April 18, 2025
Flight and the Human Dream Article by VN Shinde on Aviation History
Home » जग जवळ आणणारे विमान !
संशोधन आणि तंत्रज्ञान

जग जवळ आणणारे विमान !

विमानाने प्रवास गतीमान केला. काही दिवसांचे अंतर काही तासांवर आले. वेगवान विमानाची निर्मिती करत आवाजाच्या वेगापेक्षा जास्त वेगवान विमाने तयार झाली. रॉकेट तंत्रज्ञान विकसीत झाले. जग जवळ आले. तरीही मानवाचे पक्ष्यासारखे उडणे अजूनही स्वप्नच आहे.

डॉ. व्ही. एन. शिंदे,
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर

लहानपणी खेड्यातील वातावरण खूप छान होते. एखाद्या मंदिरात रामायण किंवा रामविजय ग्रंथाचे वाचन सुरू असायचे. त्यामध्ये मारूती अर्थात हनुमान जन्मल्या बरोबर हवेत उड्डाण घेतो. उगवत्या सूर्याला फळ समजून पकडायला जातो. त्यानंतर सीतेचा शोध घेण्यासाठी समुद्रावरून उड्डाण करतो. त्याहीपेक्षा भारी असायचे लक्ष्मणाला शक्तीमुळे आलेली मुर्च्छना घालवण्यासाठी संजिवनी हवी असते. ती आणण्यासाठी हनुमानाने रातोरात केलेले उड्डाण आणि अख्खा द्रोणागिरीच उचलून आणणे. हे ऐकताना आपल्यालासुद्धा हवेत उडायला यायला हवे, असे वाटायचे. फक्त भारतातील नाही तर जगभरातील पुराण कथांमध्येही हवेत उडण्याच्या अनेक कथा भेटतात. रामायणात तर पुष्पक विमानाने राम अयोध्येला परतले असे वर्णन येते. आणखी एक दंतकथा महाराष्ट्रात आहे, ती म्हणजे संत तुकोबा पुष्पक विमानाने सदेह वैकुंठाला गेले. असे विमानाचे अनेक दाखले भेटतात. पण बालपणापासून प्रत्येक लहान मुलाला वाटत असते, किती छान झाले असते, उडता आले असते तर…

अशीच स्वप्न पडायची अनेक संशोधकांना. अगदी सुरुवातीपासून पडायची. त्यांनी यासाठी प्रयत्न केले. अरब विचारवंत अब्बास इब्न फिरनस याला नवव्या शतकात असे यंत्र बनवावे असे वाटे. पुढे अकराव्या शतकात इंग्रज धर्मगुरू इलिमर ऑफ माल्मसबरी यांने असे यंत्र बनवले. त्यांचे विमान उडाले नाही, पायलट मात्र जखमी झाले. पुढे लिआनार्डो दा विंची यांने पक्ष्यांच्या पंखांचा अभ्यास करून असे यंत्र बनवण्याचा प्रयत्नही केला. पुढे १७९९ मध्ये जॉर्ज केले यांने प्रथमच स्थिर पंखांचे उड्डाण करू शकणारे यंत्र बनवण्याचे प्रयत्न केले. १८५३ मध्ये त्यांने वजन घेऊन जाणारे विमान नाही, पण ग्लायडर तयार केले. त्यानंतर अवघ्या तीनच वर्षांत फ्रेंच संशोधक जीन मारी ले ब्रीस यांने आधिक शक्तीशाली असे ग्लायडर बनवले. या ग्लायडरला सुरुवातीला गती देण्यासाठी घोड्यांचा वापर करत. अमेरिकन संशोधक जॉन जे मोंटोग्मोरी यांनी आणखी जास्त अंतर कापणारे ग्लायडर तयार केले.

पुढे यंत्रशक्तीचा शोध लागला. यंत्रशक्तीचा अधिक प्रभावी वापर सुरू झाला. यंत्रशक्तीचा वापर करून सर हिराम मॅक्झीम यांनी साडेतीन टन वजनाची विमानासारखी रचना तयार केली. पहिल्या प्रयोगात अपयश आल्याने त्यांनी या क्षेत्रातील कार्य थांबवले. पुढे ऑटो लिंलनथल यांनी शास्त्रशुद्ध प्रयत्न केले. १८९१ मध्ये यंत्रशक्तीच्या सहाय्याने ग्लायडरमधून मानवी प्रवास करण्यात आला. यातून मानवाला विमान बनवता येणे शक्य असल्याचे वाटू लागले. १८९० मध्ये पतंगासारखी रचना करून लॉरेन्स हरग्रेव्ह यांनी त्यासह मानवी उड्डाण केले. फ्रेंच संशोधक क्लेमंट ॲडर यांनी शक्तीशाली रचना बनवली. तेथून पुढे विमान बनवण्यासाठी गतीने प्रयत्न सुरू झाले. अनेक संशोधक संशोधन करत होते. ते प्रसिद्धही करत होते.

