July 27, 2024
india alliance -eclipsed-in-punjab-keralabengal
Home » इंडिया आघाडीला पंजाब, केरळ, बंगालमध्ये ग्रहण
सत्ता संघर्ष

इंडिया आघाडीला पंजाब, केरळ, बंगालमध्ये ग्रहण

राष्ट्रीय पातळीवर लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींची हॅटट्रिक रोखण्यासाठी दोन डझन विरोधी पक्ष इंडियाच्या बॅनरखाली एकत्र आले. ज्यांनी भाजपच्या विरोधात आघाडी स्थापन करण्यासाठी पुढाकार घेतला तेच बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे आघाडीतून बाहेर पडले व थेट भाजपच्या तंबूत जाऊन बसले.

डॉ. सुकृत खांडेकर

येत्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला केंद्रात रोखण्यासाठी स्थापन झालेल्या इंडिया नामक विरोधी पक्षांच्या आघाडीला राज्या-राज्यांत तडे जात आहेत. लोकसभा निवडणूक महिना – दोन महिन्यांवर आली असताना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री व तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी तर राज्यातील सर्व ४२ मतदारसंघांत उमेदवारांच्या नावाची घोषणा करून काँग्रेस पक्षाला तुच्छ लेखण्याचा प्रयत्न केला आहे. खरे तर ममता बॅनर्जी यांचा पक्ष इंडिया आघाडीचा प्रमुख घटक पक्ष आहे, पण काँग्रेसला विचारात न घेता त्यांनी सर्व मतदारसंघात आपला पक्ष निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर करून जागावाटपाबाबत काँग्रेसला दरवाजे बंद करून टाकले आहेत.

ममता बॅनर्जी यांनी समोरासमोर बसून पश्चिम बंगालमधील जागावाटपाबाबत चर्चा करावी, असा प्रस्ताव काँग्रेसने दिला होता. पण आपल्याशिवाय पश्चिम बंगालमध्ये अन्य कोणाची ताकद नाही व आपल्याशिवाय भाजपचा पराभव अन्य कोणी करू शकत नाही, असा संदेश त्यांनी इंडिया आघाडीला दिला आहे. इंडिया आघाडीला तडे जाणारे पश्चिम बंगाल हे काही एकमेव राज्य नव्हे, तर अन्य राज्यांतही भाजप विरोधी आघाडीत धुसफूस चालूच आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधी पक्ष आपले जागावाटपही समाधानकारक करू शकला नाही, तर निवडणुकीच्या मैदानात बलाढ्य भाजपला इंडिया आघाडी सामोरी जाणार तरी कशी ?

राष्ट्रीय पातळीवर लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींची हॅटट्रिक रोखण्यासाठी दोन डझन विरोधी पक्ष इंडियाच्या बॅनरखाली एकत्र आले. ज्यांनी भाजपच्या विरोधात आघाडी स्थापन करण्यासाठी पुढाकार घेतला तेच बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे आघाडीतून बाहेर पडले व थेट भाजपच्या तंबूत जाऊन बसले. आता तर इंडियातील घटक पक्ष चर्चा होण्याअगोदरच आपले उमेदवार जाहीर करू लागले आहेत.

राहुल गांधी न्याय यात्रेत गुंतले आहेत, त्यांना लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाचे गांभीर्य नाही, काँग्रेसमध्ये अन्य कुणाला निर्णय घेण्याचे अधिकारही नाहीत, त्याचा परिणाम इंडियाला रोज नवीन भोके पडू लागली आहेत. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतील ७ जागांपुरता काँग्रेसशी समझोता केला, पण त्यांच्या आम आदमी पक्षातील पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी काँग्रेसबरोबर जागावाटप करण्यास साफ नकार दिला आहे. हीच परिस्थिती केरळमध्येही आहे. केरळात काँग्रेसला एकटेच लढावे लागणार आहे. केजरीवाल यांनी दिल्ली, गुजरात, हरयाणा येथे काँग्रेसशी समझोता केला, उत्तर प्रदेशमध्ये सपाचे मुलायम सिंह यादव तसेच बिहारमध्ये राजदचे तेजस्वी यादव यांनी काँग्रेसबरोबर जागावाटप केले. पण तसे अन्य राज्यांत घडताना दिसत नाही.

गेल्या वर्षी २३ जून २०२३ रोजी बिहारची राजधानी पाटणा येथे नितीश कुमार यांच्या पुढाकाराने भाजप विरोधकांची बैठक झाली. दोन डझन विरोधी पक्षांनी येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करण्याची प्रतिज्ञा केली. त्यात नितीश कुमार यांचा जनता दल युनायटेड हा सुद्धा पक्ष होताच. इंडिया आघाडीकडे कोणताही कॉमन मिनिमम प्रोग्रॅम नाही. कोणताही सामाईक अजेंडा नाही. इंडियातील घटक पक्ष हे प्रामुख्याने प्रादेशिक पक्ष आहेत व त्यांच्या प्रमुखांचे त्यांच्या पक्षावर कौटुंबिक वर्चस्व आहे. आपला पक्ष, आपले कुटुंब व आपले राज्य यापलीकडे त्यांना देशपातळीवर फारसे स्वारस्य नाही. म्हणूनच लोकसभा निवडणुकीसाठी एकत्र येण्यात आघाडीत कधी जोश दिसला नाही. बिहारमध्ये काँग्रेस – राजदला सोडून नितीश कुमार यांनी पुन्हा एनडीएमध्ये जाण्याचा निर्णय घेतला तेव्हाच इंडिया आघाडीला मोठे भोकं पडले हे सर्व देशाने पाहिले.

इंडिया आघाडीच्या बैठकीत ममता बॅनर्जी यांनी स्वत:च म्हटले होते की, पश्चिम बंगालमध्ये आपला पक्षच एकमेव दावेदार राहील… या राज्यात साम – दाम – दंड – भेद सर्व मार्गाने तृणमूल काँग्रेसने राज्याची सत्ता काबीज केली आहे. विरोधी पक्ष डोकं वर काढू नये याची तृणमूल काँग्रेस दक्षता घेत असते. ममता या सलग तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाल्या आहेत, कारण पक्षाला भक्कम बहुमत आहेच पण पक्षाची संघटन साखळीही मजबूत आहे. काँग्रेस, डाव्या आघाडीला तर तृणमूल काँग्रेसने राज्यात नेस्तनाबूत केले आहे, त्यांना पुन्हा उभे राहण्यासाठी ममता जागावाटपाच्या माध्यमातून संजीवनी कशासाठी देईल ?

पश्चिम बंगालमधील प्रदेश काँग्रेसच्या नेतृत्वाला ममता बॅनर्जी यांचे वर्चस्व मुळीच मान्य नाही, म्हणून खासदार अधीर रंजनपासून अन्य काँग्रेस नेते बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसबरोबर जाऊ नये, अशी सतत भूमिका मांडत होते. काँग्रेस हायकमांड मात्र तृणमूल काँग्रेसने आपल्याशी युती करावी, यासाठी प्रतीक्षा करीत राहिली. तृणमूल काँग्रेसशी युती म्हणजे ममता यांचे वर्चस्व मान्य करावे लागेल, अशी भावना प्रदेश काँग्रेस नेत्यांमध्ये आहे. केंद्रातील भाजपशी लढण्यापेक्षा राज्यातील तृणमूल काँग्रेसशी लढणे आवश्यक व महत्त्वाचे आहे, अशी भूमिका प्रदेश काँग्रेसची आहे. ममता यांनी १० मार्चला राज्यातील सर्व जागांवर आपले उमेदवार जाहीर केल्यानंतर काँग्रेसची अवस्था त्यांच्या श्रीमुखात भडकवल्यासारखी झाली. तृणमूल काँग्रेसबाबत काँग्रेसची अवस्था सांगता येत नाही व सहन होत नाही, अशी झाली आहे. राहुल गांधी मात्र न्याय यात्रेत व्यस्त आहेत.

