्षकांना तर हा परिसर म्हणजे अक्षरशः स्वप्ननगरी वाटते. Dientes de Navarino हा जगाच्या टोकावरील गिर्यारोहणाचा मार्ग कुशल गिर्यारोहकांनाही मोठं आव्हान आहे.
प्युर्टो विल्यम्स गाव अगदी चिमुकलं आणि अपरिचित असं आहे. तिथल्या सोयी खूपच मर्यादित आहेत; पण जगाच्या नकाशावरच्या दक्षिणेकडच्या खऱ्याखुऱ्या अर्थानं अगदी शेवटचं गाव म्हणून त्याचा परिचय आणि आकर्षण हळूहळू वाढत आहे. अंटार्क्टिकाच्या १८-२० दिवसांच्या सफरीवर नेणाऱ्या क्रुझेस आता प्युर्टो विल्यम्सला थांबू लागल्या आहेत. त्यांचा जवळजवळ एक दिवसाचा मुक्काम इथं असतो. सकाळी नऊ-दहाच्या सुमारास क्रुझ बंदराला लागते आणि संध्याकाळी केप हॉर्नच्या दिशेनं कूच करते. त्यामुळे क्रुझ लागली, की त्यातले तीनशे-चारशे प्रवासी दिवसभर त्या चिमुकल्या गावात फिरत असतात. ते सारं गाव गजबजून जातं. दुकानांमध्ये सुव्हिनियर्स घेणाऱ्यांची गर्दी, पोस्टात कार्ड पाठवणाऱ्यांच्या रांगा लागतात; पण हे सर्व हवामानावर अवलंबून असतं. क्षणाक्षणाला निरनिराळी रूपं दाखवणारा निसर्ग. कधी कधी इतका पाऊस, कडाक्याची थंडी आणि पन्नास-साठ किलोमीटरच्या वेगानं वाहणारे वारे… मग पर्यटकांना क्रुझबाहेर न जाण्याच्या सूचना देण्यात येतात. त्या वेळी गावात एकदम शांतता असते. चिलियन नाविक दलाचा हा महत्त्वाचा तळ असल्यानं काही हालचाली मात्र दिसून येतातच.
अर्थात आता केवळ प्युर्टो विल्यम्सलाच भेट देणाऱ्यांची संख्याही वाढते आहे. सन २०१६मध्ये जगातल्या सुमारे तीन हजार पर्यटकांनी केवळ या परिसराच्या सफरी केल्याची माहिती अधिकाऱ्यानं सांगितली. घराघरात लॉजेस सुरू करून, तिथं त्यांची व्यवस्था केली जाते. त्यामुळे पर्यटन व्यवसाय आणि त्या अनुषंगानं अन्य उद्योग वाढत असून, स्थानिक तरुणवर्ग परत येऊ लागला आहे. प्युर्टो विल्यम्सला पर्यटक दोन मार्गांनी जाऊ शकतात – विमानानं आणि बोटीनं. चिलीतल्या पुंटा ऐरेनास या गावातून हे विमान किंवा बोट सुटते. चिलीची राजधानी सांतियागोहून साडेतीन तासांच्या विमान प्रवासानं पुंटा ऐरेनास इथं यायचं. तिथून प्युर्टो विल्यम्ससाठी दिवसातून एक विमान असतं. तो प्रवास साधारणत: ७५ मिनिटांचा असतो. आठवड्यातून एक बोट जाते. त्या प्रवासाला २८ तास लागतात. हा प्रवास हवामानाच्या लहरीवर अवलंबून असतो; पण चिलियन फिओडर्समधून सफर करताना मोठी बहार येते.
अंटार्क्टिका या सातव्या खंडावर जाणाऱ्या मराठी पर्यटकांची संख्याही हळूहळू वाढते आहे; पण वाईट याचं वाटतं, की हे पर्यटक अंटार्क्टिकाची बेसिक सहल करतात. उलट एवढे प्रचंड पैसे खर्च करून गेल्यानंतर पृथ्वीच्या नकाशावरचं दक्षिणेकडचं अखेरचं टोक असलेल्या प्युर्टो विल्यम्सला भेट देण्याचा रोमांचकारी अनुभवही त्यांनी आयुष्यात एकदा तरी अनुभवलाच पाहिजे…