- महाराष्ट्रातील ‘घडवलेले’ राजकारण लोकसभा डोळ्यासमोर ठेवूनच : पृथ्वीराज चव्हाण
- सरहद संस्थेतर्फे माजी राजदूत नवतेज सरना यांना संत नामदेव राष्ट्रीय पुरस्कार प्रदान
पुणे : आज महाराष्ट्राच्या राजकारणाची काय दशा झालेली आहे ती पाहता खरोखरीच चिंता वाटते. कारण राज्याचे राजकारण देशाला दिशा देणारे असते. येणाऱ्या काळात २०२४ साली लोकसभेच्या होऊ घातलेल्या निवडणुकांवर परिणाम व्हावेत म्हणूनच महाराष्ट्रातील राजकारण घडवण्यात आलेले आहे, असे स्पष्ट प्रतिपादन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
‘सरहद, पुणे’ या संस्थेच्या वतीने देण्यात येणारा संत नामदेव राष्ट्रीय पुरस्कार भारताचे अमेरिकेतील माजी राजदूत नवतेज सरना यांना आज पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. संत नामदेवांची मूर्ती, सन्मानपत्र आणि एक लाख रुपये रोख असे पुरस्कराचे स्वरूप होते. या प्रसंगी व्यासपीठावर सकाळ वृत्तपत्र समूहाचे समूह संपादक श्रीराम पवार, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर, मुख्य संयोजक संतसिंग मोखा, ज्येष्ठ वात्रटिकाकार रामदास फुटाणे, ‘सरहद’चे संस्थापक संजय नहार, अरुण नेवासकर उपस्थित होते.
पृथ्वीराज चव्हाण पुढे म्हणाले, लोकशाही आणि घटना यांना धोका निर्माण होण्याची परिस्थिती आपल्या आजुबाजूला निर्माण होते आहे अशा परिस्थितीत दोन राज्यांमध्ये दुवा निर्माण करणारे असे कार्यक्रम आशा निर्माण करतात. एकूणच आंतरराष्ट्रीय पटलावर भारताचा प्रभाव वाढतो आहे. त्याचप्रमाणे संघर्षही वाढतो आहे. भारत-चीन संघर्ष वाढत असून उद्या चीनमधील ‘सप्लाय चेन’ तुटली तर भारत त्याची जागा घेऊ शकेल का हे चिंतेचे वातावरण निर्माण झालेले आहे. या सगळ्या अस्थिरतेच्या वातावरणात ‘सरहद’ सारख्या संस्था जम्मू-काश्मीर, पंजाब आणि आता मणीपूरमध्ये जे काम करीत आहेत ते खरोखरीच कौतुकास्पद आहे. दोन राज्यांना जोडण्यासाठी राजदूत म्हणून उत्कृष्ट काम केलेल्या आणि त्याचवेळी लेखनामध्ये रमलेल्या पंजाबच्या सुपूत्राचा सार्थ गौरव पुरस्काराच्या रुपाने करण्यात आलेला आहे.
प्रास्ताविक संजय नहार यांनी केले. मनिषा आपटे यांनी सूत्रसंचालन केले. शैलेश वाडेकर यांनी आभार मानले. या प्रसंगी चरणजीतसिंह साहनी, युवराज शहा, डॉ. शैलेंद्र पगारिया, सुरेंद्र वाधवा, अनुज नहार आदी उपस्थित होते. धनश्री निगलीकर यांनी संत नामदेव महाराज यांची रचना सादर केली.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.