केरळमध्ये काँग्रेस व डावी आघाडी यांच्या जागावाटपाबाबत एकमत होत नाही, असे चित्र आहे. डाव्या आघाडीने आपल्या उमेदवारांची यादी तयार केली आहे, तर दुसरीकडे काँग्रेसने राज्यात १६ जागा लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. ज्या राज्यात भाजपचा आधार नाही तेथेही इंडिया आघाडीमध्ये जागावाटपाची चर्चा समाधानकारक होत नाही. पंजाबमध्ये आम आदमी पक्षाला भक्कम बहुमताने राज्यात सरकार चालविण्याचा जनादेश आहे, म्हणूनच आम आदमी पक्ष सर्व जागा लढविणार, असे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी जाहीर केले आहे. मान यांच्या घोषणेने काँग्रेसला हात चोळत बसावे लागत आहे.

उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली भाजपची सत्ता आहे. या राज्यातील सर्व ८० जागा जिंकण्याचा संकल्प भाजपने बोलून दाखवला आहे. अशा वेळी आपला पक्ष टिकवणे हे सर्वच विरोधकांना महत्त्वाचे वाटते. म्हणूनच काँग्रेसला १७ जागा देऊन सपाने त्यांच्या मित्रपक्षासह ६३ जागा लढविण्याचा निर्णय घेतला आहे. बिहारमध्ये काँग्रेस व लालू यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलात (राजद) युती होणार आहे, पण कोण किती जागा लढवणार, हे चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.

झारखंडमध्ये काँग्रेस, जेएमएम व राजद यांची युती होण्यात फारशी अडचण दिसत नाही, तिन्ही पक्षांना भाजपा केंद्रात पुन्हा येणार या भयाने ग्रासले आहे. महाराष्ट्रात शरद पवार असल्याने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) व उबाठा सेना यांच्यात युती होईल, असे चित्र आहे. पण उबाठा सेनेने परस्पर उमेदवार जाहीर करणे सुरू केल्याने काँग्रेसचे स्थानिक नेते खवळले आहेत. शरद पवारांनी बारामतीतून सुप्रिया सुळे, तर उद्धव ठाकरे यांनी उत्तर – पश्चिम मुंबईतून अमोल कीर्तिकर यांची उमेदवारी घोषित केली. प्रकाश आंबेडकरांच्या वंचित आघाडीला कोणी – किती जागा द्यायच्या यावरून रोज धुसफूस बाहेर पडत आहे.

इंडिया आघाडीची सुरुवात मोठी गाजावाजा करीत झाली, नंतर प्रादेशिक पक्ष आपल्याच गुर्मीत व मस्तीत वागत असल्याने आघाडीत एकोपा असा दिसून येत नाही. आजही निवडणुका तोंडावर आल्या असताना इंडिया आघाडीत समन्वय नाही, नियमित चर्चा नाही. एखादा अपवाद वगळता समोरासमोर बसून तोडगा काढला
जात नाही.

भाजपने अब की बार ४०० पार असा संकल्प जाहीर केला आहे. भाजपने देशात ३७० खासदार निवडून आणण्याचे ध्येय निश्चित केले आहे. रोज प्रसिद्धी व प्रसार माध्यमांच्या सर्व आघाड्यांवर पंतप्रधान मोदी देशातील १४० कोटी जनतेला डोळ्यांसमोर दिसत असून, गेल्या १० वर्षांत जनकल्याणाच्या कोणत्या योजना राबवल्या सांगून ते खड्या आवाजात मोदी की गॅरेंटी देत आहेत. देशभर एकच पक्ष व एकच नेता सर्वत्र दिसत असताना इंडिया आघाडीचे दोन डझन पक्ष कुठे आहेत, त्यांचे नेते कुठे चाचपडत आहेत, आघाडीचे ब्रँड राहुल गांधी न्याय यात्रेतून बाहेर येऊन इंडियाची रणनीती ठरविण्यासाठी कधी सवड काढणार आहेत?


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

छुईमुई अर्थात लाजाळूचे झाड… आयुर्वेदिक महत्त्व

किल्ले काळानंदीगड…

Navratri Biodiversity Theme : लाल रंगातील जैवविविधतेची छटा…

1 comment

राजाराम कदम March 16, 2024 at 2:53 PM

लेख आवडला पण आघाडी हा शब्द योग्य नाही. स्वार्थी आणि लुटारू लोकांची टोळी असते. आघाडी ला काही तरी मूल्ये असतात. ह्यांना फक्त खोके आणि पेट्या हव्यात. यांच्यात अभ्यासू नेते नाहीत तर लबाड डॉन आहेत

Reply

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading