April 1, 2023
awake-shri-ram-on-gudipadwa
Home » राम जागवा…
मुक्त संवाद

राम जागवा…

तुमच्यातल्या रावणाचे दहन तुम्हीच करा आणि त्या आतल्या रामाला  जागवा आणि सुखी व्हा. मनातला राम जागवण्यासाठी निमित्त गुढीपाडव्याचे. तेव्हा एकच संकल्प करु या मनामनातला राम जागवण्याचा आणि जपण्याचा.

सौ सुनेत्रा विजय जोशी

रत्नागिरी

गुढीपाडवा…. नवीन मराठी वर्षाची सुरुवात. आनंदोत्सव साजरा केला पाहिजे. आज प्रभू श्रीराम रावणाचा वध करून अयोध्येत परत आले. त्याच्या स्वागतासाठी नगरवासीयांनी गुढी तोरणे लावून नगराची सजावट केली..असे आपण रामायणात वाचले आहेच. तर रामायण हे प्रत्येक युगात घडतेच. जसे महाभारत युगानुयुगे सुरूच आहे. आजही द्रौपदी वस्त्रहरण चालूच आहे. पण तेव्हा दुर्योधन एक होता. आता अनेक दुर्योधन सज्ज झाले आहेत. एकटा श्रीकृष्ण कुठे कुठे धावणार…तसेच दहातोंडी रावण शंभरतोंडी झालाय. त्यामुळे एका रामाने त्याचा नाश कसा होणार ? त्यामुळे अनेक राम निर्माण व्हायला हवेत.

सत्याकडून असत्याचा नाश

रामायणाची रामकथा तशीच सुरू आहे. सीतेला आजही कपटाने पळवले जाते. सीतेवर संशय आजही घेतला जातो. रामाला वनवास आजही आहेच. ही लढाई फक्त राम रावणाची नाही, तर सत्य असत्याची आहे, खरे खोट्याची आहे. अर्थात विजय हा सत्याचाच होतो हे खरे असले तरी तो शेवट येण्यासाठी आधी नव्व्याण्णव घाव सहन करावे लागतात. मग असत्याची शंभरी भरते. पण…सुधारण्यासाठी अनेक संधी देऊनही काही जण त्या वाईट प्रवृत्तीला सोडत नाही आणि मग राम नावाच्या सत्याला असत्याचा नाश करावाच लागतो.

मानवाचे आदर्श रुप

खूप जण नास्तिक असतात. तर ठीक आहे, पण राम म्हणजे देव असे जरी मानत नसाल तरी ते एक आदर्श व्यक्तिमत्त्व आणि मानवाचे आदर्श रुप आहे. राम आणि रावण हे प्रत्येकाच्या मनात असतातच. वाईट प्रवृत्ती जास्त प्रमाणात असेल तर तो रावण. आणि सद् प्रवृत्ती जास्त प्रमाणात असेल तर तो राम. आपण म्हणतो अगदी देवमाणुस आहे. किंवा आलास मोठा सत्यवचनी राम.. असे उपरोधाने बोलत असलो तरी सत्य वचनी म्हटले की रामच आठवतो आणि रावणासारखा दुष्ट आहेस अगदी असेही बोलतो.

वानरसेना अन् नवविचारांचा पूल

आता हे तर तुमच्यावर आहे की तुम्ही कुणाला पोसून वाढवता. तसेच कान फुंकणाऱ्या मंथरा तर पावलोपावली भेटतात. पण मनातला राम जागा असेल तर बुध्दी भ्रष्ट होणार नाही. रावण हा सहज पोसला जातो. त्यासाठी काही प्रयत्न करावा लागत नाही. कारण माणसाला नेहमीच पटकन लागणारी लाॅटरी किंवा शाॅर्टकट आकर्षक वाटतात. पण राम पोसण्यासाठी तुम्हाला खूप प्रयत्न पुर्वक वागावे लागते. मातापित्यांची सेवा आणि आज्ञापालन तसेच एकवचनी, सत्यवचनी असे अनेक बिरुदे मिळविण्यासाठी स्वतःला बदलावे लागते. संघटीत होऊन वानरसेना..म्हणजे चांगल्या विचारांचे लोक सोबतीला घेऊन आणि नवविचारांचा पूल बांधून या सगळ्या वाईट शक्तीचा नाश करावा लागेल. पण रामाचा विजय आणि रावणाचे दहन हे त्रिकालाबाधित सत्य आहे.

चला संकल्प करूया…

कारण तो नसेल तर मग जगण्यात काही राम नाही.. असे होते. तसेच शेवटी त्याने राम म्हटले असे आपण म्हणतोच ना ? या रामाच्या वाटेकडे आपण सगळे डोळे लावून वाट बघतोय. पण तो आपल्यातच आहे फक्त त्याला जागवायला हवे हे न कळून युगानुयुगे तसेच अन्याय सहन करीत राहतो. त्यापेक्षा तुमच्यातल्या रावणाचे दहन तुम्हीच करा आणि त्या आतल्या रामाला  जागवा आणि सुखी व्हा. मनातला राम जागवण्यासाठी निमित्त हे गुढीपाडव्याचे. तेव्हा एकच संकल्प करु या मनामनातला राम जागवण्याचा आणि जपण्याचा.

जय श्रीराम

Related posts

हरिश्चंद्राची फॅक्टरीः झाडीबोली साहित्य चळवळ समृद्ध करणाऱ्या जीवनयोध्याचा प्रवास

लाईक अन् कमेंट्स…

मनोरंजन करणाऱ्या विविध ढंगांच्या कथा

Leave a Comment