यातील महत्त्वाचे नाव म्हणजे सॅम्युएल पिअरपाँट लँगले. १८९१ मध्ये त्यांनी या विषयावर पहिला शोधनिबंध प्रसिद्ध केला. या शोधनिबंधामध्ये त्यांनी विमानाची रचना कशी असेल, याचे सविस्तर विवेचन केले होते. किती हॉर्सपॉवरचे यंत्र वापरले, तर किती वजन उचलले जाते, हे देखील नमुद केले होते. पुढे १८९३ मध्ये हवेचा रोध, वाऱ्याची दिशा याचा यंत्रावर कसा परिणाम होतो, यावर भाष्य केले. त्यांनी आपल्या संशोधनानुसार विमानाची निर्मिती केली. त्याचे १८९६ मध्ये प्रथम उड्डाणही केले. त्यांनी अनेक प्रयत्न करून सहावे यंत्र बनवले. ते हवेत उडवले. साधारण ३००० फुट उड्डाण केल्यानंतर ते कोसळले. त्यानंतर १८९८मध्ये त्यांनी अमेरिकन सरकारसाठी मानवासह उड्डाण करू शकेल, असे विमान बनवण्यासाठी कार्य करायला सुरुवात केली. मात्र ‘सरकारी काम आणि सहा महिने थांब’, या वृत्तीमुळे कामाचा वेग कमी होता. परिणामी लँगलेंना मानवासह उड्डाण करणाऱ्या विमानाचे श्रेय मिळू शकले नाही.

तिकडे अमेरिकेतच राईट बंधू असे विमान बनवण्याच्या कार्यात मग्न होते. लोकांना त्यांचे प्रयोग वेडगळपणाचे वाटत होते. ऑर्विल राईट आणि विल्मर राईट यांनी बनवलेले विमान हे लँगले यांच्या संशोधनातील रचनेप्रमाणे होते. स्मिथ्सोनियन संस्थेने लॅंगले यांच्या उड्डाण यशस्वितेबद्दल आयोजित कार्यक्रमास ते उपस्थित होते आणि त्यांना लँगले यांनी मानवविरहीत यंत्र काही सेकंद का होईना हवेत उडवल्याचे माहीत होते. त्यांनी लँगले आणि अन्य संशोधकांचे कार्य, शोधनिबंध स्मिथ्सोनियन सोसायटीकडून मागवून घेतले. त्यांचा अभ्यास सुरू केला. या दोघांचेही फारसे शिक्षण झालेले नव्हते.

ऑर्विल छपाई मशिनवर कार्य करायचे. त्यांनी वर्तमानपत्रही सुरू केले होते. विल्मर हे आई-वडिलांच्यासह राहिले. त्यांचेही शालेय शिक्षणच झाले होते. मात्र त्यांचे वाचन अफाट होते. हवेतून उडण्याची कल्पना त्यांच्या मनात आली आणि विविध संशोधकांच्या कार्याचा अभ्यास करून त्यांच्या प्रयोगातील त्रुटी दूर करत आपली रचना बनवण्यास सुरुवात केली. त्यांनी बनवलेल्या विमानाची रचना ही अगदी लँगलेंच्या वर्णनाप्रमाणे होते, अगदी लांबी, रूंदी, उंची, वजनासह. मात्र त्यांच्या यशावेळी व्यक्त केलेल्या भाषण, लेखनामध्ये त्यांनी कोणत्याही संशोधकाचे कार्य आपण वापरल्याचे स्पष्टपणे कोठेही म्हटलेले नाही.

सन १८९९ पासून त्यांचे प्रयत्न सुरू झाले. त्यांनी सुरुवातीला पाच फूट लांबीचे विमान बनवले. पुढच्याच वर्षी त्यांनी हवामानाची अचूक माहिती मिळत असल्याने नॉर्थ कॅरोलिना भागात किट्टी हॉक येथे स्थलांतर केले. वर्षभरात त्यांनी मनुष्यविरहीत यंत्राचे उड्डाण केले. त्यानंतर काही महिन्यात पायलट सुरक्षित कशा पद्धतीने राहू शकेल, याचा शोध घेऊन रचनेत बदल केले. १९०१ मध्ये रचना सुधारीत केली. १९०२ सालापर्यंत विमान तयार झाले. तरी त्याला ग्लायडर असेच म्हटले जात होते. सगळ्या भागांची निर्मिती राईट बंधूच करत. त्यांचे सैद्धांतिक मांडणी करणारे संशोधन निबंध लिहिणे आणि प्रकाशित करणेही सुरू होते. अखेर १४ डिसेंबर १९०३ रोजी पहिले उड्डाण केले. मात्र ते अयशस्वी झाले. यंत्रणेत आवश्यक बदले करून १७ डिसेंबर रोजी यशस्वी उड्डाण झाले आणि विमानाचे युग अवतरले.

विमानाने प्रवास गतीमान केला. काही दिवसांचे अंतर काही तासांवर आले. वेगवान विमानाची निर्मिती करत आवाजाच्या वेगापेक्षा जास्त वेगवान विमाने तयार झाली. रॉकेट तंत्रज्ञान विकसीत झाले. जग जवळ आले. तरीही मानवाचे पक्ष्यासारखे उडणे अजूनही स्वप्नच आहे. आजही प्रियेला आपल्या प्रियकराला भेटावसे वाटते, मात्र तो दूर आहे, त्यामुळे त्याला भेटू शकत नाही. तेव्हा ती म्हणते, ‘पंख होते तो उड आती रे रसिया ओ जालिमा’


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading