जीवनाकडे पाहण्याची अत्यंत व्यापक दृष्टी म्हणुन. शेती वाचवा, गावाकडे चला, वसुंधरा वाचवा, पर्यावरण वाचवा असे आपण नेहमी म्हणत असतो. मात्र त्याचा नेमका अर्थ यातूनच व्यक्त होतो आहे. म्हणुनच हृषीकेश माझ्यासाठी सेलिब्रिटी आहे.
राजन इंदुलकर
हृषीकेश: द सेलिब्रिटी असे सेलिब्रिटी हल्ली अभावानेच भेटतील. किंबहुना फारसे नसतीलच.
म्हणुनच काल संध्याकाळी हृषिकेश पहिल्यांदाच घरी आला आणि तो निघताना त्याच्यासोबत फोटो काढण्याचा मोह मला झाला. मल्हारकडून त्याच्याबद्दल आधी ऐकले होते. या तासभराच्या भेटीने ते ‘ऐकीव’ मनात कोरले गेले.
पुण्यातील सधन, सुखवस्तू कुटूंबातील हा तरुण पाच वर्षापूर्वी कोकणातील एका गावात राहायला आला. त्यापूर्वी त्याने अहमदाबाद ते जम्मू अशी २५ दिवसांची सायकल यात्रा केली होती. या प्रवासातून त्याला आत्मभान आणि समाजभानाचा आविष्कार झाला असावा.
तो संख्याशास्त्रातील पदवीधर आहे. वाचन आणि लेखन हा त्याचा मुख्य छंद आहे. एक दोन पुस्तके लिहिली आहेत, लिहीत आहे. साधी राहणी, उच्च विचारसरणी ही त्याची जीवनशैली आहे.
मुख्य म्हणजे तो स्वतःच्या चरितार्थासाठी लोकांकडे मजुरीची कामे करतो. सध्या येथिल गावातून अशा अकुशल कामाच्या मजुरीचा दर ४०० रूपये आहे. ज्यात तो आपला खर्च भागवतो.
खरं तर आपल्याकडे थोडे फार शिकल्यावर शहरात जाऊन पांढरपेशी चरितार्थ करणे हीच जन-रीत आहे.
मजुरी, शारीरिक अंगमेहनत अशी कामे अगदी नाईलाज म्हणुन किंवा नशिबी आलंय म्हणुनच केली जातात. अशी मजुरीची कामे करणारा वर्ग समाजातील शेवटचा, अशिक्षित, पीडित, उपेक्षित, अत्यंत गरीब असा घटक मानला जातो.
अशी अंगमेहनत करावी लागणाऱ्या पालकांच्या मुलांना, तुमचे आई-बाप त्यांचे दुर्भाग्य म्हणुन अशी कामे करीत आहेत. तुम्ही तसे न करता, शिकून मोठे व्हा… (म्हणजे मजुरी न करता पांढरपेशी कामे करा) असे पदोपदी सांगितले जाते.
अगदीच झाले तर स्वतःच्या जमिनीत, व्यवसायात अंगमेहनत करणे हे लोकांना समजू शकते.
पण गावातील शेतकऱ्यांकडे जाऊन बांध बंदस्ती, लाकूड फाटा, भात लावणी अशी मजुरीची कामे चरितार्थ म्हणुन जाणीव पूर्वक स्वीकारणे, तेही असंख्य पांढरपेशी पर्याय खुले असताना…
याला निव्वळ वेडेपणाच म्हणता येईल.
खरं तर अशा वेडेपणांची आज नितांत गरज आहे. चाकोरीबद्ध विचार करणाऱ्यांना हे पटणार नाही.
मला मात्र हा वेडेपणा म्हणजे मानवी जीवन शैलीतील अनमोल असा अपारंपारिक ऊर्जा-स्त्रोत वाटतो. जीवनाकडे पाहण्याची अत्यंत व्यापक दृष्टी म्हणुन. शेती वाचवा, गावाकडे चला, वसुंधरा वाचवा, पर्यावरण वाचवा असे आपण नेहमी म्हणत असतो. मात्र त्याचा नेमका अर्थ यातूनच व्यक्त होतो आहे. म्हणुनच हृषीकेश माझ्यासाठी सेलिब्रिटी आहे.