July 27, 2024
importace of holy Place article by Rajendra Ghorpade
Home » तीर्थक्षेत्रास इतके महत्त्व का?
विश्वाचे आर्त

तीर्थक्षेत्रास इतके महत्त्व का?

तीर्थक्षेत्रांचाच हट्ट का? त्याऐवजी गडावर गेले तर चालणार नाही का? काही नास्तिक हा प्रश्न जरूर विचारू शकतात? कारण आजकाल बऱ्याचशा तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी श्रद्धेपेक्षा लूटच सुरू आहे. श्रद्धेचा गैरफायदा घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे. दर्शनाच्या रांगेत पाकीटचोरही वाढले आहेत. वाढत्या महागाईचा हा परिणाम आहे.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे

मोबाईल – 9011087406

आणि तीर्थे धौतें तटें । तपोवनें चोखटें ।
आवडती कपाटें । वसवूं जया ।। ६११ ।। ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा

ओवीचा अर्थ – आणि तीर्थे, (नदी आणि समुद्र) पवित्र किनारे, तप करण्याच्या शुद्ध जागा आणि गुहा ह्या ठिकाणीं ज्यास राहावयास आवडते.

तीर्थ म्हणजे पवित्र पाणी, तीर्थ म्हणजे पवित्र ठिकाण. भगवंताची, सद्गुरूंची वस्ती जेथे आहे असे ठिकाण म्हणजे तीर्थ. पण या तीर्थस्थानांची यात्रा का करावी? या वास्तू पवित्र आहेत. तेथे गेल्यानंतर मनाची शुद्धता होते. मनामध्ये शुद्ध विचारांचा प्रवाह सुरू होतो. एखाद्या ऐतिहासिक गडावर गेल्यानंतर त्याचा इतिहास आठवताच अंगावर रोमांच उभे राहते. त्या वास्तूशी निगडित इतिहासाने तेथील वातावरणाची निर्मिती होते. मन त्या वातावरणात मिसळते. अंगामध्ये ते गुण जागृत होतात. त्या पराक्रमांनी मनाला स्फुर्ती चढते. उत्साह वाढतो. धैर्य वाढते. अशा वातावरणात पराक्रमांचा पोवाडा ऐकायला मिळाले तर अंगातील रक्त उसळते. त्याच्यात नवचैतन्य उत्पन्न होते. फक्त आपण कोणत्या विचारांनी आपण गडावर गेलो आहोत यालाही महत्त्व आहे.

देवदर्शनाला जातानाही विचार कोणता आहे याला महत्त्व आहे. दैनंदिन जीवनापेक्षा थोड्या वेगळ्या वातावरणात गेल्यावर मनाचा थकवा दूर होतो. मनाला विश्रांती मिळते. प्रसन्नता वाटते. हे खरे आहे. तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी गेल्यावर हा बदल घडणार हे नैसर्गिक आहे. मग तीर्थक्षेत्रांचाच हट्ट का? त्याऐवजी गडावर गेले तर चालणार नाही का? काही नास्तिक हा प्रश्न जरूर विचारू शकतात? कारण आजकाल बऱ्याचशा तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी श्रद्धेपेक्षा लूटच सुरू आहे. श्रद्धेचा गैरफायदा घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे. दर्शनाच्या रांगेत पाकीटचोरही वाढले आहेत. वाढत्या महागाईचा हा परिणाम आहे.

पण पूर्वीच्या काळीही ही लूट सुरूच होती. सध्याच हे घडते असेही नाही. अशा घटनांनी त्या तीर्थक्षेत्राचे महत्त्व बाधित होत नाही. आपण लुटले जाणार नाही, फसणार नाही, इतरांना लुबाडणार नाही अशी मानसिकता ठेवली तर आपण निश्चितच या विचारापासून दूर राहू. देवाचे दर्शन महत्त्वाचे आहे. मग पैसे देऊन झटपट दर्शनाचा का मोह धरावा. देवाच्या इच्छेनुसार दर्शन भेटते, तर मग पैसे देऊन दर्शनाची घाई कशाला? देवाला दर्शन द्यायचे असेल, तर तो जरूर देतो. श्रद्धा ठेवायला हवी. मनाची प्रसन्नता वाढविण्यासाठी आपण हे करत आहोत. हा विचार ठेवायला हवा.

सुख, समाधानासाठी आपण तीर्थक्षेत्री जात आहोत. नाहीतर मग गडावर जाऊनही मन प्रसन्न होतेच ना? ऊर्जा मिळतेच ना? तीर्थक्षेत्रास इतके महत्त्व का हे जाणून घ्यायला हवे. मनातील दुष्ट दूर होऊन चांगला विचार-आचार करण्याचा संकल्प येथे केला जातो. तीर्थाच्या पावित्र्याने आपणही पवित्र व्हायचे असते. त्या शुद्धीत मनसोक्त डुंबायचे असते. मनाच्या शुद्धीने प्रसन्न व्हायचे असते. भक्तीने आत्मज्ञानी होण्यासाठीच येथे जायचे असते. सर्व तीर्थे ज्यामध्ये मिसळलेली आहेत अशा समुद्रात आपण डुबुन मनाची शुद्धी करून घ्यायला हवी. कारण ते सर्वात पवित्र तीर्थ आहे. तिर्थाच्या ठिकाणी जाऊन मनाची शुद्धी करून घेणे गरजेचे आहे. मनातील दुष्ट विचार सोडून देऊन मनाला स्थिर करण्यासाठी आवश्यक स्थिती उत्पन्न करायला हवी. तीर्थाच्या ठिकाणी मिळणाऱ्या उर्जेतून अध्यात्मिक प्रगती करणे गरजेचे आहे. तेच या ठिकाणी जाऊन साधायचे असते.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

अन्नसुरक्षेची बिकटवाट

भारताच्या पूर्व आणि पश्चिम किनार्‍यावरील कांदळवनाच्या काही प्रजाती कमी होण्याची शक्यता

पूर्णब्रह्माचा पुरवठादार शेतकरी

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading