July 21, 2024
Need for Maha tree conservation for Sahyadri Bhushan Dhanesha
Home » Photos : सह्याद्री भूषण धनेशासाठी महावृक्ष संवर्धनाची गरज
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

Photos : सह्याद्री भूषण धनेशासाठी महावृक्ष संवर्धनाची गरज

आंबा,काजू, रबर लागवडी साठी होणारी जंगली फळे देणार्‍या झाडांची तोड धनेश पक्ष्यांना अन्नासाठी अधिक लांबवर भटकंती करण्यास भाग पाडत आहे. एकंदरीतच सह्याद्रीच्या परिसरात असणार्‍या अधिवासाचे नष्ट होणे या प्रजातींच्या मुळावर उठले आहे. त्यामुळे देवराई संवर्धन, वृक्ष लागवड आणि असणारे महावृक्ष तोडीपासून सुरक्षित करणे हे उपाय तत्परतेने अमलात आणणे हे अत्यंत आवश्यक झाले आहे.

– प्रतिक मोरे

सह्याद्रीच्या जंगलात मनसोक्त भटकंती करत असताना या पर्वतरांगांची जैवविविधता नुसती नजरेस भुरळच घालत नाही, तर संपूर्णतः मंत्रमुग्ध करून सोडते. येथील जंगलं अनेक प्रकारच्या वृक्षवल्ली, निरनिराळे प्राणी, फुलपाखरे आणि सरपटणार्‍या प्राण्यांचे माहेरघर आहेत. मात्र, जे सर्वाधिक मनाला भावते ते म्हणजे येथील पक्षीजीवन. ना ना आकाराचे, रंगांचे आणि अनेक दुर्मीळ पक्षी इथे वास्तव्य करतात. त्यातील काहींचे रंग मन मोहून टाकणारे, तर काहींची वागणूक विलोभनीय. काही जमिनीवर राहणारे, तर काही दाट झाडांच्या पालवी आड लपून वावरणारे, प्रत्येक पाखराची तर्‍हाच निराळी. त्यात कितीतरी रंग, आकार, जाती याची गणनाच नाही. परंतु, मनाच्या कोपर्‍यात कायमचे घर करून राहणारे जे ठरावीक पक्षी आहेत त्यात ’हॉर्नबिल’चा (धनेश) समावेश अगदी सहजतेने होतो.

धनेशाच्या भारतात आढळणाऱ्या जाती

धनेश हा पक्षी केवळ दिसायलाच वेगळा नाही, तर त्याची वागणूकदेखील इतर पाखरांपासून अलहिदा आहे. भारतात या पक्ष्याच्या नऊ जाती आढळतात. श्रीलंकेत सापडणारा ’श्रीलंका राखी धनेश’ जोडला, तर त्यांची संख्या दोन आकडी होते. या नऊ जातींमध्ये राखी धनेश (इंडियन ग्रे हॉर्नबिल), मलबार राखी धनेश (मलबार ग्रे हॉर्नबिल), तपकिरी धनेश (ब्राउन हॉर्नबिल), मलबार धनेश (मलबार पाईड हॉर्नबिल), शबल धनेश (ओरिएंटल पाईड हॉर्नबिल), मोठा धनेश (ग्रेट हॉर्नबिल), विटकरी गळ्याचा धनेश (रुफस नेकेड हॉर्नबिल), नार्कोंडम धनेश (नार्कोंडम हॉर्नबिल) आणि गळपी धनेश (व्रियेथेड हॉर्नबील) यांचा समावेश आहे. ’राखी धनेश’ आपल्याकडे कुठेही दिसतो.

धनेशाचे वास्तव्य

अंगाने राखाडी आणि पहारीसारखी वाकडी चोच ही याची ओळख खूण. एखाद्या बागेत किंवा रस्त्याकडेच्या वड वा पिंपळाच्या झाडावर फळे पिकली की, हा हमखास तिथे हजेरी लावतो. याचाच भाऊ शोभावा असा ’मलबार राखी धनेश’ रंगाने करडाच असला तरी, जरासा गडद असतो. चोच चांगली जाडजूड असते. हा धनेश सह्याद्री पर्वतरांगेत अगदी केरळपर्यंत दिसून येतो. असाच दिसणारा आणखी एक धनेश म्हणजे ’शबल धनेश.’ याचा वावर उत्तर आणि उत्तर-पूर्व भारतातील हरियाणा, उत्तराखंड, बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड, आसाम आदी राज्यांत आहे. पूर्व घाटातील अरण्यातही हा दिसतो.

