डिसेंबर २०२३ अखेर समृद्धी महा मार्गामुळे महाराष्ट्राची उपराजधानी देशाच्या आर्थिक राजधानीला जोडली जाणार आहे. शिवडी-न्हावा शेवा सागरी सेतूमुळे व यशवंतराव चव्हाण जलदगती महा मार्गामुळे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी सुद्धा आर्थिक राजधानीच्या जवळ आलेली आहे.
महादेव ईश्वर पंडित
मुंबई येथे स्थापत्य सल्लागार म्हणून कार्यरत
मे २०२३ च्या अभियंता मित्र मासिकाचे अभियांत्रिकी शीर्षक सेतु निघाले शहरे जोडायला हे नजरेस पडले आणि गीत रामायणातील सेतु बांधा हो सागरी ही ओळ आठवली. खरोखरच ह्या चार अक्षरी शीर्षकात खूपच मोठा अर्थ व विकास दडलेला आहे. सेतु हा शब्दच मुळात सुंदर आहे. नदी, नाला, खाडी, डोंगर-दरी, समुद्र तसेच मानवनिर्मित अडथळे पार करण्यासाठी जी उड्डाणपूल बांधली जातात त्याला सेतु म्हणतात. गावं, शहरे, लोक, मनं,संस्कृती, सरकारी कामकाज इत्यादी रोजच्या व्यवहारातील महत्त्वाच्या बाबी जलदगतीने जोडण्यासाठी सेतूचा वापर होतो. सेतु कार्यालय ही सरकार आणि जनतेला जोडणारी कार्यक्षम व कार्यकारी यंत्रणा आहे. बुधवार दिनांक २५ मे २०२३ रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शिवडी- न्हावा शेवा ह्या सागरी मार्गाचे चाचणी परिक्षण करण्यात आले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः मोटार गाडी चालवत शिवडी ते न्हावा- शेवा हे अंतर फक्त २० मिनिटातचं पार केले एरवी ते पार करण्यासाठी कमीत कमी एक तास खर्ची पडत असे. मुंबई ट्रान्स हार्बर सागरी मार्ग हा अति जलद, अति महत्वाचा आणि स्थापत्य अभियांत्रिकीचा देशातील एक आदर्श नमुना असे शीर्षक परिधान करणारा सागरी सेतु नोव्हेंबर २०२३ अखेर लोकांच्या सेवेत रूजू होईल असा शत प्रतिशत विश्वास मा.मंत्री महोदयांनी व्यक्त केलेला आहे.
खरे तर मुंबई हे सुंदर नैसर्गिक बेट आहे. शीव बांद्रयापासून ते दक्षिणेकडील समुद्राच्या किना-यापर्यंतच्या भागालाच मुंबई असे संबोधले जाते आणि या व्यतिरिक्त मुंबईच्या उरलेल्या भागाला उपनगर असे संबोधले जाते. त्यामध्ये प्रामुख्याने ब्रांद्रा ते बोरीवली,चुनाभट्टी ते मानखुर्द आणि शीव ते मुलूंड पर्यंतच्या भागाचा समावेश होतो. मुंबई व नवी मुंबई हि दोन्ही शहरे वाशी खाडी पुल व ऐरोली या दोन सेतुनी पूर्वी जोडली गेली आहेत पण मुख्य मुंबई येणाऱ्या नोव्हेंबर अखेर शिवडी-न्हावा शेवा ह्या आदर्श सागरी सेतुनी नव्या मुंबईला जोडली जाईल. एमटीएचएल या सागरी सेतुने लांबीच्या मापदंडानुसार जगामध्ये दहावा क्रमांक प्राप्त केला आहे तसेच भारत देशामध्ये पहिलाच सर्वात लांब सागरी सेतु मुंबई व नवी मुंबई ही दोन सुंदर महानगरे जोडण्यासाठी बांधला आहे.
सर्व सामान्य भाषेत पाचशे बोईंग विमाने व सतरा आयफेल टॉवर इतक्या वजनाच्या लोखंडाचा वापर ह्या सागरी सेतुकरिता केलेला आहे. पृथ्वीच्या चार प्रदक्षिणा होतील इतक्या लांबीच्या केबल ह्या सागरी सेतू मध्ये वापरलेल्या आहेत. शिवडी – न्हावाशेवा सागरी सेतु एकूण २२ किमी लांबीचा असून त्यातील १६.५० किमी भाग समुद्रामध्ये तर उरलेला ५.५० किमी भाग जमिनीवर आहे.
