तिचा मोबाईल सतत खणखणत होता, घरच्या लॅंडलाईनलाही जरा बरे दिवस आले होते. तो ही अंग झटकून स्वास्तित्वाची जाणीव करून देत होता. टिव्हीत तर ती सतत झळकत होती. रिमोटवर दोन पिढ्यांपासून भारी प्रेम असणाऱ्या त्या वाघाला आता काहीच करता येत नव्हतं. कारण रिमोट जरी त्यांच्या हाती असला तरी चॅनल कुठलाही लावला तरी समोर वाघीण होती
संजय पाठक
पेपरात पहिल्या पानावर फोटो झळकल्यामुळे वाघीण सुखावली. गेल्या 18 दिवसांच्या तिच्या झुंजीला अखेर यश आलं. सत्तेतील वाघाला विरोधातील वाघीणीनं आस्मान दाखवलं. सोशल मिडियावर अपेक्षेप्रमाणे मिम्स फिरत होते, तिची स्तुती होत होती. एकटी वाघीण, नावाप्रमाणे वागणारी, दणकेबाज प्रेस घेणारी, मंत्र्याची विकेट घेणारी, तीन मोठ्या राजकीय पक्षांशी एकहाती लढणारी अशी विश्लेषणं लावून तिचं सर्वत्र कौतुक होत होतं. नावातच वाघ असल्याने तिलाही जरा बरं वाटत होतं.
तिचा मोबाईल सतत खणखणत होता, घरच्या लॅंडलाईनलाही जरा बरे दिवस आले होते. तो ही अंग झटकून स्वास्तित्वाची जाणीव करून देत होता. टिव्हीत तर ती सतत झळकत होती. रिमोटवर दोन पिढ्यांपासून भारी प्रेम असणाऱ्या त्या वाघाला आता काहीच करता येत नव्हतं. कारण रिमोट जरी त्यांच्या हाती असला तरी चॅनल कुठलाही लावला तरी समोर वाघीण होती. एकूणच काय आजि सोनियाचा दिनु । वर्षे अमृताचा घनु ।। अशीच तिच्या मनाची, घराची अवस्था होती. मनात उत्साहाचा, यशाचा, हर्षोल्हासाचा ऑक्सिजन भरल्याने तिचं मन वर वर उडत होतं. तिला मिळालेले फुलांचे बुके तनमन आनंदी करत होते. घरासह पक्ष कार्यालयाबाहेरील बॅंडबाजा, कार्यकर्त्यांचा जल्लोष कानावर पडत होता. हल्ली थोडा नव्हे बराचसा बॅकफूटवर गेलेल्या तिच्या पक्षाला पुन्हा आनंदोत्सवाचे क्षण वाट्याला आले होते.
आधी विधान परिषद निवडणुकीत झटका, नंतर ग्रामपंचायत निवडणुकीत फटका त्यानंतर सांगली महापालिकेतील महापौर निवडणुकीतील धक्का…. असं नको नको ते तिच्या पक्षाला सहन करावं लागलं होतं. पण आता अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तोंडावरच पक्षाला तिच्यामुळे उभारी मिळाली. पक्षाचे पहिल्या फळीतील चाणक्य नानासाहेब, दादासाहेब तिच्यावर फार, फार, फार्रर्रर्र खूष होते. त्यांनी वाघीणीच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजिला.
वाघीण पक्षकार्यालयाकडे निघणार इतक्यात समोर “किशोर’ वाघ आला. झालं… फुग्यातील हवा फस्सकन् जावी तसा वाघीणीचा आनंद गायब झाला. आनंदाची जागा आता चिंतेनं व्यापली, मनातील हर्षोल्हासाची जागा आता काळजीनं घेतली. तिच्या डोळ्यासमोर नाचू लागले ते परळचे महात्मा गांधी रूग्णालय… तेथील रेकॉर्ड विभाग… लाचलुचपत खात्याच्या अधिकाऱ्यांनी घातलेला छापा… अन् बरंच काही…! काय करणार नानासाहेब, दादासाहेबांच्या खेळीचा रिमोट आता सत्तेतल्या वाघाच्या हाती होता नं….!! रिमोट हाती असला म्हणजे “म्यूट’ करणं कधीही शक्य असतं…!!!