धनेशाची शिंगासाठी शिकार

भारतातील सगळ्यात मोठा ’मोठा धनेश’ हा अत्यंत देखणा असतो. आकाराने जवळपास गिधाडांएवढा असणारा हा काळ्या आणि पांढर्‍या रंगाने नटलेला असतो. मान आणि डोक्याचा थोडा भाग भडक पिवळा असतो. चोचीच्या वरचा शिंग चापट आणि जाड असतो. या शिंगाच्या आमिषाने उत्तर-पूर्व भारतात याची अतोनात शिकार झाली. नागालँडमधील आदिवासी या धनेशाचे शिंग पारंपरिक उत्सवामध्ये शिरस्त्राणावर वापरतात. आता अनेक वन्यजीव संस्थांनी त्यांना तसे करण्यापासून परावृत्त करून प्लास्टिकचे शिंग तयार करून दिले आहेत. उत्तर-पूर्व भारतातील अरण्ये ही अनेक धनेशच्या प्रजातीचे वसतिस्थान आहेत. यात ‘तपकिरी धनेश’, ‘व्रियेथेड धनेश’ आणि ‘विटकरी’ मानेचा धनेशाचा समावेश आहे. इथल्या जाड पानांमुळे अत्यंत घनदाट अरण्यातील उंच वृक्ष हे या धनेशांच्या घरट्यांसाठी आदर्श ठरतात. ‘नार्कोंडम धनेश’ हा दुर्मीळ धनेश केवळ अंदमान-निकोबार बेटांच्या ‘नार्कोंडम’ आणि अंदमान बेटांवरच आढळतो.

हेलिकॉप्टरसारखा आवाज अन् गोंगाट

धनेश कूळ बर्‍यापैकी मोठे, तर आहेच परंतु अतिशय लोकप्रियसुद्धा. यांच्या पंखांचा उडताना येणारा आवाज, झाडावर बसलेले असताना गोंगाट करण्याची सवय, देवराया, फळबागा इथे असणारा वावर आणि वड, पिंपळ, उंबर अशा देववृक्षांची फळे खाण्यासाठी यांची चाललेली अहमहमिका यामुळे बहुतांशी सामान्य लोकांनासुद्धा धनेश पक्षी बर्‍यापैकी माहीत असतात. भेर्ली माडाचे घोस बहरले की त्यांची फळं खाण्यासाठी दूरदूरवरून हेलिकॉप्टरसारखा आवाज करत हे पक्षी दाखल होतात आणि आपल्या गोंगटाने आसमंत गाजवून सोडतात.

’फिग’ प्रजातींची फळे शोधणे हा दिनक्रम

भेरली किंवा सुरमाडाशी असलेल त्यांच दृढ नातं एवढ प्रसिद्ध आहे की ‘महाधनेशा’ला तळ कोकणात ‘माडगरुड’ या नावानेच ओळखले जाते. ‘शिंगचोच्या’, ‘धनेश’, ‘ककणेर’, ’गरुड’ अशा अनेक नावांनी ’हॉर्नबिल’ पक्षी स्थानिक भाषेत ओळखले जातात. लोकजीवनातही चांगले स्थान असल्यामुळे अनेक भागात यांची हत्या आणि शिकार होऊ नये म्हणून लोक प्रयत्नशील असतात. दिवसाला काही किलोमीटर परिघात उड्डाण करून जंगलात बहरलेली ’फिग’ प्रजातींची फळे शोधणे हा यांचा दिनक्रम. अगदी पहाटेची किरणे पृथ्वीस स्पर्श करत असताना धनेशांचा दिवस सुरू होतो. विश्रांती स्थान असणार्‍या झाडावरून पंख आणि चोची साफ करत झुंजूमुंजू होत असताना धनेश उड्डाण करतात. मग दिवसभर रसिल्या फळांचा आनंद घेणं, कदाचित छोटे पक्षी, सरडे, साप यांचासुद्धा आस्वाद धनेश घेतात. ‘महाधनेश’ हा बहुतांशी फलाहारी आहे, तर ‘मलबारी धनेश’ मात्र संधीसाधू शिकारी. अगदी लहान पक्ष्यांची अंडी, उंदीरसुद्धा यांच्या भक्ष्यस्थानी पडतात. जंगली उंबर, धेंड उंबर, पिंपळ अशी फळे खाऊन त्यांच्या बिया विष्ठेतून सर्वदूर पोहोचवण्याचे काम या धनेश प्रजाती इमानइतबारे वर्षानुवर्षे पार पाडत आहेत. त्यामुळे सह्याद्रीच्या जंगलांचे हे निर्माते खर्‍या अर्थाने जंगलांचे शेतकरी आहेत यात शंका नाही.

विणीच्या हंगामात कळपांचे एकत्रीकरण

‘हॉर्नबिल’ सर्व पक्ष्यापासून विलोभनीय आणि विस्मयकारी बनवणारी गोष्ट मात्र वेगळीच आहे, ती म्हणजे यांचे पुनरुत्पादन. विणीचा हंगाम जवळ आला की, ‘महाधनेश’, ‘मलबारी धनेश’ आणि ‘मलबार राखी धनेश’ यांचे कळप काही ठरावीक ठिकाणी मोठ्या संख्येने एकत्रित आलेले दिसतात. या अशा एकत्र जमण्याला ‘एकत्रीकरण’ असे म्हणतात. यामध्ये अनेक तरुण धनेश नर-मादी एकमेकाला भेटतात आणि पसंत करतात. काही वेळा नरांमध्ये शिंग एकमेकांवर आपटत होणारे हवाई युद्धसुद्धा अनुभवायला मिळते. जोडी जमल्यानंतर ‘महाधनेश’ नर-मादी काही वेळा हवाई कसरतीसुद्धा करत असल्याचे निदर्शनाला आले आहे. एखाद्या दरीतून उंच झेपावत उंची गाठत तेवढ्याच वेगाने कसरती करत खाली येणे असे हे नृत्य पाहण्यासाठी नशीब बलवत्तर असायला हवे. नंतर जमलेली जोडी प्रणयाराधनाच्या तयारीला लागते. यात महत्त्वाची पायरी म्हणजे झाडांचा शोध. नेहमीच्या विश्रांतीस्थानापेक्षा घरटे तयार करण्यायोग्य ढोली मिळणे हे खूप अवघड काम. नर-मादी जोडीने झाडं, राया फिरत अशी झाडे एकदा नजरेखालून घालतात आणि त्यातील एखादे ढोली असणारे झाड पसंत करतात. अनेकदा ही झाडे मानवी वस्तींपासून अगदी जवळ, काही तर अगदी घराशेजारी किंवा देवळाशेजारी असल्याची दिसून येतात. कदाचित मानवी हस्तक्षेपामुळे घटणारी नैसर्गिक शत्रूंची संख्या आणि फळे देणारी झाडे जवळ असणे या कारणाने मानवी शेजार धनेश पक्षी जवळ करत असावेत, असा अंदाज आहे.

धनेशाचे मिलन

‘महाधनेश’ मुख्यतः बेहडा, काटेसावर किंवा शेवर, आंबा, सप्तपर्णी आणि जंगली भेंडी अशी झाडे ढोलीसाठी निवडतो, तर ‘मलबारी धनेश’सुद्धा प्रामुख्याने बेहडा, आंबा अशा झाडांना प्राथमिकता देतो, असे आढळले आहे. त्यामानाने ’ग्रे हॉर्नबिल’ यांना लागणारी ढोली आकाराने खूप छोटी असते. त्यामुळे ’ग्रे हॉर्नबिल’ची घरटी अगदी रस्त्याकडेलासुद्धा दिसून आली आहेत. ढोली असणारे झाड पसंतीस पडले की, मग नर आणि मादी एकमेकांच्या सहवासात त्या झाडावर वस्ती करतात. नर दूरवरून अगदी प्रेमाने रंगीत आणि रसरशीत फळे शोधून आणतो आणि आपल्या गळ्यातून एक एक फळ बाहेर काढत मादीला भरवतो. या दोघांमध्ये उत्कट प्रेमाने चालणारी ही ’कोर्टशिप’ जोरजोराने पंख फडफडवत मिलनामध्ये रूपांतरित होते. काहीच क्षण चालणारे हे मिलन झाले की, मग मात्र सुरुवात होते ती एका त्यागपर्वाची. मादी निवडलेल्या झाडाच्या ढोलीत जाते आणि स्वतःला बंद करून घेते. नर ठिकठिकाणाहून मातीची ढेकळे गोळा करून आणतो आणि ढोलीमध्ये टाकतो. त्याची माती लाळेत भिजवून, फळांचे रस आणि विष्ठा यांच्या एकत्रित मिश्रणाने ढोलीचे तोंड मादी फक्त आपली चोच बाहेर येईल एवढी जागा ठेऊन लिंपून टाकते. या बंदिवासाच्या काळात मादीला अन्न पुरवण्याची संपूर्ण जबाबदारी ही नर उचलतो. मादी स्वत:ला पूर्णतः बंदिस्त करून घेते. अगदी विष्ठासुद्धा ढोलीतून बाहेर उडवते.