शिवडी-न्हावा शेवा ह्या प्रतिष्ठित सागरी सेतु उभारण्यात ऑर्थोट्रोपीक स्टील डेक तंत्रज्ञान वापरलेले आहे. ८४ हजार टन वजनी ७० डेक ह्या सेतुमध्ये वापरलेले आहेत, या ७० डेकचे वजन सुमारे ५०० बोईग विमानाच्या वजना इतके आहे. वर नमूद केल्याप्रमाणे सुमारे १७ आयफेल टॉवर वजना इतके म्हणजेच सुमारे १७००० मेट्रीक टन वजनाच्या लोखंडी सळ्यांचा वापर यासाठी करण्यात आला आहे. तसेच पृथ्वीच्या परीघाच्या पाच पट म्हणजेच ४८००० कि.मी लांबीच्या केबल या सेतु उभारण्यासाठी वापरण्यात आल्या आहेत. अमेरिकेतील स्टॅच्यू ऑॅफ लिबर्टी पुतळा उभारण्यासाठी जेवढे काँक्रीट लागले आहे त्याच्या सहापट म्हणजेच ९०७५ घनमीटर इतक्या काँक्रीटचा वापर ह्या महा सागरी सेतु मध्ये केलेला आहे. शिवडी -न्हावा शेवा हा सागरी सेतू अर्ध्या मेरॅथॉन शर्यतीच्या लांबी पेक्षा जवळ जवळ दोन किलोमीटर ने अधिक आहे आणि म्हणूनच ह्या सागरी सेतूला आपण मॅरेथॅान सागरी सेतू असे नामकरण करु शकतो.
पुलाच्या एकूण लांबीच्या ७५% भाग खोल समुद्रामध्ये आहे आणि भरती ओहोटीच्या वेळी होणाऱ्या कंपनानी सेतुच्या खांबांना धक्का बसू नये म्हणून ३५ किमी लांबीच्या विशिष्ट पाईल लायनरचा वापर येथे करण्यात आला आहे. हे सर्व पाईल लाईनर जगप्रसिद्ध बुर्ज खलिफाच्या अंदाजे ३५ पट उंची इतके आहे. शिवडी-न्हावा शेवा हा सागरी सेतु देशातील दुसऱ्या क्रमांकाचे स्थापत्य अभियांत्रिकी आश्चर्याचा नमुना असं संबोधले तरी चालण्यासारखे आहे अर्थातच पहिला क्रमांक ताजमहालचा यात दुमत नाही.
स्टॅच्यू ऑफ लिबर्टी, बुर्ज खलिफा आणि आयफेल टॉवर ह्या तीन जगप्रसिद्ध स्थापत्य अभियांत्रिकी आदर्श वास्तुचा संदर्भ देशातील सर्वात लांब व पहिल्या क्रमांकाच्या सागरी सेतुमुळे आलेला आहे तसेच हा सागरी सेतु देशातील मुंबई बंदर व जवाहरलाल नेहरू बंदर या दोन प्रसिध्द बंदरांना जोडणार आहे त्यामुळे ह्या सागरी सेतुला स्थापत्य अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये एक विशेष असे महत्व प्राप्त झालेले आहे तसेच दळण वळण क्षेत्रातील देशामधील अगदी पहिल्या क्रमांकाचे अभियांत्रिकी आश्चर्य असे संबोधणेच सार्थ ठरेल.
शिवडी-न्हावा शेवा ह्या सागरी सेतुमुळे मुंबई, नवी मुंबई, रायगड,मुंबई पुणे द्रुत गती महामार्ग तसेच मुंबई गोवा महामार्ग यातील अंतर जवळ जवळ १५ किमीने कमी होऊन प्रवास वेळेत अंदाजे १५ ते २० मिनिटांची बचत होईल त्याच प्रमाणे दळणवळण जलदगतीने व सुरक्षित होण्यास मदत होईल. मुंबई ट्रान्स हार्बर लिंक मुळे देशाच्या आर्थिक राजधानीकडे पोहचण्याच्या वेळेत कमीत कमी १५ ते २० मिनिटांची बचत होत असल्यामुळे TIME IS MONEY ही दैनंदिन म्हण शिवडी-न्हावा शेवा सागरी सेतु शत प्रतिशत शब्दश: सार्थ ठरविली आहे.
२५ मे २०२३ पर्यंत नवी मुंबई फक्त वाशी खाडी पुल आणि ऐरोली ब्रीज येथे सागरी सेतुच्या माध्यमातून मुंबईला जोडलेली आहे. वाशी खाडी पुलामुळे मानखुर्द व वाशी जोडले आणि ऐेरोली ब्रीजमुळे मुलूंड व ऐेरोली जोडले गेले. खरे पाहीले तर स्थापत्य अभियांत्रिकी प्रकल्प आणि सुकर मानवी जीवन ह्या दोन बाबी एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. मुंबई व नवी मुंबईतील शहराच्या तीन जोडण्या पाहिल्यातर एकंदरीत आपणास असे निदर्शनास येते की मुलूंड व ऐेरोली हे दोन्ही शहरांचे पाय आहेत, तसेच मानखुर्द व वाशी हे दोन्ही शहरांचे हात आहेत पण आता शिवडी न्हावा-शेवा ह्या महासेतूमुळे मुंबई व नवी मुंबईचे सुपर ब्रेन एकत्र जोडले गेले आहेत असे संबोधले तरी वावगे ठरणार नाही.
नवी मुंबई हे भारतातील महाराष्ट्राच्या पश्चिम किनार्यावरील मुंबईचे नियोजित उपग्रह शहर आहे. हे १९७२ मध्ये मुंबईचे नवीन शहरी टाउनशिप म्हणून विकसित केले गेले आणि सध्या ते जगातील सर्वात मोठे नियोजित शहर आहे.नवी मुंबई मध्ये उरण , पनवेल, तळोजा, न्हावा शेवा,बेलापूर, नेरुळ, तुर्भे, वाशी, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली, द्रोणागिरी,दिघा आणि दहिसर इत्यादी क्षेत्रांचा समावेश आहे. नवी मुंबईतील सीबीडी हे नवी मुंबईचे ह्रदय आहे.
साधारणपणे १९७३ च्या सुमारास गॅमन इंडियाने बांधलेल्या वाशी खाडी पुलाच्या माध्यमातून मुंबई- नवी मुंबईने हातात हात घालून चालण्याचा निश्चय केला होता पण म्हणावा तितका विकास मुंबईच्या जुळ्या भावाला साधता आला नाही. साधारणतः २५ वर्षानंतर म्हणजेच सन १९९९ च्या दरम्यान मे. ॲफकॅान्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडने बांधलेल्या ऐरोली ब्रीजच्या माध्यमातून दोघांनी एकाच दिशेने वाटचाल करत विकास साधायचा असा दुसऱ्यांदा निश्चय करून विकास वाट धरली होती पण गेल्या पन्नास वर्षात नवी मुंबईला अद्याप मुंबईचा शेला पांघरता आला नाही. अद्याप नवी मुंबई मेट्रो रेल व आंतरराष्ट्रीय विमान उड्डाना पासून वंचित आहे. दोन्ही कामे प्रगती पथावर आहेत. पण येथून पुढे भविष्यात शिवडी-न्हावा शेवा ह्या महासेतूमुळे दोन्ही शहरांची मनं व आचारविचार जुळणार आहेत आणि त्यातून दोन्ही शहरांनी सेतुच्या माध्यमातून महा विकास साधायचा आहे.
दोन्ही शहरांची महापालिका मुख्यालये एमटीएचएलमुळे आता एकदम जवळ आली आहेत. मुंबई महापालिका मुख्यालय सर्वांग सुंदर भव्य अशी इमारत प्राचीन अभियांत्रिकीचा व आदर्श वास्तुशास्त्राचा उत्तम व आदर्श नमुना आहे तर नवी मुंबईचे महापालिका भवन नव्या अद्ययावत तंत्रज्ञानाचा आदर्श नमुना आहे. दोन्ही महापालिका मुख्यालये आदर्श अश्या वास्तुरचना आहेत तसेच मुंबई महानगरपालिका भारत देशातील सर्वांत श्रीमंत महापालिका म्हणून ओळखली जाते. आता दोन्ही शहरांनी सांस्कृतिक, शैक्षणिक, अभियांत्रिकी, वैद्यकीय, तंत्रज्ञान, क्रीडा कौशल्य, अर्थकारण, राजकारण तसेच समाजकारण इत्यादी बाबींची देवाणघेवाण करून आपापल्यापरीने सर्वांगीण विकास केला पाहिजे.
डिसेंबर २०२३ अखेर समृद्धी महा मार्गामुळे महाराष्ट्राची उपराजधानी देशाच्या आर्थिक राजधानीला जोडली जाणार आहे. शिवडी-न्हावा शेवा सागरी सेतूमुळे व यशवंतराव चव्हाण जलदगती महामार्गामुळे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी सुद्धा आर्थिक राजधानीच्या जवळ आलेली आहे. त्यामुळे सर्वांनी कला, क्रिडा, शिक्षण, तंत्रज्ञान, उद्योग धंदे, पर्यटन स्थळे,रोजगार, अर्थकारण, समाज कारण, दळणवळण, संगणकिय व राजकारण इत्यादी विविध क्षेत्राची आपआपसात देवाण घेवाण करून आपापला सर्वांगीण विकास करून मुंबई वरचा भविष्यातील भार कमी करण्यास हातभार लावणे गरजेचे आहे.
सन १९७० च्या सुमारास राज्य सरकारने नवी मुंबई मध्ये सिडकोची स्थापना केली. सिडकोने गेल्या पाच दशकात नवी मुंबई हे शहर अत्याधुनिक तसेच अद्ययावत स्थापत्य शास्त्राच्या सहाय्याने अगदी सुंदर नियोजनबद्ध शहर वसविले आहे, त्याच प्रमाणे तेथे औद्योगिक वसाहती सुद्धा साकारल्या आहेत. मुंबई देशाची आर्थिक राजधानी व महाराष्ट्राची राजधानी आहे. पुणे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे तर नागपूर महाराष्ट्राची उप राजधानी आहे. देणा-याने देत जावे घेणा-याने घेत जावे आणि घेता घेता एक दिवस देणा-याचे हात घ्यावेत या विंदा करंदीकरांच्या कवितेच्या ओळीप्रमाणे सर्व शहरांनी आपापसात विविध क्षेत्रामध्ये सेतू बांधून आपापसात चांगल्या बाबीची देवाणघेवाण करून जागतिक पातळीवर नावा रूपाला यावे हीच सर्व सुज्ञ नागरिकांकडुन अपेक्षा आहे.
मुंबई ट्रान्स हार्बर हा महासेतू पुर्ण होण्यासाठी जवळ जवळ ७ वर्षाचा कालावधी लागलेला आहे. या ७ वर्षामध्ये अनेक तज्ञ अभियंत्यांनी, सल्लागारांनी व कुशल कारागीरांनी अत्यंत अवघड, अनेक नैसर्गिक संकटावर व परिस्थितीवर मात करत नोव्हेंबर २०२३ अखेर पर्यंत देशातील पहिला सर्वात लांब सागरी सेतू लोकांच्या सेवेत रूजू करणार आहेत तसेच या संपूर्ण महासेतूचे महा काय अर्ध मॅराथॅान बांधकाम अभियांत्रिकी क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी मे. एल ॲंड टी ने हाती घेतलेले आहे आणि म्हणूनच मायबाप सरकारने सुध्दा अगदी अश्याच प्रकारची अथक मेहनत व परिश्रम करून महाराष्ट्रात विकासाचे सेतू उभारणे गरजेचे आहे तरच बेरोजगारी आटोक्यात येईल.
११ डिसेंबर २०२२ रोजी समृद्धी महा मार्गावर सुद्धा चक्रधराचे म्हणजेच चतुर मोटार चालकाचे काम उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करून पंतप्रधान मोदी यांच्या शुभ हस्ते स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे समृद्धी महा मार्गाच्या पहिल्या ५२० किमीच्या टप्प्याचं लोकार्पण केले. आता २५ मे २०२३ रोजी शिवडी-न्हावा शेवा ह्या सागरी महासेतूचे चाचणी परिक्षण करतांना सुद्धा उपमुख्यमंत्री यांनीच गाडी चालवली मग आता महाराष्ट्राच्या विकास रथाचे सुद्धा सार्रथ्य देवेंद्र यांनी करून गुजरातकडे प्रयाण न करता महाराष्ट्रभर विविध वैविध्यपूर्ण सेतुच्या माध्यमातून महाराष्ट्राला जागतिक पातळीवर अग्रेसर कधी बनवतात याकडे सर्व महाराष्ट्रवासियांचे लक्ष लागलेले आहे. सर्व राजकीय पक्षांनी आणि विविध क्षेत्रातील दिग्गज व तज्ञ मंडळींनी शिवडी-न्हावा शेवा सागरी महा सेतुसारखे एकसंध होऊन व खेळीमेळीने हातात हात घालून मुंबई, नागपूर, नवी मुंबई, पुणे तसेच नाशिक व संभाजीनगर इत्यादी शहरामध्ये विकासाचा, उत्कर्षाचा, पर्यटनाचा, संस्काराचा, औैद्योगिकीकरणाचा व रोजगाराचा सेतु लवकर बांधून सेतु निघाले शहरे जोडायला हे अभियांत्रिकी शीर्षक मानवाच्या दैनंदिन व्यावहारिक जीवनामध्ये शत प्रतिशत सार्थ करण्यासाठी राज्यकर्त्यानी ,विकास कर्त्यांनी तसेच रहिवाश्यांनी सुद्धा मनामध्ये सम विचाराचे ,सहकार्याचे व आर्थिक मदतीचे सेतु उभारले पाहिजेत.