July 27, 2024
Book Review of Sadanand Pundpal Vara Gai Gane
Home » बालविश्वाला भुरळ घालणारा कवितासंग्रह
काय चाललयं अवतीभवती

बालविश्वाला भुरळ घालणारा कवितासंग्रह

कवितासंग्रहातील कवितारूपी वारा जेंव्हा बालमुखातून गाणे गुणगुणायला लागेल तेंव्हाच मुलांच्या चेहऱ्यावर सदानंद दिसून येईल हे निश्चित. दुरापास्त होत जाणाऱ्या नात्यातल्या माणसांवर प्रेमाची हळूवारपणे फुंकर घालत आजा, आजी, मामा, मामी यांच्यासह भेटणारे आजोळ स्वर्गसुख देते. अशा अनुभवप्रधान कवितेतून बालमनावरील संस्काराचा ठेवा मजबूत करण्याचा केलेला कविंचा छोटासा प्रयत्न फारच मोलाचा ठरतो.

बा.स.जठार

गारगोटी
मोबाईल – 9850393996

सदानंद पुंडपाळ यांचा वारा गाई गाणे हा बालकवितासंग्रह बालचमुंसाठी चाळीस कवितांची मेजवानी आहे. राणी माशी, कामकरी माशा आणि सैनिक माशा अशा विविध स्तरातून बांधलेलं मधमाशीचं घर जाणून घेताना कवि मुलांना गोड गोड मधाची गोडी चाखायला देतात. मुलाचा वाढदिवस म्हणजे बालगोपाळांचा मेळाच असतो. सशाचा बर्थडे या कवितेतून असाच चितारलेला पशूपक्ष्यांचा मेळा मुलांना आपापल्या वाढदिवसाची आठवण करून दिल्याशिवाय राहणार नाही. सकाळी सकाळी भरलेली कावळे गुरूजींची शाळा वाचताना मुलांच्या मनाची उत्सुकता वाढत जाते. कवितेचा शेवट करताना कवि लिहीतात की,
सर्वांनाच व्हायचे होते
लवकर लवकर साक्षर
आनंदाने गिरवू लागले
छान छान अक्षर

या शेवटच्या कडव्यातून बालमनावर योग्य असा संस्कार करत बालकवितेचे इच्छित साध्य झाल्याचे जाणवून येते.

यमकप्रधान शब्दांची सुयोग्य जोडणी

ढगातल्या म्हातारीच्या जात्यातून गळणारा पाऊस आनंदी आनंद गडे… या कवितेची आठवण करून देतो. मोगरीच्या वेलीला तायडीचे दर्शन न झाल्याने मोगरीची फुले या कवितेत रेखलेले त्यांचे रुसवे – फुगवे हे बालमनाची प्रतिकृती चित्रीत करतात. यमकप्रधान शब्दांची सुयोग्य जोडणी करत सुसाट धावणाऱ्या आगगाडीतून दिवाळीची सुट्टी अनुभवताना दुरापास्त होत जाणाऱ्या नात्यातल्या माणसांवर प्रेमाची हळूवारपणे फुंकर घालत आजा, आजी, मामा, मामी यांच्यासह भेटणारे आजोळ स्वर्गसुख देते. अशा अनुभवप्रधान कवितेतून बालमनावरील संस्काराचा ठेवा मजबूत करण्याचा केलेला कविंचा छोटासा प्रयत्न फारच मोलाचा ठरतो.

आजाआजीचे अस्तित्व ही सुखाची खाण

हल्ली मुलांच्या स्वप्नात पुस्तक येणं फारच कठीण आहे. पण कवींनी स्वप्नात आले पुस्तक या कवितेत पुस्तकातून मिळणाऱ्या माहितीचा ओसंडून वाहणारा झरा बालमनावर कोरण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांच्या या कृतीतून अभ्यासापासून परावृत्त होत जाणारी बालशक्ती इच्छित स्त्रोताकडे वळेल,अशी आशा बाळगण्यास काहीच वावगे ठरणार नाही.