धनेशांचे जीवनचक्र

‘महाधनेश’ मादी एक ते दोन अंडी देते, तर ‘मलबारी धनेश’ मादी चारपर्यंत अंडी देते. ‘मलबारी धनेशा’चा अंडी उबवण्याचा कालावधी हा 30 दिवस, तर ‘महाधनेशा’चा कालावधी 45 दिवसांपर्यंत असतो. ‘मलबारी धनेशा’चा विणीचा हंगाम हा मार्च एप्रिल ते जुलै, तर ‘महाधनेशा’चा जानेवारी ते मेपर्यंत असतो. अंडी उबवून पिल्ले बाहेर आली की मात्र नराची धावपळ उडते. मादी आणि पिल्लू या दोघांच्याही पालनपोषण करण्याची जबाबदारी नर अगदी इमानइतबारे पार पाडतो. विणीच्या हंगामात त्याला चढलेला सोनेरी साज आता गळून गेलेला असतो. मादीसुद्धा बंदीवासात मिळणार्‍या अपुर्‍या खाण्यामुळे अगदी कृश झालेली असते. पिल्लू जरा मोठे झाले की, मग मातीचे लिंपण फोडून मादी बाहेर येते आणि पिल्लू आणि मादी मिळून पुन्हा ढोलीचे तोंड लिंपून टाकतात. अशाप्रकारे स्वतःला बंदिस्त करून घेऊन भक्षकापासून संरक्षण मिळवण्याची ही पद्धती उत्क्रांती पर्वातील एक महत्त्वाचा टप्पा मानला पाहिजे. यानंतर मात्र नर आणि मादी दोघे मिळून पिल्लाला भरवतात, या काळात पिल्लाची झटपट होणारी वाढ आणि प्रथिनयुक्त आहाराची असणारी गरज लक्षात घेऊन मांसाहारसुद्धा यांच्या आहारात समाविष्ट होतो. लहान पक्षी, त्यांची पिल्ले, अंडी, सरडे, उंदीर हे प्रामुख्याने या आहारात समाविष्ट असतात. साधारण महिना भराच्या कालावधी नंतर पंखांची वाढ झालेले आणि डोक्यावर शिंग नसणारे पिल्लू ढोलीतून बाहेर येते. मात्र साधारण वर्षभर नर आणि मादी दोघेजण आपल्या संरक्षणामध्ये या पिल्लाचे पालनपोषण करतात. असे अतिशय वेगळ्या आणि अविस्मरणीय प्रसंग डोळ्यासमोर उभे करणारे धनेशांचे जीवनचक्र अगदी आपल्या शेजारी वर्षानुवर्षे सुरू आहे.

’हॉर्नबिल’चे अस्तित्व धोक्यात

अलीकडच्या काळात मात्र देवरायांची होणारी तोड, विकासाच्या भक्ष्यस्थानी पडलेले पुरातन महावृक्ष, फळबागा आणि शेतीसाठी होणारी वृक्षतोड, रस्त्यांसाठी तोडले जाणारे वड,पिंपळ अशा अनेक कारणांनी ’हॉर्नबिल’चे अस्तित्व धोक्यात आले आहे. बेहडा, शेवर इत्यादी वृक्ष लाकडासाठी मोठ्या प्रमाणात तोडले जातात. त्यामुळे ढोली असणार्‍या वृक्षांची घटणारी संख्या ही धनेश प्रजाती समोर उभे ठाकलेले आताचे सर्वात मोठे संकट आहे. याचबरोबर आंबा,काजू, रबर लागवडी साठी होणारी जंगली फळे देणार्‍या झाडांची तोड धनेश पक्ष्यांना अन्नासाठी अधिक लांबवर भटकंती कर ण्यास भाग पाडत आहे. एकंदरीतच सह्याद्रीच्या परिसरात असणार्‍या अधिवासाचे नष्ट होणे या प्रजातींच्या मुळावर उठले आहे. त्यामुळे देवराई संवर्धन, वृक्ष लागवड आणि असणारे महावृक्ष तोडीपासून सुरक्षित करणे हे उपाय तत्परतेने अमलात आणणे हे अत्यंत आवश्यक झाले आहे.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

रस्ते, रहदारी आणि पर्यावरण !

सागरी उष्णता कालावधी वाढल्याचा मान्सूनवर परिणाम

गूढ आणि वलयकारी ब्लॅक पँथर

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading