दरवर्षी हजारो पर्यटक धामापूरला येऊन तलाव आणि भगवतीचं मंदिर बघून भारावून जातात. पण याच ठिकाणी आणखी एक अद्भुत ठिकाण आहे, तेही भगवती मंदिरापासून अवघ्या ५० पावलांवर हे कोणाच्याही गावी नसतं.
सतीश लळीत, सिंधुदुर्ग.
आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातला धामापूर तलाव, तिथलं भगवती मंदिर प्रसिद्ध आहे. धामापूर तलावाचं बांधकाम विजयनगर साम्राज्याचे मांडलिक राजे नागेश देसाई यांनी सन १५३० साली केले. या तलावाची उंची ३६ फूट आणि लांबी ८८९ फूट आहे. ५५ एकरात पसरलेल्या या तलावाची सर्वाधिक खोली ३७.५ फूट आहे. देशातील उत्कृष्ट जैवविविधतासंपन्न अशा पाणथळ जागांपैकी ही एक आहे. युनेस्कोच्या धर्तीवर इंटरनॅशनल कमिशन ऑन इरिगेशन ॲण्ड ड्रेनेज (ICID) तर्फे दिला जाणारा ‘वर्ल्ड हेरिटेज इरिगेशन साईट २०२०’ हा सन्मान तालुक्यातील ऐतिहासिक धामापूर तलावाला मिळाला आहे. संपूर्ण जगात अशा १२१ साईट्स (जागा) आहेत. भारतामध्ये अशा एकूण १० जागा आहेत.
दरवर्षी हजारो पर्यटक धामापूरला येऊन तलाव आणि भगवतीचं मंदिर बघून भारावून जातात. पण याच ठिकाणी आणखी एक अद्भुत ठिकाण आहे, तेही भगवती मंदिरापासून अवघ्या ५० पावलांवर हे कोणाच्याही गावी नसतं. भगवती मंदिराच्या बरोबर मागे एक छोटीशी घरासारखी दिसणारी चिरेबंदी कौलारु इमारत आहे. पण ते घर नसून नारायणाचं मंदिर आहे. अत्यंत मोक्याच्या ठिकाणी असलेल्या या दुर्लक्षित मंदिरात नारायणाची (विष्णुची) काळ्या पाषाणातील अत्यंत सुंदर साजिरी स्थानक (उभी) मूर्ती आहे. या चतुर्भूज मूर्तीच्या पुढील उजव्या हातात शंख, पुढील डाव्या हातात चक्र आहे. मात्र मागील दोन्ही हातात गदा दाखवून मूर्तीकारानं कोडं घातलं आहे. खरंतर एका हातात मूर्तीशास्त्राप्रमाणे कमळ हवं. पण इथे दोन गदा बघायला मिळतात. मूर्ती सालंकृत असली तरी मोजकेच दागिने आहेत. दाक्षिणात्य पद्धतीचा शिवलिंग स्वरुपाचा मुकुट, कानात कुंडलं, मागे ठळक नक्षीदार उठावाची प्रभावळ, हातात कंकणं, दंडावर बाजूबंद, गळ्यात मोजक्याच दोन माळा, (मात्र कौस्तुभमणी नाही.) उदरबंध, रुंद कटीबंध, उजव्या बाजूला गरुड, डाव्या बाजूला लक्ष्मी अशी ही मूर्ती आहे.
मूर्तीकारानं शास्त्रानुसार ती का बनवली नाही, असा प्रश्न पडतो. कदाचित तो नवखा असावा. मंदिर अत्यंत साधं आणि त्यामुळेच सुंदर आहे. इथे प्रगाढ शांतता असते. काही असो, मूर्ती शास्त्राप्रमाणे नसेलही, पण सुरेख निश्चितच आहे.
सतीश लळीत, सिंधुदुर्ग.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.