घरातील आजाआजीचे अस्तित्व ही सुखाची खाण असल्याचे बालमनावर बिंबवताना कवि लिहीतात,
आजोबा सांगती गोष्टी छान
ऐकतो आम्ही देऊन कान
आजी आजोबा सुखाची खाण
ठेवतील सारेच त्यांचा मान

वाऱ्याच्या गाण्याने मातीतल्या बी चे होणारे रोपटे, खुदकन हसणारे आणि अलगद ताईच्या वेणीत बसणारे गुलाबाचे फूल, आकाशाच्या दारी बांधलेले इंद्रधनुष्याचे तोरण यातुन पर्यावरण अभ्यासाबरोबर रिकामी झालेली बालमनाची आनंदझोळी आपसूकच भरून निघते. प्राण्यांची मॅच या कवितेतून धम्माल मज्जा अनुभवास येते.

पाठीवरचा भार बालपण हरवून घेतोय ?

सिमेंटच्या जंगलामुळे हद्दपार होणाऱ्या चिऊला साद घालत कविने बालमनावर घातलेली भूतदयेची झालर वाखाणण्याजोगी आहे. पावसाची चाहूल लागताच नाचणारा मोर, बागेतील विविध वेलींचं फुलणं, यातून मिळणारे संकेत कवितेतून सहजपणे बालमनात प्रवेश करतात. उन्हाळ्याच्या सुट्टीत सुखावह ठरणारा मामाचा गाव, गावच्या जत्रेत जमणारे फुगेवाले, घोडेवाले, जादूगार, विदुषक या सर्वांतून दिवस कधी सरतो हेच कळत नाही. यातून मिळणारा अवर्णनीय आनंद व्यक्त करताना कवि लिहीतात,
आनंद काय सांगू तुला मित्रा
वाटते रोजच हवी एक जत्रा
फिरता फिरता वाजती पाच
शाळेचा नसतो मुळीच जाच

शाळा, क्लास, अभ्यासाची स्पर्धा या सर्वांतून असह्य होणाऱ्या बालकांच्या पाठीवरचा भार बालपण हरवून घेतोय की काय अशी भीती व्यक्त करताना कवि लिहीतात,
म्हणती कसे, लहाणपण देगा देवा
मुंगी साखरेचा रवा
आमचे लहाणपण यांनी केलेय
कडू कडू दवा

राणीची भेट, मित्र आमचा छान या मजेशीर कविताबरोबर खेड्यातली मजा यातून गावाचं गावपण अनुभवण्यास मिळते. जगाची खबरबात देणाऱ्या पुस्तकाची खरा मित्र या कवितेतून करून दिलेली ओळख बालकांचे वाचनवेड वाढवण्यास मदत होईल असे वाटते.

सायकलची तुलना इंद्रधनुच्या चाकाशी

मुलांना सायकलचे फारच आकर्षण असते. त्या सायकलची तुलना इंद्रधनुच्या चाकाबरोबर करून मुलांना आकाशातल्या घरात राहण्याची आशा दाखवताना माझी सायकल या कवितेत कविने शब्दांची संगत योग्यप्रकारे मांडलेली आहे. आमचा टी. व्ही. या कवितेत प्रत्येकाच्या आवडीनिवडीच्या कार्यक्रमांची मजेशीर मांडणी करत असताना बालमनोरंजनाबाबत कुठेही कमतरता भासू दिलेली नाही.
यमकप्रधानतेत नकळत झालेली कमतरता सोडल्यास आकर्षक छपाई, आशययुक्त मुखपृष्ठ, सचित्रपणा यामुळे पुस्तक वाचनीय झाले आहे. या कवितासंग्रहातील कवितारूपी वारा जेंव्हा बालमुखातून गाणे गुणगुणायला लागेल तेंव्हाच मुलांच्या चेहऱ्यावर सदानंद दिसून येईल हे निश्चित.

पुस्तकाचे नाव – वारा गाई गाणे
कवि – सदानंद पुंडपाळ
प्रकाशक – इसाप प्रकाशन, नांदेड
पृष्ठे – 48
किंमत – 75 रुपये.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

जीवनावर मार्मिक भाष्य करणाऱ्या कविता – आईचा हात

तळमळ वाचन चळवळ रुजवण्याची…

हाफ तिकीट

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading