April 14, 2024
conservation-of-hornbill conference in Devrukh
Home » धनेश मित्र !
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

धनेश मित्र !

बालपणापासून धनेश हा पक्षी आम्ही पाहत आलो. आकाराने खूप मोठा, लांब आणि मोठी चोच , उडत असताना होणारा याच्या पंखांचा मोठा आवाज आणि ओरडायला लागल्यानंतर सहज लक्ष वेधून घेईल अशी जणू मोठी आरोळीच ! कोकणात या पक्षाला वेगवेगळी नावे दिली गेली आहेत. माड गरुड, गरुड, धनेश, कोकणेर अशा नावांनी याची ओळख आहे. धनाचा ईश्वर तो धनेश ! धनेश पक्षाचे एकूण जीवन सखोल अभ्यास करावा असेच आहे. कोकणात उंच झाडावर यांचे वास्तव्य असते. पावसाळ्यात दारापुढे घातलेल्या गावठी भाज्यांच्या मांडवावर पडवळं लागली की , हा धनेश पक्षी आजूबाजूला येतो, असे आम्हाला बालपणी सांगितले जायचे.

आमचे आंबेड खुर्दचे घर जंगलात असल्याने आणि येथे खूप मोठी आणि जुनी झाडे असल्याने या झाडांवर आमच्या बालपणी धनेश पक्षांचे जोडीने वास्तव्य असलेले आम्ही पहिले आहे. आपल्या विष्ठेतून विविध प्रकारच्या बियांची सर्वत्र पखरण करणारा म्हणूनही धनेश पक्षाची ओळख आहे. कोकणात मोठ्या प्रमाणावर सुरू असणाऱ्या जंगलतोडीमुळे धनेशाची निवासस्थाने धोक्यात आली आहेत. यामुळे भविष्यात धनेश पक्षाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो अशी भीती व्यक्त केली जात आहे. यावर विचार विनिमय करून काही ठोस उपाययोजना आणि निर्णय घेण्यासाठी धनेश मित्र निसर्ग मंडळ आणि देवरुख मधील सह्याद्री संकल्प सोसायटी यांच्यावतीने देवरुख येथील आठल्ये – सप्रे महाविद्यालयात पहिले धनेश मित्र संमेलन शनिवारी २३ मार्च रोजी मोठ्या उत्साहात झाले. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर सांगली, सातारा येथील ५० पेक्षा अधिक धनेश मित्र या संमेलनात मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. कोकणात बेसुमार वाढलेली जंगलतोड, जळावू लाकडांची होणारी वाहतूक, वेगाने नष्ट होणाऱ्या देवराया, डोंगर उतारांना लागणारे वणवे अशा विविध कारणामुळे धनेश पक्षांचा अधिवास धोक्यात आला असल्याचा सूर या संमेलनातून उमटला. जेथे धनेश पक्षांचा अधिवास आढळला आहे, तो कसा जतन करता येईल आणि याबाबत लोक जागृती करून स्थानिकांना या उपक्रमात कसे सहभागी करून घेता येईल, याविषयीची चर्चा करून काही निश्चित धोरणे या संमेलनात आखण्यात आली.बालपणी ककणेर या पक्षाविषयी खूप काही ऐकले होते. अधून मधून धनेश पक्षांच्या जोड्या आजूबाजूला दिसत होत्या. या पक्षाविषयीचे अधिक माहिती मिळावी, यांचे अधिवास कसे असतात, प्रजनन कालावधी कोणता, धनेश पक्षी कोणत्या प्रकारचे खाद्य खातो ? अशा अनेक शंका मनामध्ये कायम होत्या. देवरुख येथे धनेश मित्र संमेलन आयोजित केल्याचे समजले आणि आपल्याला हव्या असणाऱ्या अनेक प्रश्नांची उत्तरे या संमेलनात नक्की मिळतील याची खात्री झाली. विविध अभ्यासक धनेश पक्षाविषयी आपली जी अभ्यासपूर्ण मते मांडत होते, ते ऐकून मी अक्षरशः मंत्रमुग्ध झालो. ध्येयवेडी मंडळी निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी किती झपाटून काम करतात, याची अनुभूती मला या धनेश मित्र संमेलनात आली. या कामाची व्याप्ती खूप मोठी असून यामध्ये पाचही जिल्ह्यातील निसर्गप्रेमी तसेच निसर्ग मंडळे यांचे सहकार्य लाभले, तर एकमेकांच्या हातात हात घालून आणि मार्गदर्शनाने हे काम नक्कीच अधिक सोपे करता येईल यासाठी पहिल्या धनेश मित्र संमेलनाचे देवरुख येथे केलेले आयोजन नक्कीच यशस्वी झाले असे म्हणावे लागेल.

धनेश मित्र संमेलनात उपस्थितांनी केलेल्या चर्चेतून, माहिती संकलनातून, उपाययोजनांबाबतच्या सूचना मधून जो काही दिवसभरातील सार काढण्यात आला, त्याचा एक संक्षिप्त अहवाल तयार करून तो शासनाला सादर केला जाणार आहे. खरंतर आजचे धनेश मित्र संमेलन ही एक सुरुवात होती. प्रथमच मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून सर्वांचाच उत्साह वाढला असून आज ५० च्या संख्येत असणारी उपस्थिती पुढील वेळी नक्कीच दुप्पट होईल असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला. आजच्या धनेश मित्र संमेलनाला आलेला प्रत्येक निसर्गप्रेमी, आपल्याला निसर्गासाठी, धनेश पक्षासाठी अंतर्मनापासून काय करता येईल ? या एकाच ध्येयाने झपाटला होता असे दिसून आले. प्रत्येकाच्या मनामध्ये असणारी धनेशाचे अधिवास सुरक्षित करण्यासाठीची तळमळ वेळोवेळी त्यांच्या बोलण्यातून दिसून येत होती. निसर्ग हा दाता आहे. या दात्याचे हात हातात घेऊन चालले पाहिजे. मात्र स्वार्थाने झपाटलेला माणूस निसर्गाला ओरबाडत सुटला आहे. निसर्गप्रेमींनी निसर्गाच्या संरक्षणासाठी आपले तन-मन-धन खर्च करायचे आणि दुसऱ्या बाजूला निसर्गाला ओरबाडणाऱ्या मंडळींनी निसर्ग उजाडबोडका करायचा, हे आता तातडीने थांबले पाहिजे.

धनेश पक्षी हा भारतातील केरळ आणि अरुणाचल प्रदेश मध्ये आढळतो. म्यानमार मधील चिन राज्याचा धनेश हा राज्य पक्षी आहे. तसेच भारतात पक्ष्यांवर संशोधन करणाऱ्या अग्रणी संस्था बी. एन. एच. एस या संस्थेचे धनेश मानचिन्ह आहे. या पक्ष्यांची चोच फार मोठी व शिंगासारखी असल्यामुळे यांना इंग्रजी भाषेत हॉर्नबिल हे नाव दिलेले आहे. या पक्ष्यांचे एकंदर स्वरूप असामान्य असते. ब्यूसेरॉटिडी या पक्षिकुलात यांचा समावेश केलेला आहे. आफ्रिकेत सहाराच्या दक्षिणेस व दक्षिण आशियात भारतापासून फिलिपाईन्स बेटांपर्यंत ते आढळतात. पण ऑस्ट्रेलियात मात्र ते नाहीत यांच्या एकूण सु. ४५ उपजाती आहेत. भारतात धनेशाच्या पाचसहा जाती आहेत. यांपैकी मोठा धनेश (ग्रेट हॉर्नबिल) सगळ्यात मोठा असून त्याचे शास्त्रीय नाव ब्यूसेरॉस बायकॉर्निस असे आहे. ही जाती पश्चिम घाटात मुंबईपासून कन्याकुमारीच्या भूशिरापर्यंत आणि हिमालयाच्या खालच्या रांगांमध्ये १,५२५ मी. उंचीपर्यंत आढळते. बाकीच्या जातींपैकी करडा धनेश वा सामान्य धनेश ही जाती फक्त भारतातच आढळणारी असून तिचे शास्त्रीय नाव टॉकस बायरोस्ट्रीस असे आहे. हिमालयाच्या पायथ्यापासून खाली सगळीकडे (मलबार किनारा, थोडा राजस्थान व आसाम वगळून) ती आढळते. बाकीच्या जाती वेगळ्या भागांत आढळतात.

मोठ्या धनेशाची लांबी सुमारे १३० सेंमी. असते. डोके, पाठ छाती वा पंख काळे असून पंखांवर आडवा पांढरा पट्टा असतो. मान व पोट पांढरे असते, शेपटी लांब व पांढरी असून तिच्या टोकाजवळ काळाआडवा पट्टा असतो. नराचे डोळे तांबडे व मादीचे पांढरे असतात. चोच मोठी मजबूत बाकदार व पिवळी असते, डोके आणि चोचीचे बूड यांवर एक मोठे शिरस्त्राण असते, त्याचा रंग पिवळा असून वरचे पृष्ठ खोलगट असते, पायांचा रंग काळपट असतो. हा अरण्यात राहणारा पक्षी असून फार मोठ्या व उंच झाडांवर लहान थवे करून ते राहतात. याच्या असामान्य स्वरूपामुळे तो सहसा नजरेतून सुटत नाही. उडत असताना याच्या पंखांचा होणारा आवाज दीड किमी. वर तरी ऐकू जातो. झाडावर स्वस्थ न बसता हे ओरडून गोंगाट करीत असतात. फायकस कुलातील वड, पिंपळ अशी फळे हा जरी यांचा मुख्य आहार असला, तर ते किडे, सरडे किंवा इतर अन्न खात असल्यामुळे त्यांना सर्वभक्षी म्हणता येईल. फळे किंवा इतर खाद्यपदार्थ खाण्याची यांची रीत मोठी विलक्षण आहे. ते पदार्थ चोचीने वर उडवून आ वासतात व तो घशात पडला म्हणजे गिळतात. याच्या विचित्र शिरस्त्राणाच्या उपयोगाविषयी काहीही माहिती नाही. ते भरीव नसून त्याचा आतला भाग स्पंजसारखा असल्यामुळे ते हलके असते.

मोठ्या धनेशाच्या प्रजोत्पादनाचा काळ जानेवारीपासुन एप्रिलपर्यंत असतो. या काळातले याचे एकंदर वर्तन करड्या धनेशासारखेच असते. करडा धनेश घारीएवढा असून त्याची लांबी सु. ६० सेंमी. असते. दिसायला हा बेढब असतो. वरचा भाग तपकिरी करड्या रंगाचा असतो. शेपटी लांब, निमुळती व तपकिरी रंगाची असते. शेपटीतील प्रत्येक पिसाच्या टोकाजवळ काळा पट्टा असतो. व टोक पांढरे असते, छाती करड्या रंगाची व पोट पांढरे असते. चोच मोठी बाजूंनी चपटी, वाकडी व काळी असते आणि तिच्यावर टोकदार नळकांड्यासारखे शिरस्त्राण असते. हा पूर्णपणे वृक्षवासी असून विशेष दाट झाडी नसलेल्या प्रदेशातील मोठ्या जुनाट झाडांवर राहतो. कधीकधी बागांत किंवा झाडीतही तो दिसतो. यांचे लहान थवे असतात. निरनिराळ्या प्रकारची फळे, कोवळे कोंब, किडे, सरडे, उंदराची पिल्ले ते खातात. यांना फार जोराने उडता येत नाही. यांचा आवाज किंचाळल्यासारखा असून घारीच्या आवाजाची आठवण करून देतो. यांच्या विणीचा हंगाम एप्रिल ते जून असतो. मादी २-३ पांढरी अंडी घालते. या हंगामातले यांचे आणि बाकीच्या बहुतेक धनेशांचे वर्तन असामान्य असते.धनेश पक्षात प्रियाराधनानंतर नर मादीचा जोडा जमतो. अंडी घालण्याच्या सुमारास मादी एखाद्या उंच झाडाच्या खोडातल्या तीन मी. पेक्षा जास्त उंचीवर असलेल्या ढोलीत जाते. ही ढोली यांचे घरटे होय. स्वतःची विष्ठा आणि नराने आणलेला चिखल यांच्चया मिश्रणाने ती ढोलीच्या कडा लिंपते.चोच आतबाहेर करता येईल एवढीच उभी फट त्यात ठेवते. मादी या वेळी खरीखुरी बंदिवान होते. नर वरचेवर खाद्यपदार्थ आपल्या चोचीतून आणतो आणि ती फटीतून चोच बाहेर काढून ते खाते. पिल्ले सुरक्षित बाहेर पडेपर्यंत घास तिला भरवावे लागत असल्यामुळे नर या जास्त श्रमांमुळे रोडावतो, पण मादी चांगली गुबगुबीत होते. बंदीवासात असताना मोठ्या धनेशाच्या मादीची पिसे गळून पडतात व नवी उगवतात. पिल्ले १५ दिवसांची झाल्यावर मादी ढोलीवरील लिंपण चोचीने फोडून बाहेर पडते, पण पिल्ले आतच असतात. सामान्यतः बाहेर पडल्यावर मादी दार पुन्हा लिंपून टाकते. त्यानंतर पिल्ले मोठी होऊन बाहेर येईपर्यंत नर आणि मादी दोघे त्यांना भरवतात.

धनेशाच्या अधिवासाचे पुनरुज्जीवन करणे आवश्यक आहे. कोकणातील धनेश पक्ष्यांच्या संवर्धनासाठी त्याच्या ढोल्यांचे संरक्षण आणि नोंदणी, अधिवासाचे पुनरुज्जीवन, खाद्यफळांच्या वृक्षांची लागवड, खाजगी जागेतील धनेश पक्ष्यांच्या ढोल्यांचे संवर्धन आणि जनजागृती या पातळ्यांवर काम करणे आवश्यक असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

देवरुखमधील आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयातील एस. के. पाटील सभागृहात झालेल्या महाराष्ट्रातील पहिल्या धनेशमित्र संमेलनाला ‘नेचर काॅन्झर्वेशन फाऊंडेशन’ आणि ‘गोदरेज कन्झुमर प्रोडक्ट्स लिमिटेड आणि एन वी इको फार्म’ यांनी अर्थसहाय्य पुरवले. संमेलनाच्या उद्घाटनाच्या प्रसंगी व्यासपीठावर ‘देवरुख शिक्षण संस्थे’चे अध्यक्ष सदानंद भागवत, ज्येष्ठ वन्यजीव संशोधक भाऊ काटदरे, ए.एस.पी महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. नरेंद्र तेंडोलकर, रत्नागिरीचे मानद वन्यजीव रक्षक निलेश बापट, ‘नेचर काॅन्झर्वेशन फाऊंडेशन’चे वन्यजीव संशोधक डॉ. रोहित नानिवडेकर आणि वनस्पती अभ्यासक डॉ. अमित मिरगल हे उपस्थित होते.

कोकणात ककणेर म्हणून ओळख असलेल्या या पक्ष्याच्या संवर्धनासाठी दीर्घकालीन उपाययोजना करणे आवश्यक आहे. कोकणात केली जाणारी निसर्गाची पूजा हीच वन्यजीव संवर्धनाचा पाया आहे.

सदानंद भागवत

‘सह्याद्री संकल्प सोसायटी’चे कार्यकारी संचालक प्रतीक मोरे यांनी संमेलनाच्या पहिल्या सत्रात कोकणातील धनेश पक्ष्यांच्या नोंदीविषयी माहिती दिली. सीसीटीव्ही कॅमेरा लावून देवरुखमध्ये धनेश पक्ष्यांच्या प्रजनन क्रिया कशा पद्धतीने नोदवल्या जात आहेत, याविषयी त्यांनी सविस्तर विवेचन केले.

डॉ. रोहित नानिवडेकर यांनी खुल्या स्वरूपाच्या चर्चासत्रामधून स्थानिकांना कोकणात धनेश पक्ष्यांच्या संवर्धनामध्ये असलेल्या आव्हानांविषयी बोलते केले. यावेळी स्थानिकांनी धनेशाला असलेल्या धोक्यांची यादी तयार केली. हवामान बदलामुळे घरट्यांवर होणारा प्रभाव तपासण्यासाठी वर्षांनुवर्षांच्या नोंदी आणि मोठ्या संख्येने धनेशाच्या घरट्यांचे निरीक्षण नोंदवणे आवश्यक आहे. हे निरीक्षण ‘सिटीझन सायन्स प्रोग्राम’अंतर्गत करता येऊ शकते, असे मत नानिवडेकर यांनी सत्राअंती मांडले.

या सत्रानंतर ‘महाएमटीबी’ आणि ‘द हॅबिटॅट्स ट्रस्ट’ निर्मित महाधनेश पक्ष्यावरील माहितीपटाचे सादरीकरण झाले. यावेळी तरुण भारतचे वरिष्ठ पर्यावरण प्रतिनिधी अक्षय मांडवकर उपस्थितांशी संवाद साधला. धनेश पक्ष्यांना असणाऱ्या धोक्यांवर मात करण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना करणे आवश्यक आहेत, यावर खुल्या स्वरुपातील चर्चा सत्र पार पडले. कमी वेगाने वाढणाऱ्या झाडांचे ‘इन-सिटू’ पद्धतीने संवर्धन करुन, वेगाने वाढणाऱ्या प्रजाती या धनेशाच्या अधिवास संवर्धनाच्या प्रकल्पामध्ये वापरणे आवश्यक असल्याचे मत वनस्पती अभ्यासक डॉ. अमित मिरगल यांनी मांडले.

धनेश पक्ष्यांच्या अधिवासाच्या पुनरुज्जीवनाविषयी नानिवडेकर यांनी प्रमुख मुद्दे मांडले. धनेशाच्या संवर्धनाच्या कामात येणारा सर्वात मोठा अडथळा म्हणजे स्थानिक झाडांच्या रोपांची उपलब्धता. मोठ्या संख्येने स्थानिक झाडांची रोपे तयार करणाऱ्या रोपवाटिकांना प्रोत्साहन देणे, हे धनेशाच्या अधिवास संवर्धनामध्ये महत्त्वाची भूमिका बजावू शकते, असे प्रतिपादन नानिवडेकर यांनी केले. त्यानंतर त्यांनी धनेशाचे छायाचित्र करताना कोणती तत्वे पाळावीत, याविषयी महत्त्वपूर्ण मुद्दे मांडले. सत्रादरम्यान धनेश पक्ष्यांविषयी वेगवेगळे खेळ पार पडले. धनेश संवर्धनाविषयी या संमेलनामधून नोंदवलेले प्रमुख मुद्दे हे सरकार दरबारी मांडण्यात येणार आहेत. सृष्टीज्ञान संस्था, देवरुख शिक्षण प्रसारक मंडळ, सह्याद्री निसर्ग मित्र – चिपळूण, एन व्ही इको फार्म गोवा, महाराष्ट्र वन विभाग आणि दैनिक मुंबई तरुण भारत, निसर्ग सोबती – रत्नागिरी यांच्या सहकार्याने हे संमेलन पार पडले.

कोकणात धनेश पक्ष्यांच्या संवर्धनासाठी काम करणाऱ्या व्यक्तींचा संमेलनामध्ये धनेशमित्र पुरस्काराने सन्मान करण्यात आला. देवळे गावातील धनेशमित्र भरत चव्हाण, डॉ. शार्दुल केळकर, डॉ. अमित मिरगल, राजापूरचे धनेशमित्र धनंजय मराठे, निसर्गाची राजदूत तनुजा माईन आणि पर्यावरण पत्रकार अक्षय मांडवकर यांचा ‘धनेशमित्र’ पुरस्काराने सन्मान करण्यात आला. तसेच कोंसुब, आंगवली, देवळे, देवडे, किरबेट, धामणी या ग्रामपंचायतींनी देखील धनेशाच्या संवर्धनासाठी पुढाकार घेतल्याने त्यांचा देखील सन्मान करण्यात आला. एकंदरीत हे एक दिवशीय धनेश मित्र संमेलन यशस्वी झाले असून यापुढील कालावधीत खरंतर कोकणातील प्रत्येक व्यक्तीने ‘ धनेश मित्र ’ बनण्याची खरी गरज आहे.

निसर्गाचे रक्षण करणे ही केवळ निसर्ग मित्र मंडळींची जबाबदारी नसून, निसर्गाचा होणारा ऱ्हासं रोखण्यासाठी आता प्रत्येक कोकणवासीयाने पुढे येण्याची खरी गरज आहे. धनेश मित्र संमेलन हे एक निमित्त आहे. धनेशांच्या निवासांचे संवर्धन करून हे काम थांबणार नसून देवरायांचे रक्षण, उंच झाडांचे रक्षण, धनेशाच्या निवासस्थानांचे रक्षण, धनेशाच्या विषठेत मिळणाऱ्या असंख्य प्रकारच्या बियांपासून विविध रोपांची निर्मिती अशा विविध कामात धनेश मित्रांसह, निसर्गप्रेमींचे हात बळकट करण्यासाठी प्रत्येक कोकणवासीयाने पुढे यायला हवे.

जे. डी. पराडकर ( 9890086086 )

Related posts

स्वतःची स्वतःतील अर्धमाविरुद्ध लढाई

भेंडाघाटचा संगमरवर…

बंदिशीचा रसराज…

Leave a Comment